Tuesday, September 27, 2016

उथळ पाण्याला खळखळाट फ़ार

indian TV debates के लिए चित्र परिणाम

गेल्या आठवड्यात कानपूर येथे भारत न्युझीलंड यांच्यातला कसोटी सामना सुरू झाला. नेहमीप्रमाणे मग भारतीय संघाच्या शक्तीचे अनाठायी कौतुक माध्यमातून सुरू झाले होते. पण पहिल्याच दिवशी त्यात काही चमकदार फ़लंदाज ढासळले, तेव्हा भारताच्या हातातून सामना निसटल्याची निराशाजनक भाकिते सुरू झाली. कसोटी सामना मर्यादित षटकांचा नव्हेतर पाच दिवस चालणारा खेळ असतो आणि त्यात दोन्ही संघांना दोन डाव खेळायचे असतात. याचे भान तरी त्याविषयी बातम्या देणार्‍यांनी राखायला हवे. पण भविष्यवाणी आणि बातमीदारी यातली सीमारेषाही ज्यांना उमजलेली नाही, अशा लोकांचा सध्या माध्यमात भरना झालेला आहे. म्हणून मग आता काय घडते आहे, ते सांगण्या लिहिण्यापेक्षा त्याचे भविष्यातील परिणाम कथन करण्याची स्पर्धा चालते. सहाजिकच पहिल्या दिवशीच पाचव्या दिवशी काय निकाल लागेल, त्याची भविष्यवाणी होऊन गेली. न्युझिलंडचा पहिला डावही खेळला गेला नव्हता, तेव्हा भारताच्या हातून सामना निसटल्याचे सांगितले गेले. सुदैवाने जगात किंवा मायदेशीही भारतीय माध्यमांना कोणी गंभीरपणे घेत नाही. म्हणूनच तो सामना पुढले पाच दिवस खेळला गेला आणि सोमवारी प्रचंड फ़रकाने त्यात भारताचा विजय झाला. न्युझिलंडची फ़लंदाजी भारतीय मार्‍यासमोर टिकाव धरू शकली नाही. याला सामान्य भाषेत उथळ पाण्याला खळखळाट फ़ार असेच म्हणतात. हे अर्थातच क्रिकेटपुरते मर्यादित नाही, तर जगातल्या प्रत्येक घटनेविषयी भारतीय माध्यमांचे होत असते. आताही उरी येथील घातपाती हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची भाषा झाल्यापासून, असाच पोरकटपणा माध्यमातून चालू आहे. त्यात ज्यांनी निर्णय घ्यायचे किंवा पाकला धडा शिकवायचा आहे, ते गप्प आहेत आणि माध्यमात मात्र युद्ध जुंपले आहे. त्यात कधी पाकचा पराभव होतो, तर कधी भारताचा पराभव होतो आहे.

घातपाती कृत्य आणि युद्ध यात जमिनअस्मानाचा फ़रक असतो. कुठल्याही युद्धाचा भडका अकस्मात उडत नाही. घातपाती कृत्य करणार्‍यांना युद्धाची तयारी करावी लागत नाही. कारण त्यांना आकस्मिक कृत्ये करायची असतात. युद्ध हे दिर्घकालीन परिणामांचा विचार करून छेडले जात असते. म्हणूनच घातपाती पाकिस्तानी असले म्हणून पाकिस्तान विरोधात हत्यार उपसण्यापुर्वी भारताला शंभरवेळा विचार करणे भाग आहे. कारण घातपाती बेकायदा कृत्य करीत असतात. त्यांचा बंदोबस्त करणार्‍या पोलिसांनाही गोळी घालताना परिणामांचा विचार करावा लागतो. बुर्‍हान वाणी ह्याची चकमकीत हत्या झाली, तो जिहादी होता हे जगजाहिर आहे. पण त्याला मारतानाही कायद्याच्या कसोट्या पार कराव्या लागतात. ही कायद्याने प्रस्थापित झालेल्या कुठल्याही सरकारची अडचण असते. उलट कुठल्याही कायद्याचे बंधन नसलेल्या घातपात्यांना तीच सर्वात मोठी सुविधा असते. ते कायदा जुमानत नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई करणार्‍यांना मात्र कायद्याचे पालन करावे लागत असते. भारत सरकारची ही अडचण ज्यांना कळते, त्यांना चोख उत्तर देण्यातला विलंब किंवा अडचणी कळू शकतात. पण ज्यांना अशा गोष्टीचे गांभिर्य कळत नाही, त्यांना रोज चालणार्‍या चर्चा आणि युद्ध यातला फ़रक ठाऊक नसतो. म्हणूनच मग भारताने शेपूट घातली किंवा ५६ इंच छातीचे काय झाले, असले सवाल विचारले जातात. त्याचे उत्तर देत बसला असता, तर भारतीय कर्णधाराला कानपूर कसोटी जिंकण्याला अवधी मिळाला नसता आणि अशा त्रस्त समंधांचे समाधान करीत मोदी बसल्यास, त्यांना पाकिस्तानचा बंदोबस्त करायला सवड मिळणार नाही. युद्ध हा शेवटचा पर्याय असतो, त्यात हिंसा व विध्वंसापेक्षाही शत्रूचे मनोधैर्य खच्ची करण्याला प्राधान्य असते. खरी तीच रणनिती असते, की ज्याच्या बळावर कमी प्रयासात व कमी वेळेत परिणाम साधला जात असतो.

आपल्याला पाकिस्तानला संपवायचे नसून नामोहरम करायचे आहे. त्याला असे छुपे हल्ले वा घातपात करण्याची हिंमत होता कामा नये, इतके खच्ची करायचे आहे. याचे भान असेल तर युद्ध किंवा चोख उत्तर म्हणजे काय, त्याचा अंदाज येऊ शकतो. पाकला खच्ची करण्याचे विविध उपाय चाचपून बघितले जात आहेत आणि त्याची चाचपणी चालू असताना आपापली अक्कल पाजळणार्‍यांना त्यापैकी काही समजून घेण्याची गरज वाटलेली नाही. आपल्या वाट्याला हा अनुभव मागल्या दोन दशकात येतो आहे. पण इस्त्रायल मागली सत्तर वर्षे त्याच अनुभवातून जात आहे. प्रत्येक युद्धात अरबांना, त्यांच्या सेनेला आणि पॅलेस्टाईनी बंडखोरांना इस्त्रायलने नामोहरम केलेले आहे. पण अजूनही त्यांना संपवून टाकलेले नाही. कारण तसे संपवण्याचा हेतू नसतोच. मात्र अशा प्रत्येक घडामोडीनंतर अरबांना अधिकाधिक खच्ची करण्यात इस्त्रायल यशस्वी झाला आहे. गेल्या चारपाच वर्षात तर आता कोणी पॅलेस्टाईनी समस्येवर सहानुभूतीने बोलायचेही विसरून गेला आहे. शिवाय पॅलेस्टाईनी बंडखोरीतला जोशही मावळून चालला आहे. कारण अशा घटनांना प्रत्युत्तर देताना इस्त्रायलने त्यांना कधीच संपवले नाही, पण पद्धतशीरपणे त्यांना इतके खिळेखिळे करून टाकले, की त्यातून सावरून उभे रहाण्यालाच आणखी चारपाच वर्षे लागली पाहिजेत. असा विचार भारतातल्या आजवरच्या राज्यकर्त्यांनी कधी केलाच नाही. एक इंदिराजी सोडल्यास तशा दिशेने कुठले प्रयासही झाले नाहीत. आज मोदी त्याच दिशेने विचार व चाचपणी करीत असून, त्यातला कुठलाही उपाय धावपळीने व घाईघाईने अंमलात आणला जाऊ शकत नाही. मात्र जो काही उपाय योजला जाईल, त्याचे परिणाम दिर्घकाळ पाकिस्तानला भोगावे लागतील. मग अधूनमधून घडणार्‍या अशा घटनांना कायमचा पायबंद घातला जाऊ शकेल.

सिंधू खोर्‍यातले पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी होऊ शकते, हा विचारही आजवर कधी कोणी ऐकला नव्हता. आज भारतीय वाहिन्यांवर त्याची चर्चा चालू आहे, म्हणून पाकला घाम फ़ुटला आहे. राजनैतिक पातळीवर पाकची कोंडी करण्याचा डाव कधी खेळला गेला नाही. पाकने काश्मिरचे रडगाणे उकरून काढायचे आणि भारताने तिथे राष्ट्रसंघात सारवासारव करायची, इतकीच भारताची रणनिती राहिलेली आहे. प्रथमच जगभरातून पाकिस्तानला एकाकी पडायची वेळ आलेली आहे. अमेरिकेतही पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाकच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा बलुची स्वातंत्र्याचा विषय जगाच्या पटलावर आणला गेला आहे. पाकिस्तानला बचावात्मक पवित्र्यात आणण्याच्या इतक्या खेळी चालू असताना, युद्धानेच उत्तर देण्यासाठी उतावळे होणे शुद्ध मुर्खपणा असतो. प्रेक्षकांना दिपवून टाकणारे चौकेछक्के मारणारा फ़लंदाज किती काळ मैदानात टिकून रहातो? कसोटी खेळणार्‍याला याचे भान राखावे लागते. २०-२० सामन्याप्रमाणे खेळायची घाई विपरीत स्थिती निर्माण करू शकते. प्रथमच घातपाती हल्ल्यानंतर पाकिस्तानला घाम फ़ुटण्यापर्यंत हालचाली झाल्या आहेत आणि कुठल्याही क्षणी भारतीय सैनिक युद्धात उतरतील; या भयाने पाकिस्तान ग्रासला आहे. याचा अर्थ ज्यांना कळत नाही, त्यांना समजावण्यात अर्थ नसतो. त्याची गरजही नसते. त्यापेक्षा जबाबदार आहेत, त्यांनी आपल्या पद्धतीने काम करीत रहावे आणि परिणाम लोकाना दिसतील जाणवतील, इतके काम करावे. सुदैवाने भारतीय जनता माध्यमांप्रमाणे उतावळी किंवा अतिशहाणी नाही, तिला परिणामांशी कर्तव्य आहे. म्हणूनच सावधपणे सामान्य माणुस सरकारी हालचालीवर लक्ष ठेवून आहे. उथळ विवेचनाला त्याने महत्व दिलेले नाही. लौकरच त्याचे समाधान देशाचे नेतृत्व करीलच.

3 comments:

  1. खुप छान !खरच आज गरज आहे मिडीयासाठी cencor ची विशेषत्ःः संंरक्षण बाबतीत.

    ReplyDelete
  2. छानच सुंदर भाऊ,आपल्या सुदैवाने अापले फलंदाज Test.50-50,20-20 मध्ये Expert आहेत व कप्तान हे चहा विकता विकता तिकीट गोळा करता करता accidentally या खेळात आलेतन नुकताच भार सांभाळलेले यांचे शिष्य भन्नाट आहेत Parrikar Virat विशेष शिष्य आहेत

    ReplyDelete
  3. काही दिवसापुर्वीच लोकसत्ता ने पाकिस्तान ची पाणीकोंडि करण्यासाठी अग्रलेखातुन सल्ला दिला होता.

    ReplyDelete