Wednesday, September 7, 2016

शाब्बास! जितेंद्र आव्हाड

awhad के लिए चित्र परिणाम

बुधवारी सकाळी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर अनेक बातम्यांच्या गदारोळात एक ठाण्यातलीही बातमी दाखवली जात होती. अशांत काश्मिर वा आम आदमी पक्षातला धुमाकुळ, अशा गर्दीत ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जाब विचारणार्‍या त्या बातमीचे काय प्रयोजन होते? चित्रण म्हणून जे काही दाखवले जात होते, ते बहुधा रितसर कॅमेराने केलेले नव्हते. कुणाच्या तरी मोबाईलवर चित्रित केलेला तो प्रसंग होता. त्यात एक तरूणी कुणा तरुणाला फ़टाफ़ट थपडा मारून जाब विचारताना दिसत होती. बातमी अशी, की या मवाल्याने आपल्या दोस्तांसह तिला छेडलेले होते आणि बलप्रयोगही केलेला होता. त्यासाठी त्याला जाब विचारण्याची संधी जितेंद्र आव्हाड यांनी दिली. सदरहू वाहिन्यांच्या मते आव्हाड यांनी केलेला तो अक्षम्य गुन्हा होता. कारण त्यांनी त्या मुलीला पोलिस ठाण्यात नेऊन रितसर तक्रार नोंदवायचा सल्ला द्यायला हवा होता. उलट आव्हाड यांनीच त्या मवाल्याला समोर आणून तरूणीला आपला हिशोब चुकता करण्याची संधी दिली. किंबहूना मवाल्याला धोपटून काढत त्याची बेअब्रु करण्याची मोकळीक दिली. याला गुन्हा ठरवून वाहिन्यांच्या उथळ निवेदिका या आमदाराला जाब विचारत होत्या. त्या तरूणीला कायदा हाती घ्यायला प्रोत्साहन देण्यासाठी आव्हाड यांनाच गुन्हेगार ठरवले जात होते. माध्यमांच्या अकलचे दिवाळे किती वाजले आहे, त्याचा यासारखा दुसरा नमूना असू शकत नाही. आव्हाड यांच्याविषयी आम्हाला फ़ार प्रेम नाही. त्यांच्या अनेक थिल्लर कृती व कार्यक्रमाची आम्ही सातत्याने टवाळीच केलेली आहे. पण जिथे या माणसाने जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याची बुज राखली, तिथे त्याची पाठ थोपटतानाही आम्ही कंजुषी करणार नाही. आजवर त्यांनी जे काही केले असेल त्यातले हे सर्वात मोठे पुण्यकर्म वा सामाजिक कर्तव्य आहे, असे आमचे ठाम मत आहे.

गुन्हेगार वा मवाल्यांना कायदा समजत असता आणि कायद्याचा धाक असता, तर मुली महिलांना रस्त्यावर फ़िरताना भिती वाटली नसती. महिला एकाकी असतात व काहीशा लाजाळू संकोची असतात, त्याचाच फ़ायदा घेऊन छेडछाड चालत असते. त्यात पुन्हा कोणी हस्तक्षेप करणार नाही आणि पोलिसात तक्रार दिली, तरी जामिनाचा आश्रय असतोच. थोडक्यात गंमत म्हणून कुठल्याही मुली महिलांच्या इज्जतीशी वा संयमाशी खेळणे, हा अलिकडे सरसकट मामला झालेला आहे. कारण मवाली भुरटे यांना कायद्याचा धाक उरलेला नाही. जिथल्या तिथे आपल्याला कोणी रोखू शकत नाही, हे त्यांच्या आत्मविश्वासाचे कारण झालेले आहे. उलट कायद्याच्या मार्गाने गेले तर जामिनावर सुटणारा गुन्हेगार मवाली, आपल्याला सतत त्रास देण्याच्या भयाने मुली अनेक अत्याचार सहन करीत असतात. यावरचा पक्का व परिणामकारक उपाय म्हणजे अशी हिंमत वा गुन्हेगारी आत्मविश्वासाचे खच्चीकरण होय. ते काम पोलिसात तक्रार देऊन किंवा खटले भरून होऊ शकत नाही. त्यापेक्षा जिथे कुठे अशा घटना घडत असतात वा घडल्याचे कानी येते, तिथेच त्याचा बंदोबस्त होणे अत्यावश्यक झालेले आहे. अशी असंस्कृत वा अशिष्ट कृत्ये करणार्‍या मवाल्यांना चारचौघात वा भर चव्हाट्यावर बेइज्जत करणे वा त्यांचे तोंड काळे करणेच, त्यांच्यातल्या मस्तवालपणाला लगाम लावू शकते. असे कृत्य करणार्‍याला कायद्यानुसार शिक्षा होण्याची गरज नाही, कारण त्यातून मुलीमहिलांसा सुरक्षा मिळत नसते, की त्यांच्यावरील अत्याचाराच्या जखमा भरून येत नसतात. तशा जखमा होऊच नयेत हा उपाय आहे आणि त्यात एका आमदाराने पुढाकार घेतला असेल, तर त्याची पाठ थोपण्यास माध्यमांनी व जाणत्यांनी पुढे यायला हवे. जितेंद्र आव्हाड यांनी तो पुढाकार घेतला असेल, तर त्यांनाच गुन्हेगार ठरवणार्‍यांच्या अकलेची कींव करावी तितकी थोडी आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाचे अनेक आमदार महिलांचे शोषण करतात. मंत्री रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करतो. त्याचे चित्रणही करतो. त्यानंतर पोलिसात जाऊन दाद मागण्याची हिंमत त्या महिलेला होत नाही. ही आजच्या कायद्याच्या नाकर्तेपणाची साक्ष समोर आहे. अशा वेळी एक आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड त्या पिडीत मुलीला मवाल्याशी थेट सामना करण्याला प्रोत्साहन देत असेल तर तो मोठे पवित्र व समाज सुरक्षेचे काम करतोय. इतकेही ज्यांच्या मेंदूत शिरत नाही, त्यांच्या बुद्धीची वैद्यकीय तपासणी करायला हवी. कारण आज महिलांना तक्रार देण्याचीही हिंमत उरलेली नाही. उलट मवाली भुरट्यांना कायद्याची पाठराखण सुरक्षित वाटते आहे. सवाल कायद्याचे पावित्र्य पाळण्याचा नसून मुली महिलांना सुरक्षित वाटण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी योग्य प्रासंगिक उपाय आवश्यक आहेत. आव्हाड यांनी ते प्रसंगावधान राखले आहे. त्यांनी आपण उठून त्या मवाल्याला दोन थपडा लगावलेल्या नाहीत. त्यांनी त्याच मुलीला हिशोब चुकता करण्याला प्रोत्साहन दिले, ही बाब लक्षणिय आहे. त्यातून अशा संकोचून गप्प बसणार्‍या, अकारण तोंड लपवून बसणार्‍या शेकडो मुलींना धाडस देण्याला या आमदाराने हातभार लावला आहे. समाजाने पोलिस व शासकीय यंत्रणेवर अवलंबून रहाणे व संकटकाळी प्रेषिताची प्रतिक्षा करणे; हे स्वतंत्र स्वयंभू नागरिकाचे लक्षण नाही. संकट वा अन्याय होत असेल तिथे पुढाकार घेऊन हस्तक्षेप करणे, हेच कुठल्याही प्रगत सुरक्षित समाजाचे लक्षण असते. तेच काम करण्याला एक आमदार प्रोत्साहन देत असल्यास त्याचे कौतुक करायची दानत हवी. ती नसेल, तर निदान त्यालाच खच्ची करण्याचा दिवाळखोरपणा तरी दाखवू नका. कायदा व सभ्यतेची मक्तेदारी फ़क्त माध्यमांनी घेतलेली नाही. असल्या कायद्यापेक्षा लोकांना म्हणूनच असे आमदार आवडतात. त्यांना लोक निवडून देतात.

आव्हाड यांच्या अनेक कार्यक्रम व भूमिकांची आम्ही नेहमी टिंगल केली आहे. किंबहूना त्यांच्या दहीहंडी सारख्या दिखावू कार्यक्रमाची हेटाळणी केली आहे, शाहू फ़ुले आंबेडकरांचा वारसा चालवणारे असल्याच्या आव्हाडांच्या दाव्यावर आम्ही प्रश्नचिन्ह लावलेले आहे. पण या विषयात त्यांनी जो पुढाकार घेतला, त्याचे कौतुकही करणे भाग आहे. कारण ज्या विचारांचा ते सतत गाजावाजा करतात, त्याची प्रचिती अशा कृतीतून येऊ शकते. याला महिलांचे सबलीकरण म्हणता येईल. एका भयभीत मुलीला, तिच्यातली रणरागिणी जागवायला आव्हाडांचे हे कृत्य उपयुक्त ठरले आहेच. पण ज्यांनी कोणी हा प्रसंग ऐकला वा बघितला असेल, अशा कित्येक मुलींना आता आपणही घाबरून जगण्याची गरज नाही. मवालीगिरी करणार्‍यांना धोपटून काढले पाहिजे, असे वाटले तरी खुप मोठे समाजप्रबोधन झाले म्हणता येईल. महिलांना कायद्याने वा पोलिसांनी संरक्षण देण्यापेक्षा त्यांना स्वसुरक्षा करता आली पाहिजे. त्यांना निर्भयपणे समाजात वावरता आले पाहिजे. त्याची सुरूवात मवालीगिरी करू बघणार्‍यांना भयभीत करणे हीच असू शकते. कुठल्याही समाजप्रबोधनात शासनापेक्षा स्वयंभू नागरिक निर्माण करण्याला प्राधान्य असते आणि मुली महिला सुरक्षेसाठी स्वयंसज्ज होणे, निर्भय होणे हाच एकमेव उपाय आहे. आमदार व लोकप्रतिनिधी त्यासाठी वेळोवेळी महिलांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले तर त्याचा आरंभ होऊ शकेल. आव्हाडांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत केली असेल, तर त्यांची पाठ थोपटणे भाग आहे. किंबहूना अशा वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापले पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आव्हाड यांच्या समर्थनाला पुढे आले पाहिजे. कारण यातूनच समर्थ भारत निर्माण होऊ शकतो. राजकारण अशा विषयातून दूर ठेवले पाहिजे. पुन्हा एकदा, शाब्बास जितेंद्र आव्हाड!

3 comments:

  1. भाऊ मी बातमी बघीतली नाही पण यांचा भुतकाळ पाहता हा पब्लिसिटी स्टंट असुशकतो

    ReplyDelete
    Replies
    1. Agree sadyache rajkarnachi patali divsen divas khalavat chalali aahe he lok kahihi karu shaktat

      Delete
  2. Three cheers for Jitendra Awhad ! आणि भाऊ, आपल्या मनाच्या मोठपणाला सलाम 👍👍

    ReplyDelete