Sunday, September 25, 2016

जागा मराठा आम जमाना बदलेगा

Image result for maratha morcha

साठ वर्षापुर्वी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमाने चालली होती. अवघ्या महाराष्ट्रात तेव्हा शाहिरांचे पोवाडे आणि संघर्ष गीते गाजत वाजत होती. त्यातले शाहीर अमरशेख यांचे हे शब्द आजही कानात घुमतात. अर्थात जेव्हा ते कानी पडले होते, तेव्हा त्याचा अर्थ उमजण्याइतके वय नव्हते. पण महाराष्ट्रासाठी एकवटलेला तमाम मराठी बांधव म्हणजे मराठा इतकेच कळत होते. आमच्यासारखी कोवळ्या वयातली पोरेही तेच शब्द बडबडत असायचो. आज ज्या अर्थाने मराठा शब्दाचा वापर होतो, तो कालपरवापर्यंत ठाऊक नव्हता. गेल्या दिडदोन दशकात ह्या नव्या अर्थाने हा शब्द समोर येत गेला. ज्याला जातीचा संदर्भ आहे. आणि आज जिल्ह्या जिल्ह्यात मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत असताना, प्रथमच राज्यातील या बहुसंख्य समाजाकडे जात म्हणून बघितले जात आहे. मराठ्यांकडे जात म्हणून बघितले जाणे नवे नाही. अलिकडल्या कळात अनेक मराठा संघटना निघाल्या आणि त्यांनी अतिशय आवेशात मराठ्यांचे जातीवाचक संघटन करण्याचा प्रयास केला. पण त्यांना फ़ारसा प्रतिसाद मिळू शकला नव्हता. त्यांच्या आवाहनाला व भूमिकेलाही जात म्हणून मराठ्यांचा लक्षणिय प्रतिसाद मिळू शकला नव्हता. केवळ माध्यमातून त्यांचा खुप गाजावाजा झाला. बहुतेक प्रसंगी हिंसा वा आक्षेपार्ह मजकूर भाषेसाठी अशा संघटनांना प्रसिद्धी मिळाली. पण तुलनेने सामान्य मराठा त्यांच्यापासून मैलोगणती दूर होता. अगदी आरक्षणासारखा जिव्हाळ्याचा विषय असतानाही मराठे अशा संघटना व त्यांच्या आंदोलनापासून दूर राहिले आहेत. असा समाज अकस्मात त्या संघटना व जातीचे प्रस्थापित नेते सोबत नसताना इतक्या मोठ्या संख्येने एकजूट होऊ लागला असेल, तर ती दखल घेण्य़ासारखी गोष्ट नक्कीच आहे. पण जेव्हा अपवादात्मक स्थिती निर्माण होते, तेव्हा अपवाद म्हणूनच तिच्याकडे बघणे व समजून घेणे अगत्याचे असते.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करून गुन्हेगार फ़रारी झाले. हे आरोपी दलित असल्याचे लक्षात आल्यावर सर्वत्र गदारोळ झाला. त्याची प्रतिक्रीया म्हणून हे मोर्चे निघत असल्याचा दावा आहे. पण त्यातील उपरोक्त घटना केवळ निमीत्त मात्र आहे. ज्या देशात व महाराष्ट्रात अशा घटना नव्या नाहीत, तिथे एका घटनेचा इतका जोरदार प्रतिवाद करायला एका जातीचे लोक अशा मोठ्या संख्येने का जमतात? त्यामागची मानसिकता लक्षात घ्यायला हवी. तसे जातीय प्रयत्न आजवर फ़सलेले असताना अकस्मात हा प्रतिसाद येण्याला काही वेगळे कारण असले पाहिजे. त्यातही पुन्हा याची तुलना गुजरातच्या पाटीदार आंदोलनाशी होऊ शकत नाही, किंवा राजस्थान हरयाणाच्या जाट समुदायाशी होऊ शकत नाही. कारण त्यांनीही आरक्षणासाठी आंदोलन छेडलेले असले तरी त्याला हिंसक वळण लागलेले होते. त्यात नावाजलेल्या जाती नेत्यांचा पुढाकार होता. पुर्वतयारीही खुप होती. इथे अकस्मात मराठ्यांचे मोर्चे निघू लागले आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघून जातीचे प्रस्थापित नेतृत्वही गडबडून गेले आहे. दुसरी अत्यंत लक्षणिय बाब म्हणजे ह्या मोर्चामध्ये कुठल्या घोषणा नाहीत की कोणाचा झिंदाबाद मुर्दाबाद नाही. किंबहूना हे मोर्चे मूक आहेत. ही बाब महत्वाची आहे. ते मोर्चे कुणा मध्यवर्ति संघटनेच्या आदेश व कार्यक्रमानुसार निघालेले नाहीत. त्या त्या जिल्ह्यातील काही लोक पुढाकार घेतात आणि त्यांच्या नियोजनासाठी बैठका होऊन तारीख ठरवून जमवाजमव सुरू होते. मात्र प्रतिसाद अफ़ाट व डोळे दिपवणारा आहे. नुसती संख्या दाखवून आपल्या शक्तीचा व भावनांचा अविष्कार घडवण्याची ही कल्पना कोणाची माहिती नाही. पण ती घडताना बघितली आणि अमरशेखांचे ते शब्द आठवले. ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा.’

हा काही वेगळा प्रकार आहे. मराठा जागा होत असल्याची चाहुल आहे. पण मराठा त्यातून जागा होत असेल, तर आजवर झोपा काढत होता काय, असाही प्रश्न विचारणे भाग आहे. किंबहूना तोच खरा प्रस्थापितांना भेडसावणारा प्रश्न आहे. विविध भव्य फ़लकावर पत्रकांवर त्यामागची भूमिका स्पष्ट होते. महिलांचा त्यातला सहभाग चकीत करणारा आहे. पण तो अघोषित आवाज जातीचा भासल्याने अनेकांना भयभीत केले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आजवर जातीसाठी न्याय मागणारे असे कार्यक्रम वा आंदोलने झाली. त्याचेच निकष लावून या मोर्चाकडे बघितले जात आहे. इतर प्रत्येक जातीला न्यायासाठी संघटन व आंदोलन करण्याचा अधिकार असेल, तर मराठा समाजालाही तो अधिकार आहे. इतर जातीच्या तशा कार्यक्रमाने वा संघटनेने कोणी विचलीत होणार नसेल, तर मराठ्यांच्या मोर्चानेही कोणी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. वेळोवेळी दलित वा रिपब्लिकन एकजुटीसाठी प्रयत्न होतात. त्यावर कोणी चिंता व्यक्त करत नसेल, तर अशा बाबतीत चिंता कशाला? की मराठ्यांनी अन्यायावर दाद मागू नये वा कुठले हक्क सांगू नयेत असा दावा आहे? प्रत्येकजण या अजुब्याकडे बघून आपापल्या सोयीचे अर्थ लावतो आहे. पण एक साधी दिसणारी बाब कशी कोणाच्या लक्षात येत नाही? हा मूकमोर्चा काही बोलत नाही आणि फ़क्त संख्येचे बळ दाखवतो आहे. आम्ही बहुंसंख्य आहोत असे सांगतो आहे. लोकसंख्येतील मोठा समाजघटक आहोत असेही सांगतो आहे. पण तरीही आम्हाला अन्याय व दुर्दशेला सामोरे जावे लागते आहे, अशी आपली वेदना व्यक्त करतो आहे, ही साधी बाब कोणी कशाला ओळखू शकत नाही? एका बाजूला तो अवघ्या लोकसंख्येला आपले दु:ख सांगू इच्छितो, तर दुसर्‍या बाजूला आपल्याच जातीच्या प्रस्थापित नेत्यांना त्यांच्याच नाकर्तेपणाचे परिणाम दाखवू इच्छितो आहे. कोणी तिकडे बघणार आहे काय?

मध्यंतरी देशात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांची मोदी सरकारने राज्यसभेवर नियुक्ती केली. तेव्हा शरद पवार खोचकपणे काय म्हणाले होते? प्रथमच इतिहासात छत्रपतींना पेशव्यांनी नेमणूक दिली. याचा अर्थ आजवर आधुनिक लोकशाहीत सत्ता मराठ्यांकडे होती आणि आज ती ब्राह्मणांकडे गेली आहे, असेच पवारांना सुचवायचे होते. तसे कितपत होते हा वेगळा भाग! पण मुठभर मराठा सुखवस्तु घराण्यांच्या हाती केंदित झालेली सत्ता म्हणजे मराठे सत्तेत; असा अर्थ पवारांना अपेक्षित होता. म्हणूनच आज पुन्हा मोर्चाविषयी बोलताना त्यांनी जुन्याच वक्तव्याला पुस्ती जोडली आहे. ‘हे मराठा मोर्चे सरकारच्याच विरोधातले आहेत’ अशी ग्वाही पवार देत आहेत. म्हणून त्यात तथ्य आहे काय? आपल्या राजकीय डावपेचात आपल्याला झुगारून निघणार्‍या मोर्च्याचा उपयोग करून घेण्य़ाची खेळी त्यामागे आहे. वास्तवात हे मोर्चे एकच ओरडून सांगत आहेत. मागल्या सहा दशकात भले काही मराठे गब्बर झाले असतील वा सत्तेचा उपभोग घेत सुखावलेले असतील. परंतु खराखुरा सामान्य मराठा मात्र गावोगावी भरडला गेला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पुरोगामी-प्रतिगामी असल्या खेळात मराठा नाडला गेला आहे. इतकेच हा मोर्चा मूकपणे सांगतो आहे. तो आपल्याच जातीच्या प्रस्थापित नेत्यांच्या नाकर्तेपणावरची नाराजी व्यक्त करीत मैदानात आला आहे. बदलत्या अर्थकारणात मराठा शेतीतून नाडला गेला आहे. जातीमुळे उच्चवर्णिय मानला गेलेल्या मराठ्याला रोजगार संधीतही वंचित व्हावे लागले आहे. पण धनदांडगा वा सत्ताधारी म्हणून सबळ समाजघटक अशीच त्याची नोंद होत राहिली. मात्र त्याच्या दुर्दशेकडे मराठा नावाने मौज करणार्‍यांनी साफ़ दुर्लक्ष केले. म्हणून ही हलाखीची पाळी आली, असेच तो अफ़ाट जनसमुदाय आक्रंदून सांगतो आहे. कोणी ती शांतते़ची भाषा समजून घेणार आहे काय?

यशवंतराव चव्हाणांच्या उदयानंतर महाराष्ट्रातील राजकीय समिकरण मराठ्यांच्या नेतृत्वाखाली उर्वरीत समाज घटकांना समाविष्ट करून घेणारी व्यवस्था असेच राहिले होते. त्यात मग मराठा समाजाने इतरांच्या न्यायाची व गरजांची काळजी घ्यायची होती. पण शतकानुशतके ज्यांनी गावावर राज्य केले, हुकूमत गाजवली त्यांच्यावर अपमानित होण्याची वेळ येऊ नये, याचीही काळजी घेतली जायला हवी ना? समाजप्रबोधन वा परिवर्तन हे नुसते कायद्याने होत नसते. सामाजिक अभिसरण आणि मतपरिवर्तन त्याचे मार्ग असतात. अन्यथा नुसत्या संघर्षातून उलथापालथ होत जाते. त्यात खालच्या वर्गांना नव्याने प्रतिष्ठीत करताना वरच्या वर्गांमध्ये असुया किंवा वैरभावना येण्याचा धोका असतो. त्याची फ़िकीर केली नाही, तर परिवर्तन बाजूला पडते आणि हेवेदावे सुरू होतात. शेती बुडीत जाणे आणि अन्य बाबतीतल्या संधी कमी होणे, यातून गावगाड्यातील मराठ्यांची पारंपारिक प्रतिष्ठा घसरगुंडीला लागली. आपल्या जातीचा कोणी उच्चपदावर बसला म्हणून मागास घटकांना समाधान मिळाले. पण तशी स्थिती मराठ्यांची नव्हती. ते आपापल्या गावात वस्तीत उच्चभ्रू होते आणि त्याच प्रतिष्ठेला धक्का बसत गेला. आरक्षणाने रोजगार संधीत कपात झाली. त्याचा मोठा फ़टका सवर्ण म्हणून मराठा कुणबी अशा जातींना बसला आहे. दुसरीकडे हुकमी उत्पन्नाची शेती डबघाईला गेली आहे. याचे भान मराठ्यांचे राजकीय वा सामाजिक नेतृत्व करणार्‍यांनी कधीच ठेवले नाही. शेदिडशे घराणी व त्यांच्याच मेहरबानीवर पोसलेली आणखी दहाबारा हजार मराठा घराणी सोडली, तर बाकी मराठा लोकसंख्येच्या वाट्याला काय आले? इतरमागस वा दलितांइतकीच बहुसंख्य मराठ्यांची दुरावस्था नाही काय? पवार किंवा चव्हाणांच्या उच्चपदी विराजमान होण्याने अशा खेड्यापाड्यातील मराठ्यांना कुठली सुबत्ता, न्याय वा प्रतिष्ठा मिळू शकली?

मराठेशाही असो किंवा पेशवाई असो, खेड्यापाड्यातला मराठा सत्तेच्या जवळ होता आणि त्याची हुकूमत होती. नव्या जमान्यात ते सर्व संपत असताना त्याची बदलत्या जमान्यात जागा कुठली, हा विषय कोणाच्याच ध्यानीमनी राहिला नाही. त्यात पुन्हा मराठा राजकीय नेत्यांनी आपापली सर्वसमावेशक पुरोगामी प्रतिमा जपण्यासाठी दलितांचे कैवारी होण्याचा पवित्रा घेतला. त्यातून फ़ुले शाहू आंबेडकर अशी एक शब्दावली तयार झाली. ती पुन्हा त्याच मराठ्यांच्या तोंडी कोंबली गेली. गावागावातले जातीचे संघर्ष ब्राह्मणांच्या माथी मारून पळवाटा काढल्या गेल्या. ब्राह्मण भले उच्चवर्णिय असेल व त्यांनी पुर्वकाळात भेदभाव केलेला असेल. तो अजून पुसला गेलेला नाही आणि आजही त्याचा प्रभाव मराठा व उच्च जातींच्या मनात रुजलेला आहे. त्याला कायदे करून वा फ़क्त गुन्हा ठरवून ती समता प्रस्थापित होऊ शकत नाही. पण तसे कायदे उरकण्यात आले आणि त्याचे सर्वाधिक बळी आजच्या काळातील गावागावातले उच्चवर्णिय मानले जाणारे मराठे होत गेले. एट्रोसिटी कायद्यान्वये दाखल झालेल्या तक्रारी व गुन्ह्यांचा अभ्यास केला, तर त्यातले बहुतांश आरोपी मराठेच आढळतील. म्हणजे सत्तेत मराठे आणि खेडोपाडी आरोपीही मराठे; अशी विचित्र स्थिती आली. पुन्हा त्याबद्दल बोलायचे नाही. कारण तमाम मराठा नेते फ़ुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढणार. मात्र अशा थोर महापुरूषांनी जो समतेचा महामंत्र दिलेला आहे, तो समाजात रुजवण्याचे कष्ट कोणी घेतले नाहीत. म्हणून एट्रोसिटी या कायद्याने समतेची भावना जोपासली जाऊन जातीय भेदभाव कमी होण्यापेक्षा, त्यातून अधिक कडवी वैमनस्ये उदयास येत गेली. आजच्या मोर्चामध्ये त्याच दुखण्याचा आक्रोश चालला आहे. त्या कायद्याचा वापर किती योग्य वा अयोग्य झाला त्याचा कधी विचारही करण्याची पवार किंवा तत्सम नेत्यांना गरज वाटली नाही, हे खरे दुखणे आहे.

दुसरीकडे रोजगारसंधी कमी झाल्याने आलेले हलाखीचे दिवस! आरक्षणाची मागणी त्यातून आलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यासाठी झालेल्या आंदोलने वा मेळाव्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मराठा सहभागी झालेला नव्हता. म्हणजेच आरक्षणातील अडचणी त्यालाही कळतात. पण आपल्याला सुखासमाधानाने व स्वाभिमानाने जगायची संधी मिळावी, ही त्याची अपेक्षा गैर मानता येणार नाही. आजवर त्यासाठी मराठा म्हणणार्‍या नेत्यांनी काहीही केले नाही, त्याविरोधातला हा आक्रोश आहे. कारण अशा कायदेशीर समाज परिवर्तनात सर्वाधिक भरडला गेलेला तोच समाजघटक आहे. त्याला कोपर्डीच्या घटनेने चेतवले तर त्याचेही कारण लक्षात घ्यायला हवे. आजवर अशा घटना घडल्या तिथे बहुतांश मराठा वा उच्चवर्णिय सवर्णांचा मस्तवालपणा दिसून आला. पण कोपर्डीत मराठा मुलीवर हा प्रसंग आल्यावर अंतर्मनात सुप्तावस्थेत असलेला उच्चवर्णिय अहंकार उफ़ाळून आला आहे. ‘आता खुप झाले. पुरोगामीत्व फ़ार झाले’ ही त्यातली धारणा आहे. खर्डा, जवखेडा वा खैरलांजी अशा घटनांनी जसे दलित समाजाची प्रक्षुब्धता उफ़ाळून आली होती, तशीच ही प्रतिक्रीया आहे. ती समजून इतक्यासाठी घ्यायची, की ती वेदना आहे. तिच्यावर मीठ चोळण्यापेक्षा कुठल्याही जातीच्या मुलीवर अन्याय होतो. अन्याय दुर्बळावर होतो आणि अन्याय मस्तवाल सबळाकडून होतो. जातीचा संदर्भ किरकोळ असतो. जिथे जो सबळ तोच अन्याय करतो. म्हणून जातीपातीच्या पलिकडे जाऊन दुर्बळांच्या न्यायासाठी संपुर्ण समाजाला समान भावनेत आणण्याची हीच सुवर्णसंधी असते. अशा मोर्चात अन्य जातीच्या लोकांनीही सहभागी होण्याचा पुढाकार घेतला पाहिजे. फ़सवे शब्द किंवा संदर्भ देऊन काहीही साध्य होणार नाही. मराठा हा बहुसंख्य समाज आहे आणि तो जागा होवून परिवर्तनाची पताका आपल्या खांद्यावर घेऊ शकला, तर जमाना बदलण्यास वेळ लागणार नाही. त्याच्या आक्रोशाकडे संशयाने बघण्यापेक्षा वेदनेवर फ़ुंकर घातली गेली, तर खर्‍या अर्थाने फ़ुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रात रुजवता येतील. सामाजिक सौहार्द निर्माण करतील. आणि नेत्यांना बाजूला ठेवून मराठा एकत्र येतोय हा म्हणूनच शुभशकून आहे.

6 comments:

 1. भाऊ क्रांतिसिंह नानासाहेब पाटीलांचा वारसा चालवणारे व सांगली शहर सुधार समितिचे अध्यक्ष यांचे या मोर्चां बाबतचे मत what's app वर शेअर केले आहे ते देत आहे. खरतर आपन सर्व गोष्टी भावनेच्या तराजुत मोजतो त्यास प्रॅक्टीकल असन्याची जोडच देणं विसरतो. मराठा समाजाने त्यांच्या नेत्याच्या कार्याचे आॅडीट करने गरजेचे आहे. मराठा समाज हा बराचसा शेतीवर आवलंबुन आहे पन शेतकरी हा विषय आपन भावनीक करुन ठेवलाय. पारंपारीततेतुन बाहेर पडने पचनीच पडेनाय. सींचनाचा फायदा सर्वात जास्त शेती असलेल्या समाजास होनार आहे हे माहीत आहे तर सींचन घोटाळा बाहेर काढुन ते प्रकल्प पुर्ण करन्याची मागनीच नाही.
  गर्दी ने मोर्चे नीघतात. मागणी करन्याचा हक्क आहे म्हनुन आपन बेफामपने मागणीही करतो. परंतु त्यास आभ्यासाची जोड हवीय.
  आता तीन मागन्या ज्या मोर्चात जोर धरत आहेत त्याचे पाहु ...

  मागणी 1) कोपर्डी प्रकरण...
  आता तब्बल दोन महीने झालेत आरोपी अटक होउन, वीटनेस सर्व सहाजीकच गावातीलच असनार म्हनजेच त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेच पाहीजेत ईतक्या दिवसात...मग विषय रहातो मेडीकल ईव्हीडंसचा ..ईतक्या दिवसात व ईतक्या संवेदनशील विषयात तो आलाच पाहीजे जर नसेल आला तर का नाही आला यावर कुनीच बोलत नाही. आपल्याला लाज वाटली पाहीजे पुर्ण महाराष्ट्रात केमीकल ॲनालीसीस करनार्या सुसज्ज लॅबच नाहीत. व्हीसेरा रीपोर्टची चार महीने वेटींग औरंगाबाद लॅबमदे आहे. म्हनजेच आपल्याकडे सुविधांचा आभाव आहे यावर कुनीच बोलेनाय म्हनजे फक्त भावनीकतेने आपन एकञ होतोय पन मुख्य मागनीवरील लक्ष विचलीत होतेय हे पन लक्षात घेने गरजेचे आहे. म्हनजेच आता हा विषय भावनीक नसुन प्रॅक्टीकल बनायला हवाय...

  मागणी 2) ॲट्रासीटी कायदा रद्द करणे/ अमेंड करने
  या मागनीचे स्टॅटेस्टीकल ॲनालीसीस एकाही मोर्चात दिसले नाही. प्रत्येक कायद्याचा गैरवापर होतो तसा या कायद्याचाही होतो परंतु त्यामुळे कायदा रद्द करने चुकीचेच आहे. परंतु जर बदल करायचा तर बदलाचा मसुदा (तो चुक असो किंवा बरोबर) कुनीच तयार केलेला मोर्चात दिसला नाही. बर तो कायदा सेंट्रल गव्हर्टेंटचा आहे मग एकाही मराठा खाजदाराने त्याबाबत पंतप्रधानीशी आथवा कायदा मंञ्याशी चर्चा केल्याचा दावा मोर्चात केला नाही तसेच त्याबाबत कुनीही सेंट्रल गव्हर्मेंटशी पञव्यवहार केल्याचे दिसेनाय म्हनजेच ही मागनीही केवळ भावनीकतेवर चालुय...

  मागणी 3 ..आरक्षण
  या बाबत केवळ तुलनात्मक भाषनबाजी चालुय. परंतु तामीळनाडुच्या पॉलीसीवर कुनीच आभ्यास केल्याचे दिसेना..तसेच 16 टक्के दिलेले आरक्षन नाईंथ शेड्युलमदे का नाही टाकन्याचा हट्ट धरला हे तात्कालीन मराठा नेत्यांना कुनीही विचारताना दिसेनाय. तसेच मराठा नेत्यांना आरक्षन द्यायचेच होते तर त्यांनी तसे का नाही दिले यावर काहीच बोलत नाहीत म्हनजेच हा मुद्दाही केवळ भावनीक केलाय...

  मोर्चात शांतता आहे, नीयोजन आहे, गर्दी आहे व मागण्याही आहेत परंतु हे सर्व भावनीक पातळीवर चालुय यास अभ्यासाची जोड हवीय...
  भावनीकतेचे नेहमीच रुपांतर हींसेत होते. तसे न होन्यासाठी अभ्यासपुर्ण मागणी व त्या मागणीची अर्थपुर्ण मांडणी गरजेचे आहे.
  तसेच प्रतीमोर्चाचेही चालुय. ॲट्रासीटी रद्द केलाय अशा अविर्भावात प्रतीमोर्चाचे नीयोजन चालु केलेय. दोनही बाजुने कायदा काय आहे हे आगोदर व्यवस्तीत समजुन घेने गरजेचे आहे मग त्यात योग्य बदल होने गरजेचे आहे. क्रीया व त्यावर प्रतीक्रीया यातुन हींसा होउन सर्वांचे वाटोळे होन्या अगोदर अभ्यासपुर्ण मांडनी आणि मागणी होने गरजेचे आहे.
  तसेच मागील वर्षी कायदा अमेंड करताना जे खाडदार गप्प बसले त्यांनाही जाब विचारावा लोकांनी तसेच प्रतीमोर्चा काढनारास वैचारीक गुलामीतुन बाहेर नीघुन विचार करन्यास समजावने मला गरजेचे वाटते....Adv.Amit Shinde. Sangli Sudhar Samati

  ReplyDelete
 2. लोकसत्ता तर आग्रलेखात लिहतेय कि atrocity कायद्याचा दुरुपयोग झालाय याची आकडेवारी उपलब्ध नाही. मुस्लिम लोकसंख्या कशी वाढली नाही हे दाखवून देण्यासाठी लोकसत्ताने अनेक लेखात statistics चा रतीब घातला परंतु त्याना महाराष्ट्रातील या कायद्याविषयी माहिती उपलब्ध नाही म्हणे ! काश्मिर मधील हिंसक मोर्चेकर्याविषयी सहानुभुती दाखविणारे हे लोक मराठा मोर्चाविषयी आग्रलेखातुन शंका उपस्थित करतात. एवढा प्रचंड जनसमुदाय शांततेत जातोय , स्वच्छता राखली जातेय, पंतप्रधान निधीला काही ठिकाणी निधि दिला गेला . तर कुठे उरीतील हुतात्म्याना स्रधांजली वाहण्यात आली , आता तूम्हीच सांगा जगाच्या पाठिवर असा मोर्चा
  कुणी पाहिला का? जे सामान्य माणसाला समजते ते या शहाण्याना समजत नाहि काय? सतत शाहु फुले आंबेडकर यांचे नाव घेउन मराठी मानस जोडण्या ऐवजी तोडले, सावरकरांचे नाव घेतले यांच्या कपाळाला आठ्या पडु लागल्या . महाराष्ट्र सर्वाचा होता व आहे. पुरोगामीत्वाचा हार गळ्यात घालुन मर्द मराठ्याना पांगळे केले गेले. पण आता मराठ्याना स्वत्वाची जाणीव आली म्हणून आता या मराठ्या सोबत बुद्धी बळाची कोणती चाल खेळावी हे या अर्धवट रावांना कळत नाहिए.

  ReplyDelete
 3. भाऊ या लेखा बद्दल धन्यवाद
  मराठा मोर्चाची अनेक कारणे देता येतील. यामागे कोण आहेत हे जरी वरवर विचार केला तर आण्णांच्या अंदलोना प्रमाणे जन (जाती ) आंदोलन आहे. पण खोल विचार केला तर ही पुढील राजकीय व्युह रचना आहे? हे सामान्य माणसाला समजायला काळाचा इंतजार करावा लागेल.

  कारण यासाठी मिडिया व सोशल मीडिया नेहमी प्रमाणेच शोध पत्रकारीता जरी केली तरी खरी बाजु समोर येवु देणार नाहीत (आठवा 2जी 3जी कोळसा ऑगस्टा हॅलीकाॅप्टर घोटाळे हे सर्व कॅगने बाहेर काढले पण असे का हे प्रत्येक नागरिकाने तपासणे आवश्यक आहे कारण गेली कित्येक दशके मिडिया व राजकीय पक्ष यांनी छुपी भागीदारीच केली आहे कारण मिडिया हा सरकार व नागरिक यांच्यातील महत्वाचा दुवा आहे व असे घोटाळे बाहेर काढून सामान्य जनतेला जागृत करून अशा सरकार व शासन व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवणे व आंदोलने उभारुन त्यांच्या सार्वजनीक मालमत्तेची लुट थांबवणे हे परम कर्तव्य आहे. आणि नेमके हेच ओळखुन मिडियाला भागीदार करुन देशाची लुट केली हि दशकानु दशके लागलेली चटक आता अन्य पक्षाचे सरकार आल्या मुळे बंद पडली आहे. व सत्तेपासून दुर रहाणे अशा प्रस्थापित पक्षांना अशक्य झाले आहे. आता हे पहा की गेली जवळ जवळ सहा दशके महाराष्ट्रात काँग्रेसचे व नैसर्गिक रित्या मराठा नेतेच सत्तेत होते पण हे का झाले नाही या वर अनेक थातुर मातुर कारणे देता येतील व खदखदिचा हा परिणाम आहे अशी दिशाभुल सहज करता येते कारण मिडिया हेच पेरेल. ( भारतीयां बाबतीत ब्रायन, गोडझोनहून-न्युझीलंड यांने सांगितलेल्या प्रमाणे
  अनेकांना ब्रायनचे केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर जवळ जवळ संपुर्ण भारतवासी भ्रष्टाचारी आहेत त्याचे हे विचार अनेकांना पटणार नाहीत हे ठाऊक आहे. पण त्याने आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. विचारवंताने सांगितल्या प्रमाणे भारतीय सहज दिशाभुल होणारे व अत्यंत स्वार्थी आहेत व यासाठी देशाला सहज विकु/राक्षसी शक्तींच्या हाती देण्यात मदत करतात.
  हाच मराठा समाज ज्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या वर अन्याय झाला, राजीव गांधी हत्ये नंतर शरद पवारचे 150 आमदार 35-40 खासदार निवडून आणण्याची ताकत, अभ्यासू, मुत्सद्दी व अनुभवी नेतृत्व काँग्रेस मध्ये असताना त्यांना डावलून नरसिंहराव सारख्या सुमार व हायकमांड पुढे नतमस्तक होणारे नेतृत्व पंतप्रधान पदावर बसवले त्यावेळी का एकवटला नाही?
  यामागे कोण आहे हे काळाच्या पडद्यापुढे बाहेर येइलच.
  अशा सत्ता मिळण्याची शक्यता असणाऱ्या मोक्याच्या वेळी मोक्याच्यी मंत्री पदे घेऊन आपला कार्यभाग उरकला (आठवा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळुन पण काँग्रेसचा मुख्यमंत्री का स्विकारला).

  हे सर्व विश्लेषण करुन मांडणार्या विचारवंताना, लेखक, राजकीय पंडिता ना सेलिब्रिटी ना आवार्ड/थैल्या, प्लाॅट, घरे अशा अनेक सुविधा देऊन दशकानु दशके प्रस्थापित पक्ष्याने आपल्या ताटाखालचे नुसतेच मांजर बनवले नाहीतर योग्य वेळी भुंकायला व कोल्हेकुई करायला लावते.
  हे सर्व वारंवार भारता सारख्या खंडप्राय नैसर्गिक साधन संपत्ती समरुद्ध देशात का होते व कोणती शक्ती या मागे आहे याचा उहापोह मिडिया व विचारवंत विकले गेले असताना कोण करणार?
  आठवा आण्णांच्या आंदोलनला असाच जमलेला जनसागर पण त्यावेळी हे सर्व कुठे होते (जास्त लोक नाॅर्थ इंडियनच होते व आण्णांना मुंबईत आजारपणाचे कारण सांगुन गाशा गुंडाळयला लागला.
  अत्ता पर्यंत युपी बिहार सारख्या राज्यात चाललेल्या जातीपातीच्या राजकारणा पासुन महाराष्ट्र थोडा दुर होता ( पक्ष श्रेष्ठींच्या आदेशातुन आलेले मुख्यमंत्री अंतुले यांच्या विरोधात अशीच छोटी व छुपी मराठा लाॅबी उतरली होती व त्यांनी अंतुलेंची पायउतरणी केली होती).
  परंतु आता महाराष्ट्राच्या तथाकथित पुरोगामी सत्तालंपट छुप्या नेतृत्वाखाली ही जातीय विभागणी ची दुरगामी परिणाम करणारी व्युवनिती केली आहे व महाराष्ट्राला विकासा कडुन भकासा कडे नेणारी आहे का की अण्णा हजारेच्या अंदोलना प्रमाणे नियती महाराष्ट्रला अलगद बाहेर काढेल हे पहायला मिळेल.
  परंतु या सर्व प्रसंगात हातपाय न गाळता धीराने सामोरी जाण्याची कसोटी मुख्यमंत्री कशी पार पाडतात हे पहायला हवे.
  तसेच सत्ते च्या राजकारणात वाकब असलेला मुरब्बी बिग बाॅसने पुढच्या निवडणुकीसाठीची तयारी चालू केली आहे व काँग्रेसला पुर्नप्रस्रथापीत करण्याची मुहूर्तमेढ करत आहे हे काळच सांगेल.
  अमुल

  ReplyDelete
 4. जे मोर्चे निघत आहेत त्यातील एक मागणी शैक्षणिक आरक्षणाची आहे. टीव्ही वरील एका मुलाखती मध्ये एका कॉलेज तरूण फी बदललं बोलत होता. ओपन कॅटेगिरी मध्ये १५०००० फी असेल तर तिचं आरक्षण असणाऱ्याना २०००० आहे. मुळात १५०००० हे value कोण ठरवत एवढे पैसे लागतात कसे याचा विचार पण गरजेचा आहे.

  ReplyDelete
 5. Lekh maarmik.Saamana chya vyangachitrakarane avashya bodh ghyava,ani morchya sandharbhaat sanyam dakhvaava.Bhaginni rastyawar padlya naahiyet ajun.Asley ghanerde cartoon gharich theva tyanchya.Kadak nishedh ani Bhauchya mature analysis che abhinandan

  ReplyDelete