Friday, September 30, 2016

सहन होत नाही, सांगता येत नाही

Image result for nawaz sharif

गेले काही दिवस मी उरी हल्ल्यानंतर कठोर कारवाई होणार, याची हमी या स्तंभातून देत आलो आहे. कारण आजवरची गोष्ट वेगळी होती आणि आज भारत वेगळ्या स्थितीत आहे, याचे भान मला होते. कोणीही डोळे उघडून समोर बघत असेल, तर त्याला काय घटना घडत असतात, त्याचा आंदाज येऊ शकत असतो. पण डोळ्यांवर पट्टी बांधून तोंडाची बडबड सुरू केली, मग आपलीच फ़सगत होत असते. पाकिस्तान कधी पत्रकार परिषद घेऊन वा टिव्हीवर घातपाती हल्ल्याची घोषणा करीत नाही. कुठल्याही लष्करी वा घातपाती हल्ल्यातील परिणाम त्याच्या आकस्मिकतेवर अवलंबून असतो. शत्रूला गाफ़ील ठेवण्याला प्राधान्य असते. म्हणून रणनिती वा कुटनिती कधी जाहिरपणे बोलली जात नाही. किंबहूना बातम्या छापून येण्यासाठी वा श्रेय मिळण्यासाठी अशा कृती होत नसतात. त्यात साधल्या जाणार्‍या परिणामांना महत्व असते. पाकला चोख उत्तर याचा अर्थ निषेध असू शकत नाही. पण कुठेतरी उरीच्या यातनांची वेदना पाकला समजली पाहिजे, असा त्याचा अर्थ होता आणि भारताच्या सेनेचे कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी त्याची ग्वाही दिलेली होती. उरीनंतर त्यांनी पाकला भारत चोख उत्तर देईलच. मात्र त्याची जागा व वेळ आम्ही आमच्या सोयीनुसार निवडू; असे म्हटलेले होते. त्याचा अर्थ भारतीय शहाण्यांना व पाकला आज उमजला असेल. कारण आठ जागी सीमापार जाऊन भारतीय कमांडोंनी जिहादी छावण्या उध्वस्त केल्या आहेत. इतके होऊनही पाकला त्याविषयी तक्रार करण्याची हिंमत होऊ शकलेली नाही. अमेरिकन सेनेने पाक हद्दीत घुसून ओसामाला ठार मारला होता, तेव्हा तरी कुठे पाकला आपल्या हद्दीत परकीय सेना आल्याची कबुली देण्याचे धाडस झाले होते? अध्यक्ष ओबामांनीच घोषणा केली, तेव्हा पाकने त्या घुसखोरीचा निषेध केला. तोपर्यंत पाकसेनेने मौन पाळले होते.

अब्रु ही अशी चीज असते, की गेली हे कोणी उजळमाथ्याने सांगत नाही. ओसामा प्रकरणात भले पाक हद्दीत अमेरिकन सेनेने घुसखोरी केली व पाकचे सार्वभौमत्व पायदळी तुडवले होते. पण पाक काय करू शकला? दिड तास सेनेच्या मुख्यालयाजवळ परकीय सैनिक धमाका करीत होते आणि पाकसेना त्यांचा बालही बाका करू शकलेली नव्हती. मग ते कुठल्या तोंडाने जगाला ओरडून सांगणार? त्यामुळे पाकसेना देशाच्या सीमा व सार्वभौमत्व सुरक्षित राखू शकत नाही, याचीच कबुली दिली जाणार ना? म्हणून पाकने वीस तास त्याविषयी मौन धारण केलेले होते. पण मारला गेला तोच ओसामा असल्याची खात्री पटल्यावर अमेरिकन अध्यक्षांनीच त्याविषयी घोषणा केली. त्यात त्यांनी कारवाई कुठे झाली, तेही सांगितल्याने पाकिस्तानची अब्रु चव्हाट्यावर आलेली होती. पाकने मग निषेधाचा कांगावा केलेला होता. पण आपली धाडसी सेना अमेरिकन कमांडोंना रोखू कशामुळे शकली नाही, त्याचा खुलासा पाकपाशी नव्हता. जगभर पाकची त्यामुळे नाचक्की झालेली होती. पण पाक नागरिकांच्या समोरही पाकसेना नामर्द असल्याचे सिद्ध झालेले होते. अशा नामर्दांच्या अण्वस्त्र धमकीला घाबरून रहाणे, हाच मुर्खपणा होता व असतो. पण त्यासाठी भारतीय नेत्यांना भयभीत करणारे पगारी हस्तक पाकने भारतीय माध्यमात जमवून ठेवलेले असल्याने, भारताला उघडपणे लष्करी कारवाईची भाषा बोलता येत नव्हती. म्हणूनच त्याविषयी संपुर्ण गोपनीयता बाळगणे आवश्यक होते. एकीकडे अशा गद्दार पत्रकारांकडून पाकला तयारीचा सुगावा लागण्याचा धोका होता आणि दुसरीकडे युद्धविरोधी नाटकांचा ससेमिरा सुरू होण्याची चिंता होती. म्हणून दहाबारा दिवस याविषयी संपुर्ण गुप्तता राखण्यात आली. जणू भारत लष्करी कारवाई अजिबात करणार नाही, असे पाकला गाफ़ील ठेवण्यात यश आले. त्याचा मोठा हातभार या कारवाईला लागला आहे.

या हल्ल्यात किती पाक सैनिक वा जिहादी मारले गेले, याची आता खुप चर्चा होईल. किती छावण्या उध्वस्त झाल्या किंवा नेमके किती जागी हल्ले झाले, याचाही मोठा उहापोह चालेल. पण त्या गोष्टी तुलनेने किरकोळ आहेत. या हल्ल्यातून सुरक्षेचे कोणते हेतू साधले गेले, त्याला मोठे महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारत असे हल्ले करू शकतो, याची ग्वाही पाकिस्तानला मिळालेली आहे आणि त्यांना तशी भिती होतीच. म्हणून तर काही महिन्यांपुर्वी म्यानमार येथे भारतीय कमांडोंनी सीमापार जाऊन केलेल्या कारवाईचे स्मरण करण्याची गरज आहे. तेव्हा कृती म्यानमारध्या हद्दीत झाली होती आणि प्रतिक्रीया पाकिस्तानातून आलेली होती. म्यानमारमध्ये जे केले, तसे काही पाकिस्तानात करायला जाल तर मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अकारण पाकनेते व सेनाधिकार्‍यांनी दिलेला होता. अगदी पठाणकोट हल्ला होण्यापुर्वीची ती गोष्ट आहे. पाकची अण्वस्त्रे दिवाळीचे फ़टाके नाहीत, घुसखोरीची कारवाई झाली तर अणूबॉम्ब टाकू; अशी भाषा मुशर्रफ़पासून कोणीही बरळत होता. पण आज त्यांची बोलती बंद झाली आहे. भारताचा सेनाप्रवक्ता सीमापार पाक हद्दीत गेल्याचे जाहिरपणे सांगतो आहे आणि पाकसेनेला तसे कळवतोही आहे. पण उलट काही करण्याची धमकी विसरून पाकसेना मात्र आपल्या हद्दीत काहीही घुसखोरी झालेली नसल्याची ग्वाही देत आहे. दोन सैनिक मारले गेल्याची व अनेक जखमी झाल्याचे मात्र मान्य करतो आहे. कारण आपण अशी कारवाई रोखण्यात नामर्द आहोत आणि जिहादी वगळता आपल्यापाशी लढणारे सैनिकच उरलेले नाहीत, याची कबुली देणे लाजिरवाणे झाले आहे. ही खरी कमाई आहे. उठसुट अण्वस्त्रांची धमकी किती पोकळ आहे व त्या नुसत्या वल्गना आहेत, तेच या निमीत्ताने भारतीय सेनेने जगाला प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेले आहे. ते लष्करी उद्दीष्ट होते.

पाकिस्तान ज्या धमक्या आजवर देत होता, ती निव्वळ बोलाची कढी नि बोलाचा भात असल्याचे यातून सिद्ध करण्यात आले आहे. आठवडाभर आधी पाकने अकस्मात राजधानी इस्लामाबाद येथील आभाळात आपली लढाऊ विमाने उडवून सराव केला होता. त्यानंतर आपण भारताच्या हल्ल्याला चोख उत्तर देणासाठी सज्ज आहोत असे आपल्याच जनतेला दाखवण्याचे नाटक पार पाडलेले होते. मात्र प्रत्यक्षात भारतीय सेनेचे कमांडो एकच वेळी आठ जागी हल्ले करीत होते आणि जिहादींचा फ़डशा पाडत होते. तेव्हा पाकला कुठलाही प्रतिकार करता आला नाही, हेच त्यातले सार आहे. मात्र ते पचवणे पाकला शक्य नाही. कारण आपण नाकर्ते ठरल्याची कबुली दिल्यास मायदेशीच पाकसेनेची नाचक्की ठरलेली आहे. म्हणून पाकसेना व गुप्तचर खात्याने कुठे हल्ले झाले, त्या जागा कथन केल्या (ज्यांची नावे भारतीय सेनेने जाहिर केलेली नाहीत). पण हल्ले सीमापारच्या गोळीबार तोफ़ांच्या मार्‍यातून झाल्याचे पाकने सांगितले आहे. खरेतर भारतानेच असे काही जाहिर केल्यावर पाकसेनेला भारतच कुरापती करतो असे सांगायची ही उत्तम संधी आहे. त्यातून जगाची सहानुभूती मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पण ती घ्यायची तर भारतीय कमांडो आपल्या हद्दीत घुसल्याचे मान्य करावे लागेल. पण त्यातला एकही पाकसेनेला ठार मारता आला नाही, ही नाचक्की ठरते ना? थोडक्यात या कारवाईत भारतीय सेना काय करू शकली, याचे उत्तर सोपे आहे. पाकला असा धडा शिकवला आहे, की त्याची अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ अशी होऊन गेली आहे. अर्थात त्यावरचा उपायही पाकला शोधण्यास कित्येक वर्षे जातील. पण अण्वस्त्र नावाचा बागुलबुवा या कारवाईने कायमचा निकालात काढलेला आहे. त्याचे श्रेय अर्थातच धोका पत्करणार्‍या भारतीय नेत्यालाच द्यावे लागेल.

4 comments:

  1. सुंदर भाऊ.F16 विमान पकड्यांची घाबरले पाकडेच वाह मोदीजी.idea केली अन ...

    ReplyDelete
  2. गद्धार पत्रकार कोण आहेत हे सारं देश जाणतो आहे , एकदा यांचे सर्जिकल ऑपरेशन करायला पाहिजे

    ReplyDelete
  3. धन्यवाद भाऊसाहेब...!

    ReplyDelete
  4. भाऊ कृपया लिंक मधील लेख पहुन सत्यता पडतळनी करावे..

    धन्यवाद..

    http://liveindia.live/postdetail/index/id/98467/un-say-about-india

    ReplyDelete