Thursday, October 20, 2016

झाकली मूठ

sharad ajit के लिए चित्र परिणाम

यावर्षी पावसाने महाराष्ट्राला चांगला हात दिला आहे. त्यामुळे जवळपास बहुतांश धरणे तलाव भरलेले आहेत. दुष्काळाचे सावट हटलेले आहे. तसे झाले नसते, तर अनेकांना तीन वर्षापुर्वी अजितदादांनी काढलेले उद्गार आठवले असते. सोलापूरच्या कुणा शेतकरी कार्यकर्त्याने धरणातले पाणी सोडण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण आरंभले होते. तर धरणात पाणीच नसल्यावर सोडणार कुठले? असा सवाल करून भागले असते. पण आपल्या गावरान भाषेत लोकांना हसवण्यासाठी उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी कोरडी धरणे भरण्यासाठी सोपा उपाय कथन केला होता. तो गाजलाही खुप! अशा विविध नव्या शब्दावल्या किंवा वक्त्तव्यातून अजितदादा पवार गाजत राहिलेले आहेत. अशीच त्यांची एक उक्ती त्यांना कायमची चिकटली. ‘आपण टग्या आहोत’ असे त्यांनी अभिमानाने सांगितले होते आणि तसे शब्द जपून वापरावे असे त्यांना काकांनी सांगितले होते. कारण असे शब्द कायमचे चिकटतात. ते खरे होते. पण दादांना अनेकदा शब्दांचा मोह आवरत नाही. आताही तसेच झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे एका सभेत बोलताना त्यांनी सध्या राजकारणात किती महागाई झालेली आहे, त्याची व्यथा बोलून दाखवलेली आहे. पण त्यातून त्यांनी आपल्याच काकांची झाकली मुठ उघडी करून टाकली. निवडणूका दाराशी आलेल्या आहेत, त्यात विधान परिषद किंवा नगराध्यक्ष निवडले जाताना नगरसेवकांना गोळा करावे लागते. विविध पक्षाचे आमदार फ़ोडून महापौर वगैरे निवडून आणावे लागतात. तो दादांच्या हातचा खेळ होता की मळ होता, हे माहित नाही. पण दादांनी तसे अनेकांना निवडून आणलेले आहे. मात्र आजकाल तो मळ खुप महागला झाल्याची तक्रार आहे. पुर्वी आमदार वा खासदार ज्या किंमतीत मिळायचे त्यात आता खरेदीविक्री होत नाही, अशी दादांची व्यथा आहे. ती त्यांची एकट्याची आहे की काकांचीही आहे?

गेल्या महापालिका निवडणूकीच्या काळात दादांच्या काकांनी अनेक मराठी वाहिन्यांना दिर्घ मुलाखती दिलेल्या होत्या. त्यापैकी एका मुलाखतीत निवडणूकीवर उमेदवार करीत असलेला खर्च ऐकून काका थक्क झालेले होते. आमदार नगरसेवक व्हायला इतका खर्च केला जात असेल, तर यापुढे आपण निवडणूक लढवू शकणार नाही, असेही दादांचे काका म्हणाल्याचे स्मरते. ती झाली पाच वर्षापुर्वीची गोष्ट! आता काकांचा पुतण्या म्हणतो, पुर्वी पन्नास लाखात आमदारही विकत मिळायचा. आजकाल नगरसेवकही तितक्या पैशात फ़ुटत नाही. आजवर अनेकदा अशा खरेदीविक्रीवर चर्चा झालेली आहे. त्याला घोडेबाजार म्हणूनही माध्यमातून हिणवले गेलेले आहे. पण कोणी कधी उजळमाथ्याने असे होत असल्याची कबुली दिलेली नव्हती. दादांनी तशी हिंमत केलेली आहे. पण म्हणूनच विविध पक्षातले आमदार खासदार पवारांच्या गोटात कसे पोहोचत होते, त्याचाही खुलासा होऊन गेला ना? कल्याणचा शिवसेनेचा खासदार परांजपे असाच एकेदिवशी दादांचे निकटवर्ति जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत काकांचे आशीर्वाद घ्यायला पोहोचला होता. त्याला किती लाख वा कोटी दिले गेले असतील? आपण नुसता अंदाज करू शकतो. जनता पक्षातले बबनराव पाचपुते किंवा शिवसेनेतले छगन भुजबळ कॉग्रेसमध्ये कसे पोहोचले, त्याची किंमत आपल्याला अजून कळलेली नाही. पण ती काही लाखापेक्षा अधिक नसणार याविषयी आपण निश्चींत होऊ शकतो. काकांनी राजकारण मुठीत ठेवण्यासाठी झाकलेली ही मुठ, पुतण्याने अकस्मात उघडून टाकल्यामुळे आपल्याला किंमतीचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकला. पण निश्चीत आकडे कधीच कळणार नाहीत. पण मोठमोठ्या कोट्यवधीच्या निवीदा कशाला काढाव्या लागत होत्या, त्याचा खुलासा होऊ शकतो. असे महागडे आमदार खासदार विकत घ्यायचे तर पैसे कुठून आणायचे?

आठवते, काही वर्षापुर्वी गोपिनाथ मुंडे यांचा पुतण्या असलेला आमदार धनंजय मुंडे, याला अजितदादांमध्ये चमत्कारी शक्ती असल्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्याने भाजपाने दिलेल्या आमदारकीचा राजिनामा देऊन राष्ट्रवादीत दाखल होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. माध्यमांनी त्याला भाजपातून फ़ुटण्याचे नाव दिले होते. पण फ़ुटण्याची किंमत असते असे कोणी म्हटलेले नव्हते. दादांनी धनंजय मुंडे यांची किंमत यातून सांगितली आहे काय? असे काही बोलण्यामागे दादांचा हेतू काय तेच समजत नाही. पण मागल्या तीन दशकात त्यांच्या काकांनी कायम आमदार फ़ोडण्यावरच राजकारण केले, ही बाब जगजाहिर आहे. मग त्यातूनच पुतण्याला हे दरपत्रक उपलब्ध झाले होते काय? दोनचार वर्षामागे दादांनीही गोपिनाथ मुंडे वा अन्य कुणाचे निष्ठावान आमदार नगरसेवक फ़ोडण्याचा सपाटा लावला होता. त्याचे दरपत्रक आज सांगत आहेत काय? की आता सत्तेत जाण्यासाठी आमदार फ़ोडायचे तर मोजावी लागणारी किंमत आवाक्यात राहिली नाही, याची कबुली दादांना द्यायची आहे? दोन्ही कॉग्रेसचे मिळून ८५ च्या आसपास आमदार आहेत. त्यात बहुमताचे गणित जुळवायचे तर आणखी ५० आमदारांची तुट आहे. तितके आमदार कुठल्या दराने विकत घेता येतील, याचे काही अंदाजपत्रक आखण्यात हल्ली दादा गर्क होते काय? अन्यथा हा विषय अकस्मात कुठून आला? हे सरकार पाडून नवे आणायचे तर प्रत्येकी पन्नास लाखात आमदार मिळणार नाहीत. पाच दहा कोटी दरडोई मोजायचे तर किती रक्कम होईल, त्याची विवंचना आहे काय? ती रक्कम येणार कुठून अशी चिंता भेडसावते आहे काय? आज असे काही बोलण्यामागचा हेतू स्पष्ट होत नाही. कुछ तो गोलमाल है भाई! कारण अजितदादा कुठलेही निर्हेतुक विधान सहसा करीत नाहीत. मग त्यांनी कुठल्या हेतूने असे विधान केलेले असावे?

बाकी काहीही असो, आपल्यावरचे पक्ष फ़ोडणे, आमदार फ़ोडणे असे झालेले आरोप दादांच्या काकांनी सतत फ़ेटाळले आहेत. पण जितके फ़ेटाळले तितके तेच आरोप त्यांना कायम चिकटून राहिलेले आहेत. त्यांचा घोडेबाजारशी संबंध जोडण्यासारखा कुठला साक्षीपुरावा कोणी समोर आणू शकला नव्हता. आता हा पहिलापहिला साक्षीदार थेट घरातूनच समोर आला आहे. जुन्या काळात असे म्हणताना अजितदादा जख्ख म्हातारे झालेले नाहीत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आता कुठे २५-२६ वर्षे होत आहेत. आमदार वा खासदार होऊन तितकी वर्षे होत असतील, तर आमदार खासदारांची खरेदीविक्री करण्याचा जमाना दहा बारा वर्षे पुढला असू शकतो ना? म्हणजे दादा ज्या कालखंडाचे दरपत्रक सांगत आहेत, तो कालखंड इसवीसन २००० नंतरचा असावा. एकविसाव्या शतकाच्या आरंभी आमदारांची किंमत पन्नास लाख होती आणि नगरसेवकांची त्यापेक्षा अर्थातच कमी होती. पण निवडणूका व सत्ता असाच खेळ असेल, तर जिल्हा बॅन्का वगैरेही तशाच निवडून येत असतील ना? साखर कारखाने, खरेदीविक्री संघ वा त्यांचे सदस्य किती किंमतीला मिळत असतील? केवढी मोठी उलाढाल आहे ना? इतकी रक्कम कुठल्या बॅन्क खात्यातून किंवा चेकद्वारे काढता येऊ शकत नाही. त्याचा व्यवहार रोखीतलाच करावा लागणार ना? त्या नोटा मोजायला खरेदीदार नोटांचा छापखाना चालवत नसतो. त्याला रिझर्व्ह बॅन्केनेच छापलेल्या नोटा मोजाव्या लागणार. मग ही रक्कम पेरायची आणि उगवायची, तर सिंचनाची गरज नाही काय? ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन निविदा काढल्या तर त्यातून पीक कुठले निघाले, त्याचा पत्ता पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणूनच लागला नव्हता. ते बिचारे शेतात काय पिकले व कुठली शेते भिजली, ते शोधत बसले. त्यापेक्षा बाबांनी ओले झालेले हात बघितले असते, तर सिंचन कुठे झाले त्याचा शोध त्यांना लागला असता.

2 comments:

  1. हाहाहा छानच भाऊ बाबांना आेले हात दिसले नाहित का बघितले नाहित

    ReplyDelete
  2. आता महानगरपालिका निवडणूका आल्या आहेत जवळ....
    पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला टिकवण्यासाठीचे हिशोब मांडत आहेत बहुतेक....

    ReplyDelete