Sunday, October 16, 2016

बातमीला घाबरलेली पाकसेना

nawaz raheel sharif के लिए चित्र परिणाम

पाकिस्तानचे सरसेनानी जनरल राहिल शरीफ़ यांनी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात आपल्या सर्व ज्येष्ठ सेनाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि एक ठराव संमत करून घेतला. कराची येथील ‘डॉन’ नामक दैनिकात छापून आलेल्या बातमीमुळे पाकिस्तानची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली, असा त्यांचा दावा आहे. एका बातमीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असे खुद्द सेनापतीलाच वाटत असेल, तर मग पाकिस्तानची सेना व तिने राखलेली त्या देशाची सुरक्षा व्यवस्था तपासून बघण्याची गरज निर्माण होते. कारण अशा शेकड्यांनी बातम्या भारतात रोजच्या रोज छापून येत असतात आणि त्यावर अव्वाच्या सव्वा चर्चाही रंगत असतात. पण म्हणून देशाची सुरक्षा धोक्यात आल्याचे कोणी राजकारणी नेता म्हणालेला नाही, की सेनादलाच्या कुणा अधिकार्‍याने तशी तक्रार केलेली नाही. मग जनरल राहिल शरीफ़ यांना अशी भिती कशाला वाटली असेल? बातमीमुळे धोक्यात येण्याइतकी पाकची सुरक्षा यंत्रणा ढिसाळ व तकलादू आहे काय? बातमी तरी काय मोठी होती? पाकच्या पंतप्रधानांनी एक बैठक बोलावली आणि त्यात गुप्तचर खात्याचे प्रमुख व राजकीय नेत्यांची खडाजंगी उडाली. त्यापैकी एका नेत्याने पाकमध्ये मोकाट झालेल्या जिहादी संघटना व त्यांचे म्होरके यांना वेसण घालण्याची मागणी केली. परराष्ट्रमंत्र्याने जगात पाकिस्तान एकाकी पडत चालल्याचा इशारा दिला. इतक्याने पाकची सुरक्षा धोक्यात कशी काय येऊ शकते? जे सेनाधिकारी कालपर्यंत उठसुट अण्वस्त्रे सोडून भारताला बेचिराख करण्याच्या धमक्या देत होते, त्यांना एका किरकोळ बातमीने इतकी भिती कशाला वाटली असेल? भारतात तर सर्जिकल स्ट्राईक झाला किंवा नाही, यावरही शंका घेतली गेली. म्हणून देश धोक्यात आल्याचे कोणी म्हटले नाही. मग एका बातमीने धोक्यात येणारी पाकची सुरक्षा म्हणजे तरी काय आहे?

तर पाकची सुरक्षा म्हणजे तिथल्या सामान्य जनतेच्या डोक्यात दिर्घकाळ जोपासलेला एक भ्रम आहे. प्रत्येक युद्धात पाकिस्तानचा दारूण पराभव झालेला आहे. परंतु पाकच्या शालेय पुस्तकातले धडे वाचले, तर त्यातही पाकसेनेने भारताला कसे पाणी पाजले, त्याचेच धडे शिकवले जात आहेत. मग त्यातून ज्या दोनतीन पिढ्या शिकल्या, त्यांना आपली पाकसेना म्हणजे जगातली सर्वात अजिंक्य शूरविरांची सेना वाटत असेल, तर नवल नाही. मग अशा सेनेला आपली ती शौर्याची प्रतिमा सतत जपावी लागत असते. म्हणूनच तिथे कधी खर्‍याखुर्‍या युद्धाची चर्चा होत नाही, त्याचा इतिहास चर्चिला जात नाही. त्याविषयी प्रश्न विचारले जात नाहीत, तसा प्रयत्न कोणी केला तरी त्याला देशद्रोही ठरवून आयुष्यातून उठवले जाते. त्यासाठी प्रत्येक माध्यमाला दहशत घातली गेलेली आहे. पत्रकारांची खर्‍या बातम्या देण्याची बिशाद नाही. म्हणूनच भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याची तिथल्या माध्यमात खिल्ली उडवली गेली होती. पाकिस्तान कुठल्याही क्षेत्रात हरू शकत नाही. कारण अल्लाहच्या आशीर्वादाने चाललेला तो देश आहे, असे सामान्य माणसाच्या मनावर बिंबवण्यात आलेले आहे. त्याला तडा जाईल अशी कुठलीही माहिती उघड होऊ दिली जात नाही. कारण तेच पाकिस्तानचे सर्वात मोठे गुपित आहे. त्या गुपितावर प्रश्नचिन्ह लावणे, म्हणजे संकटाला आमंत्रण देणेच होय. ते धाडस कोणी पत्रकार वा विचारवंतही करू शकत नाही. पाकिस्तानी पत्रकारच कशाला? त्यांचे भारतातील मित्रही तसे धाडस करू शकत नाहीत. म्हणून सामान्य पाकिस्तानी त्याच भ्रमात जगत असतो. ‘डॉन’च्या वृत्ताने त्याला तडा गेला. कारण त्या बातमीने प्रथमच पाकिस्तानी सेनेच्या पापावरचा पडदा उचललेला आहे. पाकिस्तानात जिहादी आहेत आणि सेनेच्याच आश्रयामुळे फ़ोफ़ावले आहेत, अशी माहिती पाक वृत्तपत्रानेच दिली आहे.

अशा बातम्या चोरून वा अन्य मार्गाने भारतीय माध्यमे बघणार्‍या पाकिस्तान्यांना मिळत असते. पण त्याला खोटा प्रचार समजण्याची पाकिस्तानात फ़ॅशन आहे. मग त्यांना भारतातून वा अन्य परदेशी बातम्यातून मिळणारी माहिती कशी खरी वाटणार? सहाजिकच सतत सगळीकडे नालायक ठरलेली पाक सेना पाक जनतेला अजिंक्य वाटत राहिली आहे आणि ती समजूत तशीच रहाणे, ही पाकिस्तानच्या सुरक्षेची हमी आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ जगात कुठे पराभूत झाला, मग त्यांच्या खेळाडूंना मायदेशी दिर्घकाळ तोंड लपवून जगावे लागते. ही क्रिकेटवीरांची गोष्ट असेल, तर युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांची काय स्थिती होऊ शकेल? त्यांना उजळमाथ्याने पाकिस्तानात जगता येईल काय? रस्तोरस्ती लोकच त्यांना जोड्याने मारतील ना? म्हणून पाकसेना नेहमी लोकांना भ्रमात ठेवत असते आणि त्यात त्यांना पाकचे राज्यकर्ते मदत करत असतात. कारण राजकारण्यांनी लुडबुड केली, की पाकसेना त्यांना हाकलून लावून सत्ता हाती घेते. किंवा लोकशाहीने निवडून आलेल्यांना मुठीत ठेवले, की पाकसेनेचे गुपित सुरक्षित असते. ‘डॉन’च्या त्या बातमीने त्यालाच तडा गेला. कारण पाकसेनेला व तिचाच घटक असलेल्या गुप्तचर खात्याला पंतप्रधानाने दमदाटी केल्याची बातमी छापून आली. तेव्हा आधी नवाज शरीफ़ यांना दम देऊन सेनापतींनी त्या बातमीचा साफ़ इन्कार करून घेतला. पण डॉन माघार घ्यायला राजी झाला नाही. तेव्हा त्याच्या पत्रकाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यामुळे सर्वच पाक पत्रकारांना विरोधात उभे रहावे लागले. जगात गाजावाजा होऊ लागला. तेव्हा गुपचुप त्या पत्रकारावर लादलेली बंधने उठवावी लागली. म्हणजेच सेनेचे नाक आणखी कापले गेले. पण ही बातमी फ़ुटलीच कशी, याला महत्व होते. कारण पंतप्रधानांनी घेतलेली बैठक होती ना?

थोडक्यात कोणीतरी आतूनच मुद्दाम पत्रकाराला बातमी देऊन सेनेची नाचक्की घडवून आणली, अशी शंका घेण्याला जागा आहे आणि सेनापतींनी तशीच शंका काढली आहे. जाणिवपुर्वक कोणीतरी आतल्याच राजकारण्याने ही बातमी दिली, असा आरोपच सेनाधिकार्‍यांच्या बैठकीत करण्यात आला. तसे प्रसिद्धीपत्रकातही म्हटले आहे. मग तसा संशय कोणावर घेतला गेला असेल? कोणी राजकारणी पाकसेनेला बदनाम करायला इतका टोकाला गेला आहे? अर्थात नेहमीची वेळ असती तर सेनेने उठाव करून शरीफ़ यांची गठडी वळली असती. त्यांना बडतर्फ़ करून सत्ता हाती घेतली असती. पण सध्या पाकसेनेचे ग्रह फ़िरलेले आहेत. बहुतेक प्रांतामध्ये असंतोषाचा भडका उडालेला आहे. त्यांचा बदोबस्त करताना पाकसेनेच्या नाकी दम आलेला आहे. त्यातच भारताने सर्जिकल स्ट्राईक करून कुठल्याही क्षणी युद्ध छेडण्याचे संकेत दिलेले आहेत. ते युद्ध झालेच तर आठवडाभरही टिकाव लागण्याची शक्यता नाही. म्हणजेच एका बाजूला युद्ध टाळायचे तर कुटनिती करायला नागरी सत्तेची सेनादलाला गरज आहे. त्याचाच राजकीय लाभ उठवून राजकारणी पाकसेनेला खच्ची करायचा डाव खेळत आहेत काय? तशी शंका सेनाधिकार्‍यांना आली असल्यास नवल नाही. त्याचाच एक भाग म्हणून वृत्तपत्रात बातमी दिली गेली आणि सेनेच्या आग्रहासाठी पत्रकाराच्या मुसक्या बांधल्या. पण त्यातून संपुर्ण पत्रकारितेलाच सेनेच्या विरोधत दंड थोपटून उभे करण्यात आले. तेही परवडणारे नाही. म्हणूनच पाकसेनेने सफ़ाई दिल्यासारखा खुलासा केला आहे. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानात भारताने कोणाकोणाला फ़ोडून आपले हस्तक बनवले आहे, असे भय त्यामागे आहे. म्हणून एक सामान्य बातमीला पाकचे सरसेनापती घाबरून गेले आहेत. आपला शौर्याचा मुखवटा फ़ाटू लागल्याने पाक सेनेला दरदरून घाम फ़ुटल्याचे हे लक्षण आहे.

1 comment: