Thursday, October 13, 2016

युपीएचे सर्जिकल स्ट्राईक (२)

Image result for chidambaram

युपीएच्या काळात चार सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा तेव्हाचे संरक्षणमंत्री ए. के. अंथोनी यांनी केलेला नाही. तर गृहमंत्री चिदंबरम यांनी तसा दावा केलेला आहे. मग त्यांनी तसे केल्याचा पुरावा कुठला? तर तोही गोपनीय आहे. पण अर्थात तो गोपनीय राहिलेला नाही. त्याची लक्तरे मागल्या काही महिन्यात वाहिन्यांमधून व विविध माध्यमातून समोर आलेली आहेत. यातला पहिला सर्जिकल हल्ला त्यांनी मालेगाव बॉम्बस्फ़ोटाच्या निमीत्ताने केला असे म्हणता येईल. तेव्हा अर्थातच चिदंबरम अर्थमंत्री होते. पण तेव्हा महाराष्ट्रात एक घटना घडली होती. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव प्रकरणात फ़क्त एकाच धर्माचे संशयित का पकडता, असा सवाल शरद पवार यांनी केला आणि नव्याने शोध सुरू झाला. त्यात भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी कर्नल पुरोहित यांना ताब्यात घेतले गेले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेत असल्याची हुलकावणी दिली गेली आणि नंतर त्यांच्यावरच मालेगाव स्फ़ोटाचा आरोप करण्यात आला. अजून त्याचे कुठलेही पुरावे, कोर्टाला देऊन शिक्षापात्र ठरवले गेलेले नाही. आठ वर्षानंतर नव्या तपासपथकाने तर कुठलेच पुरावे नसल्याचा खुलासा केला आहे. मग त्या भारतीय सेनेच्या गुप्तचराला पकडून काय साधले गेले? असा माणूस देशाच्या सुरक्षेला धोका कुठून आहे, त्याचा माग काढत असतो. कुठून शत्रू देशात घुसून छुप्या कारवाया करू शकतो, त्याच्यावर पाळत ठेवून त्याला नेस्तनाबुत करणे हेच कर्नल पुरोहितचे काम होते आणि त्या छुप्या कारवाया करताना त्याचे सर्व अहवाल त्याने वेळोवेळी वरीष्ठांना दिल्याचेही लष्कराच्या कागदपत्रातून समोर आलेले आहे. मग त्यालाच घातपाताच्या आरोपात बंदिस्त करून कोणावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता? त्याची प्रचिती पुढल्या दोनच महिन्यात मुंबईला आली. कारण मुंबईवर कसाब टोळीने हल्ला केला व दोनशे निरपराधांचा बळी घेतला.

कसाबच्या कृपेने मग चिदंबरम देशाचे गृहमंत्री झाले. मुंबई हल्ला झाला तेव्हा शिवराज पाटील गृहमंत्री होते. त्यांचे कर्तृत्व इतके मोठे की पंतप्रधान मनमोहन सिंगांनी त्यांना त्या रात्री झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीतही येऊ दिले नाही. त्याच रात्री त्यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. कारण देशभर मुंबई हल्ल्याने नाराजी पसरली होती. मुद्दा असा, की भारतीय सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानी घातपाती मुंबईत येऊन पोहोचले, तर भारतीय गुप्तचर काय करीत होते? त्यापैकीच एक गुप्तचार कर्नल पुरोहित याला आरोपी बनवून गुप्तचर खात्याचे खच्चीकरण कोणी केले होते? ते खच्चीकरण झाले नसते, तर कसाबला सागरी मार्गाने मुंबईपर्यंत येऊन धडकणे शक्य झाले असते काय? युपीएच्या काळातील ही मोठी कारवाई होती. ज्यात भारतीय सेनादलाच्या एका कर्तबगार अधिकार्‍यालाच घातपाती ठरवून तुरूंगात डांबले गेले. त्या तपासाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी सतत पत्रकार परिषदा घेऊन भक्कम पुरावे पुरोहित विरोधात असल्याचा दावा केला होता. परंतु आजपर्यंत शिक्षापात्र ठरवू शकेल असा कुठलाही पुरावा कोर्टासमोर आणला गेलेला नाही. मग अशा गुप्तचराला डांबून कोणाचा मार्ग सुकर केला गेला होता? पुरोहित यांना अटकेत टाकून पाकिस्तानी जिहादी टोळीला मुंबईवर हल्ल्यासाठी येण्याचा मार्ग सुकर करण्यात आला, असे म्हणणे वावगे ठरेल काय? तिथेच हा सर्जिकल स्ट्राईक संपला नाही. जामिनाची वेळ आली आणि पुरावे नाहीत, म्हणून मोक्का लावून त्या पुरोहितला कायचा गजाआड डांबला गेला. याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. त्यात शत्रूच्या क्षमतेवरच घाला घातला जात असतो. भारताची सुरक्षा करणार्‍या यंत्रणेवरच घाला घालण्याची ही कारवाई, युपीएच्या कालखंडातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. ज्यामुळे पाकिस्तानच्या मारेकर्‍यांना मुंबईपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला.

या संपुर्ण काळात भारतीय गुप्तचर खात्याला खच्ची करण्याच्या कारवाया भारत सरकारकडूनच चाललेल्या होत्या. पाकिस्तान वा त्यांचे जिहादी यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशा कारवाया करण्यात गृहखाते राबलेले दिसेल. जेव्हा कर्नल पुरोहित यांना मोक्का लागू शकत नाही, असा निर्वाळा कोर्टाने दिला; तेव्हा अधिकाधिक घातपाती गुन्ह्यात त्यांना अडकवून गजाआड ठेवण्यासाठी आटापिटा केला गेला. समझोता एक्स्प्रेस किंवा अजमेर अशा कुठल्याही घातपातामध्ये त्या अधिकार्‍याला गुंतवण्यात कुठली सुरक्षा होती? पण असे भारतीय सुरक्षा खच्ची करण्याचे डावपेच गृहखात्यातून खेळले जात होते. ज्याचा खुलासा मध्यंतरी जुनी कागदपत्रे उलगडताना झालेला आहे. मात्र त्याची जाहिर वाच्यता चिदंबरम यांनी वा युपीएने कधीच केली नाही. त्यांचे सर्जिकल स्ट्राईक असे होते. जे भारताच्या सुरक्षेला धोक्यात आणणारे असायचे. ही केवळ एक घटना नाही. काही वर्षापुर्वी होऊन गेलेल्या इशरत जहान चकमकीला खोटे ठरवून त्यात गुजरातचा सात आठ वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मारेकरी बनवण्याचा सर्जिकल स्ट्राईक असाच होता. इशरत ही पाकिस्तानी तोयबांची हस्तक असल्याचे संसदेत तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी सांगितले होते, अन्य कागदपत्रातही तेच दिसत होते. पण चिदंबरम गृहमंत्री झाले आणि त्यांनी गुजरातच्या पोलिस अधिकार्‍यांना मारेकरी ठरवण्यासाठी कागदपत्रातही हेराफ़ेरी केली. इतक्या सहजतेने ही हेराफ़ेरी करण्यात आली, की देशाचे रखवालदार गुन्हेगार दाखवण्यापर्यंत मजल गेली. हा स्ट्राईक इतका बेमालूम होता, की देशातली माध्यमेही पुरावे साक्षी बघितल्याशिवाय गुजरातच्या पोलिसांना घातपाती मानायला तयार झाली. तेव्हाचे गृहखात्याचे वरीष्ठ अधिकारी मणि यांनी त्या कागदोपत्री झालेल्या सर्जरीचा तपशील अलिकडेच उघड केला आहे. तो चिदंबरम यांनीच केलेला सर्जिकल स्ट्राईक होता.

इशरत तोयबाची घातपाती होती आणि तिच्यासोबत मारले गेलेले दोन सोबती पाकिस्तानी जिहादी होते. तरीही त्यांना संपवणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना खुनी ठरवण्याची स्पर्धा सुरू झालेली होती. जिहादी इशरतला निष्पाप तरूणी ठरवून देशव्यापी टाहो कोणी फ़ोडला होता? त्यात गुजरातचे पोलिस गुंतले आहेत, म्हणुन अमित शहा किंवा नरेद्र मोदी यांना अलगद गुंतवण्याचा खेळ कोणी केला होता? किती बेमालूमपणे हा खेळ चालला होता? देशातल्या कुणा शोधपत्रकाराला किंवा संपादकालाही त्याबद्दल शंका घेण्याची बुद्धी झाली नाही. संपुर्ण माध्यमे आणि पत्रकारांच्या बुद्धीवर चिदंबरम व युपीएने इतके कुशल सर्जिकल स्ट्राईक केलेले होते, की सर्वांची बुद्धीच निकामी होऊन गेलेली होती. भारतीय माध्यमेही पाकिस्तानी थाटात भारतीय सुरक्षा यंत्रणांचे लचके तोडू लागली होती. सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूच्या आक्रमकता वा बचावाला निकामी करणारा असतो. कर्नल पुरोहित वा इशरत प्रकरणातील गुजरातचे पोलिस अधिकारी यांच्या खच्चीकरणाने कुणाचा काटा काढला गेला? कोणाचे त्यात खच्चीकरण झाले? तोच शत्रू असणार ना? चिदंबरम व युपीएने ज्याचे खच्चीकरण केले, त्याला तुम्हीआम्ही भारतीय सुरक्षा यंत्रणा म्हणतो. ज्यांनी भारतीयांच्या सर्व सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा खच्ची करून टाकल्या. त्यांना ते उघडपणे सांगता येणार नव्हते. कारण भारतीयांच्या सुरक्षेसाठी भारताच्या सुरक्षा यंत्रणा निकामी करणारे अजब तर्कशास्त्र सामान्य जनतेला पटवून देणे शक्य नव्हते ना? म्हणुन मग युपीएने सर्जिकल स्ट्राईक केले, पण त्याविषयी संपुर्ण गोपनीयता पाळली. आज इतकी वर्षे उलटून गेली, तरीही त्याचा नेमका तपशील सांगायची त्यांना हिंमत झालेली नाही. उलट तो तपशील उघड होऊ लागला, तेव्हा चिदंबरम यांनी आपला हेतू वेगळा असल्याचे सांगत हात झटकलेले आहेत. मात्र देशप्रेमाचे नाटक कायम चालू आहे.

4 comments:

  1. प्रश्न - एका नावेत बसुन चिदम्बरम , दिग्विजय , मणिशंकर , केजरिवाल , राहुल व कन्हैय्या जात आहेत , नाव जर पाण्यात बुडाली तर कोण वाचेल ? उत्तर - देश वाचेल !

    ReplyDelete
  2. भाऊ आपण माझाच surgical strike केलात

    ReplyDelete
  3. भाऊ,साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पुरोहित कधी सुटणार ?? यासाठी आपण दबाव टाकावा ही विनंती

    ReplyDelete