Thursday, October 6, 2016

पाकिस्तानातील उलथापालथ


modi sharif lahore के लिए चित्र परिणाम

पाकिस्तानचे ‘द डॉन’ हे जुने व विश्वासार्ह दैनिक मानले जाते. गुरूवारी त्यात एक बातमी प्रसिद्ध झाली. ती थक्क करून सोडणारी आहे. कारण त्यातून मागल्या काही दिवसात पाकिस्तानी माध्यमे जी चित्रे रंगवत आहेत, त्यावरच बोळा फ़िरवला गेला आहे. ती बातमी कुणा भारतीय माध्यमाने दिलेली नाही, म्हणूनच पाक जाणत्यांना ती नाकारताही येणार नाही. त्या बातमीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी सेनाध्यक्षांना बाजूला ठेवून, जिहादी व त्यांच्या म्होरक्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश पाकच्या गुप्तचर खात्याला दिलेले आहेत. उरी येथील भारतीय लष्करी तळावरचा हल्ला आणि नंतर भारतीय कमांडोंनी केलेला प्रतिहल्ला, यावरून जगभर वादळ माजलेले होते. त्यात भारत आणि पाक यांनी दोन वेगवेगळ्या गोष्टी जगासमोर मांडल्या. मग कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न होता. पाकची माध्यमेही सरकारी बाजूवर विसंबून भारतविरोधी प्रचार करीत होती. अगदी पाकिस्तान जगात एकाकी पडतोय आणि त्याच्यावर राजनैतिक बहिष्कार घातला जाण्याचा धोकाही पाकिस्तानी पत्रकारही नाकारत होते. पण आता डॉनची बातमी खरी मानायची, तर पाक सरकारही आपण एकाकी पडत चालल्याचे मान्य करीत आहे आणि माध्यमांनाही जाग येऊ लागली आहे. अन्यथा इतकी बेधडक बातमी डॉन प्रसिद्ध करू शकला नसता. हे भारताचे खरे यश मानता येईल. कारण पाकिस्तान अनेक मुंडक्यांचा राक्षस आहे व त्याची हत्या कुठलेही एक मुंडके उडवून होऊ शकत नाही. मात्र ही मुंडकी एकमेकांच्या विरोधात लढू वा भांडू लागली, तरच त्या राक्षसाला निकामी करता येऊ शकेल. त्याचीच सुरूवात होत असल्याचे डॉनची बातमी सांगते. कारण आता पाकसेना व पाक सरकार यांच्यातच जुंपलेली दिसते आहे. तिचे पर्यवसान कदाचित पाकमध्ये लष्कराच्या बंडामध्येही होऊ शकते आणि नवाज शरीफ़ पुन्हा बडतर्फ़ही होऊ शकतात.

कारगिल युद्धानंतर तसे झालेले होते. कारगिल प्रकरणी पाक तोंडघशी पडल्यावर शरीफ़ यांनी अमेरिकेची मनधरणी करून, युद्धबंदी घोषित केली होती. त्याचाच राग मनात ठेवून पुढे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ़ यांनी शरीफ़ना नंतर बडतर्फ़ केलेले होते. तेही नाट्य़ महत्वाचे होते. श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेले मुशर्रफ़ मायदेशी परत येत असताना, त्यांच्या विमानाला कराची विमानतळावर उतरण्यालाच शरीफ़ यांनी प्रतिबंध घातला होता. तेव्हा मुशर्रफ़ यांच्या विश्वासू सहकार्‍यांनी उठाव करून शरीफ़ यांना अटक केली आणि परस्पर लष्करी बंडाची घोषणा केलेली होती. मग मायदेशी येऊन मुशर्रफ़ यांनी रितसर स्वत:ला लष्करी प्रशासक म्हणून घोषित केलेले होते. शरीफ़ यांच्यावर खटले भरून त्यांना देशातून हाकलून लावलेले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चहुकडून भारताने पाकची कोंडी केलेली असल्याने लोकशाही नागरी सरकार चालवणेही शरीफ़ यांना अशक्य होऊ लागले आहे. कारण जगाने व आशियानेही पाकिस्तानला वाळीत टाकलेले आहे. यातून मार्ग काढायचा तर वातावरण निवळण्याची गरज आहे. मात्र भारत ते वातावरण सौम्य होऊ द्यायला तयार नाही. जिहादी हल्ले बंद झाल्यशिवाय कुठली बोलणी नाहीत की चर्चा नाही; अशी ठाम भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. तिला जगातल्या मोठमोठ्या बलवान देशांनी पाठींबा दिलेला आहे. परिणामी मध्यस्थी करायला सुद्धा कोणी मित्र पाकिस्तानकडे शिल्लक उरलेला नाही. अझर मसूदला दहशतवादी ठरवण्यात चिनने पाचर मारलेली असली, तरी तो तांत्रिक मुद्दा आहे आणि अधिक काळ तसे करता येणार नाही, असे चिननेही बजावले आहे. म्हणूनच पाक पुरता कोंडीत सापडला आहे. त्यातून फ़क्त भारत व मोदीच मार्ग काढू शकतात. तोच पर्याय शरीफ़ यांना पत्करण्याची पाळी आलेली आहे.

सर्जिकल स्ट्राईक व राजनैतिक कोंडी करून मोदी सरकारने पाकला कैचीत पकडले आहे. ती कोंडी नुसती नागरी सरकारची नाही, तर पानसेनेचीही झालेली आहे. त्यातून माघार घेण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. पण माघार घेतली तर नाक कापले जाते, म्हणून पळवाट शोधण्याचा हा प्रयास आहे. ती पळवाट शरीफ़ यांनीच लष्कराला आणि गुप्तचर खात्याला दाखवली आहे. पहिली गोष्ट म्हणजे सीमेवरील जिहादी हल्ले थांबवावे. दुसरी गोष्ट, जिहादींचे म्होरके आहेत त्यांना आवरावे किंवा त्यांच्यावर खटले भरावेत. तिसरी गोष्ट संपुर्ण पाकिस्तानात पोलिसांना जिहादी घातपाती यांच्यावर कारवाई करण्याची मोकळीक द्यावी. तशा कारवाईत लष्कर वा गुप्तचर खात्याने हस्तक्षेप करू नये. इतक्या स्पष्ट शब्दात शरीफ़ यांनी आपली भूमिका मांडली आहे. ती मान्य नसेल तर जगाकडून बहिष्कृत होण्याच्या तयारीला लागा, असा इशारा सुद्धा दिलेला आहे. आजवर पाकिस्तानची इतकी चहुबाजूंनी कधी कोंडी झाली नव्हती आणि भारताने पाकचे नाक इतके कधी दाबलेले नव्हते. ही म्हणूनच नरेंद्र मोदींची किमया म्हणायला हवी. मात्र त्यात शरीफ़ शरण आलेले आहेत, की त्यांची मोदींशी मिलीभगत आहे, असा एक प्रश्नही शिल्लक उरतो. पाकिस्तानात लष्कराचा मर्जीवर राजकीय सरकार चालते, हे उघड गुपित आहे. जेव्हा लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार लष्कराला डोईजड होऊ लागते, तेव्हा सेनाप्रमुख पंतप्रधानाची गठडी वळतात आणि सत्ता ताब्यात घेतात; हा जुना अनुभव आहे. शरीफ़च त्यातून गेलेले असल्याने तितका धोका ते पत्करण्याची शक्यता अजिबात नाही. पण नेमकी योजना आखून पाकसेनेला व त्यांच्या सेनाधिकार्‍यांना नामोहरम केले, तर नागरी सत्तेला सेना शरण जाऊ शकेल, ही गोष्टही तितकीच खरी आहे. मात्र सेना नामोहरम झाली तरी पकिस्तान दुबळा व पराभूत होता कामा नये; अशीही शरीफ़ यांची अपेक्षा असू शकते.

भारताने बांगला देशला पाकिस्तानपासून तोडले. पण कधीही भारताने बांगला देशात आपली हुकूमत गाजवली नाही, की तो प्रांत आपल्याला जोडून घेतला नाही. म्हणजेच भारतासमोर दुबळा असला तरी पाक शिल्लक राहू शकतो. किंबहूना भारतच पाकला अनेक बाबतीत स्वयंभू व्हायला मदतही करू शकतो. हे बांगला देशाकडे बघून समजू शकते. मग त्याच मार्गाने पाकिस्तानने वाटचाल करून सततची लष्करी राजवटीची टांगली तलवार काढून टाकण्याचा जुगार शरीफ़ खेळत आहेत काय? पाकला सेनेच्या प्रभावाखालून बाहेर काढण्यासाठी मोदी-शरीफ़ यांच्यात शिजलेला काही डाव आहे काय? त्यात पाकसेनेला दुबळे करून जिहादी दहशतवादाचा आश्रयदाता खतम करायचा. मात्र पाकसेना दुबळी झाली तर बदल्यात भारताने पाकचे तुकडे पाडणार नाही, इतके आश्वासन द्यायचे. पाकच्या नागरी सरकारशी सहकार्य करून पाकच्या विकासाला हातभार लावायचा. असा काही छुपा करार शरीफ़-मोदी यांच्यात झाला आहे काय? तसे अजिबात नसेल असे मानता येत नाही. डॉनची बातमी बघितली तर नवाज शरीफ़ फ़ॉर्मात दिसतात आणि त्यांनी लष्करप्रमुख राहिल शरीफ़ यांना अंगावर घेण्याचे धाडस केलेले आहे. त्यात त्यांना चिन वा अमेरिका मदत करण्याची बिलकुल शक्यता नाही. शक्य असेल तर भारत वा मोदी-डोवालच अशी खेळी करू शकतात. आज मोदींना जगात मान आहे, तितका शरीफ़ना नाही. कारण भारताची सर्व सुत्रे मोदींच्या हाती आहेत.. उलट शरीफ़ सेनादलाच्या हातातले कळसुत्री बाहुले आहेत. त्यातून मुक्त होऊन मोदींप्रमाणे स्वतंत्र देशाचा स्वयंभू पंतप्रधान होण्याची आकांक्षा शरीफ़नी बाळगली आहे काय? डॉनची बातमी खरी असेल, तर त्यातल्या अनेक छटा तपासून बघण्याची गरज आहे. ही घडामोड वरकरणी दिसते तितकी सोपी वा साधीसरळ नक्कीच नाही. काय रहस्य दडले आहे शरीफ़ यांच्या धाडसात?

5 comments:

  1. आपण म्हणता तसे असेल तर अनेक प्रश्न , त्यात काश्मिर चाहि आलाच , मार्गीलागुन भारतीय उपखंडाचे चित्रच बदलून जाईल .

    ReplyDelete
  2. शरीफ यांचे धाडस की अगतिकता?
    Do or die.
    थांबा आणि पहा.

    ReplyDelete
  3. अगदीच फांसे नीट पडले नाही तर शरीफना भारतात आश्रय मिळेल इतके तरी आश्वासन दिले गेले असेल का ?

    ReplyDelete
  4. मस्तच निरीक्षण भाऊ जर हे खरे असेल तर मोदीजी मोठ्या विजयाच्या जवळ आहेत

    ReplyDelete
  5. मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केल्या नंतर शरीफला पैशाचा मोबदल्यात सोडून दिला होत.

    ReplyDelete