Tuesday, June 27, 2017

मोदी‘भक्त’ कामाला लागले

modi cartoon kureel के लिए चित्र परिणाम

नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांना मोदीभक्त म्हणायची एक फ़ॅशन मागल्या तीन वर्षात निर्माण झाली. पण त्यामागे टवाळीचा हेतू असतो. वास्तविक अशा समर्थकांना भक्त संबोधणे, ही त्या शब्दाची विटंबना आहे. कारण खरा भक्त आपल्या दैवतासाठी झीज सोसत असतो, त्याग करत असतो. पण ज्यांना मोदीभक्त संबोधले जाते त्यातल्या क्वचितच कोणी मोदींसाठी कुठला त्याग केला असेल वा त्रास घेतला असेल. हे लोक बहुतांश बोलघेवडे आणि तोंडपाटिलकी करणारे आहेत. त्यांनी मोदींनी निवडून यावे किंवा राजकारणात यशस्वी व्हावे, म्हणून काय केले, त्याचा हिशोब कधी मिळू शकत नाही. मात्र मोदींचे खरे भक्त व त्यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे बाजूला पडलेले आहेत. त्यांच्या माथी मोदीत्रस्त वा मोदीद्वेषी असा शिक्का मारला जात असतो. त्यामध्ये ज्या शेकडो लोकांचा सामवेश आहे त्यापैकी एक म्हणून आपण महाराष्ट्रातले एक बुद्धीमान संपादक व व्यासंगी पत्रकार कुमार केतकरांना मोजू शकतो. अशा खर्‍या त्यागी भक्तांचे योगदान मिळाले नसते, तर मोदींना इतकी मोठी मजल मारता आली नसती, की पंतप्रधान होऊन जगभर मिरवता आले नसते. किंबहूना देशाला नरेंद्र मोदी नावाचा कोणी माणूस गुजरातचा मुख्यमंत्री आहे वा त्याची पंतप्रधान होण्याची क्षमता असू शकते, याचा जगाला थांगपत्ता लागला नसता. मोदीही शिवराज चौहान वा रमणसिंग यांच्याप्रमाणे आपल्या राज्यातच कुंठीत राहिले असते. पण केतकर आदिंनी तसे होऊ दिले नाही आणि आज आपल्या ह्या दैवताला पुढल्याही लोकसभा निवडणुकीता अभूतपुर्व यश मिळावे, म्हणून आतापासून असे भक्त कामाला लागलेले आहेत. तसे नसते तर इतक्यातच केतकरांनी २०१९ मध्ये अयोध्येचा राम अवतरला तरी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य. असल्याचा निर्वाळा देण्याची काय गरज होती? याला म्हणतात खरी भक्ती!

सध्या नरेंद्र मोदी त्यांनीच नियुक्त केलेले राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना निवडून आणण्य़ाच्या खटाटोपात गुंतले आहेत. इतक्या व्यापात असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मोदींना बोलावून घेतले. सहाजिकच मोदींना २०१९ च्या लोकसभा निवडणूकीचा विचारही करायला सध्या सवड नाही. अशा स्थितीत केतकरांनी एका संमेलनात ती जबाबदारी उचलली आहे. त्यांनी मोदींच्या पुढल्या लोकसभा प्रचाराचा नारळच फ़ोडला आहे. पाच वर्षापुर्वीही लोकसभा निवडणूकीला तब्बल दोन वर्षे बाकी असताना केतकर वा तत्सम लोकांनी मोदींची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा दिवास्वप्न ठरण्य़ाची आगंतुक भाषा सुरू केली होती. वास्तवात त्यावेळी मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद टिकवण्याची शर्यत धावायला लागत होती. आधी दोनदा जिंकलेली विधानसभा पुन्हा तिसर्‍यांना जिंकण्याच्या खटाटोपात मोदी गुंतलेले होते. त्यांनी सदभावना यात्रा काढलेली होती. तिथे शेकडो लोकांना नित्यनेमाने भेटून आपली प्रतिमा सुधारण्यात मोदी गर्क झालेले होते. तेव्हा केतकरांसारख्यांनीच असा माणूस पंतप्रधान व्हायला कसा नालायक आहे; त्याचे ढोल पिटायला सुरूवात केली. त्याच्या परिणामी मोदी पंतप्रधान पदाला लायक आहेत किंवा नाहीत, त्याचा विचार भारतीय जनमानसात रुजवला गेला. तेव्हा तर भाजपातही कोणी नेता प्रवक्ता याविषयी अवाक्षर बोलायला धजावत नव्हता. कितीही डिवचले, तरी भाजपाचे प्रवक्ते मोदींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दल बोलायची हिंमत करत नव्हते. केतकर वा तत्सम कुणी प्रश्न केलाच, तर भाजपा नेते प्रवक्तेही बगल देऊन टाळाटाळ करीत होते. पण अशा खर्‍या मोदीभक्तांची चिकाटी मोठी दांडगी होती. त्यांनी भाजपाच्या अधिवेशनात मोदींना लोकसभेतील प्रचारप्रमुख नेमले जाईपर्यंत आपला हट्ट सोडला नाही आणि भाजपाला मोदींना राष्ट्रीय नेतृत्वासाठी निवडणे भाग पाडले होते.

नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले होते आणि त्यांनी पक्षाच्या संसदीय मंडळातूनही मोदींना डच्चु दिला होता. अशा भाजपाला मोदी राष्ट्रीय नेतृत्व करायला नकोच असल्याचा आणखी कुठला पुरावा हवा? पण केतकरांसारख्या निस्सीम मोदीभक्तांनी आपला हट्ट सोडला नाही आणि अखेरीस गडकरींच्या जागी अध्यक्ष झालेल्या राजनाथसिंग यांनी गोव्याच्या अधिवेशनात मोदींना प्रचारप्रमुख नेमले. तिथून मग केतकर आदि मोदीभक्तांना इतका जोश आला, की रोजच्या रोज भाजपाच्या नेत्यांवर आणि सामान्य भारतीयांवर त्यांनी मोदीनिंदेचा भडीमार केला. त्यातून या गुजरातच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आणूनच विश्रांती घेतली होती. हळुहळू त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेले आणि मग उगवत्या सूर्याला दंडवत घालणारे अनेक तोंडपुज्ये वाचाळ मोदीसमर्थक जमा होत गेले. पण त्यापैकी कोणी कधी मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणण्यासाठी कवडीचे योगदान दिलेले नव्हते. आता त्याला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला असून, आणखी दोन वर्षांनी पुढल्या लोकसभा निवडणूका व्हायच्या आहेत. अशावेळी पुन्हा खरे मोदीभक्त आघाडीवर येताना दिसत आहेत. तसे नसते तर केतकरांनी नांदेडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात अयोध्येतील रामाच्या नामाचा जप कशाला केला असता? नोटाबंदीपासून अनेक विषयामुळे लोक मोदींवर नाराज आहेत. म्हणूनच मोदींचा पराभव केतकरांनी वर्तवला आहे. सामान्य लोक सध्या संमोहनात असून लौकरच त्यांना शुद्ध येईल आणि २०१९ साली मोदी पराभूत होतील, अशी ग्वाही केतकरांनी दिली आहे. सहाजिकच संमेलनात उपस्थित असलेले तमाम मोदीभक्त सुखावले नसते, तरच नवल होते. मागल्या पाच वर्षात आपण कुठल्या संमोहनात गुंगून गेलेलो आहोत, त्याचा शोधही न लागलेल्यांच्या संमेलनात इतर काय अपेक्षित असू शकते?

केतकर म्हणतात, संमोहन अवस्थेतून बाहेर पडले मग दुखायला लागते. हे सत्य आहे. पण पाच वर्षाहून अधिक काळ उलटत आला तरी केतकरांसारखे मोदीभक्त अजून आपल्या पुरोगामी संमोहनातून बाहेर पडू शकलेले नाहीत. खरेच संमोहनातून बाहेर पडल्यावर दुखायला लागत असते, तर लोकसभेच्या त्या दारूण पराभवानंतर कॉग्रेस वा अन्य पुरोगामी पक्षांना दुखते आहे याची जाणिव नक्की झाली असती. आपण पराभूत झालोय इतके तरी नक्की उमजले असते. पण इतकी वर्षे उलटून गेली तरी केतकरांसह त्यांचे पुरोगामी सवंगडी कुठल्या संमोहनात फ़सलेत? मोदींची नोटाबंदी वा अन्य जुमले यांचा प्रभाव संपला, मग महागाईचे चटके लोकांना बसतील असे केतकर म्हणतात. ते कधी बसणार? कारण त्यानंतर अनेक निवडणूका झाल्या आणि त्यातही मोदींच बाजी मारून गेलेत. पण त्या निकालांनी आपल्याला दुखापत करणार्‍या कुठल्या किती जखमा झाल्यात, त्याकडेही वळून बघण्याची बुद्धी पुरोगाम्यांना सुचत नाही. तेव्हा हे पुरोगामी संमोहन किती प्रदिर्घकालीन असू शकते, त्याचे नवल वाटू लागते. त्याच संमोहनाची झिंग उतरली म्हणून लोकांनी पुरोगामी पक्षांना धुळ चारली. त्याचा परिणाम म्हणून मोदी जिंकलेले दिसतात. मोदींची लोकप्रियता त्यांना सत्तेवर घेऊन गेलेली नाही. पुरोगामीत्वाच्या चटके व वेदनांनी केतकरांच्या लाडक्यांना पराभूत केले आहे. खुज्या पुरोगामीत्वाच्या समोर मोदी उत्तुंग वा उंच वाटत आहेत. अन्यथा मोदी आहेत तितकेच सामान्य आहेत. मोदींच्या कर्तृत्वापेक्षाही सामान्य भारतीयांना पुरोगामी नाकर्तेपणाच्या भितीने भेडसावलेले होते. म्हणूनच मोदींना लोकांनी पसंती दिली. आता तीच पसंती कायम राखण्यासाठी केतकरांनी कंबर कसली आहे. मग मोदींना भिती कशाची? त्यांच्या विजयासाठी तमाम पुरोगामी सर्वशक्तीने मैदानात उतरले असतील, तर घरी बसूनही मोदी पुन्हा पंतप्रधान होणारच ना? मोदींना रामाचे वरदान नकोच आहे. केतकरांचे वरदान पुरेसे आहे.

9 comments:

 1. Apratim lekh ahe Bhau. Kumar Ketkar defies human intellect and intelligence. Such small minded people have denigrated the beauty of the Indian mind and Indian Culture.

  ReplyDelete
 2. अभिषेक मुळेJune 27, 2017 at 11:15 PM

  मार्मिक विश्लेषण

  ReplyDelete
 3. नक्की संमोहन कि गारुड?

  ReplyDelete
 4. बोलण्याआधी केतकरांच्या डोळे आणि तोंडाच्या हालचालीमुळे ते काय वाक्य बोलणार हे गेस करता येते असे माझा एक मित्र मला सांगत असतोय.
  फारच पाळीव झालेत सुमार्जि.

  ReplyDelete
 5. उपहासात्मक विश्लेषण खूप छान..भाऊ..तुमचे सर्वच लेख छान असतात.

  ReplyDelete