उत्तरप्रदेशच्या निकालानंतर गायब झालेल्या राहुल गांधींनी शेतकरी आंदोलन पेटल्यावर पुन्हा भारतीय मतदाराला अपले दर्शन घडवले होते. अचानक ते घराबाहेर पडले आणि सहारनपूरला भडकलेल्या जाळपोळीत तेल ओतायला हजर झाले. अर्थातच तिथल्या पोलिसांनी जमावबंदी लागू केली असल्याने राहुलना त्या शहरात जाऊ दिले नाही. तेव्हा राहुलनी ओरडा केला आणि निमूट माघारी जाण्याचा निर्णय घेतला. पुढे त्या सहारनपूरच्या दंगलीचे काय झाले, त्याची खबरही राहुलना घ्यावी असे वाटले नाही. मग त्यांनी पुन्हा घरात दडी मारली आणि अशाच कुठे हिंसाचाराच्या वा दंगलीच्या बातम्या झळकतील, तेव्हाच तिकडे धाव घेतली. सहाजिकच हल्ली राहुलना शोकांतिकेचे पर्यटक म्हणून लोक ओळखू लागले आहेत. मग मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलन भडकले आणि जाळपोळ झाल्या्वर राहुलनी तिकडे धाव घेतल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नव्हते. मग राहुल पुढे तेलंगणात गेले आणि त्यांनी घराणेशाहीवर हल्ला चढवून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अवाक करून सोडले. यातही काही नवे नाही. गेल्या वर्षी जंतरमंतर येथे माजी सैनिक समान निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी दिर्घकाळ धरणे धरून बसले होते, तेव्हाही राहुलनी गर्दीतले फ़ोटो काढून घेण्यासाठी तिकडे मोर्चा वळवला होता. पण त्या माजी सैनिकांनी त्यांना व्यासपीठावर चढू दिले नाही आणि राहुलना हात हलवत माघारी फ़िरावे लागले होते. पुढे काळा पैसा उकरून काढण्यासाठी पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि राहुल गांधींना दिर्घकाळाचा रोजगार मिळाला होता. नोटाबंदीने सामान्य जनतेचे कसे भयंकर हाल चालू आहेत, त्याचा आवाज उठवण्यासाठी राहुल दिल्लीच्या विविध बॅन्कांमध्ये पोहोचले होते. पण जेव्हा नोटाबंदीची मुदत संपली, तेव्हा त्याचे लाभ विचारण्याची वेळ होती. तर तेव्हाच राहुल गायब झाले होते.
राहुल गांधी यांच्याकडे आज देशातील सर्वात जुन्या कॉग्रेस पक्षाची सुत्रे आलेली असून, त्या पक्षाला अधिकाधिक हास्यस्पद बनवण्याचा या तरूण नेत्याने विडाच उचलला आहे. म्हणून तर प्रत्येक वेळी ते काहीतरी आवेशपुर्ण बोलतात आणि पक्षाची हालत आणखी खराब करून टाकतात. आताही मध्यप्रदेश वा अन्य राज्यात शेतकर्यांचा लढा पेटला असताना राहुलनी तिकडे धाव घेतली होती. पण शेतकरी अजून रस्त्यावर असताना राहुल मात्र सुट्टी झाल्याचे सांगून परदेशी निघून गेले आहेत. इटालीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी सुट्टीवर जात असल्याचे राहुलनीच सोशल मीडियात जाहिर केले आणि ती एक बातमी होऊन गेली. अनेक राजकीय नेते असे परदेशी सुट्टीवर जात असतात. त्यांच्या कोणी बातम्या देत नाही. मग राहुल यांच्याच बाबतीत बातम्यांचा गदारोळ कशाला उडवला जात असतो? कालपरवाचीच गोष्ट घ्या. मध्यप्रदेशात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आणि पोलिसांनी गोळीबारही केला. सहाजिकच तिथे राहुल गांधींनी धाव घेतली. पण ज्यांच्याकडे त्या राज्याचे कॉग्रेस नेतृत्व सोपवलेले आहे, ते ज्योतिरादित्य शिंदे गायब होते. राज्याचा प्रमुख कॉग्रेस नेताच अशा कसोटीच्या प्रसंगी राहुल सोबत नसावा, ही चमत्कारीक गोष्ट नाही काय? पण त्याचा कोणी उल्लेखही केला नाही. ज्योतिरादित्य कुठे आहेत? राहुल सोबत मंदसौरला का पोहोचले नाहीत? असले सवाल कोणा पत्रकारानेही राहुलना वा कॉग्रेसला विचारले नाहीत. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे परदेशी सुट्टीवर गेलेले होते. पण त्याची कुठे चर्चाही झाली नाही. पण राहुल परदेशी जाणार म्हणताच चर्चा होते आणि गदारोळ माजवला जातो. कारण राहुलनीच तशी स्थिती निर्माण करून ठेवली आहे. त्यांच्या मातोश्री सोनिया परदेशी गेल्या याचा उल्लेखही सहसा कुठे बातम्यांमध्ये येत नाही. पण राहुलची परदेशवारी नेहमी गाजते.
राहुल कुठेही जातात आणि समोरच्या गर्दीला सांगतात, आपण त्यांच्यासाठी लढायला आलेले आहोत. पण लढाई आपल्या जागी रहाते आणि राहुल गांधी फ़ोटो काढून घेतल्यावर गायब होतात. नंतर त्यांना ती समस्या वा लढ्याचे स्मरणही रहात नाही. त्यापेक्षाही मजेशीर गोष्ट म्हणजे असा लढा किंवा विषय जेव्हा ऐरणीवर येतो, तेव्हाच राहुल परदेशी निघून गेलेले असतात. नोटाबंदीमुळे करोडो लोकांचे हाल झाले असा ओरडा राहुलनी केला होता. सहाजिकच नोटाबंदी उठल्यानंतर त्यात जनतेचा कुठला लाभ झाला, असा सवाल विचारण्याची वेळ होती. ३१ डिसेंबरला नोटाबंदीची मुदत संपली. तेव्हा किती काळा पैसा गोळा झाला व जनतेचे कोणते कल्याण त्यात साधले गेले, असा खडा सवाल पंतप्रधान मोदींना विचारण्याची वेळ होती. पण तेव्हाच राहुल गांधी युरोपच्या दौर्यावर सुट्टीसाठी निघून गेलेले होते. थोडक्यात लोखंड भट्टीत घालून तापवायचे आणि त्यावर घणाचा घाव घालण्याची वेळ आली, मग ते लालभडक लोखंड पाण्यात बुड्वायचे, असे अजब लोहारकाम राहुल गांधी करतात. मग त्यांच्या अशा विक्षिप्त वागण्याचे खुलासे देण्यापलिकडे कॉग्रेस नेते व प्रवक्त्यांपाशी अन्य काही काम उरलेले नाही. हळुहळू नव्या पिढीचे कॉग्रेस नेतेही राहुलचेच अनुकरण करू लागले आहेत. मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनाने भडका उडालेला असताना तिथले कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे युरोपच्या दौर्यावर गेलेले होते. पण माघारी येताच त्यांनी अगत्याने मंदसौरला जाऊन अटक करवून घेतली. पण आंदोलनाचा भडका उडाल्यापासून चारपाच दिवस शिंदे कुठे गायब होते, त्याचा खुलासा देण्याची त्यांना गरज वाटली नाही. असे टिव्हीच्या कॅमेरासमोर नाटक रंगवण्याला आजकाल कॉग्रेस पक्षात संघटनात्मक कार्य मानले जाऊ लागले असेल, तर राहुलचेच अनुकरण होणार ना? टाईमपास म्हणुन लोकांविषयी आस्था दाखवणे यापेक्षा वेगळे काय चालू आहे?
लोकसभेच्या निवडणुका ऐन भरात आल्या असताना तीन वर्षापुर्वी सर्व माध्यमात राहुल व मोदी यांची तुलना चाललेली असायची. त्यात नलिनी सिंग या पत्रकार महिलेने राहुलचे नेमक्या शब्दात वर्णन केलेले होते. मोदी हे दिवसाचे चोविस तास व आठवड्याचे सातही दिवस राजकारणी आहेत. उलट राहुल गांधी अंशकालीन नेते आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या. त्याचा अर्थ असा, की राहुल एखादा दिवसही पुर्ण वेळ, म्हणजे अवघे आठ तासही राजकीय काम करीत नाहीत. उलट नरेंद्र मोदी दिवसाचे चोविस तास राजकीय नेता असतात आणि राजकारणाचा बोजा सातही दिवस अथक उचलत असतात. असे सिंग यांना म्हणायचे होते. त्यांचे ते वर्णन मोदींनी खोटे पडू दिले नाही. तितकेच राहुलनेही नलिनी सिंग यांचे शब्द खरे करून दाखवलेले आहेत. सहाजिकच सामान्य मतदाराला त्यांनी प्रभावित करणे दूर राहिले. स्वपक्षातही सामान्य कार्यकर्त्याला हा नवा नेता पोरकट वाटू लागला आहे. तसे नसते तर त्याच उत्तरप्रदेशातील एका जिल्हा कॉग्रेस नेत्याला पक्षातून हाकलावे लागले नसते. विनय प्रधान नावाच्या या नेत्याने सोशल मीडियात राहुलचे कौतुक करणारा मजकूर टाकला, म्हणून त्याची हाकालपट्टी झाली आहे. कारण त्याने राहुलचे मोठे कौतुक शब्दात केलेले असले, तरी राहुलचा उल्लेख हास्यास्पद केला आहे. आपल्या त्या मजकूरात विनय प्रधान याने राहुल यांचे नाव पप्पू असे टाकलेले आहे. एकूण राहुल गांधींची जनमानसातील प्रतिमा काय आहे, त्याचेच प्रतिबिंब या मजकूरात पडलेले आहे. पप्पू म्हणजे अर्धवट अकलेचे पोर अशीच प्रतिमा असते आणि सातत्याने तसे बोलले जात असल्याने, आता कॉग्रेसमध्येही अनेकांना तो शब्द चपखल वाटू लागला आहे. अन्यथा कौतुकापोटी एका जिल्हा कॉग्रेस नेत्याने पर्यायवाची म्हणून पप्पू असा उल्लेख कशाला केला असता? कॅडबरीच्या एका जाहिरातीमध्ये अमिताभने अशा नादान पोराच्या उत्तीर्ण होण्याविषयी केलेली जाहिरात आठवते?
भाऊ!
ReplyDeleteपप्पू पास हो गया।
कॅडबरी हो जाय।
राहूल बरा असे राजेशाही बोलने वागने मध्यप्रदेशची जबाबदारी असलेल्या शिंदेचे असते.चार दिवसानी उगवल्यावर वाहिनीच्या पत्रकारालाच दटावु लागले की तुम्ही इथे acमध्ये बसता वगैररे तो पत्रकार खर तर खुप फिरनारा आहे ते चिडुन म्हनाला की तुमच्यासारखे नेते असल्यावर जनतेला शिवराज शिवाय काय पर्याय आहे? मुख्य म्हनजे महाराष्ट्रतील त्याची आवृती लंडन मध्य् होती इथ आंदोलन पेटल होत.फायदा पन घेता येत नाही.शाहना नावै ठेवुन ताय उपयोग
ReplyDelete