सध्या भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध खुपच बिघडलेले आहेत आणि त्यात सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. भारतात सत्तांतर झाल्यानंतर वाजपेयी असताना किंवा मोदी आल्यावर, संबंध सुधारण्यासाठी खास पुढाकार घेतला गेला होता. पण त्याला भारताचा बावळटपणा समजून पाकिस्तान नसत्या उठाठेवी करीत राहिला. काश्मिरचा प्रश्न अधिक पेटवणे आणि घातपाताच्या मार्गाने भारताला अधिक जेरीस आणणे; ही पाकची रणनिती बनुन गेली आहे. थोडक्यात आपल्याला संवादाची व मैत्रीची भाषा नको असल्याचेच संकेत, पाकिस्तान वारंवार देत राहिला आहे. त्यानंतरच दोन्ही देशातले संबंध अधिकाधिक विकोपास गेले आहेत. सहाजिकच ह्या विषयाचा निचरा करायचा, तर पाकिस्तानचे आणखी तुकडे पाडणे वा त्याला कायमचा नामोहरम करून टाकणे, इतकाच पर्याय भारतापुढे शिल्लक राहिला आहे. स्थिती १९७१ पेक्षाही अधिक बिकट व विचित्र आहे. तेव्हा पाकिस्तानची कटकट फ़क्त भारतापुरती मर्यादित होती. आज पाकिस्तान ही अवघ्या सुबुद्ध जगाची डोकेदुखी होऊन बसला आहे. जगातल्या कुठल्याही जिहादी घातपाताचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत येऊन पोहोचत असतात. त्यामुळे जगात पाकिस्तानचे मित्र कमी झाले असून, चीनसारखा एखादा समर्थ देश दिवाळखोर दारुड्याला आपल्या फ़ायद्यासाठी मदत करावी, तसा पाकच्या मागे उभा रहात असतो. पण कसोटीचा प्रसंग ओढवला तर चीनही पाकिस्तानला वार्यावर सोडून देणार आहे. मग भारताने काय केले पाहिजे? इंदिरा गांधी यांचे अपुरे राहिलेले काम नरेंद्र मोदींनी पुर्ण करावे काय? १९८० सालात पुन्हा सत्तेवर आलेल्या इंदिराजींचे एकच स्वप्न होते आणि ते पाकिस्तानचे आणखी तुकडे पाडण्याचे होते. पण ते साकार होण्यापुर्वीच त्यांची हत्या झाली. आज मोदींसारखा तितकाच खमक्या नेता भारताला लाभला असताना, ते स्वप्न पुर्ण होईल काय?
पाकिस्तान हा सिंध व पंजाब या हिंदूस्तानातील दोन मोठ्या प्रांतांना जोडून बनलेला देश आहे. त्याच्या पलिकडे वायव्य सरहद्द प्रांत नावाचा प्रदेश आहे तो मनाने कधीच पाकमध्ये सहभागी झालेला नव्हता. तर बलुचीस्तान हा स्वायत्त प्रांत ब्रिटीश भारताचा हिस्सा नव्हता. तरीही तिथल्या नबाबाच्या डोक्याला पिस्तुल लावून त्याचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण उरकण्यात आलेले होते. पुढेही बलुची लोकांना दुय्यम नागरिकाची वागणूक देऊन छळले गेले. तर सिंध प्रांतामध्येच प्रामुख्याने भारतीय प्रदेशातून स्थलांतरीत झालेल्या निर्वासितांनी आपला संसार थाटला. त्यांनाही कधी प्रतिष्ठा लाभली नाही. सहाजिकच पाकिस्तान आज भारतद्वेष या एकाच कल्पनेने जोडलेला असला, तरी अंतर्गत परस्पर वितुष्टाचे बीज कायम राहिलेले आहे. त्यामुळेच तिथे एकजीव पाकिस्तानी समाज निर्माण होऊ शकला नाही, की राष्ट्राची उभारणी होऊ शकली नाही. पाक राजकारणावर कायम पंजाबी नेत्यांचे वर्चस्व राहिले आणि त्यांच्याच सरंजामी अहंकाराखाली बाकीचा पाकिस्तान भरडला गेला आहे. त्यामुळेच १९७१ सालात बंगाली पंतप्रधान नेमायला नकार देऊन पंजाबी लष्करशहाने पाकच्या विभाजनाला हातभार लावला होता. आताही उर्वरीत पाकिस्तानात पंजाबी वर्चस्वाने बाकीच्या सांस्कृतिक घटकांना पायदळी तुडवलेले आहे. आपला आवाज उठवू बघणार्यांना तुडवणारी पाक सेना, प्रामुख्याने पंजाबी घटकाची असल्याने सिंधी, बलुची किंवा पख्तुनी घटकांचा मेळ कधीच बसलेला नाही. त्यात पुन्हा शिया सुन्नी व अहमदिया असे धार्मिक भेदभाव आहेतच. या सर्वांना एकत्र नांदवणे राज्यकर्त्याला अशक्य होते. त्यात आणखी लष्करातील पंजाबी वरचष्मा ही डोकेदुखी कायम आहे. असा पाक समाज विभागला गेलेला असताना त्याचेच शस्त्र त्याच्या विरोधात वापरणे अशक्य नाही. जसे काश्मिरी वेगळेपणाला खतपाणी घालून पाकने भारताला सतावले आहे, तसे भारत पाकिस्तानात घडवू शकतो काय?
अफ़गाणिस्तानातला सोवियत विरोधी जिहाद चालवताना पाकने बलुची टोळ्या व अरबांचा संकर घडवून आणला. त्यात अनेक परदेशी मुस्लिम तरूणांना भारत विरोधी जिहादमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी बलुची प्रदेशात वसवलेले आहे. बलुचीस्तान पाकिस्तानचा ४५ टक्के भूप्रदेश असून तो नैसर्गिक खनीज संपत्तीने श्रीमंत आहे. त्याचे लाभ पाकिस्तानने सतत उठवले असले, तरी त्याची फ़ळे कधी बलुची लोकांच्या वाट्याला आलेली नाहीत. हा बलुची समाज वांशिक निष्ठा मानणारा आहे आणि तो मुस्लिम झाला असला तरी त्यात धार्मिक बांधिलकीपेक्षाही वांशिक व टोळीची निष्ठा अधिक प्रभावी असते. त्यामुळेच बलुची नेत्यांचे खच्चीकरण पाकने सुरू केल्यावर त्यातले अनेकजण परदेशी पळून गेले. त्यांनी बाहेरून पाक राष्ट्रवादाला आव्हान दिलेले आहे. थोडक्यात बलुचीस्थान हा पाकिस्तानचा काश्मिर व्हायला पोषक परिस्थिती आहे. सामुहिक कत्तल व गळचेपी करूनही तिथली बंडखोरी थांबू शकलेली नाही. मोठ्या संख्येने सैन्य तैनात करून पाकला बलुची स्वातंत्र्याची कल्पना चिरडावी लागते आहे. या बंडखोरांनी आपापल्या डोंगर कपारीत पाक सेनेला जेरीसही आणल्याच्या अनेक घटना आहेत. मग भारताने त्याच बलुचींना पाठबळ दिल्यास काय होऊ शकेल? अगदी स्पष्ट सांगायचे तर पाकिस्तान जसे काश्मिरी फ़िदायीन भारतात पाठवतो, तसे प्रशिक्षित बलुची फ़िदायीन घडवण्याचा उद्योग भारताने सुरू केला, तर काय होईल? वरकरणी ते आपल्याला अशक्य वाटेल. पण ह्यातला भारताचा अनुभव जुना व चांगला आहे. आपल्याकडे ज्याची फ़ारशी वाच्यता केली जात नाही अशा तामिळी वाघांच्या आरंभीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था कोणी केली होती? त्यांना रसद व शस्त्रास्त्रे कोणी पुरवली होती? आश्रय कोणी दिला होता? तसेच बलुची स्वातंत्र्यवीरांना भारत पाठबळ देऊ शकणार नाही काय?
गेल्या आठवड्यात एका वाहिनीवर बोलताना माजी सेनाधिकारी जी. डी. बक्षी यांनी त्याचा ओझरता उल्लेखही केला. चर्चेत सहभागी असलेल्या एका माजी पाकिस्तानी सेनाधिकार्याला बक्षी म्हणाले, थोडे दिवस थांबा तुम्हालाही बलुचीस्तानात फ़िदायीन हल्ल्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कुठलाही माजी सेनाधिकारी गमतीने असे काही बोलू शकत नाही. त्याला थोडीफ़ार माहिती असल्यानेच तो बोलू शकतो. शिवाय असेच माजी लष्करी अधिकारी गोपनीय योजनांच्या आखणीमध्ये सहभागी करून घेतले जात असतात. त्यामुळेच बक्षी असा इशारा हवेत देऊ शकत नाहीत. त्यांना काय शिजते आहे त्याचा सुगावा असल्यानेच त्यांनी सदरहू तंबी देण्यापर्यंत मजल मारलेली असू शकते. याच इशार्याला जोडून इतर राजकीय बातम्या तपसल्या, तर चित्र स्पष्ट व्हायला मदत मिळते. भारताने अफ़गाणिस्तानला विकास योजनांमध्ये खुप मोठी मदत चालविली आहे. अफ़गाण सेना व पोलिसांसह गुप्तचर विभागाच्या उभारणीत भारताने मार्गदर्शन केलेले आहे. अशी मदत कोणी धर्मार्थ करीत नसतो. प्रत्येक देश दुसर्याला आपापले राजकीय व आर्थिक स्वार्थ बघूनच सहाय्य देत असतो. जी मदत भारत अफ़गाणिस्तानला करतो, त्याविषयी पाकिस्तान कायम नाराज राहिला आहे. पाकच्या नाराजीचे काय कारण असू शकते? तर पाकची पश्चीम सीमा अफ़गाण प्रदेशाला भिडलेली असून, तिथपर्यंत भारतीयांना मुक्तपणे वावरण्याची मोकळीक अशा योजनांमधून मिळत असते. इवल्या अफ़गाण लोकसंख्येसाठी सहा भारतीय दुतावास कशाला हवेत, अशीही पाकची तक्रार आहे. इतका भारताचा तिथला वावर म्हणजे अफ़गाण समाजात पाकविरोधी बीजारोपण असू शकते, हे पाकने ओळखले आहे. इतकी वर्षे भारत हे काम तिथे करीत असेल, तर एव्हाना तिथे भारताने आपले किती हस्तक व अड्डे निर्माण केलेले असू शकतात?
बलुची व पख्तुनी नाराजांना अफ़गाणिस्तानमध्ये आश्रय देऊन, त्यांना पाक विरोधातील गनिमी युद्धासाठी सज्ज करणे, मग भारतासाठी अशक्य उरते काय? गतवर्षी स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुची स्वातंत्र्य लढ्याला सहानुभूती जाहिर केली आणि त्यानंतर जगात अनेक देशामध्ये आश्रय घेतलेल्या बलुची नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तान विरोधात निदर्शने केली. पाक विरोधी घोषणा देतानाच भारतमातेचा जयजयकारही करावा, याला योगायोग मानता येत नाही. इंदिराजींच्या जमान्यात अर्धवट राहून गेलेल्या पाकचे तुकडे पाडण्याच्या योजनेला आता नव्याने सुरूवात झालेली असू शकते. त्याच्या खाणाखुणा अशा तुरळक बातम्यातून सापडत असतात. आपल्याकडे काश्मिरात नित्यनेमाने गनिमी युद्ध करणारे मुजाहिदीन सापडत असतात आणि त्यांचे शिरकाण चालू असते. तसेच अनेक घातपात हल्ली बलुचीस्तानात झाल्याच्या बातम्या वारंवार येऊ लागल्या आहेत. पण त्याची वाच्यता पाकिस्तान सहसा करीत नाही. असे काही घडले मग भारतीय गुप्तचर खात्याच्या हस्तकांचे पाप, म्हणून बोटे मोडली जातात. पण त्यांच्यावर बलुची वा पख्तुनी गनिम असा शिक्का मारला जात नाही. या आरोपात तथ्य नसेल असे कोणी म्हणू शकत नाही. हे घातपाती वा गनिम बलुची असतात आणि ते पाकिस्तानी सेनेला व प्रशासनाला जेरीस आणण्याच्या कारवायांमध्ये गर्क असतात. त्यांना कुठून मदत मिळते? त्याचा सूड घेण्य़ासाठी पाकने तालिबानांना हाताशी धरून अफ़गाण सरकारला सतावण्याचा उद्योग केल्याने, त्या देशानेही आता पाकच्या विरोधात युद्धाचाच पवित्रा घ्यायचा बाकी राहिला आहे. उद्या तसे झाल्यास मैत्रीचा हात म्हणून भारतीय सेनाही अफ़गाण प्रदेशात जाऊ शकते. किंबहूना आजही तिथे किती भारतीय सेना तैनात झालेली आहे, त्याचा तपशील उपलब्ध नाही
बॉर्डर रोड ओर्गनायझेशन हा सीमावर्ति दुर्गम प्रदेशात रस्त्याची बांधणी करणारा भारतीय सेनेचा एक विभाग आहे. तो बांधकाम करणारा विभाग असला तरी व्यवहारात तीही एक सेनाच आहे. कुठल्याही प्रसंगी बांधकाम बाजूला ठेवून युद्धाला सज्ज होऊ शकेल, अशी ही फ़ौज असते. त्यांचा दिर्घकाळ वावर अफ़गाणिस्तानात आहे. इराणच्या सीमपर्यंत जाणारा पाक सीमेलगतचा महामार्ग, याच फ़ौजेने उभारलेला आहे. अशा स्थितीत तिथे बांधकामात रोजगार करणारे अफ़गाण मजूर व नागरिक यांच्याशी या भारतीय फ़ौजेची चांगलीच मैत्री व जवळीक होणे स्वाभाविक आहे. त्यातून मग आपले हस्तक व पाकविरोधक जोडण्याला चालना मिळत असते. बलुची वा पख्तुनी प्रदेशात आज पाकसेनेला हैराण करणार्या टोळ्या वा गट त्यातूनच पुढे आलेले नाहीत, अशी कोणी हमी देऊ शकतो काय? पण आता स्थिती त्याच्याही खुपच पुढे गेलेली असू शकते. कारण भूमिगत व परदेशी आश्रय घेतलेले बलुची नेते, यांच्याशी आता भारताचे साटेलोटे जमलेले आहे. त्यांच्या माध्यमातून पुढली पावले उचलली जाऊ शकतात. अफ़गाण सरकार पाकिस्तानच्या विरोधात ठामपणे उभे रहाणार असेल, तर अशा लोकांना घातपाती म्हणून बलुची प्रदेशात पाठवता येऊ शकेल. त्याखेरीज इराणमध्ये उचापती करणारे पाकिस्तानातील सुन्नी लढवय्ये इराणला डोकेदुखी झालेली आहे. त्यांचा बंदोबस्त करायला इराणही उत्सुक आहे. या दोन्ही बाजू एकत्र येऊन पाकिस्तानच्या विरोधात लढाईला सज्ज झाल्या, तर काश्मिर व भारतीय सीमेवरचे सैन्य उचलून पाकला अफ़गाण व इराण सीमेवर जमवाजमव करावी लागेल. भारत विरोधी आघाडी आवरून आपल्या पश्चीम सीमेवर सुरक्षेची जय्यत उभारणी करावी लागेल. त्यातच यातल्या शिया हौथी व बलुची घातपात्यांनी पाकच्या महानगरात धुमाकुळ घालण्याची रणनिती राबवली, तर पाकसेनेला पळता भूई थोडी होऊन जाईल.
अर्थात एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे. मागल्या दोन दशकात पाकसेनेला लढायची सवय गेलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी आपले काम जिहादी, फ़िदायीन व मुजाहिदीन यांच्याकडून करून घेतलेले आहे. त्यामुळेच पाकसेनेच्या बड्या अधिकार्यांनाही प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची सवय राहिलेली नाही. त्यापेक्षा उंटावरून शेळ्या हाकण्याचीच सवय त्यांना जडली आहे. सहाजिकच भारत, इराण वा अफ़गाण फ़ौजांनी मनात आणले व युद्धाचा पुकारा केल्यास, पाकसेना इराकच्या सद्दाम सेनेसारखी लुप्त होऊन जाईल. राजकारणात ढवळाढवळ करताना आणि पैशाची उलाढाल करताना खाऊगिरीची सवय त्यांना निकामी करून गेली आहे. निश्चीत पगार व रोजगार म्हणून पाकसेनेत लोक भरती होत असतात आणि अधिकारीही पैसे कमावण्याची सोय म्हणून सेनेत दाखल होत असतात. त्यांच्याकडून लढाईला सामोरे जाण्याची अपेक्षा कोणी करू शकत नाही. म्हणून तर केव्हाही व कुठेही तालिबान वा इतर जिहादी गट पाक सेनेची झोप उडवून देत असतात. तेही सेनेच्या मुठीत राहिलेले नाहीत आणि मनमानी करीत असतात. त्यांच्या जोडीला बलुची व शिया हौथी गनिमांनी उच्छाद मांडला, तर पाकिस्तानचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही. सेनेतले जे कोणी वांशिक अधिकारी असतील, ते पाक सरकारचे आदेश झुगारून आपल्या वंशाच्या बंडखोरांन सहभागी होत बंडाचे निशाण फ़डकवू शकतील. बघता बघता पाकिस्तानची चारपाच शकले उडाली, तर चिनी सेना त्या देशाला वाचवू शकणार नाही. आज फ़ुरफ़ुरणारे अनेक सेनाधिकारी व राजकीय नेते आपला गाशा गुंडाळून परदेशी आश्रय घ्यायला पळून गेल्याचेही बघावे लागेल. भ्रष्ट राजकारणी व लष्करी अधिकारी यांनी पाकिस्तान पोखरून ठेवला आहे. त्याला घातपाती गनिमांनी एक जोरदार धक्का दिला, तरी हा इमला कोसळून पडायला काही महिनेही लागणार नाहीत. असे बलुची पख्तुनी गनिम हा भारताने पाकला दिलेला घरचा आहेर असेल.
No comments:
Post a Comment