Tuesday, June 13, 2017

अण्णा कुठे आहेत?

anna hazare के लिए चित्र परिणाम

गेल्या काही दिवसापासून देशातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यात नेहमीचे रुळलेले प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते जसे समाविष्ट आहेत, तसेच अण्णा हजारे यांच्यासोबत चार वर्षापुर्वी देशातील भ्रष्टाचार समूळ खणून काढण्यासाठी आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल व त्यांचे अन्य सहकारीही समाविष्ट आहेत. मात्र त्यापैकी कोणीही आपल्यावर झालेल्या आरोपांविषयी खुलासा देण्यास पुढे आलेले नाहीत. खुद्द अण्णाही त्याबद्दल मौन धारण करून गप्प बसलेले आहेत. अण्णांचे हे मौन मोठे चमत्कारीक आहे. कारण त्यांचे हे मौन केजरीवाल आणि टोळीला आशीर्वाद ठरतो आहे. खरे तर अण्णांचा आणि आम आदमी पक्षाचा काडीमात्र संबंध नाही. ज्या लोकपाल आंदोलनातून केजरीवाल उदयास आले, त्याचा चेहरा अण्णांचा होता. अण्णांच्या उपोषणाचे भांडवल करून केजरीवाल यांनी आपली प्रतिमा लोकमानसात ठसवली होती. मग त्यांनी लोकपाल आंदोलन गुंडाळून राजकारणात उडी घ्यायचे ठरवले. आंदोलनाने सिद्ध झाले नाही, तो लढा राजकारणात उतरून सिद्ध करण्याचा चंग केजरीवाल यांनी बांधला होता. पण अण्णांचा आशीर्वाद त्यांना मिळू शकला नाही. अण्णांनी तेव्हाच स्पष्ट केले होते, की आपला फ़ोटो वा नाव राजकीय पक्षासाठी वा प्रचारासाठी वापरू नये. या अटीवर अण्णा व केजरीवाल वेगळे झाले होते., केजरीवालनी दिलेला शब्द पाळला. त्यांनी कुठेही अण्णांचे नाव वापरले नाही किंवा फ़ोटोही वापरला नाही. त्याची त्यांना गरजही नव्हती. कारण अण्णांचा फ़ोटो वा नावाने मते मिळत नाहीत, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. तरीही केजरीवालनी अण्णांना दिल्लीना नेऊन ‘रामलिला’ मांडली, कारण त्यांना स्वत:ला दिल्लीचा ‘रोखपाल’ व्हायचे होते. तितकी आपली प्रतिमा निर्माण झाल्यावर त्यांना अण्णांची गरज उरलेली नव्हती. पण म्हणून अण्णांना त्याविषयी काडीमात्र कर्तव्य नाही काय?

लोकपाल आंदोलनातून केजरीवाल राजकारणात आले, त्याचा चेहरा अण्णा होते. म्हणजेच कुठेतरी केजरीवाल नावाचा नेता उभा करण्याला अण्णांच हातभार लागलेला आहे. सहाजिकच त्याच्याकडून काही पापकर्म झाले, तर त्याचा कान पकडण्याचा अधिकार अण्णांना निश्चीतच आहे. ज्यांच्यासाठी अण्णांनी कधी दोन शब्द प्रचार केला नाही किंवा ज्यांच्या राजकारणाला अण्णांचा कधीही स्पर्शही झालेला नव्हता; अशा लोकांच्या विरोधात अण्णा नेहमी कंबर कसुन उभे ठाकलेले आहेत. आजच्या पिढीला ठाऊक नसेल, पण २२-२३ वर्षापुर्वी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कुठल्याशा भ्रष्टाचाराच्या गोष्टी उघडकीस आल्या, तेव्हा अण्णा राळेगण सिद्धी सोडून देहूला आले होते. तिथे माऊलीच्या पायरीवर उपोषणाला बसले होते. तेव्हा अण्णांना गर्दी व मोठ्या व्यासपीठाची गरज भासत नसे. मुंबईपासून दूर देहूला माऊलीच्या दारी अण्णा उपोषणाला बसले, तरी त्याच्या बातम्या व्हायच्या. विधानसभेच्या निवडणुका तेव्हा जवळ आल्या होत्या आणि अशावेळी अण्णांनी पवारांच्या विरोधात उपोषण आरंभल्याने सिंहासन डळमळू लागले होते. कारण तेव्हाचे विरोधी नेते गोपिनाथ मुंडे अण्णांच्या दिमतीला जाऊन पोहोचले होते. पण तेव्हाही अण्णांनी राजकीय रंग लागू नये, म्हणून उपोषण गुंडाळून राळेगण सिद्धी गाठली होती. त्यानंतर अण्णा एकदम युती सरकार सत्तेत येईपर्यंत शांत होते. त्यांच्याऐवजी गो. रा. खैरनार यांनी पवारांच्या भ्रष्ट सरकारचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतले. तर अण्णा त्यापासून दूर राहिले होते. मग युती सरकारमध्ये शशिकांत सुतार यांनी अण्णांच्या ट्रस्टला दिल्या जाणार्‍या अनुदानाची फ़ाईल तपासण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच अण्णा राळेगण सिद्धीतून बाहेर पडले होते आणि उपोषणाला तयार झाले होते. पुढे त्यांनी ११-१२ दिवसांचे बेमुदत उपोषणही केले होते.

थोडक्यात कुठल्याही पक्षाचे वा नेत्याचे भष्ट प्रकरण मिळाले, मग अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसलेले होते. लोकपाल आंदोलनातही अण्णा अगत्याने त्याच्या आठवणी सांगायचे. आपण चार मंत्र्यांच्या विकेट काढलेल्या आहेत, असे अण्णा अभिमानाने सांगायचे. ते युतीच्या काळातील मंत्री होते. ज्यांना मंत्री व्हायला वा सत्तेपर्यंत पोहोचायला कुठली मदत अण्णांनी केली नाही, त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप तपासून बघावे, म्हणून अण्णा अगत्याने मैदानात यायचे. अशा अण्णांची केजरीवाल विषयातली जबाबदारी छोटी असू शकते काय? कारण आज केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत व त्यांच्या हाती एका छोट्या राज्याची सत्ता केंद्रीत झाली आहे, त्याला अण्णा थोडे तरी जबाबदार आहेत. म्हणूनच दिल्लीकरांच्या भावनांचे अण्णाही देणे लागतात. त्यांचा आम आदमी पक्षाशी वा त्याच्या सरकारशी काडीमात्र संबंध नसेल. तसा तो पवार सरकार किंवा युती सरकारशीही संबंध नव्हता. तरीही अण्णा त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे ठाकले, तर केजरीवाल यांच्यावर संशय घेतला गेल्यास सर्वप्रथम अण्णांनीच मैदानात यायला नको काय? अर्थात केजरीवाल प्रकरणे आजवरच्या अण्णांच्या उपोषणापेक्षाही गंभीर मामला आहे. कारण हे नुसते आरोप नाहीत, तर त्याची चौकशी सुरू झाली असून, केजरीवाल संबंधातील अनेकांवर धाडीही पडल्या आहेत. केजरीवाल यांचे निकटचे सहकारीही साक्ष द्यायला पुढे आलेले आहेत. अशावेळी अण्णांचे मौनव्रत खुद्द केजरीवाल यांच्यापेक्षाही शंकास्पद भासणारे आहे. कुठल्याही भ्रष्टाचारावर क्षणार्धात तुटून पडणार्‍या अण्णांचे केजरीवाल यांच्या बाबतीतले मौन किंवा बोटचेपेपणा खुप चकीत करणारा आहे. आज दिल्लीत केजरीवाल यांना कोणी बोलू वा आवरू शकत नाही. पण तिथे अण्णांनी जाऊन धरणे वा उपोषण आरंभले, तर केजरीवालना मोठा धक्का बसू शकतो. कारण अण्णा या एकाच माणसावर केजरीवाल मतलबी वा स्वार्थी असा आरोप करू धजणार नाही.

केजरीवाल अण्णांवर आरोप करू शकत नाहीत, अशी आपली समजूत आहे. पण खरेच तशी वस्तुस्थिती आहे काय? आपल्याला भले तशी खात्री असेल, परंतु अण्णांना तितकी खात्री आहे काय? की कपील मिश्रावर जसे केजरीवालनी प्रत्यारोप केले, तसेच तो इसम आपल्यावरही उलट आरोप करील, म्हणून अण्णांनी त्याबाबत गप्प बसणे पसंत केले आहे? काही दिवसांपुर्वी म्हणजे कपील मिश्राने आघाडी उघडण्यापुर्वी, आम आदमी पक्ष व लोकपाल आंदोलनाचा एक प्रमुख नेता कुमार विश्वास, यानेही केजरीवालना जाहिर सवाल करणारा एक व्हिडीओ प्रदर्शित केला होता. त्यातून केजरीवालना सूचक धमकी दिलेली होती. त्यावरून खुप धुरळा उडाला आणि पक्षाचे अन्य नेते जाऊन भेटले तरी विश्वास यांनी आपली नाराजी मागे घेतली नव्हती. नंतर केजरीवाल त्याच्या घरी गेले आणि समजूत घालून आपल्या निवासस्थानी त्या कवीला घेऊन आले. तिथे काय जादू झाली ठाऊक नाही. पण ह्या कविचा एकदम कायापालट होऊन गेला. आज कपील मिश्राने भरपूर पुरावे समोर आणले आहेत., त्यावरून धाडी पडल्या आहेत आणि केजरीवालच्या निकटवर्तियांनाही चौकशीला बोलावण्यात आले आहे. पण कवीवर्यांची बोलती बंद आहे. केजरीवाल विरोधात धडधडीत पुरावे समोर आले असतानाही कुमार विश्वास यांची वाचा बंद आहे. नेमके तसेच अण्णाही त्या विषयात मौन घेऊन गप्प आहेत. आपण नाराजी व्यक्त केली तर तोच केजरीवाल आपल्यालाही घरी नेऊन जादू करण्याची भिती अण्णांना सतावत असेल काय? केजरीवाल घरी बोलावून अशी काय जादू करतात, की त्यांचे जुने सहकारी गप्प होऊन जात असतील? कवि विश्वास यांचा अनुभव लक्षात घेता काहीतरी जादू नक्कीच आहे आणि अण्णांनाही त्याच जादूची भिती नसती, तर त्यांनी केजरीवाल यांच्यावरच्या आरोप व चौकशीनंतर नक्कीच मौन बाळगले नसते.

2 comments:

  1. कवींसोबत बाईच्या भानगडीची वंदता होती. आण्णांसोबतही तसेच काही असेल काय!

    ReplyDelete