Friday, June 2, 2017

स्वाभिमान आणि अहंकार

raju shetty sadabhau के लिए चित्र परिणाम

चार दशकापुर्वी महाराष्ट्राच्या शेतकरी राजकारणाला पहिला धक्का दिला तो शेतकरी संघटनेने. शरद जोशी यांच्यासारख्या एका उच्चशिक्षित अधिकार्‍याने चांगली नोकरी सोडून शेतीच्या व्यवसायात उडी घेतली आणि शेती तोट्यात का असावी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यातून त्यांनी शेतकर्‍यांचे प्रबोधन बाजारात व खेड्यापाड्यात जाऊन सुरू केले. तोपर्यंत महाराष्ट्रात कॉग्रेसच्या खादीधारी नेत्यांकडेच शेतकरी नेतृत्व होते. किरकोळ प्रमाणात शेकाप सोडल्यास अन्य कुणा पक्षाला ग्रामिण भागात स्थान नव्हते. कारण सुखवस्तु शेतकरीच गरीब शेतकरी व भूमिहीन शेतकर्‍यांचे नेतृत्व करीत होता. अल्पभूधारक वा शेतमजूराला कोणीही वाली नव्हता. कारण त्याच्या दुखण्याचे कोणी निदान करीत नव्हता की त्यावरचे उपाय सांगत नव्हता. सहाजिकच त्यालाही कॉग्रेसच्या सहकार महर्षींच्या मागे फ़रफ़टावे लागत होते. त्याला शेतकरी संघटना किंवा शरद जोशींनी प्रथम शह दिला. त्यानंतर हळुहळू शेतकरी समाजात विचार सुरू झाला. आत्मपरिक्षणाला वेग आला. त्याला आव्हान देण्याचा एक प्रयास तात्कालीन राजकीय महिला शालिनीताई पाटील यांनी केलेले होते. जोशी हे ब्राह्मण ना शेतीतले काय कळते, असे बोलून त्यांनी या आव्हानाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. कारण तोपर्यंत जोशींनी शेतकर्‍याला जागे केलेले होते आणि तो शेतकरी जातीच्या जंजाळात अडकायला राजी नव्हता, तेव्हा कॉग्रेसच्याच अनेक दांडग्या नेत्यांनी शेतकरी संघटनेला मुठीत घेण्याचे डावपे़च सुरू केले आणि त्यात जोशी फ़सत गेले. कांदा उत्पादक वा तत्सम सामान्य शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणार्‍या शेतकरी संघटनेला घुसखोर कॉग्रेसी नेतॄत्वाने ऊस वा नगदी पिकांच्या आंदोलनात ओढले आणि त्या संघटनेची धार बोथट होत गेली. आजही त्यापेक्षा वेगळे काही होताना दिसत नाही.

सत्ता किंवा अधिकार ही बाब अशी असते, जी सुन घरात आल्यावर मुलगा हातून गेल्याचे दु:ख मातेच्या मनात पेरत असते. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत, अशी बेदिली माजल्याची मोठी चर्चा आहे. पण हे दोन व्यक्तींमधले भांडण नसून सत्ता व सत्तेपासून दूर असण्यातला फ़रक आहे. त्या कालखंडात ऊस व नगदी पिकांच्या लढाईत शरद जोशी उतरले आणि त्यांच्यासाठी सहकारी माया उचंबळली होती. त्यांच्या सभेला ट्रॅक्टर व ट्रकने माणसे लाखोच्या संख्येने जमा केली जाऊ लागली आणि जोशी लाखांच्या सभेत बोलू लागले. आरंभी कुठल्याही बाजारपेठेत वा बाजाराच्या स्थानी जाऊन शेपाचशे लोकांच्या गर्दीसमोर बोलणार्‍या जोशींना मग लाखांच्या गर्दीची इतकी सवय लागली, की त्यांना गर्दी नसलेल्या जागी जाऊन भाषण देण्याची गरज वाटेनाशी झाली. त्यांच्या संघटनात्मक शक्तीपेक्षाही सभेला आंदोलनाला जमणार्‍या गर्दीला महत्व येत गेले. किंबहूना सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज कॉग्रेस नेत्यांनी तशी परिस्थिती निर्माण केली आणि पुढल्या काळात शेतकरी संघटनेची आक्रमकता संपली. तिला राजकीय वेध लागले. शरद जोशी यांनी वेगळा राजकीय पक्ष काढला होता आणि अन्य पक्षांशी निवडणूक युती आघाडीही केलेली होती. त्यातून शेतकरी संघटना विखुरली गेली, तिचे तुकडे पडले. नेत्यांमध्ये हेवेदावे सुरू झाले. हळुहळू शेतकरी आंदोलन विस्कळीत होऊन गेले. ज्या शिवसेनेच्या विरोधात जोशींनी तात्विक भूमिका मांडल्या होत्या, तिच्याच पाठींब्याने राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यापर्यंत त्यांची घसरण झाली. त्याच विखुरण्य़ातून जे अनेक तुकडे पडाले, त्यातला एक तुकडा कोल्हापूरच्या परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुपाने पुढे फ़ोफ़ावला. आज भाजपाच्या सोबत असलेली शेतकरी संघटना तीच आहे. मात्र तिचा स्वाभिमान मागे पडला असून, अहंकाराची लढाई जुंपलेली आहे.

मुळात शरद जोशींचे अनुयायी असलेल्या राजू शेट्टी यांनी २००१ सालात जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. पुढल्या निवडणुकीत त्यांनी शिरोळ येथून विधानसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून लढवली व जिंकलीही. तिथून मग या संघटनेचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्या कालखंडात राजू शेट्टी यांनी कॉग्रेसच्या दिग्गजांचा धक्का देऊन शून्यातून संघटना उभी केली होती. पैशाशिवायही सहकार सम्राटांना धुळीस मिळवता येते, अशी आशा निर्माण केली होती. तिथून मग त्यांच्या संघटनेचा पसारा हळुहळू वाढत गेला. पश्चीम महाराष्ट्र व अन्य भागातही त्यांची संघटना उभी राहू लागली आणि अन्य निराश जोशी अनुयायी त्यात सहभागी होत गेले. त्याचा राजकीय लाभ अर्थातच शेट्टी यांनाही मिळाला. कारण २००९ मध्ये त्यांनी लोकसभा लढवून जिंकली आणि त्यांचा दबदबा शेतकरी वर्गात निर्माण झाला. अर्थात राजकारण व आंदोलन चालवायचे तर विश्वासाचे सहकारी लागतात आणि त्यांच्याही महत्वाकांक्षा विचारात घ्याव्या लागतात. ते करताना राजकारणात पुर्णपणे डुंबावे लागत असते. राजू शेट्टी यांना असे अनेक विश्वासू सहकारी मिळाले, त्यापैकीच एक सदाभाऊ खोत आज महाराष्ट्रात मंत्री झालेले आहेत. आता याच दोघात विवाद सुरू झाला आहे. गेल्या लोकसभेच्या रणसंग्रामात शेतकरी संघटनेने भाजपाच्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आणि राजू शेट्टी पुन्हा लोकसभेत निवडून आले. पण नजिकच्या मतदारसंघात सदाभाऊंना जिंकता आले नाही. मग विधानसभेच्या वेळी महायुतीत फ़ाटाफ़ुट झाली आणि ही संघटना भाजपासोबत गेली. सहाजिकच त्यांना सत्तेतही सहभाग देणे भाग होते. पण संघटनेचा कोणी आमदार नसल्याने त्यात विलंब होत गेला. अखेरीस वर्षभरानंतर सदाभाऊं भाजपा सरकारचे मंत्री झाले. तर राजू शेट्टी अजून नेतेच राहिले आहेत.

अलिकडेच राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणूका झाल्या आणि त्यात सदाभाऊंनी आपल्या पुत्राला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यापासून या वादाला रंगत चढली आहे. या सहकारी मित्राला खाजगीत सुनावण्यापेक्षा राजू शेट्टींनी जाहिरपणे आपल्या संघटनेतील घराणेशाहीवर टिका केली आणि सदाभाऊंनाही उत्तर दिल्याखेरीज रहावले नाही. त्यातून मग हा बेबनाव वाढतच गेला आहे. एका बाजूला राज्यातील शेतकरी कर्जमाफ़ीसाठी विरोधी पक्ष मागण्या आंदोलने करतो आहे. तर त्याच सत्तेत बसलेले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत मात्र कर्जमाफ़ी नाकारणार्‍या सरकारचे गुणगान करीत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांचा कोंडमारा होणे स्वाभाविक आहे. तीच कोंडी फ़ोडण्यासाठी असेल, राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांचे आंदोलन हाती घेतले आहे. अशा दोन नेत्यांमध्ये हाणामारी सुरू झाली असेल, तर इतरांनी आगीत तेल ओतण्यालाच तर राजकारण म्हणतात. सहाजिकच शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस अशा पक्षांनी राजू शेट्टींची पाठ थोपटत, आपली कार्यकर्त्यांची फ़ौज या लढाईत शेट्टींच्या पाठीशी उभी केलेली आहे. थोडक्यात सदाभाऊंना शह देण्यासाठी सुरू झालेले संघटनेच्या अंतर्गत राजकारण, आता स्वाभिमानाला सोडून अहंकाराच्या वाटेवर चालू लागले आहे. आपल्या संघटनेचा सदस्य सरकारमध्ये मंत्री असताना कर्जमाफ़ी होऊ शकत नसेल, तर राजू शेट्टींना त्या सत्ताधारी आघाडीत रहाणे कितीकाळ शक्य होणार आहे? शेतकरी हितासाठी राजकारणात आलेल्या ह्या दोन नेत्यांना आता राजकारणाने इतके व्यापलेले आहे, की त्यांची वाटचाल तीन दशकापुर्वीच्या पुर्वजांच्या दिशेने होऊ लागली आहे. शेतकर्‍यांना दरम्यान किती न्याय मिळाला, या प्रश्नाचे उत्तर कोणापाशी नाही. पण सत्तेच्या मागे लागल्यावर किंवा राजकारणाच्या कर्दमात फ़सल्यावर, तत्वाच्या व चळवळीच्या गप्पा बोलाची कढी होत असते. स्वाभिमान संपून अहंकार शिरजोर होत असतो.

4 comments:

  1. भाऊ ही माहिती आपल्या लेखा मुळे लाखो लोकांना त्यात शेतकरी पण आहेत त्यानां पण समजेल..
    भारत शेती प्रधान देश आहे व इंदुर मध्ये 1992 साली ट्रेनिंग मध्ये डाॅ. नागर यांनी भारताच्या आर्थिक विकास व disequilibrium in income (आर्थिक विषमता) सामाजिक विकासा मधील शेती ची भुमिका एका साध्या कोष्टका मध्ये समजुन सांगितली होती.
    GDP contribution by Agriculture in 1950 was 70% and population dependent on Agriculture was also 70 % होती.
    Now only 26-27% income comes from agriculture but population directly or indirectly dependent is 65%.
    यामुळे भारतातील शेतकरीवर्गाची व शेतीची पण दुर्दशा झाली.

    परंतु मोदीं सारख्या अष्टपैलू दिग्गज नेतृत्वाचे सुध्दा शेती विषया कडे दुर्लक्ष झाल्याचे सक्रुत दर्शनी दिसत आहे.
    मोदीनी गुजरातचे नेतृत्व हातात घेतल्यावर प्रथम नर्मदा प्रजेक्टला चालना देत सुरवात केली. त्यात पहिल्या आडव्या आलेल्या मेधा पाटकरांना गुजराती शेतकर्रयानी पीटाळुन लावले त्यावेळी अमीर खान मेधा पाटकर च्या समर्थनार्थ ऊभा राहिला व त्याच्या निषेधार्थ फिजा या फिल्म वर लोकांनी/शेतकरीवर्गाने बहिष्कार टाकला. मेधाताई चे फाॅरेन फंडेड हेच देशी संपादक मोदी सरकार वर तुटुन पडले. आणि आज हाच अमीर खान महाराष्ट्रात आज जल संचयासाठी मोहिमेचा म्होरक्यां झालाय! किती विलक्षण विरोधाभास आहे. या वरुन लक्षात येते किती खोलवर विचार करुन भारत विरोधी शक्ती पेरणी करत आहेत.
    गुजरात मधील शेती चा विकास करुन चायना पेक्षा अधीक शेती विकास दर करुन दाखवला वेळी मोदींची ही दुरदृष्टी भारत विरोधी जागतिक थिंक टॅक ने मोदी हे त्यांच्या भारताला अविकसीत ठेवण्याच्या प्लॅनला धक्का देणारे भारतीय नेतृत्व आहे हे ओळखले. व मोदी विरोधात आघाडी तेज केली.. हिंदूत्ववादी दुर दर्शी नेतृत्व या विदेशी व्यापारी वृत्तीला घातक वाटले.
    मग अशा अनेक नेतृत्वांना त्यांनी फुलण्या आधी खुरडले होते व आहे. त्यासाठी मिडियावाले हे प्रभावी अस्त्र वापरले जात आहे. काँग्रेस इतर सरकार आले की हे मिडियावाले तुटुन पडतात.
    आता गेला आठवडाभर निखिल वागळे धुडगुस घालत आहेत व शेतकरी नेत्यानी मुख्य मंत्री यांच्याशी चर्चा करुन संप मिटल्याचे जाहीर केले. परंतु निखिल वागळे जणु आपणच शेतकरी नेता असलेल्या प्रमाणे तुम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहात ना असे जमाव जमा करुन विचारत आहे. हे कोणत्या पत्रकारेत बसते?
    भाऊ मी असे हजारो प्रोग्रॅम रेकाॅर्ड करून ठेवले आहेत. काँग्रेस सरकार सत्तेवर असताना हेच पुरोगामी व पत्रकार देशाचे किती नुकसान होते हे त्यावेळच्या विरोधी पक्षांना विचारत होते.
    आता याच मिडियावाल्यानी सरकारला कठदर्यात ऊभे केले आहे.
    अशी भुमीका हे का घेतात हे तपासणे आवश्यक आहे.
    परंतु मोदी शेती विकासा कडे जेव्हडे पहायला पाहिजे तेव्हडे पहात नाहीत असे लक्षात येते.
    Aks

    ReplyDelete
  2. भाऊ मुळात राजु शेट्टी ही व्यक्ति सेटलमेंट वाली आहे एकदा राष्ट्रवादी विरोधात (मानेबाई)खांग्रेस ने मदत केली याचे पोस्टर सांगली कोल्हापुरात खांग्रेस ने लावले होते खांग्रेस धमाका आॅफर एकावर दोन फ्री (राजु शेट्टी व मंडलीक)दुसर्यावेळी मोदींमुळे

    ReplyDelete
  3. वागळे तर वेडाच झालाय.पुर्वी लोकमत वर देवेंद्र त्याला मस्त निरुत्तर करायचे तेव्हा वागळे त्यांना तम्ही मुख्यमंत्री होनार म्हनून डिवचायचे.आता खरच ते cm झालेत ते त्याला सहन होइना.आणि मुख्य म्हनजे देवे्द्र cm झाले प्रवक्ता चे उलट वागळे मुख्य संपादक तर सोडाच नोकरी पन टिकेना धड एक चॅनलवर.त्यामुळे ते डाचतय त्याची गरळ तो cm ना सतत नावे ठेवुन ओकत असतो.शेतकरी आणि तो काय संबंध?

    ReplyDelete
  4. Bhau I expect some comments about farmers strike from you.I believe that Modiji is best p.m.but what's about fadanvis he is making joke of power which constitution gave him.
    Sir
    There is huge unrest between farmers because of draught and other things you better know it
    There is no difference remains if fadanvis try to behave like kejrival
    It's not the problem but no political idiology will have faith
    I insist you to right something on farmers strike for opening eyes of Maharashtra government.

    ReplyDelete