Wednesday, June 7, 2017

मानवी कवच म्हणजे काय?

मागल्या काही दिवसात काश्मिरातील हिंसाचार व जिहादी हल्ले वाढलेले होते. त्यातून तिथल्या प्रशासनाला व लष्करालाही मार्ग काढणे अवघड होऊन बसले. कारण पुर्वी जसा कुठे घातपाती हल्ला झाल्यावर पोलिस व लष्कराचे जवान घेरा घालून कारवाई करायचे, त्यात अडथळे आणले जाऊ लागले. म्हणजे असे झाले, की कुठेही घातपाती हल्ला झाला किंवा जिहादी दडी मारून बसल्याची खबर लागल्यावर कारवाई सुरू झाली, मग स्थानिक जमाव कारवाईत अडथळे आणु लागला. पुर्वीच्या काळात अशी घटना होत असे तेव्हा वस्तीत लपून बसलेल्या जिहादींना बाहेर काढण्यासाठी आधी परिसराला वेढा दिला जात असे. मग स्थानिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याला प्राधान्य होते. असे लोकही जीवाच्या भितीने सुटायला उत्सुक असायचे. आजकाल असा कुठल्याही चकमकीचा सुगावा लागला, मग स्थानिक तरूणांचे गट तिथे येऊन पोलिसी कारवाईत व्यत्यय आणू लागले. त्यासाठी हुर्रीयत वा तत्सम फ़ुटीरवादी संघटनांच्या माध्यमातून पाकिस्तान पैसे पुरवत असल्याचाही खुलासा झालेला आहे. म्हणजेच अशा गोष्टी पाकिस्तानच्या इशार्‍यावर होत असतात. त्याचा दुहेरी लाभ त्यांना मिळतो. एक म्हणजे या गडबडीत भारतीय पोलिस वा लष्कराचे लक्ष विचलीत होऊन फ़सलेल्या जिहादींना निसटण्याची संधी मिळून जाते. शिवाय चुकून त्यात कुणा काश्मिरीचा बळी पडला, मग भारतीय सेनेवर हिंसाचाराचा आरोपही करता येतो. उलट सैनिकांना समोर जिहादी असूनही ठामपणे कारवाई करता येत नाही. याचा सरळ युद्धशैलीत अर्थ असा होतो, की काश्मिरी तरूण दगडफ़ेक किंवा जमावाने व्यत्यय आणुन जिहादींना संरक्षण देत आहेत. त्यांच्यासाठी जणू चिलखत उभारत आहेत. ज्याला मानवी सुरक्षा कवच म्हटले जाते. हे जमावच मानवी कवच होऊन पुढे आलेले आहेत. ओसामा बिन लादेनही आपल्या सुरक्षेसाठी हेच तंत्र वापरत होता.

कुठल्याही युद्धात किंवा प्रामुख्याने गनिमी युद्धात शत्रू नागरिकांचा असाच वापर करीत असतात. नक्षलवादी कारवाया त्यामुळेच फ़ोफ़ावल्या आहेत. त्यात सैनिकी कारवाई केली वा मोकाट हत्यारांचा वापर केल्यास नागरी जिवीतहानी संभवते. म्हणूनच शत्रू वा घातपाती नेहमी वस्तीत लपलेले असतात. काही लोकांना ओलिस ठेवून त्यांचा ढालीसारखा उपयोग करून घेतात. कारण गोळीबार वा अन्य लाष्करी कारवाई केल्यास, मोठ्या संख्येने नागरिक मारले जातील, याची त्यांना फ़िकीर नसते. पण सैनिकांना त्याची फ़िकीर करावी लागते. भ्याड लोक नेहमी अशी मानवी ढाल वापरत असतात. नेमका तोच पवित्रा आजकाल पाकिस्तानचे हस्तक व काश्मिरातील त्यांचे पाठीराखे घेत आहेत. आधी घातपात्यांच्या विरोधातली कारवाई वेगळी व्हायची आणि पोलिस विरोधातील आंदोलनाचे प्रकरण वेगळे असायचे. त्यांची सरमिसळ होत नसे. पण अशा हिंसक आंदोलनावर जीवघेणी नसलेल्या बंदुकीचा वापर झाला आणि अनेकांना जखमी व्हावे लागले. त्यावर कोर्टात दाद मागून पेलेटगनचा वापर बंद करून घेण्यात आला. सहाजिकच जमावाला आता जखमी होणार नसल्याची खात्री पटली आणि अधिकाधिक मोठा जमाव सैनिकांच्या विरोधात दगडफ़ेक व हल्ले करायला पुढे येऊ लागला, पेलेटगनचा वापर थांबवला गेल्याचा परिणाम असा झाला, की मस्तीखोर तरूणांचे जमाव धोका पत्करून पुढे यायचे, त्याच्या जागी आता शाळेची मुले व मुलीही बेधडक पोलिस व सैनिकांवर हल्ले करायला पुढे येताना दिसू लागल्या. याला युद्धतंत्रामध्ये मानवी ढाल नाहीतर काय म्हणायचे? असे संरक्षण या जमावांना मिळाले. मग त्याचा पाकिस्तानने आपल्या रणनितीमध्ये मोठ्या चतुराईने वापर करून घेतला आहे. पाकने आपल्या घातपाती हस्तकांसाठी मग अशा निर्भय झालेल्या काश्मिरींनाच मानवी ढाल म्हणून वापरून घेतले आहे.

आज काश्मिरात चालू आहे ते गनिमी युद्ध आहे., यादवी युद्ध आहे. त्यात प्रचलीत सैनिकी नियम वा शैलीने काम होऊ शकत नाही. त्यासाठी कल्पकतेची गरज आहे. त्यात कमीत कमी हिंसा व जिवितहानी होण्याला प्राधान्य असायला हवे आहे. अपरिहार्य असेल तिथेच हिंसा हे युद्धतंत्र असते. गोगोईने एका सोप्या पद्धतीने त्यात मानवी ढालीचा उपयोग केला आहे. त्यात अमानुष असे काहीच नाही. युद्धामध्ये शत्रूला पराभूत करणे आवश्यक असते आणि त्यासाठी शत्रूच्या रणनितीला त्याच पद्धतीने तोंड देता येत असते. शत्रू तोफ़ा डागत असेल तर फ़टाके वाजवून त्याला पादाक्रांत करता येत नाही. त्याच्या रणनितीमध्येच त्याला पराभूत करण्याची गरज असत. असे तंत्र आधीपासून नियमात बंदिस्त करता येत नाही किंवा त्याची व्याख्या बनवता येत नाही. शत्रू जर मानवी हाल पुढे करून हल्ले करीत असेल, तर तुम्ही सुद्धा मानवी ढालीचा वापर करण्याला पर्याय उरत नसतो. तसे करायचे नसेल तर शत्रूला मानवी ढाल पुरवायला पुढे धावणार्‍यांनाही शत्रू समजून त्यांचा बंदोबस्त करणे भाग आहे. सैनिक शत्रूशी दोन हात करीत असताना सैनिकालाच सतावणारे वा त्यात व्यत्यय आणणारे शत्रूची रसद असता. ती रसद तोडणे हा युद्धाचा एक अपरिहार्य भाग असतो. गोगोईने त्यापेक्षा काहीही भिन्न केलेले नाही. असा प्रकार यापुर्वी कुठल्या भारतीय सेनाधिकार्‍याने केला नव्हता. कारण त्या कालखंडात कोणी काश्मिरी नागरिक वा जमाव असे वागत नव्हते. भारतीय सेनेने पुकारलेल्या जिहादी विरोधी कारवाईत कोणी अडथळे आणत नव्हते. त्यांनी असा उद्योग सुरू केला त्यातून ते पाकिस्तानी हस्तक असल्याची घोषणाच करत असतात आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय सेनेवर रहात नाही. त्यांना सुरक्षित करण्याची जबाबदारी पाक हस्तकांवर किंवा जिहादींवर जात असते.

पुर्वी जिहादी लपलेल्या जागी वा चकमकीच्या जागी असलेले काश्मिरी जीव मुठीत धरून पळ काढायचे. चकमकीच्या जागेपासून खुप दूर जाऊन कारवाई संपण्याची प्रतिक्षा करायचे. आता चित्र एकदम बदलून गेले आहे. आता जिथे चकमक चालू आहे अशा ओसाड निर्जन भागातही काश्मिरी युवक धाव घेतात आणि तिथे कारवाईत गुंतलेल्या भारतीय सैनिकांच्या कामात व्यत्यय आणतात. ते काम असते अतिरेकी वा जिहादींना गाठून ठार मारण्याचे, किंवा जीवंत पकडण्याचे. तिथे जाऊन हे जमाव दगडफ़ेक करू लागले तरी त्यापैकी कोणाला जीवाचे भय नसते. कारण जिहादी लपून बसलेल्या जागेवरून कुणाही काश्मिरीवर गोळीबार करणार नसतो. त्याला फ़क्त भारतीय सैनिक टिपायचे असतात. उलट जिहादीला मारण्यासाठी सज्ज असलेली बंदुक आपल्यावर गोळी झाडणार नाही, याची दगडफ़ेक्याला खात्री असते. म्हणजेच असा दगडफ़ेक्या जमाव प्रत्यक्षात जिहादीसाठी मानवी ढाल बनून पुढे आलेला असतो. यातून मार्ग कसा काढायचा? मेजर लिथूल गोगोईने त्याच मार्गाचा शोध लावलेला आहे. युद्धात समानता आणण्यासाठी त्याने जिहादींचे हत्यारच त्यांच्या विरोधात वापरलेले आहे. जिहादी किंवा दगडफ़ेक्या जमाव एकाच बाजूचे असतील, तर ते परस्परांचा जीव घेत नसतात. म्हणूनच एकमेकांसाठी मानवी ढाल होतात. तर तीच ढाल गोगोईने वापरलेली आहे. त्याने एका काश्मिरी दगडफ़ेल्यालाच आपल्या जीपवर बांधून आपल्यासाठी ढाल तयार केली. काश्मिरी युवक इतकेच संतापलेले व भडकलेले होते, तर त्यांनी त्याही परिस्थितीत गोगोईची तुकडी व त्यातले भारतीय जवान यांच्यावर हल्ला कशाला केला नाही? कारण तो हल्ला प्रत्यक्षात त्यांच्यातल्याच एकाचा जीव घेणारा ठरला असता. जे मानवी कवच जिहादी वापरतात, त्याचाच वापर गोगोईने केला होता आणि तोच जालीम उपाय ठरलेला आहे.

जे कोणी असा जमा्व बनवून भारतीय सेनेवर सैनिकी तुकड्यांवर दगडफ़ेक करायला पुढे सरसावतात, ते स्वत:च कुणासाठी तरी मानवी ढाल बनुन पुढे आलेले असतात. सहाजिकच त्यांना सामान्य नागरिक वा माणुस म्हणून गणती करण्यात अर्थ नसतो. मानवी ढाल होण्याचा निर्णय त्यांचा असतो आणि त्याचे परिणाम त्यांनी भोगायचे असतात. मेजर गोगोई वा अन्य कोणी भारतीय सैनिक आपले कर्तव्य बजावण्यासाठी गेलेला असेल आणि त्यात कोणी अडथळा आणत असेल, तर त्यामध्ये कुठलीही माणूसकी नसते. युद्धक्षेत्रात नागरी नियम वा निकष लागू होत नाहीत. जिथे जिहादी वा पाकिस्तानी घुसखोर भारतीय सैनिकांवर बॉम्ब फ़ेकतात. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे वा जीवावर उदार होणे, ही प्रत्यक्षात जिहादीला वा पाकिस्तानला केलेली मदतच असते. म्हणूनच अशा जमावाला शत्रू समजूनच वागवणे भाग असते. कारण ज्याच्या जीवावर बेतलेले असते, त्याच्यासाठी जो त्याक्षणी शत्रू असेल तो शत्रू असतो. नंतर कोणी काय म्हणतो त्याला अजिबात अर्थ नसतो. कारण मोजक्या क्षणात तिथे निर्णय घ्यावे लागत असतात. त्यात विलंब केला तर पुढल्या क्षणी गोगोई जिवंतही असण्याची शक्यता नसते. म्हणूनच मानवी ढालीप्रमाणे दगडफ़ेक्याचा वापर करणे योग्य असते. कारण त्यातून योग्य परिणाम साधले जात असतात. किंबहूना त्यामुळे आपला जीव अशाही प्रकारे धोक्यात आहे याची जाणीवच या दगडफ़ेक्यांना तसल्या कृतीपासून परावृत करू शकते. सवाल कोणी मानवी ढाल व्हायचे ठरवले, आहे त्याचा आहे. कोणी ती ढाल वापरली असा मुळीच नाही. दगडफ़ेके तसे वागले नव्हते, तेव्हा कुणाही भारतीय सेनाधिकार्‍याने कुणाचा मानवी ढाल म्हणून वापर केला नव्हता. जेव्हा असे जमाव जिहादींचे मानवी कवच म्हणून समोर आले; तेव्हाच तसा त्यांचा उपयोग भारतीय सेनेने केला आहे. आपण साधन असल्याचे ज्यांनी कृतीतून दाखवले त्यांचा गुन्हा आहे.

No comments:

Post a Comment