बुधवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फ़ैजाबादच्या दौर्यावर गेलेले होते. तिथे त्यांचे अनेक कार्यक्रम ठरलेले होते. त्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त मानल्या जाणार्या रामजन्मभूमी मंदिराला भेट देण्याचाही कार्यक्रम समाविष्ट होता. ज्याच्या सार्वजनिक जीवनाचा आरंभच जन्मभूमी आंदोलनातून झाला, असा हा मुख्यमंत्री आहे आणि आता त्याने अयोध्येत जाऊनही मंदिरात दर्शनाला जाऊ नये, अशी कोणाची अपेक्षा असेल, तर त्याला इंग्रजीत फ़ुलीश व मराठीत बालीश म्हणावे लागेल. कारण योगी आदित्यनाथ हा संन्यासी माणूस आहे आणि सत्ता वा संपत्ती असल्या गोष्टी त्याच्यासाठी दुय्यम आहेत. तो राजकारणातच आपल्या धार्मिक कर्तव्यासाठी आलेला आहे, अशी त्याची आस्था आहे. तर त्याने अयोध्येत येऊनही रामलल्लाच्या दर्शनाला जाऊ नये काय? राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुठल्याही देवस्थानाला भेट देऊ नये, किंवा प्रामुख्याने हिंदू देवस्थानाला भेट देऊ नये, असा कुठला घटनात्मक दंडक आहे काय? नसेल तर योगींच्या दर्शनावरून इतका गदारोळ व्हायचे काहीही कारण संभवत नाही. पण तो कल्लोळ झाला, कारण आता ती नेहमीची बाब बनलेली आहे. कोणी मुस्लिम नेता मक्केला गेला म्हणून गदारोळ होत नाही, किंवा मुस्लिमाने संसदेतही राष्ट्रगीताचा सन्मान राखण्यास नकार दिला, म्हणून कल्लोळ होत नाही. पण जो कोणी हिंदू असेल त्याने आपल्या धर्माचा आदर करण्याने या देशामधला पुरोगामीपणा धोक्यात येत असतो. असे बोलण्याची आता बुद्धीवादी फ़ॅशन झाली आहे. तरी ती फ़ॅशन कालबाह्य झाली आहे. पण जुन्यातच रमणार्यांना कोणी समजावू शकत नाही. म्हणून हा गदारोळ झाला. म्हणून योगींचे काही अडले नाही किंवा त्यांनी अशा ओरड्याकडे ढुंकूनही बघितले नाही. निदान एका बाबतीत तरी योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेमके अनुकरण केले, हे मान्य करावे लागेल.
मागल्या लोकसभेपुर्वी गुजरातची विधानसभा निवडणूक झालेली होती. त्याचा प्रचार मोदींनी खुप आधी सुरू केला होता आणि त्यासाठी सदभावना यात्रा आरंभलेली होती. गुजरातभर फ़िरलेल्या त्या यात्रेमध्ये अनेक जागी लोक मोदींना येऊन भेटत होते. मतप्रदर्शन करत होते. अशाच एका समारंभात एक मौलवी मोदींपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांच्याशीही मोदींनी हस्तांदोलन केले होते. मग त्या मौलवींनी खिशातून एक टोपी काढली आणि ती मोदींच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. तर त्याला नम्रपणे नकार देऊन, मोदींनी त्याच्याकडून खांद्यावरचा शालीसारखा रुमाल मागून घेतला. पण त्याची ती टोपी नाकारली होती. पुढल्या काळात विविध वाहिन्यांवरून ते दृष्य़ किमान दहापंधरा लाख वेळा तरी प्रक्षेपित झाले असेल. किमान दहावीस हजार चर्चा त्यावरून झडल्या असतील. मोदी कसे मुस्लिमांना व इस्लामला अपमानित करतात, त्याचा डंका पिटण्यासाठी त्या दृष्याचा सढळहस्ते वापर पुढली दोन वर्षे अखंड चालू होता. त्याविषयी खुलासे देताना भाजपाचे नेते प्रवक्ते थकून गेले होते. पण मोदींनी त्याविषयी चकार शब्द उच्चारला नव्हता, की हा अपप्रचार थांबवण्याचा प्रयासही केला नव्हता. टोपी नाकारण्यासाठी मोदींनी माफ़ी मागावी, अशी मागणी कित्येक लाख वेळा झाली असेल. पण मोदी त्याविषयी चकार शब्द बोलले नव्हते. कारण सतत ते चित्र बघून जनमानसावर त्याचा पडणारा प्रभाव, मोदींच्या राजकारणाला खुप फ़ायदेशीर ठरणारा होता. मग आपले विरोधक सढळहस्ते करीत असलेली मदत मोदींनी कशाला नाकारावी? त्यांनी त्या प्रक्षेपणाला आक्षेप घेतला नाही किंवा आरोपांना उत्तर दिले नाही. परिणाम दोन वर्षांनी लोकसभा निकालातून समोर आला. मोदींच्या दृष्य़ाने व त्याच्या सातत्याने झालेल्या प्रक्षेपणाने किमान पन्नाससाठ अधिकचे खासदार भाजपाला मिळवून दिलेले होते. मग योगींचे काय होईल?
कुठल्याही कृतीचे पडसाद उमटत असतात. तसेच मोदींच्या त्या चित्रणाचे पडसाद जनमानसात उमटत होते. जितक्या आग्रहाने मोदींकडे माफ़ीची मागणी चालली होती, तितक्या अगत्याने लोकही मोदींकडे नजर ठेवून होते. हा माणूसही मुस्लिमधार्जिण्या धर्मांधतेला बळी पडतो काय, याकडे लोकांचे लक्ष लागलेले होते आणि मोदींना त्याची पुर्ण कल्पना होती. आपण मुस्लिम धर्मांधतेला शरण जाणार्यापैकी नाही, हे सिद्ध करण्यासाठी मोदी कटीबद्ध होते आणि त्यातूनच भाजपाला बहुमतापर्यंत घेऊन जाणारी हिंदू व्होटबॅन्क तयार होत गेली. त्या दृष्यामुळे वा त्याच्या प्रक्षेपणामुळे मोदी बिथरले असते आणि त्यांनी त्यासाठी अपरोक्ष का होईना माफ़ी मागितली असती, तर त्यांना पंतप्रधान पदापर्यंतची मजल मारता आली नसती. माध्यमांचा आपल्या विरोधातलाही प्रचार कसा चतुराईने वापरून घेता येतो, याचा एक अप्रतिम नमूनाच त्यातून मोदींनी जगासमोर पेश केला. मागल्या तीन वर्षात ते दृष्य कुठल्या वाहिनीने पुन्हा दाखवलेले नाही. कारण त्यातून आपण कुठला मुर्खपणा केला, ते या मुर्ख पुरोगामी संपादकांना खुप उशिरा लक्षात आले. तशीच आणखी एक गोष्ट अमित शहांची सांगता येईल. लोकसभेपुर्वी अमित शहांची उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून नेमणूक झाली होती. आपल्या कामाला आरंभ करण्यापुर्वी त्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाच्या मंदिराला भेट दिली आणि त्यांना तिथे जाण्याचे प्रयोजन विचारण्यात आले. मंदिर व्हावे ही देशवासियांची अपेक्षा असून आपणही तोच नवस तिथे केल्याचे शहांनी तात्काळ सांगुन टाकले. मग शहा मंदिराचा अजेंडा घेऊनच उत्तरप्रदेशात आल्याचा डमरू पुरोगामी वाजवू लागले,. गल्लीबोळापासुन वाहिन्यांवर तशाच चर्चा रंगवल्या गेल्या आणि अमित शहा काय काम बांधत आहेत, त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होऊन गेले. राज्यात विरोधकांचे बारा वाजल्यावरच त्यांना जाग आली होती.
ही पार्श्वभूमी मुद्दाम इथे सविस्तर सांगितली. कारण अशा नगण्य गोष्टीचा डिमडीम वाजवल्यामुळे भाजपाचे नुकसान होत नाही. झाला तर फ़ायदाच होतो, याचे भान त्यातून यावे, इतकीच अपेक्षा आहे. पण ती खरी ठरू शकत नाही. ज्यांना मंदिर बाबरी असल्या गोष्टींवरच्या खपल्या काढल्याशिवाय समाधान होत नाही, त्यांना कोणी शहाणे करू शकत नाही. मोदी किंवा शहा कोणी साधूसंत नाहीत. ते पक्के राजकारणी आहेत आणि योगी आदित्यनाथही साधू असले, तरी त्यांनी राजकारणात उडी घेतलेली आहे. म्हणूनच त्यांच्याकडून कोणी राजकीय परमार्थाची अपेक्षा बाळगू नये. बाकी जगण्याच्या बाबतीत हा मुख्यमंत्री साधू आहे. पण जिथे राजकारण सुरू होते, तिथे त्यालाही राजकीय धुर्तपणा व मतलब सोडून भागत नाही. अशा स्थितीत अयोध्येच्या परिसरात जाणार्या या योगीपुरूषाने रामलल्लाच्या दर्शनाला जायचे टाळावे, ही अपेक्षाच गैरलागू आहे. त्याचा त्याला किंवा त्याच्या पक्षाला लाभ मिळू नये अशी अपेक्षा असेल, तर त्याविषयी बोलण्याचे टाळणे, हा राजकीय शहाणपणा असू शकतो. पण त्याचा सध्या विरोधी पक्षात दुष्काळ पडलेला आहे. आपण कितीही पुरोगामी कारभार केला तरी हिंदूत्वाला सोडलेले नाही, इतकाच यातून संकेत दिला जात असतो. त्यापेक्षा योगी वा शहा-मोदी यांची अधिक अपेक्षा नसते. पण त्याचा गवगवा झाला मग हे नेते जितके हिंदूत्ववादी आहेत, त्यापेक्षा अधिक कडवे भासू लागतात आणि त्याचा फ़ायदा त्यांना हिंदूमते गोळा करण्यात विनासायास मिळत जातो. एक शब्दही हिंदूत्वाचा आवेश म्हणून न बोलताही त्यांचा हेतू साधला जातो. कारण विरोधकच त्यांच्या हिंदूत्वाचा डंका अखंड पिटत असतात. उलट योगी वा मोदींसारखे नेते उदारमतवादी मतांना जवळ ओढणारी भाषा बोलत असतात. इतके बालीश वा फ़ुलीश विरोधक वाट्याला येण्यासाठी खुप नशिबवान असावे लागते.
काही पुरोगामी लोक अजुन ते नेहरू चे पुरोगामी सेक्कुलर ढोल वाजवत असतात ज्याची सद्दी पुर्न संपलीय.हिंदु ना दुखावून फूट पाडून राज्य करण्याचे दिवस गेले.पुरोगामी दहशतवादाला बळी पडायला मोदीजी काही वाजपेयी नव्हेत उलट मोदीजी नीच पुरोगामी पनाचा पडदा एक शब्दही न बोलता फाडलाय
ReplyDeleteसहमत👆
ReplyDeleteखूपच छान विश्लेषण, नेहमीच मार्मिक
ReplyDeleteभाऊ अगदी मुुद्दैसुद लिहीलेय
ReplyDeleteयालाच म्हणतात पुरोगीमींचा
ReplyDeleteफुल्ल बालीश पणा
किंवा
बालीश पुरोगामींचा फुलीश पणा
अगदी मुद्देसूद लिहीलय
ReplyDelete