Wednesday, June 7, 2017

पाकची चहुकडून घेराबंदी

सध्या तरी पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या कुलभूषण जाधवचा विषय थंडावला आहे. कारण आंतरराष्ट्रीय कोर्टाला कसे रोखावे, त्याचा मार्ग पाकिस्तानला गवसलेला नाही. सहाजिकच तिथे नव्याने खटल्याची सुनावणी व्हावी असा आटापिटा पाकिस्तानने चालविला आहे. त्यातच भारतात काश्मिरमध्ये धुमश्चक्री चालू झाली आहे. तिथे प्रशिक्षित जिहादी पाठवून हिंसेचे थैमान घालण्याचा खेळ पाकिस्तानला आखडता घ्यावा लागलेला आहे. कारण ज्या मार्गाने हे जिहादी घुसवले जातात, ते मार्ग भारतीय सेनेने रोखून धरलेले आहेत. नियंत्रण रेषेपलिकडे जिथे म्हणून पाकिस्तानी ठाणी व खंदक आहेत, तिथून भारतीय सीमेवर गोळीबार व तोफ़ा डागायच्या आणि त्याचा आडोसा घेऊन जिहादींनी घुसखोरी करायची, हे जुने तंत्र झाले आहे. आता भारतीय सेनेने त्यावर जालिम उपाय योजला आहे. त्यानुसार कुठेही किंचीत गोळीबार पलिकडून सुरू झाला, मग संपुर्ण नियंत्रण रेषेववर सावधानता बाळगली जाते आणि जबरदस्त भडीमार सुरू केला जातो. सहाजिकच नियंत्रण रेषेच्या पलिकडे नागरिकही सुरक्षित नाहीत, अशी स्थिती निर्माण करण्यात भारताने यश संपादन केले आहे. नियंत्रण रेषेच्या पलिकडे नागरी हालचालही कमी व्हावी असा त्यामागचा हेतू आहे. मग त्याच रुपातून जिहादी वावरणेही अशक्य होऊन जाते. या धोरणानुसार आता पाकिस्तानातून होणार्‍या घुसखोरीला पायबंद घातला गेला आहे. तर त्याला काटशह म्हणून पाकने भारतीय काश्मिरातील आपल्या हस्तकांना बिळातून बाहेर पडून उत्पात घडवण्याचे काम हाती घेण्यास फ़र्मावले. त्यातच बुर्‍हान वाणी वा त्याचे निवडक साथीदार चकमकीत मारले गेले आहेत. अशा घटना बातमी रुपाने तुकड्यात आपल्यासमोर येत असतात, सहाजिकच त्यातली व्यापक भारतीय रणनिती स्पष्ट होत नाही. त्यातली युद्धनितीही आपल्याला लक्षात येऊ शकत नाही.

युद्धनिती कधीच जाहिरपणे बोलली जात नसते आणि सेनापती वा सेनाधिकारी जे काही जाहिरपणे बोलतात, त्यातून ते नेहमीच आपली रणनिती झाकून ठेवत असतात. सहाजिकच आज काश्मिरात भारतीय सेना किती आघाड्य़ांवर लढते आहे, त्याचा खुलासा कधीच होऊ शकणार नाही. पण ज्या बातम्या येत असतात, त्यातून भारत सरकार व भारतीय सेनेने आक्रमक धोरण स्विकारले असल्याचे सत्य लपून रहात नाही. मेजर गोगोई याने एका दगडाफ़ेक्याला जीपवर बांधून दगडफ़ेक रोखून दाखवली, तर सेनापतींनी त्याचा गौरव केला. त्यातून यापुढे काय होऊ शकेल, त्याचा संकेत दंगेखोर पाक हस्तकांना दिला गेला आहे. म्हणूनच कालपरवा हुर्रीयतच्या नेत्यांवर एकाच वेळी अनेक धाडी पडल्या, तिथे कोणी दगड मारायला धजावला नाही की, जमाव करण्याचा आगावूपणा झालेला नाही. त्यातून एक गोष्ट साफ़ होते, की अशा सामान्य दंगेखोर पोरांचा आडोसा घेऊन ज्या पाकवादी कारवाया काश्मिरात चालू होत्या, त्याला मोठ्या प्रमाणात भारतीय सेनादलाने लगाम लावलेला आहे. पण त्याचवेळी रोजच्या रोज अनेक भागात जिहादी लष्कराच्या तुकड्यांवर हल्ले करतात व चकमकी झडतात, तो प्रकार थांबलेला नाही. असे निदान बातम्यांवरून दिसते. त्यात कितीसे तथ्य असावे? एका बाजूला नियंत्रण रेषेवर काटेकोर लगाम लागलेला असताना, इतके घुसखोर सातत्याने येऊ शकत नाहीत. मग हल्ले कोण करतो आहे आणि चकमकी कोणाशी चालू आहेत? त्याचे उत्तर सोपे आहे. जे आधीच इथे दबा धरून बसलेले आहेत, त्यांना सुरक्षित बिळातून बाहेर काढून ठोकले जात आहे. नावी घुसखोरी बंद आणि आधीच इथे येऊन बसलेल्यांचा नि:पात; अशी ही दुधारी रणनिती सध्या अंमलात आणली जात आहे. त्याचे दुरगामी परिणाम लाभदायक असू शकतात. कारण जितकी अशा घातपात्यांची संख्या घटणार आहे, तितका काश्मिर शांत होत जाणार आहे.

तीन वर्षात मोदी सरकारने काश्मिरात कुठली शांतता आणली? उलट काश्मिरची स्थिती अधिकच बिघडत गेली आहे, असाही आरोप होत असतो. त्याचे उत्तर काश्मिर व पाकिस्तानी धोरणात गुंतलेले आहे. दिर्घकाळ पाकिस्तान व काश्मिर या धोरणातल्या चुका नेमक्या शोधून त्याचे निदान कधी झाले नाही. वेळोवेळी प्रसंग येईल तसे उपाय योजले गेले आहेत. त्याच्या दिर्घकालीन परिणामांचा कधीच विचार झाला नाही. सहाजिकच समस्या तात्पुरती संपली असे भासले असले तरी समस्या अधिकाधिक जटील होत गेलेली होती. काश्मिर व त्यातील पाकिस्तानचा हस्तक्षेप यावर गेल्या तीन दशकात खुप बोलले व लिहीले गेले आहे. पण त्यातून कधीही विषय निकालात निघणारे उपाय सापडू शकले नाहीत. पण त्या उथळ उपायांनी समस्या अधिकच गुंतागुंतीची होत गेली. मागल्या तीन वर्षात मोदी सरकारने काहीकाळ जुनेच धोरण पुढे राबवित दुसरीकडे या समस्येचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातली गुंतागुंत हुडकून काढलेली आहे. नंतरच त्या संबंधात व्यापक स्वरूपाच्या धोरणाची आखणी केली आहे. पाकिस्तान, चीन व काश्मिर अशा विविध वाटणार्‍या प्रश्नांची गुंतवळ उलगडून त्यातले परस्परांना जोडणारे धागे वेगळे केले आहेत आणि आता परस्परांना छेद देणार्‍या विषयांना एकाचवेळी हात घातला आहे. त्यामुळे का बाजूला काश्मिर धुमसताना दिसतो आहे आणि पाकिस्तान त्यात काही ढवळाढवळ करू शकलेला नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानला जागतिक मंचावर एकाकी पाडण्याचा खेळ झाला असून, चीन त्याला प्रत्येकवेळी संरक्षण देण्यात तोकडा पडू लागला आहे. त्याच कालखंडात काश्मिरात व दिल्लीत जे कोणी पाकप्रेमी भुरटे आहेत, त्यांचीही नाकाबंदी सुरू झालेली आहे. येत्या दोन वर्षात काश्मिरात त्याचे उपकारक परिणाम नक्की दिसू लागले तर नवल नाही. कारण ह्या परस्पर पुरक समस्यांना एकमेकांशी तोडण्याची रणनिती सध्या राबवली जात आहे.

चीन आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानचे चोचले पुरवित असतो. पाकिस्तानला आपल्या अंतर्गत राजकारणासाठी काश्मिर धुमसत ठेवणे भाग आहे आणि काश्मिरातील काही आझादीप्रेमी नेत्यांना व गटांना आपल्या पोटपाण्यासाठी काश्मिरात शांतता नको आहे. याखेरीज भारतातील काही राजकीय गटांना भाजपा विरोधासाठी काश्मिरची होळी झाली तरी कर्तव्य नाही. इतका द्वेष त्यांच्या मनात फ़ोफ़ावला आहे. अशा सगळ्यातून मोदी सरकारला मार्ग काढणे भाग आहे. त्यातला पहिला मार्ग म्हणून मग या विविध गटातल्या हितसंबंधितांची परस्परांना मिळणारी मदत व रसद तोडून टाकणे होय. नियंत्रण रेषेवर ‘नियंत्रण’ मिळवून आधी घुसखोरीला पायबंद घातला गेला आहे, नंतर हुर्रीयत व अन्य पाक हस्तकांना मिळणार्‍या पैशाच्या रसदीवर आर्थिक घाला घातला गेला आहे. तिसरी गोष्ट चिनी हितसंबंधांना पाकिस्तानी प्रदेशातच बाधा निर्माण करण्यात बलुची व अन्य टोळीवाल्यांना भारताने खुला पाठींबा दिला आहे. चौथी बाजू अफ़गाण राज्यकर्त्यांना पाकच्या जिहादी मानसिकेतेच्या विरोधात उघड भूमिका घ्यायला उभे केले आहे. इतकी राजनैतिक सज्जता झाल्यानंतरच काश्मिरातील भारतीय सेनेला मुक्त हस्ते कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणून तर काश्मिरात आपल्या विभागिय सेनाधिकार्‍यांची दोन दिवसांची बैठक घेऊन जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सेनेची युद्धसज्जता पाकिस्तानला कळावी यासाठी पावले उचलली आहेत. अशा अनेक गोष्टी एकत्रित बघितल्या तर मोदी सरकारच्या पाक व काश्मिरविषयक बदलत्या धोरणाची थोडीफ़ार कल्पना येऊ शकते. अशा बाबी कुठलेही सरकार वा त्याचे लष्कर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करीत नसतात. जाणकारांनी व अभ्यासकांनी असे तुकडे जुळवून व जोडून त्याचा सारांश शोधायचा असतो. अर्थात ज्याला गरज वाटत असेल त्यांनीच असे शोध घ्यावे.

3 comments:

  1. नेहमीप्रमाणेच समर्पक विवेचन भाऊ !

    ReplyDelete
  2. भाऊ अत्यंत जटिल विषया संबंधी मोदी सरकारने चालवलेला काश्मिर प्रश्न निकालात काढायचा प्रयत्न आपण सामान्य देशवासियांना समजेल अशा शब्दात या लेखात सांगितला आहे. आपणास शतशः प्रणाम.
    या सर्व नाकेबंदी यशस्वी झाल्यास नक्कीच काश्मिर प्रश्नावर प्रभावी उपाय होऊ शकतो.
    या गोष्टी सामान्या पर्यंत पोहचवण्यात मिडियावाले असमर्थ ठरत आहेत आणि या मुळे खरेतर मोदी सरकारचे काम थोडे सोपेच होईल. कारण मिडियावाल्यांना खरोखरच हे समजत नसेल तर त्यांच्या आगलावे पणावर निर्बंध येयील.
    परंतु याच मिडियावाल्यांनी काश्मिर प्रश्नांवर मोदी सरकारला पुर्णपणे अपयश आले आहे असा प्रचार चालवला आहे. त्यामुळे सहज चर्चा केली तर नागरिक मोदी सरकारला काश्मिर प्रश्नांवर अपयश आल्याचे चर्चा करताना दिसतात. ( हे जो ट्रेनने बसने प्रवास करतो अशा सामान्य माणसाला नित्य नियमाने ऐकू येते. किंवा जो देशात चाललेल्या परिस्थिती बद्दल कोणाशी चर्चा करतो त्याला मोदीनी तिन वर्षात काहीच ठोस केले नाही अशी प्रतीक्रीया येते.)
    आणि त्यांना असे काही सांगितले तर विश्वास बसत नाही. विदेशी काळा पैसा 15 लाख खात्त्यात जमा विदेशी गुंतवणूक रोजगार निर्मिती या ठळक परिस्थितीत काहीच फरक झाला नाही असे म्हणुन मोदी सरकार फेल म्हणतात. हा स्वानुभव आहे. आजकाल च्या फास्ट फुड प्रमाणे हे अत्यंत क्लिष्ट प्रश्न चुटकी सरशी सुटावेत असे वाटते व मोदी फेल म्हणुन बोंबाबोंब करतात. आणि या मुळे काँग्रेस, ममता व अनेक जण मोदींना फेकु म्हणुन सोशल मिडियात हिणवतात.
    आणि याच मुळे जरी मोदी भाजपला निवडणूकीत यश मिळाले तर ते व्होटिंग मशिन मुळे मिळाले अशी चर्चा चालते.
    व जसजशा लोकसभा निवडणूका जवळ येतील तसतसे याला मिडियावर ऊत येतील. व एखादी प्रियांका काँग्रेसला 150 लोकसभा सिट पर्यंत घेऊन जाते. सोनिया चे सुमार नेतृत्वाने हे गेली 25 वर्षे करुन दाखवले आहे.
    भाजप सरकारची (मोदी सरकार) हे पण पेरले जातं आहे जसे अटल बिहारी व महाजन यांची धोरणा /व्यक्तीमत्वाने भाजपचे यश दाखवले गेले व त्यामुळे भाजपला पक्ष म्हणुन मोठा/ रुजु दिला होऊ दिला नाही. व परत / सलग 10 -15 वर्षे या खंडप्राय देशावर काँग्रेस शिवाय कोणी गेल्या 70 वर्षांत राज्य करु शकले नाही. आणि मोदींचा भाजप याला अपवाद ठरतो का हे पुढील दोन वर्षांत समजेल. आणि असा काँग्रेस इतर सरकार चा अपवाद भारत देशाचे भाग्य बदलु शकतो.
    Aks पनवेल

    ReplyDelete
  3. भाऊ आपली All time great articles मी अनेक गृपवर, मित्र व मिडियावाले यांना खालील मजकूर लिहून पाठवतो
    Article by Bhau Torsekar on Kashmir must read भारत या खंडप्राय देशात रहाणारे नागरिक म्हणुन काही देशाच्या मुलभुत समस्या वर चाललेले प्रयत्न मिडियावाले दाखवणार नाहीत कारण हे सरकार भ्रष्टाचार करुन मिडियावाले ना भागिदारी देत नाही.. परंतु आपणास नम्र विनंती समस्येचा दुरगामी उपाय म्हणुन काय प्रयत्न चालु आहेत हे वाचा. हल्ल्या वर प्रती हल्ला केला तर काही शाहिद होतायत हे बलिदान जो पर्यंत खंबीर नेतृत्व व राष्ट्रहितवादी सरकार आहे तो पर्यंत व्यर्थ नक्कीच जाणार नाहीत.

    Wednesday, June 7, 2017
    पाकची चहुकडून घेराबंदी
    सध्या ...

    ReplyDelete