Wednesday, June 21, 2017

लढाईपुर्वीच पराभूत



भाजपाने राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केल्यावर आलेल्या विरोधातल्या प्रतिक्रीया मोठ्या मजेशीर आहेत. सोमवारी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी करण्यापुर्वी, अनेक पक्षांनी व गटांनी आपल्याला हवी तशी नावे आखाड्यात फ़ेकलेली होती. त्यात शिवसेनेने जसे मोहन भागवत किंवा स्वामिनाथन यांची नावे पुढे केली होती. तशीच कॉग्रेस वा डाव्यांच्या गोटातून गोपाळ गांधी वगैरेही नावे पुढे आलेली होती. पण कोविंद यांचे नाव पुढे आले आणि अकस्मात आधी समोर आलेली नावे अडगळीत जाऊन पडली. आता सुशीलकुमार शिंदे वा मीराकुमार यांची नावे पुढे आली आहेत. याचे कारण कोविंद हेच आहे. भाजपाने हे नाव पुढे करताना ते दलित असल्याचे जाहिर केले आणि एकूणच राष्ट्रपती राजकारणाचे रंगरूप बदलून गेले. आता ते नाव मान्य करायचे, किंवा त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून कोणी उभा करायचा, तर त्याला दलित हवा, हे परिमाण लागू झाले. त्यामुळेच मग कॉग्रेसमधील दोन प्रमुख दलित चेहरे पुढे आले. त्यात आधीच्या लोकसभेतील सभापती म्हणून काम केलेल्या मीराकुमार यांचा उल्लेख झाला, तसेच आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून ‘गाजलेले’ सुशीलक्मार शिंदे यांचे नाव पुढे आले. पण त्याआधी कोणी यांची नावेही घेतलेली नव्हती. खरेच ही दोन नावे गुणवान किंवा पात्र असतील, तर आधीच कोणीतरी त्यांची नावे राष्ट्रपती पदासाठी घ्यायला हवी होती. पण कुठेही त्यांचा उल्लेखही झाला नाही. पण कोविंद हे दलित असल्याचा गवगवा भाजपाने केला आणि विरोध करणार्‍यांना दलित शोधण्याची पाळी आली. हेच मोदी विरोधात उभे असलेल्यांच्या पराभवाचे एकमेव कारण आहे. ते सतत राजकारणाचा अजेंडा मोदींना मांडू देत असतात. आपला अजेंडा पुढे करून त्यानुसार मोदींना राजकारण करायला भाग पाडणे, या विरोधकांना अजून का सुचत नाही?

राजकारणाचा अजेंडा जो लादत असतो. तोच विजयी होत असतो. लोकसभेच्या निवडणूकांचे वेध लागल्यापासून मोदी सतत देशाच्या राजकारणाचा अजेंडा व दिशा ठरवत आहेत. सहाजिकच त्यांच्या अपेक्षेनुसार व इच्छेनुसार विरोधकांना वागणे भाग पडते आहे. अशा खेळात मोदी चतुर असून, त्यांनी सतत विरोधकांना हुलकावण्या दिल्या आहेत. आताही उत्तरप्रदेश विधानसभा जिंकल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती निवडणूकीची तयारी चालविली होती. तर विरोधक मात्र मतदान यंत्रात गुरफ़टून गेले होते. त्या दोन महिन्यात मोदींनी कुशलतेने राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी हाताशी असलेली मते आणि कमी पडणारी मते, यांचे गणित मांडून विजयाची तयारी चालू केली होती. पण त्याविषयी विरोधक साफ़ गाफ़ील होते. अण्णा द्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल अशा एनडीएबाह्य पक्षांची मते भाजपाकडे आणल्यास, हवा तो राष्ट्रपती निवडून आणणे शक्य होते. मागले दोन महिने मोदी-शहा तेच समिकरण जुळवण्यात गर्क होते. याचा अर्थ असा होता, की उमेदवार कोण ही बाब मोदींनी दुय्यम मानली होती. ज्याला आपण उमेदवार करू; त्याला निवडून आणण्याइतकी हुकूमी मते हाताशी असायला हवी, याचे भान असलेला एकच नेता देशात होता. उलट नुसती पोपटपंची करणार्‍या अन्य पक्षीयांना राष्ट्रपती निवडणूक दारात येऊन उभी असल्याचे भानही नव्हते. त्याची चाहुल लागल्यावरही या शहाण्यांनी मतांचे समिकरण मांडण्याचा विचारही केला नाही. त्यात भाजपा विरोधातील वा बिगरभाजपा प्रत्येक मत आपल्याकडे कसे येईल, याचाही विचार केला नाही. त्यापेक्षा राष्ट्रपती कसा हवा आणि तो सहमतीने निवडावा, असले प्रवचन आरंभले होते. तिथेच मोदींचा विजय निश्चीत झाला होता आणि होत असतो. तिथेच मोदी विरोधकांवर आपला अजेंडा सहज लादू शकत असतात. दलित उमेदवार आणुन त्यात मोदी यशस्वी झाले.

मुळात आपला संयुक्त उमेदवार विरोधकांनी उभा करायचा, हा निर्णय कधीच घेता आला असता. उत्तरप्रदेशची निवडणूक संपल्यावर आणि त्यात मोदींची जादू कायम असल्याचे सिद्ध झाल्यावर विरोधक गडबडले होते. पण तरीही सावध झाले नव्हते. सावध झाले असते, तर त्यांनी उत्तरप्रदेशच्या पराभवाकडे पाठ फ़िरवून राष्ट्रपतीच्या निवडणूकीचे आव्हान उघड्या डोळ्यांनी बघितले असते आणि मोदींना धोबीपछाड देण्याची मोठी संधी म्हणून तात्काळ जुळवाजुळव सुरू केली असती. पण तसे होणेच नव्हते. विरोधी पक्ष स्वबळावर काहीही करायचे विसरून गेले आहेत. आपण काही करण्यापेक्षा मोदी वा भाजपा काही करील, त्याला विरोध करणे; हा आता विरोधकांचा अजेंडा बनुन गेला आहे. त्यामुळेच सोनियांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावल्यानंतर त्यात संयुक्त उमेदवार उभा करू; इतकाही साधा निर्णय होऊ शकला नाही. व्यक्ती कोण हे नंतर ठरवता आले असते. पण बिगर भाजपा एकच संयुक्त उमेदवार, असा निर्णय घेण्यात काय अडचण होती? असा प्रस्ताव करण्यात मोदी कुठे आडवे आले होते? तरीही तितका सामान्य निर्णय सुद्धा विरोधकांना करता आला नाही. त्या बैठकीलाही सर्व पक्ष व नेते हजर होतील, इतकी मजल मारता आली नाही. कारण विरोधक पुरते दिशाहीन होऊन गेले आहेत. त्यांची कल्पनाशक्ती निकामी होऊन गेली आहे. आपण विरोधक म्हणून काय करावे, तेही त्यांना सुचेनासे झाले आहे, म्हणून मग पळवाट शोधण्यात आलेली आहे. जे काही करायचे ते मोदींनी करावे आणि मग आपण आरामात त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ, अशी ती पळवाट आहे. पण यातून पुढाकार मोदींकडे गेलेला आहे आणि आपणहून विरोधक काही करतील, याची मोदींना भितीच उरलेली नाही. सगळा राजकीय खेळ मोदींना हवा तसा आणि हवा तेव्हा खेळला जाऊ लागला आहे. तसे नसते तर आता शिंदे वा मीरा कुमार यांची नावे पुढे आलीच नसती.

आज दुर्दैव असे आहे, की माध्यमात दिसतात, त्यापेक्षा प्रत्यक्षात कुठे विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. भाजपाचा उमेदवार जाहिर झाला आणि तात्काळ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्याचे अभिनंदन करायला पुढे झाले. यातूनच विरोधी एकजुटीला सुरूंग लावला जातो, इतकेही त्यांना उमजत नसेल काय? पण शिरजोर लालूंना जागा दाखवून देण्याची संधी म्हणून नितीश यांनी अशी कृती केली. त्यामुळेच रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित होऊन चोविस तास उलटण्यापुर्वीच सोनियांनी योजलेल्या बैठकीत हजर असलेल्या अनेक पक्षांचा पवित्रा बदलून गेला. मायावती, मुलायम, नितीश अशा अनेकांनी भाजपा उमेदवाराकडे असलेला कल बोलून दाखवला. जर महिनाभर आधीच बिगर भाजपा पक्षांचा संयुक्त उमेदवार उभा करायचे ठरले असते आणि भाजपापुर्वीच तो जाहिर झाला असता; तर आज यापैकी कोणा नेत्याला वा पक्षाला वेगळी भूमिका घेण्याची मोकळीक राहिली नसती. किंबहूना विरोधकांचा उमेदवार आधीच समोर आणला गेला असता, तर मोदी-शहांना कोविंद यांचे नाव ठरवतानाही वेगळा विचार करावा लागला असता. पण विरोधकांनी सहमतीचे नाटक सुरू केले आणि त्यांच्या भेटीगाठी घ्यायला शहांनी ज्येष्ठ मंत्र्यांना पाठवून विरोधकांना आणखीच गाफ़ील करून टाकले. सत्ताधारी पक्षाने कुठलेही नाव आधी सांगितले नाही, अशी तक्रार आला कॉग्रेस वा डावे नेते करतात, तेव्हा म्हणून हसू येते. तुम्हाला राजकीय लढाई करायची असेल, तर सत्ताधारी पक्षाकडे आशाळभूत नजर लावून बसता येत नसते. तुम्ही पुढाकार घ्यायचा असतो आणि सत्ताधारी पक्षाला प्रतिक्रीया देण्यास भाग पाडायचे असते. पण पराभूत मनोवृत्तीने पछाडलेल्या विरोधकांना अजून २०१४ च्या पराभवातूनच सावरता आलेले नाही, की मोदींच्या हातून पुढाकार हिसकावून घेण्याचा विचारही सुचलेला नाही. मग यापेक्षा काय वेगळे होऊ शकते?

3 comments:

  1. नेहमीप्रमाणे जबरदस्त लेख भाऊ.

    आणखी एक मुद्दा--- शिवसेना भाजपवर नाखूष आहे हे तर अगदी जगजाहिर आहे. मग शिवसेनेला आपल्या बाजूला खेचायचा कोणता प्रयत्न विरोधकांनी केला? शिवसेनेने यापूर्वीही बहुतेक सर्व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांविरूध्द मत दिले होते तेव्हा यावेळी शिवसेनेला आपल्या बाजूला खेचून आणणे अशक्य होते का? एन.डी.ए मधले पक्ष आपल्या बाजूला खेचून आणणे तर दूरच राहिले. यांच्यातलेच मग नितीशकुमार, नवीन पटनायक, मुलायमसिंग हे मोहरे लगोलग रामनाथ कोविंद यांच्या बाजूला गेले आणि विरोधकांच्या एकजुटीचा बट्ट्याबोळ उडाला. वास्तविकपणे विरोधकांनी पुढाकार घेऊन भाजपने नाव जाहिर करायच्या आधी आपल्या संयुक्त उमेदवाराचे नाव जाहिर केले असते तर मोदींना त्याला उत्तर देणारा उमेदवार शोधावा लागला असता. तसेच २०१७ पासूनच विरोधकांनी आपण एकत्रित आहोत असे चित्र जनतेपुढे उभे केले असते तर त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळीही विरोधकांना फायदा होऊ शकला असता. त्यासाठी ही राष्ट्रपती निवडणुक म्हणजे मोठी संधी होती. ती विरोधकांनी वाया घालवली आहे. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी विरोधकांची युती झालीच तर ती उत्तर प्रदेशात घाईघाईने उरकलेल्या समाजवादी-काँग्रेस युतीसारखी असेल. अशा आयत्या वेळी केलेल्या युतीचा लोकांवर किती प्रभाव पडणार?

    ReplyDelete
  2. Senene virodhat matdaan kele ate tar kendratun tyanchi hakaalpatti zali asti va Maharashtrat pan dhunganavar laath nasli asti. Satte sathi senene julavun ghetale.

    ReplyDelete
    Replies
    1. आजच्या परीस्थितीचे योग्य वर्णन केले आहे

      Delete