Sunday, June 18, 2017

कृतीवीर आणि शब्दवीर

doer के लिए चित्र परिणाम

कुठल्याही देश, राष्ट्र वा समाजात नेतृत्व करणार्‍या दोन फ़ळ्या असतात. त्यातली एक फ़ळी कृतीवीरांची असते तर दुसरी फ़ळी शब्दवीरांची असते. या दोन नेतृत्वांचे समाजावर वर्चस्व असते. त्या दोन गटांमध्ये समतोल असतो, तेव्हा तो समाज वेगाने प्रगती करीत असतो. पण त्या दोन नेतृत्व गटांमध्ये विसंवाद किंवा बेबनाव निर्माण होतो, तेव्हा प्रगती खुंटत जाते. समाजाला प्रगतीपेक्षाही स्थैर्याची गरज असते. सहाजिकच आधी स्थैर्याला प्राधान्य देऊ शकणारा त्यात वरचढ ठरतो. म्हणजे दोनपैकी कृतीवीर असलेला नेतृत्व गट शब्दवीर गटावर मात करून आधी समाजाला स्थैर्य प्रदान करतो. जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा कृतीवीराला समाजाचा पाठींबा मिळतोच. पण काही शब्दवीरही अशा स्थैर्याला प्राधान्य व समर्थन देत असतात. कारण बुद्धीवादाचा अतिरेक हा समाजाला गोत्यात घेऊन जाणारा असतो. अतिरेक कुठलाही असो, तो धोकाच असतो. कृतीवीराला आपल्या अतिरेकापासून रोखण्याची जबाबदारी बुद्धीवादी शब्दवीराची असते. पण त्याचे शब्दसामर्थ्य समाजावर राज्य करू लागले, की कृतीवीर दुबळा होत असतो. अशा प्रसंगी त्या अतिरेकाला लगाम लावण्यासाठी कृतीवीराला शब्दवीराच्या साहसाला रोखण्याचे धाडस करावेच लागत असते. कारण समाज अनिर्बंध जगू शकत नाही. त्यात दुबळ्यालाही न्याय मिळावा लागतो आणि सबळाला लगामही लावायची व्यवस्था असावी लागते. त्यातला समतोलच समाजाला स्थैर्य प्राप्त करून देत असतो. डाव्या विचारवंतांचे तत्वज्ञान फ़्रेंच राज्यक्रांतीपासून सुरू होते. तेव्हा फ़्रान्समध्ये राज्यकर्ती जमात लोकांच्या सुखदु:खापासून कशी दुरावली होती, त्याचे उदाहरण म्हणून या आधुनिक लोकशाही क्रांतीकडे बोट दाखवले जाते. पण तेच दाखवणारे शहाणे आजकाल तात्कालीन फ़्रेंच राज्यकर्त्यांसारखे वागू लागलेत, याचेही स्मरण त्यांनाच उरत नाही.

फ़्रान्समध्ये लोकांना दोन वेळचे अन्न म्हणजे पावही मिळेनासा झाला होता आणि त्यांनी प्रक्षुब्ध होऊन राजवाड्यावर मोर्चा नेलेला होता. तिथे मौजमजा करण्यात गर्क असलेल्या अभिजनवर्ग वा सुखवस्तु उच्चभ्रू वर्गाला पाव म्हणजे काय, तेही ठाऊक नव्हते. म्हणून कोणी राजकन्या म्हणाली, पाव मिळत नसेल तर लोकांनी केक खावा. पावापेक्षाही केक महाग असतो, इतकेही भान त्या वर्गाला राहिलेले नव्हते. थोडक्यात अशा उच्चभ्रू वर्गाची न्यायाची कल्पना किती फ़सवी होती, त्याचा अंदाज येऊ शकतो. लोकांना स्वस्तातला पाव मिळत नसेल तर त्याने केक कुठून मिळवावा? असा प्रश्न त्या राजकन्येला पडला नाही. आज आपल्या देशातल्या लोकांना साधा न्याय किंवा सुरक्षा मिळत नाही. गाव गल्लीत कुठल्याही मुलीला घरातून बाहेर पडल्यास सुखरूप परत माघारी येण्याची ह्मी देता येत नाही. रोजच्या रोज देशभरात कित्येक मुलींवर बलात्कार होतात आणि त्यांचे मुडदेही पाडले जातात. पण त्यविषयी कोणा उच्चभ्रू वा अभिजन वर्गातील शहाण्याला फ़िकीर आहे काय? लाखो लोकांना सुरक्षा मिळू शकत नाही. अशा देशात व समाजात अविष्कार स्वातंत्र्य उपलब्ध नाही, म्हणून गळा काढला जात असतो. त्याच देशात हजारो कोटीची लुट करून विजय मल्ल्या फ़रारी होतो. त्याला कायदा हात लावू शकत नाही, अशी दुबळी कायदा व्यवस्था झाली आहे. हजारो कोटी रुपयांची लुट करून चिटफ़ंडवाले उजळमाथ्याने जगत असतात. त्यांचा बाल कोणी बाका करू शकत नाही. पण त्याच देशातले बुद्धीमंत किंवा शब्दवीर सरकारला कोणाविषयी जाब विचारत असतात? अरुंधती रॉय नावाच्या बाईला कोणी सोशल माध्यमातून अपशब्द वापरले, म्हणून गदारोळ माजवला जातो. तो माजवणार्‍यांना देशात बलात्कार होत असल्याचे भान तरी आहे काय? असेल तर त्याविषयी त्यांनी काय केले आहे?

बलात्कार थांबवता येत नसतील तर लोकांनी अविष्कार स्वातंत्र्याची पताका हाती घ्यावी, असेच यामागचे तर्कशास्त्र नाही काय? बलात्कार करणार्‍याला कायद्यात जामिन मिळू शकतो आणि तो पुन्हा बलात्कार करायला मोकळा आहे. त्यासाठी कोणी बदलाची मागणी केली आहे काय? नेहरू विद्यापीठातील कन्हैयाकुमार नावाच्या विद्यार्थ्याला कोर्टात वा अन्यत्र मारहाण झाली, म्हणून गदारोळ माजवणार्‍या दिल्लीतील उच्चभ्रू वर्गाने देशात सातत्याने वाढणार्‍या गुन्हे वा गरीबांच्या लूटमारीविषयी काय आवाज उठवला आहे? अशा अनेक उदाहरणातून देशातील शब्दवीर व कृतीवीर यांच्यातला समतोल ढळला असल्याचे लक्षात येऊ शकेल. देशाच्या व समाजातील गरीब लोकांच्या अपेक्षा काय आहेत, याचे भान शब्दवीरांना उरलेले नाही. त्यापेक्षा त्यांना आपल्या कल्पनेतील समाजाच्या चिंतांनी ग्रासलेले आहे. भारतात काय आदर्श व्यवस्था असावी, याची त्यांना फ़िकीर आहे. पण त्या आदर्श व्यवस्थेत जगण्यासाठी भारतीय लोकसंख्या किमान जीवंत राहिली पाहिजे, याचे साधे स्मरणही या वर्गाला राहिलेले नाही. यातल्या अभिजन वर्गाविषयॊ जनसामान्यांना आदर असतो. तेच समाजाला शहाणपणा शिकवू शकणारे म्हणून हा आदर निर्माण झालेला असतो. पण त्या शहाणपणातून समाजाला किमान न्याय वा जगण्यासाठी सुसह्य व्यवस्था उभारण्यास हतभार लागत नाही, असा अनुभव येऊ लागला, म्हणजे लोकांमध्ये अशा शहाण्या वर्गाविषयी तिरस्कार जन्म घेतो व वाढीस लागतो. किंबहूना तिथेच कृतीवीराचे पारडे जड होऊ लागते. शहाण्यांच्या शाब्दिक बुडबुड्यांनी कल्पनांचा पर्वत उभा रहात असला, तरी तो वास्तवाशी निगडीत नसतो. म्हणून लोकांना कृतीवीराच्या वास्तव घोषणा आवडू लागतात. त्यात किमान सत्याचा अंश असतो. स्वर्गसुख ही कल्पना असते आणि किमान गरजांची पुर्तता हे वास्तव असते.

शब्दवीर किंवा बुद्धीमंत हा कल्पनाशूर असतो. म्हणूनच वास्तव भयंकर रूप धारण करून सामोरे आल्यावर शब्दवीराचे पाय गळपटतात. त्याचे अवसान गळून जाते. उलट अशा प्रसंगी कृतीवीर हिंमतीने संकटाला सामोरा जात असतो. अपेक्षीत यश त्याला मिळेलच असे नाही, पण किमान संकटातून सावरण्याइतकी कृती त्याच्याकडून शक्य असते. उलट अशा प्रसंगी पळून जाणार्‍या शब्दवीराविषयी लोकांचा भ्रमनिरास होऊन जात असतो. आपण निव्वळ शब्दाचे बुडबुडे उडवू शकतो आणि त्याच्या पलिकडे आपण कर्तृत्वहीन आहोत, शब्दवीराला याचे पक्के भान असते. पण कृतीवीराला हाताशी धरून आपण मोठे बदल घडवून आणू शकतो, याचीही जाणिव शब्दवीराला असते. म्हणून या दोघांमध्ये समतोल असला तर समाजाला मोठी मजल मारता येते. पण कधीकधी शब्दवीर कृतीवीराला आपल्या कब्जात ठेवण्याच्या आहारी जातो. त्यातून दोघांमध्ये बेबनाव सुरू होतो. शब्दसामर्थ्यावर बुद्धीमान लोक समाजाच्या मनावर राज्य करीत असतात. हुकूमत गाजवत असतात. त्यामुळेच कृतीवीराच्या विरोधात जनमत बनवण्याची क्षमता त्यांच्यापाशी असते. तिला घाबरून कृतीवीर वचकून असतो. पण तो खुपच दबला आणि शब्दवीरांच्या तालावर नाचू लागला, तर कृतीवीराची हुकूमत सैल होत जाते आणि शब्दवीरांचे वर्चस्व समाजात निर्माण होते. असे शब्दवीर कल्पनाविश्वात रमणारे असले तर वास्तवाचे भान त्यांना रहात नाही. पर्यायाने देशात अराजकाची स्थिती निर्माण होत जाते. सामान्य जनता वास्तव जगात जगणारी अ्सते. ती शब्दाने भारावणारी असली, तरी वास्तवाचे अखंड भान राखणारी असते आणि दुबळा कृतीवीर तिच्या मनातून उतरत जातो. ती जनता अधिक कठोर व ठामपणे उभा रहाणारा किंवा शब्दवीरांना झुगारणारा कृतीवीर शोधू लागते. त्यातूनच मग त्या समाजात वा देशात क्रांती येत असते. त्यात शब्दवीरांना केविलवाणे व्हावे लागत असते.

हे विवेचन इतके सविस्तर अशासाठी केले, की आपल्या देशात सध्या या दोन नेतृत्व गटात जुंपलेली आहे. मनमोहन वा त्याच्या आधीचा पंतप्रधान व सरकारांना काही मुठभर शब्दवीरांनी कब्जात घेतले होते आणि सत्तेची पकड सैल झालेली होती. वास्तवाचे भान सुटल्याप्रमाणे राजसत्ता भरकटलेली होती. सामान्य लोकांच्या जीवनातील खर्‍याखुर्‍या समस्या बाजूला पडून मुठभर विचारवंतांच्या कल्पनेतील भ्रामक समस्यांचे समाधान शोधण्यात देशातील सत्ता व सत्ताधारी वाहून गेले होते. त्यावर लोकांना अन्य पर्याय सापडत नव्हता. सेक्युलर पुरोगामी हे शब्द एक पाखंड बनून गेले होते आणि गरीबाला न्याय ही बाष्कळ गोष्ट झाली होती. या दुर्दशेला इथले शहाणे वा बुद्धीमंतच जबाबदार असून त्यांच्या तालावर नाचणारे राजकारणी देश चालवायला नाकर्ते असल्याची धारणा लोकांची झालेली होती. त्याच्या परिणामीच नरेंद्र मोदी नावाच्या कृतीवीराची भुरळ सामान्य जनतेला पडत गेली. सहाजिकच त्याची जितकी निर्भत्सना शहाण्यांकडून होत गेली, तितके लोक मोदींकडे आकर्षित होत गेले. आज तीन वर्षे उलटून गेल्यावरही मोदी नावाचे गारूड लोकांच्या मनावर कायम आहे, त्याचे उत्तर शब्दवीरांच्या नाकर्तेपणामध्ये सामावलेले आहे. कारण नरेंद्र मोदी यांच्या हाती आज सत्ता एकवटलेली असून त्यांनी अशा बुद्धीमान वर्गाला साफ़ झुगारून लावलेले आहे. तर आपल्या शब्दसामर्घ्यावर मोदींच्या सत्तेला मूठीत ठेवण्याची धडपड देशातले बुद्दीवादी करत आहेत. पण त्यांचे शब्द वा त्याचे सामर्थ्य कधीच कालबाह्य व निकामी होऊन गेले आहे. याची पुरती जाणिव मोदींना आहे. म्हणूनच हा विरोधाभास तयार झाला आहे. आपले शब्द व कल्पना अर्थहीन व निरूपयोगी होऊन गेल्याचे भान या वर्गाला येईल, तेव्हाच पुन्हा देशात नेतृत्वाचा समतोल नव्याने प्रस्थापित होऊ शकेल. कारण कृतीवीर वदल घडवून आणतो आणि शब्दवीर त्यासाठी एकट्याने काहीही करू शकत नसतो.

कुठल्याही कालखंडात व समाजात नेतृत्वाचे असे दोन गट असतातच. पण त्यांची आपापली जबाबदारी असते. जेव्हा त्यातला एक गटही आपल्या कर्तव्याला पारखा होतो, तेव्हा नेतृत्वातला समतोल बिघडू लागलेला असतो. त्याचेही कारण असते. कृतीवीर वा सत्ताधीश आणि शब्दवीर यांच्यात साटेलोटे होऊन परस्पर हितसंबंधांसाठी निर्णय घेतले जाऊ लागतात, तेव्हा तो समाज अधोगतीला लागत असतो. कारण त्यात नाकर्त्या सत्ताधीशालाच कृतीवीर म्हणून लोकांच्या माथी मारणारी प्रमाणपत्रे शब्दवीर देऊ लागतात. त्यांच्या प्रमाणपत्राने कोणाच्या अंगी कर्तृत्व येऊ शकत नसते. नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी चार वर्षापुर्वी मोदींची केलेली निर्भत्सना आणि त्याचवेळी राहुल गांधी यांच्या गुणांचे केलेले कौतुक आपल्याला ठाऊक आहे. वास्तविक आजच्या राजकारणातील या दोन नेत्यांची कुठलीही तुलना होऊ शकत नाही. राहुल नेतृत्व करायला कसा निरूपयोगी आहे, ते वारंवार सिद्ध झालेले आहे. खरे तर त्याच्या नाकर्तेपणाचा पहिला बोभाटा देशातील बुद्धीमंतांनीच करायला हवा होता. पण ज्यांची गणना बुद्धीवादी वर्ग म्हणून केली जाते, त्यांचे हितसंबंध कॉग्रेसच्या सत्तेत गुंतलेले होते. म्हणूनच त्यांनी सोनियांच्या इशार्‍यावर राहुल गांधी यांचे गुणगान सुरू केले होते. त्याचे विविध दुष्परिणाम तेव्हाच जनतेच्या अनुभवास येऊ लागले होते. परिणामी अमर्त्य सेन वा अन्य शब्दवीरांचे प्रमाणपत्र राहुलना वाचवू शकले नाही. उलट त्यातून इथल्या अभिजन वर्गाचीच जनमानसातील पत संपुष्टात आली. लोकांनी पर्याय वा नवा कृतीवीर शोधण्याला आरंभ केला होता. त्यातूनच नरेंद्र मोदी नावाचा कृतीवीर देशाची सत्ता काबीज करू शकला. पण त्याने जुन्या शब्दवीरांचे हितसंबंध जपण्यास नकार दिला असल्याने त्यापैकी कोणी मोदींना मान्यता देण्याला राजी नाही. तर त्यांच्या तालावर नाचायला मोदी राजी नाहीत.

अर्थात नव्या युगातला आणि नवा बुद्धीवादी वर्ग उदयास येत असतो. ती कुठल्याही समाजाची वा देशाची गरज असते. आज नव्या सत्तेशी जुळते घेऊन नव्या समाज निर्मितीला वेग देण्यासाठी आपली बुद्धी व समज पणाला लावणारा पर्यायी अभिजनवर्ग तयार होतो आहे. त्याच्या आगमनाने कालबाह्य झालेला व दिवाळखोरीत गेलेला नेहरूकालीन अभिजनवर्ग अखेरचे श्वास घेत घुसमटलेला आहे. आपले शब्दसामर्थ्य जनमानस नियंत्रित करण्यावर असते, याचा विसर पडलेला तो जुना अभिजनवर्ग पुरता गोंधळलेला आहे. त्याचे पहिले लक्षण मागल्या दोन वर्षात माध्यमांमध्ये होत चाललेला आमुलाग्र बदल दाखवतो. महिनाभर आधी सुरू झालेल्या रिपब्लिक टिव्ही नामक वाहिनीने अल्पावधीत मिळवलेली लोकप्रियता, दिल्लीच्या व देशभरातील नेहरूवादाला खणून काढत चालली आहे. नव्या लोकप्रिय संपादक पत्रकार व वाहिन्यांना मोदींचे दलाल म्हणून संबोधल्याने त्यांची विश्वासार्हता संपणार नाही, की जुन्या कालबाह्य नेहरूवादी बुद्धीवादाची पत पुन्हा प्रस्थापित होण्याची  शक्यता नाही. आपल्या मर्यादा किंवा लक्ष्मणरेषा ओलांडून बुद्धीवादी शब्दवीरांनी कृतीवीरांच्या प्रदेशात लुडबुड सुरू केली, तिथून त्यांचे सामर्थ्य संपत गेले. असे बुद्धीवादी व संपादकच समर्थाघरीचे श्वान झाले आणि त्यांनी आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. अशा लढाईत शब्दाचे सामर्थ्य संपले, मग कृतीवीर शब्दवीरांला सहज निलाकात काढत असतो. सत्ताधीश जेव्हा शब्दवीरांचे गुलाम होतात, तेव्हा त्यांचे सिंहासन डळमळू लागते. नवा कृतीवीर राजकीय क्षितीजावर उगवत असतो. त्याच्या उदयानंतर नवनवे शब्दवीर नव्या समाजाच्या कल्पना घेऊन प्रस्थापित होणे अपरिहार्य असते. खरेतर नाकर्त्या कृतीवीराला बदलण्याची प्रक्रीया शब्दवीरांनी सुरू करायची असते. त्यामध्येच त्यांनी गफ़लत केली, मग समाज नवा कृतीवीर निर्माण करतो आणि त्याच्या कालखंडात नव्या शब्दवीरांचे आगमन अपरिहार्य असते.

4 comments:

  1. Great Bhau....Jar swathachya antarangat pahila tar ha lekh personal life la pan apply hoil......Nice .......

    ReplyDelete
  2. केवळ शब्दवीर किंवा केवळ कृतीवीर असा कोणी नसतो . शब्द उच्चारणे व लिहिणे हीसुद्धा कृतीच असते , कृतिशूर विचार करूनच कृती करतो आणि विचार शब्दांशिवाय नसतो . चित्रपट सुरु होण्यापूर्वी पडदा असतो ,प्रेक्षकही असतात पण चित्रपट सुरु झाला कि प्रेक्षक अंधारात जातात ,नाहीसे होत नाहीत . तसे हे शब्द आणि कृती यांचे आहे . Man of action आणि man of contemplation यात काही माणसात विचार ,चिंतन यांचे प्राधान्य तर काहींमध्ये कृतीचे एवढेच अभिप्रेत आहे . गांधीजी ,आंबेडकर विवेकानंद शंकराचार्य यांच्यात दोन्ही मिलाफ दिसतो . दोन्ही प्रकारचे लोक राष्ट्राला आवश्यक असतात .

    ReplyDelete
  3. भाउ तुम्ही जे लिहिता ते पुराव्यासह महाराष्ट्रत घडतेय.चपराकने मसाप च्या विरोधात विश्वंभरच्या टिकेवर लेखच छापला चौधरीने परत fb बिळात चपराकवर तोंडसुख घेतले तर चपराक ने डायरेक्ट सांगितले की तुम्ही अब्रुनुकसानिचा दावा करा.चेले पन सुचवायला लागले.दावा दाखल करायची हिमंत नाही fb वर नुसत तारे तोडने चालुय ते सुद्धा ठराविक कोशात

    ReplyDelete