बुधवारी रिपब्लिक या वाहिनीच्या दोन पत्रकारांना राजदचे नेते लालूप्रसाद यांनी फ़टकारले व मारलेही. मुद्दा असा होता, की लालुंच्या मुली मुलांना मिळालेल्या मालमत्ता भेटीचा विषय या वाहिनीने तपशीलात बाहेर काढलेला आहे. आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून लालूंनी किती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले, त्याच्यावर आता न्यायालयातही शिक्कामोर्तब झालेले आहे. किंबहूना याच कारणास्तव नितीशकुमार यांनी लालुंशी राजकारणात फ़ारकत घेतलेली होती. आपल्या वैचारिक भूमिकेचा त्याग करून नितीश यांनी १९९८ सालात भाजपाशी युती केली. मात्र सोळा वर्षानंतर नितीशना अकस्मात आपण सेक्युलर व पुरोगामी असल्याचे भान आले आणि त्यांनी मोदी विरोधासाठी भाजपाशी काडीमोड घेतला व लालूंशी सोबत स्विकारली. पुरोगामीत्व कसे सोयीने बदलत असते, त्याचा हा नमूना आहे. लोकसभेत नितीशकुमार स्वतंत्रपणे लढले व पराभूत झाले आणि लालूही तसेच पराभूत झाले होते. तेव्हा त्या पराभवातून बाहेर पडण्यासाठी नितीश लालुंच्या भ्रष्टाचाराला शरण गेले. आता विधानसभेत लालूंची शक्ती वाढलेली आहे आणि त्यांच्या मर्जीवर नितीशना आपली खुर्ची टिकवावी लागते आहे. पुरोगामीत्वाची ही लाचारी असते. त्यांना वैचारिकतेला कधीही तिलांजली देण्याची तयारी ठेवावी लागते अन्यथा आजच्या जमान्यात पुरोगामी होता येत नाही. नितीश आज लालूंचे समर्थन करीत आहेत, तर मार्क्सवादी कॉग्रेसचे समर्थन करीत आहेत. अर्थात याच मार्क्सवादी पक्षाला यापुर्वीही पुरोगामीत्वासाठी अशीच लाचारी करावी लागलेली आहे. त्यात नवे काहीच नाही. आज नितीशकुमार जसे खुर्चीसाठी अगतिक आहेत, तसेच दहा वर्षापुर्वी मार्क्सवादीही वैचारिक लाचारीने लालूंना शरण गेलेले होते. तत्वांचे मुखवटे लावून तत्वांना तिलांजली देण्यात पुरोगामीत्वाचा हात कोणी धरू शकणार नाही.
लालूंनी चारा घोटाळा केल्याचा गवगवा झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्यातून जनता दलात फ़ुट पडली होती. लालूंनी आपल्या जागी पत्नीला मुख्यमंत्रीपदी बसवले आणि शरद यादव, रामविलास पासवान, नितीशकुमार अशा नेत्यांना बाजूला व्हावे लागले होते. पण पुढले राजकारण असे वळण घेत गेले, की मार्क्सवादी पक्षालाही त्याच वळणावर यावे लागले होते. लालूंवर अनेक आरोप आहेत, तसाच त्यांच्या पक्षाचे एक नेता तस्लिमूद्दीन यांनी मार्क्सवादी आमदाराचा मुडदा पाडल्याचाही आरोप होता. असा गुन्हेगार माणुस लालूंनी लोकसभेत निवडून आणला आणि युपीए सरकार स्थापन झाले, तेव्हा त्याला राज्यमंत्री पदावर देखील बसवला. पण कुणा मार्क्सवादी नेत्याने वा पक्षाने त्यावर आक्षेप घेतला नाही. पहिले युपीए सरकार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठींब्याशिवाय स्थापन होऊ शकले नसते. पण तितकीच ताकद लालूंपाशी होती. भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचे असेल तर सर्वांनी आपापले मतभेद गुंडाळून ठेवणे भाग होते. पण मतभेद आणि आपापल्या वैचारिक तात्विक भूमिका, यात फ़रक असतो. मार्क्सवादी आमदाराची हत्या करणार्या पक्षाला वा त्यातील आरोपी खुन्याला मंत्री होण्यासाठी मार्क्सवादी पक्षाने पाठींबा द्यावा काय? पण तो पाठींबा दिला होता. कारण आपल्या कार्यकर्ता वा आमदाराच्या खुन्यापेक्षा मार्क्सवादी पक्षाला भाजपा अधिक धोकादायक वाटला होता. यामध्ये कुठला वैचारिक मतभेदाचा विषय येतो? खुनी वा बलात्कारी सेक्युलर पक्षात असला, मग त्याला सर्व गुन्हे माफ़ असतात काय? नसेल तर मार्क्सवादी पक्षाने लालूंच्या पक्षातील तस्लिमुद्दीन या व्यक्तीला मंत्रीपद देऊ नये, असा आग्रह तरी धरायला होता ना? पण पुरोगमीत्व हे आता भाजपाला रोखण्यापर्यंत मर्यादित होऊन गेले आहे. त्यात कुठल्याही वैचारिक भूमिकेला स्थान उरलेले नाही.
ही बाब एकाच पक्षापुरती मर्यादित राहिलेली नाही. पुरोगामीत्व एक पाखंड व थोतांड होऊन गेलेले आहे. मग कुठली अफ़रातफ़र असो किंवा अन्य कुठलाही गुन्हा असो, त्यातही पुरोगामीत्व शिरलेले आहे. गुन्हा कुठला वा किती मोठा, याला महत्व राहिलेले नाही. गुन्हा करणारा आपल्या गोटातला असला तर कुठल्याही गंभीर गुन्ह्यालाही पुरोगामीत्वाचे लेबल लावून निर्दोष ठरवण्यापर्यंत बुद्धीवादाची मजल गेली आहे. तसे नसते तर चार वर्षापुर्वी तरूण तेजपाल नामक भानगडखोर पत्रकाराच्या संरक्षणाला तमाम दिल्लीकर शहाणे हिरीरीने पुढे आले नसते. मोदी व शहा यांनी गुजरातच्या सत्तेत असताना कुणा मुलीवर पाळत ठेवली असल्याचा गवगवा करणारेच, तेजपालच्या बलात्कार प्रकरणात मात्र सज्जड पुरावे मागत त्याचा बचाव करत होते. सहाजिकच तेजपालनेही आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्यापेक्षा पुरोगामी कातडे पांघरले होते. आपण पुरोगामी पत्रकार असल्यानेच गोव्यातील भाजपा सरकारने आपल्याला गोत्यात घातले असल्याचा आरोप तेजपाल तेव्हा करत होता. पण संबंधित मुलीच्या आरोपातले तथ्य नाकारण्याची त्याला गरज वाटलेली नव्हती. त्यानेच त्या मुलीला लिहीलेल्या इमेलमधून गुन्ह्याला दुजोरा दिलेला होता. आपल्या पुरोगामी पत्रकाराला माफ़ी देण्यासाठी अनेक बुद्धीमान लोक पुढे सरसावलेले होते. मग आताही आपल्यावरचे गुन्हे सिद्ध झाले असताना लालूंनी पत्रकारांना झिडकारले मारले तर बिघडले काय? संसदेच्या आवारात एका पत्रकाराला मारहाण झालेली आहे. पण उठसुट अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणार्या कोणालाही त्याचा साधा निषेध करण्याची गरज भासलेली नाही. कारण सरळ आहे. पुरोगामीत्व नावाचे एक धर्मपीठ दिल्लीत तयार झाले आहे आणि त्याने एक जातिव्यवस्था उभी केली आहे. त्यात जे कोणी अभिजन उच्चवर्णिय असतात, त्यांना सर्व गुन्हे माफ़ असतात. बाहेरच्यांना मात्र कुठलीही माफ़ी नसते.
समाजाच्या तथाकथित उच्चभ्रू वा अभिजन मानल्या जाणार्या वर्गातले हे लोक, दिल्लीत बसून योग्य-अयोग्य याचे निवाडे करीत असतात. त्यांनी निर्वाळा दिला, मग खुन बलात्कारही पुरोगामी ठरवला जातो आणि त्यांच्या इशार्यावर कुणा मुलीकडे नुसते बघितले, म्हणजेही बलात्कार ठरू शकतो. म्हणून तर त्यांच्या लाडक्या अरुंधती रॉयबद्दल नुसते अनुदार उद्गार काढले, तरी काहूर माजवले जाते आणि तेजपालने एका मुलीवर चक्क बलात्काराचा प्रयत्न केला, तरी त्यात गंभीर गुन्हा नसतो. लालू कोणाला संसदभवनात मारहाण करू शकतात. अर्थात ती मारहाण अशा उच्चभ्रू वर्गातील पत्रकाराला झाली, तर ब्रह्महत्या होत असते. पण या अभिजन वर्गाच्या बाहेरचा कोणी तसा मारहाणीला बळी पडला असेल, तर ते त्याच्या पुर्वजन्मीचे पाप असते. ही एक पुरोगामी जातीव्यवस्था मागल्या दोन दशकात दिल्लीत प्रस्थापित झाली व तेच धर्मपीठ असल्याने तिथून देशभर राज्य करू लागली. पण तीन वर्षापुर्वी त्या धर्मपीठाचे स्थान असलेल्या नगरातले सत्ताधीश बदलून गेलेले आहेत. तिथे असलेला राजाश्रय संपुष्टात आला आहे. त्यामुळेच अशा पुरोगामी धर्ममार्तंडांच्या पिठाचे आदेश कोणी जुमानत नाही. पण धर्मसत्ता टिकवण्याची त्यांची धडपड संपलेली नाही. ती धडपड कधी पत्रकारिता, माध्यमे वा साहित्य पुरस्कारवापसी यातून डोके वर काढत असते. आपल्या शिव्याशापांनी पुरोगामी मान्यता नसलेली सत्ता ढासळून पडेल, अशी त्यांना खुळी आशा अजून आहे. बहुसंख्य भारतीय जनता आपल्या धर्मपाखंडातून व राजकीय अंधश्रद्धेतून मुक्त झाली आहे, याचे भान त्यांना नसल्याने आणखी काही काळ असे नाटक चालू राहिल. पण पुढल्या लोकसभा मतदानातून पुरोगामी धर्माचा डोलारा जमिनदोस्त होईल, तेव्हा यातले अनेक पुरोगामी धर्ममार्तंड हिंदूत्वाचे वेद सांगू लागले, तर कोणी आश्चर्य मानण्याचे कारण नसेल. कारण त्यांना तत्वाशी कर्तव्य नसते, तर सत्तेचा राजाश्रय हवा असतो.
वाव भाउ सुपर.महाराष्ट्रात पन असे लोक आहेतच.महाराष्ट्र पुरोगामी असल्याने? इथले लोक प्रतिगामी लोकांना विरोध करण्यासाठी डायरेक्ट पाकच्या साइडला जातात व त्यासाठी किती बुदधि खर्च करतात
ReplyDeleteदिल्लीतील "लुटीयंस" हे आधुनिक ब्राह्मण झाले आहेत.
ReplyDeleteकोण पुरोगामी वा प्रतिगामी हे कसे व कोणी ठरवायचे? कुठे मिळतात असे दाखले? पुरोगामीत्व हे एक ढोंग आहे. प्रतिगामी आहोत असे तर स्वतःला कोणही म्हणत नाही. पुरोगामी व्यवसाय बंद पडण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलाय.
ReplyDelete