Sunday, June 25, 2017

बेटी: लालूकी आणि बिहारकी

tejashwi-and-tej-pratap-yadav-and-misa-bharti

भाजपाने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करून मोठा बेमालूम डाव टाकला; असे अनेक संपादक पत्रकारांचे आकलन आहे. पण त्या डावाला उत्तर देताना कॉग्रेस वा विरोधक कुठे फ़सले, ते अजून कोणाला सांगता आलेले नाही. दरम्यान चोख उत्तर म्हणून सोनियांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये मीराकुमार यांना विरोधकांचे एकमुखी उमेदवार घोषित करण्यात आले आहे. सहाजिकच दलित विरुद्ध दलित, अशी ही लढाई होऊ घातली आहे. मीराकुमार या लोकसभेच्या माजी सभापती आहेत आणि भारत सरकारच्या राजदूत मुत्सद्दी म्हणून त्यांनी अनेक देशात कामगिरी बजावलेली आहे. पण तेवढ्यासाठी त्यांना या पदासाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपाने दलित उमेदवार टाकला, म्हणून युपीएने दलित उमेदवार पुढे करायची खेळी झाली आहे. त्यात योगायोगाने मीराकुमार बिहारच्या असल्याने त्यांच्यावर ‘बिहारकी बेटी’ असा शिक्का मारून त्या राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मतासाठी साकडे घालण्यात आलेले आहे. म्हणून तात्काळ नितीश यांचे सत्तेतील सहकारी लालूप्रसाद यांना बिहारच्या बेटीची ममता दाटून आलेली आहे. त्यांनी आपल्या सत्तेतील दोस्ताला कळवळून बिहारच्या बेटीला पाठींबा देण्यासाठी आवाहन केलेले आहे. लालूंचा हा कळवळा अनेकांना दांभिक वाटत असेल. पण आपली बेटी मिसा भारती व मीराकुमार यांच्यातले साम्य बहुधा लालूंना त्यातून प्रकट करायचे असावे. मात्र लालूंच्या अ़सल्या भावनात्मक आवाहनाला नितीश यांनी दाद दिलेली नाही. उलट त्यावर असा चोख खुलासा केला आहे, की त्यातून लालुंसह युपीएची बोलती बंद व्हावी. मीराकुमार यांना पराभूत होण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण त्याच लबाडीचे उदात्तीकरण मात्र तावातावाने चालू आहे. त्याचाच फ़ुगा नितीशनी फ़ोडून टाकला आहे.

‘बिहारकी बेटी’ या शब्दाचे अनेक अर्थ निघत असतात आणि त्याचे चटके यापुर्वी नितीशना अनेकदा बसलेले आहेत. दहा वर्षापुर्वी अहमदाबादच्या सीमेवर इशरत जहान नावाच्या एका ठाण्यातल्या मुलीला पोलिसांनी चक्मकीत ठार मारले होते. वास्तवात ती ठाण्याजनिक कळवा-मुंब्रा भागातील अनोळखी मुलगी होती. पण नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यात त्यांच्याच पोलिसांकडून इशरतचा चकमकीत मृत्यू झाल्यामुळे, विनाविलंब तिचे उदात्तीकरण सुरू झालेले होते. पुढे शोध लागला की इशरतचे मातापिता मुळचे बिहारचे असून, ते महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेले होते. सहाजिकच इशरतविषयी अनेकांना उमाळा आलेला होता आणि त्यात निती-लालूंचा पुढाकार असेल, तर नवल नाही. इशरत काय दिवे लावत होती, त्याची दखल अशा कोणाही नेत्याने कधी घेतली नाही. पण खोट्या चकमकीचा विषय आला म्हणताच, अनेकांना अकस्मात इशरत ‘बिहारकी बेटी’ असल्याचे साक्षात्कार झालेले होते. तेव्हा बिहारकी बेटी असा शब्दप्रयोग आला, की तो काळजीपुर्वक समजून घेण्याची गरज आहे. आता अचानक अनेकांना मीराकुमार ‘बिहारकी बेटी’ असल्याचा शोध लागला आहे आणि इशरतचे ‘वडिलधारे’ नितीशही ती जबाबदारी घ्यायला पुढे सरसावले आहेत. मात्र यंदा त्यांचा मूड बदलला आहे. बिहारकी बेटी पराभवाच्याच वेळी कशी आठवते, असा नितीशनी उलटा सवाल केलेला आहे. युपीएने मागल्या दोन राष्ट्रपती निवडणूका सहज जिंकल्या. तेव्हा विजयाची खात्री होती आणि बिहारच्या बेटीला तो मान मिळवून देण्याची इच्छा सोनिया किंवा युपीए यांना कशाला झाली नव्हती? यावेळी पराजयाची खात्री असताना मात्र बिहारची बेटी म्हणून मीराकुमारना पुढे करण्यात आले आहे. अशी चपराक नितीशनी हाणली आहे. इतकेच बेटीचे महत्व होते तर लालूंना आपलीच कन्या मिसा भारतीही बिहारची बेटी म्हणून पुढे करता आले असते ना?

मीराकुमार यांनी अलिकडल्या कालखंडात आपली स्वतंत्र ओळख दिली आहे. वास्तविक त्यांना राजकारणात संधी मिळाली ती पिताजींचा वारसा म्हणून. त्यांचे वडील बाबु जगजीवनराम हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता म्हणूनच सतत मंत्रीमंडळात राहिलेले होते आणि इंदिराजींनी आणिबाणी लादली, तिचा लोकसभेतील प्रस्तावही त्यांनीच मांडलेला होता. पुढे आणिवाणी उठली आणि निवडणूका लागल्या, तेव्हा बदलत्या राजकारणात बाबूजींनी इंदिराजींची साथ सोडून जनता पक्षात प्रवेश केला होता. अशा पित्याचा वारसा मीराकुमार यांना मिळाला आणि त्यांनीही पित्याच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण केले. पण सहसा त्यांची ओळख दलित नेता म्हणून कधी करून देण्यात आली नव्हती. तशी ओळख प्रथमच होत आहे. पण लालूंना या बिहारच्या बेटीविषयीचे कौतुक वेगळ्याच गोष्टीसाठी असण्याची शक्यता आहे. आजकाल भारत सरकारचे आयकर खाते व सक्तवसुली संचालनालय मिसा भारती व तिचे पतिराज, यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. कारण या दोघांनी करोडो रुपयांचे व्यवहार करताना करबुडवेगिरी केल्याचा आरोप आहे. किंबहूना लालूंचे  संपुर्ण कुटुंबच सध्या आयकर बुडवेगिरीच्या जंजाळात फ़सलेले आहे. बहुधा त्याच कारणास्तव लालूंना साम्य आढळलेले असावे. कारण १९७० च्या दशकात मीराकुमार त्यांचे पिताश्री स्वर्गिय जगजीवनराम यांनाही त्याच कारणास्तव प्रसिद्धी मिळालेली होती. त्यांनी आयकर बुडवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. पण त्यांनी बुडवेगिरीला विस्मरणाचे नाव दिलेले होते. तब्बल दहा वर्षे बाबुजींनी आयकर भरला नव्हता आणि चौकशी झाली तेव्हा आपण विसरूनच गेलो; असा खुलासा दिला होता. लालू त्याही पलिकडे गेलेले आहेत. त्यांनी असे कुठले व्यवहार झाले नाहीत वा आपल्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा कांगावा केला आहे.

बाबु जगजीवनराम यांची कन्या म्हणून मीराकुमर यांची ओळख करून देणार्‍यांना, त्या नेत्याच्या विस्मृतीचे विस्मरण आज कशाला झालेले असावे? अर्थात लालूप्रसाद यादवांना तितके विस्मरण झालेले नाही. म्हणून त्यांना मिसा भारती व मीराकुमार यांच्यातली ‘बिहारकी बेटी’ नेमकी ओळखता आलेली असावी. म्हणूनच त्यांनी आपल्या परममित्र नितीशकुमारांना पाठींब्यासाठी आवाहन करताना ‘ऐतिहासिक भूल’ होऊ नये असा इशारा दिलेला असावा. त्यातला हा इतिहास बहुधा जनता दल युनायटेडच्या अनेक नेत्यांनाही आठवत नसावा. त्या पक्षातल्या एका ‘त्यागी’पुरूषानेच त्या जनता काळात मीराकुमार यांचे बंधू सुरेश कुमार यांच्या अश्लिल छायाचित्रांचा गौप्यस्फ़ोट घडवून आणायला हातभार लावला होता. तो इतिहास खुप वादग्रस्त आहे. त्यात जाण्याची गरज नाही. आजच्या काळाशी सुसंगत असे एकच साम्य लालूकी बेटी आणि बिहारकी बेटी यांच्यात आहे, हे आयकराच्या संबंधीत. अर्थात जुना इतिहास कोणाला हवा असतो? जो सोयीचा असेल तितका इतिहास अभिमानाचा असतो, तर अडचण करणारा इतिहास विसरून जायचा असतो. राजकारणात हाच निकष असतो. त्यामुळेच नितीशना युपीएच्या दहा वर्षात मीराकुमारना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेली नव्हती, हा इतिहास आठवतो. पण आपल्याच ‘त्यागी’ सहकार्‍याच्या उचापती आठवत नाहीत. उलट लालूंना मीराकुमारच्या पित्याशी असलेले आपले साधर्म्य आठवून, मीराकुमार ‘बिहारकी बेटी’ असल्याचा साक्षात्कार होत असतो. राजकारण हा भामट्यांचे शेवटचे आश्रयस्थान असल्याचे सांगितले जाते, त्याचीच यातून प्रचिती येते. कधी त्यातला इतिहास सांगायचा तर कधी प्रादेशिक वा रक्ताचे नाते पुढे करायचे असते. बाकी कोणी कोणाचा नसतो. मग बोलणारे इकडले असोत की तिकडले असोत. तसे नसते तर परस्परांच्या उरावर बसलेले अण्णाद्रमुकच्या तिन्ही गटांचे कोविंद यांना मत देण्यविषयी एकमत कशाला झाले असते?

No comments:

Post a Comment