Sunday, June 11, 2017

पलायनाचे रणशिंग

gujarat AAP के लिए चित्र परिणाम

अजून देशातले राजकीय पक्ष आगामी राष्ट्रपती निवडणुकीतील आपापले उमेदवार निश्चीत करू शकलेले नाहीत, इतक्यात आम आदमी पक्षाने डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची बातमी आली आहे. गेल्या दोनतीन वर्षापासून केजरीवाल यांनी पंजाब, गोवा आणि गुजरात विधानसभा लढवण्याची जय्यत तयारी केलेली होती. त्यासाठी दिल्ली सरकारच्या पैशाची उधळण करून या तीन राज्यात आपल्या कौतुकाच्या वारेमाप जाहिराती करून घेतल्या होत्या. इतकेच नाही तर दिल्लीकरांना वार्‍यावर सोडून या राज्यात आम आदमी पक्षाचे आमदार व मंत्री अहोरात्र पक्षाची संघटना बांधण्यासाठीही झटत होते. पण आधी पंजाब राज्यात त्या पक्षाला अपयश आले आणि गोव्यात तर मतदाराने त्यांना धुळ चारली. तितकेही कमी नव्हते म्हणून की काय, दिल्लीत केवळ महिन्याभराने झालेल्या महापालिका मतदानात आम आदमी पक्षाची रयाच गेली. त्यामुळे केजरीवाल आणि टोळी हादरून गेली असून, त्यांनी आधी मतदान यंत्रावर आपल्या अपयशाचे खापर फ़ोडले. त्यावर त्यांच्याच निकटवर्तियांचा विश्वास बसलेला नसताना एकामागून एक मोठ्या भ्रष्टाचाराच्या भानगडी चव्हाट्यावर येऊ लागल्या आणि या पक्षाच्या नेत्यांना उजळमाथ्याने समाजात फ़िरण्याची भिती वाटू लागली. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून आता या मोठ्या लढवय्यांनी गुजरातच्या लढाईचे शिंग फ़ुंकण्याच्या मुहूर्तावर पलायनाची तुतारी फ़ुंकलेली आहे. गुजरातचे पक्षाचे नेते व प्रभारी यांनी पक्ष तिथे सत्ता मिळवण्यच्या स्थितीत नसल्याचे सांगत आता निवडणूका लढवू नयेत अशा निष्कर्षाप्रत आल्याचे एका बातमीत म्हटले आहे. पण ही बातमी वा पक्षाच्या एका प्रवक्त्याचे विधान किती परस्पर विरोधी आहे, त्यातला विनोद समजून घेण्यासारखा आहे. म्हणूनच त्याच उहापोह आवश्यक आहे.

पहिली गोष्ट म्हणजे पक्षाने अधिकृतपणे लढाईतून पलायन करत असल्याची घोषणा केलेली नाही. पण तशी बातमी बाहेर आलेली आहे. त्या बातमीनुसार पक्षाच्या राज्य समितीने केजरीवाल यांना एकूण १८२ विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर केला आहे. त्यापैकी काही मतदारसंघात पक्षाची ८० टक्के बांधणी पुर्ण झाल्याचे म्हटले आहे. तर काही जागी अवघी २० टक्के संघटना बांधणी पुर्ण झाल्याचे सांगितले आहे. पण अन्य पक्षांचीही राज्य व मतदारसंघातील स्थिती या अहवालात नोंदली असल्याचे बातमी म्हणते. त्यानुसार गुजरातमध्ये कॉग्रेसपेक्षाही ‘आप’ची स्थिती चांगली असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. म्हणजे तसा अहवाल दिल्याचे माध्यम प्रमुख हर्षील नायक यांनीच पत्रकारांना सांगितले आहे. खरेच कॉग्रेसपेक्षा आम आदमी पक्षाची गुजरातमधील स्थिती उत्तम असेल, तर त्यांनी निवडणूकीतूम पलायन करण्याचे काहीही कारण असू शकत नाही. कारण कुठल्याही पक्षाला मतदार पहिल्याच प्रयत्नात थेट सत्तेवर आणून बसवत नाही. खुद्द केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करून दिल्लीची विधानसभा लढवली, तेव्हाही त्यांना दिल्लीकरांनी साधे बहूमतही बहाल केलेले नव्हते. कॉग्रेसच्या आतताईपणामुळे त्यांना अल्पमत असतानाही मुख्यमंत्री होण्याची मजल मारता आली. दुसर्‍या खेपेस भाजपाच्या मुर्खपणामुळे त्यांना अपुर्व बहूमताची मजल मारता आली. पण त्या यशाने त्यांना इतकी झिंग चढली आहे, की कुठल्याही राज्यात वा निवडणूकीत थेट सत्ता मिळवण्यासाठीच आपला अवतार झाला असल्याच्या भ्रमात, हे भुरटे लोक वागू लागले होते. म्हणूनच त्यांना गोवा व पंजाबात थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत होती. पण त्यांच्यापेक्षा वास्तववादी असलेल्या मतदाराने अल्पावधीतच केजरीवाल टोळीला त्यांची खरी जागा दिल्ली महानगरातही दाखवून दिली आहे. पण सत्य डोळे उघडून बघण्याची हिंमत तरी असायला हवी ना?

दिल्लीतल्या पहिल्या अपुर्‍या यशानंतर माध्यमातून मिळालेल्या अफ़ाट प्रसिद्धीने केजरीवाल यांचे माथे इतके फ़िरले, की त्यांन सरळ पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लगली होती. ती त्यांची चुक नव्हती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या खुळचटपणाने त्यांना पहिल्या प्रयत्नातच मुख्यमंत्रीपद लाभले असेल, तर तशाच पोरखेळात लोकसभेच्या मुठभर जागा जिंकून पंतप्रधानही होण्याचे स्वप्न त्यांनी बघण्यात काय गैर होते? या देशाने अशाच सेक्युलर पोरखेळाने देवेगौडा वा इंदरकुमार गुजराल यांनाही पंतप्रधानपदी बसवलेले होते, त्या देशाच्या सेक्युलर राजकारणात केजरीवाल यांनी स्वप्ने बघण्यात गैर ते काय? सहाजिकच त्यांनी दिल्लीच्या त्या पहिल्या सत्तेला लाथ मारून देशभर लोकसभेच्या जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आणि देशातील सर्वाधिक अमानत रकमा गमावणारा पक्ष, म्हणून आम आदमी पक्षाची नोंदणी करण्याचा विक्रम साजरा केलेला होता. चुक लक्षात आल्यावर त्यांनी दिल्लीकरांचे पाय धरले आणि दिल्लीच्या सेवेत पुढली पाच वर्ष स्वत:ला अर्पण करून घेण्याचा शब्द दिला होता. पण वर्षभर होण्याच्या आधीच मुळचा स्वभाव उफ़ाळून आला आणि पुन्हा त्यांना अनेक राज्यातली सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडायला लागली. नाहीतरी दिल्लीची तिजोरी हाती आलेली होती. त्यातूनच मग गुजरात हा मोदींचा बालेकिल्ला पादाक्रांत करण्याचा मनसुबा रचला गेल्यास नवल नव्हते. शिवाय माध्यमांचा हिरो म्हणूनच केजरीवाल नाचत होते. सहाजिकच त्यांच्या नगण्य हालचालींनाही देशव्यापी प्रसिद्धी मिळत होती आणि काडीचा प्रभाव नसतानाही कुठलेही राज्य केजरीवाल सहज जिंकू शकतात, अशा बातम्याही रंगवल्या जात होत्या. मात्र त्याला मतदार बधला नाही. याची प्रचिती गोवा पंजाबात आली. पण दिल्लीने तर केजरीवाल यांचा पुर्ण रंगच उतरवून टाकला. किंबहूना त्यांचा खरा चेहराच जगासमोर आणला.

याला एका नवख्या पक्षाचा फ़सलेला डाव असेही म्हणता येत नाही. कारण कुठलाही नवा पक्ष यशासाठी लढत नसतो, तर आपल्या प्रभावक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी पराभवाला सामोरे जाण्याची हिंमत करत असतो. पहिल्या प्रयत्नातच सत्ता मिळवण्याची कोणी अपेक्षाही करीत नाही. केजरीवाल व त्यांचा पक्षच त्याला अपवाद आहे. त्यांना पक्षाचे चार कार्यकर्तेही जिथे नाहीत, त्या राज्यातही सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडत असतात आणि तशा अपेक्षाही ते बाळगत असतात. पण दिल्लीच्या पालिकाही त्यांना जिंकता आल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणेही त्यांना समजलेली आहेत. पण आपला नाकर्तेपणा किंवा चुका मान्य करण्याचा किमान प्रामाणिकपणा त्यांच्यापाशी नसल्याने, कसलेही युक्तीवाद करून पळ काढण्याचा खेळ करावा लागतो आहे. त्याची भाजपा वा मोदींना भिती वाटण्याचा विषय दूरची गोष्ट झाली. यांची विश्वासार्हता आता मोदीविरोधी पुरोगामी पक्षातही उरलेली नाही. म्हणून तर सोनियांनी बोलावलेल्या दोन्ही बैठकांमध्ये दिल्लीतले असूनही आम आदमी पक्षाला कोणी आमंत्रण दिलेले नव्हते. कारण ह्या पक्षाला आता भारतीय राजकारणात दिल्लीत वा इतरत्र कुठलेही भविष्य नसल्याचे इतरांनीही ताडले आहे. किंबहूना केजरीवाल आणि त्यांच्या टोळभैरवांनाही त्याची खात्री पटलेली आहे. सहाजिकच आणखी एक दारूण पराभव किंवा बहुतेक जागी डिपॉझिट गमावणारा पक्ष म्हणून नामूष्की पदरी येण्याचा धोका टाळण्यासाठीच त्यांनी लढाईपुर्वीच माघारीची तुतारी फ़ुंकली आहे. कारण दिल्लीतल्या भानगडी व भ्रष्टाचार निपटतानाच केजरीवाल यांची दमछाक सुरू झालेली आहे, ते कुठल्या तोंडाने गुजरात वा अन्य राज्यातल्या विधानसभा प्रचाराला लोकांसमोर जाऊन उभे रहाणार आहेत? जातील तिथे लोक त्यांच्याकडे कपील मिश्राने केलेल्या प्रश्नांची उत्तरे मागू लागतील आणि पळता भूई थोडी होणार ना?

2 comments:

  1. पन विश्वंबर चौधरी केजरीवाल ची बाजू सतत घेत असतात. परवाचत कपिलला हिनवुन केजरीवाल वविरोधात पुरावे मागितले आहेत पन बेछुट पुराव्याशिवाय आरोप करने कपिल अरविंद कडुन शिकलाय

    ReplyDelete
  2. bhau its bcoz of a deal between congres and kejri. there was a news almost A month back reg. same.

    ReplyDelete