Thursday, June 29, 2017

‘आप’की औकात



चार वर्षापुर्वी आम आदमी पक्षाची स्थापना झालेली होती आणि तेव्हा आपल्याला राजकारण करायचे नाही, तर राजकारण बदलायचे आहे, असे अरविंद केजरीवाल व त्यांची टोळी अगत्याने प्रत्येक क्षणी बोलत होती. आज चार वर्षानंतर त्यांनी राजकारणात कुठला बदल घडवून आणला, ते आपण स्वच्छ बघू शकतो आहोत. वास्तव जीवनात आपण ज्याला चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतो, त्यापेक्षा या नव्या राजकारण्यांनी नवी कुठली भर राजकीय क्षेत्रात घातलेली नाही. गुंडगिरी, दंगलखोरी वा भ्रष्टाचार हे मागल्या तीनचार दशकात भारतीय राजकारणाचे महत्वाचे घटक बनलेले होतेच. पण निदान असे काही उघडकीस आले, म्हणजे त्यात गुंतलेल्या व्यक्तीला त्या त्या पक्षाने हाकलून लावले, किंवा पक्षातून गचांडी दिलेली होती. पण केजरीवाल यांनी अशा प्रत्येक गुन्ह्याचे आणि त्यातल्या बदमाशीचे उदात्तीकरण करण्याचा नवा पायंडा पडलेला आहे. कलमाडी वा तत्सम भ्रष्टाचाराचा गाजावाजा देशात चालू होता, त्याच काळात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी केजरीवाल टोळीने कंबर कसलेली होती. त्या भ्रष्टाचाराला आळा घालणे दूरची गोष्ट झाली. या टोळीने मनसोक्त भ्रष्टाचार करून अल्पावधीत किती मोठा भ्रष्टाचार व अफ़रातफ़री बेधडक कायदे धाब्यावर बसवून करता येतात, त्याचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. आता तर त्यांनी विधानसभेतही नित्यनेमाने हाणामारी व गुंडागर्दी करता येते त्याचा नवा दाखला पेश केला आहे. याच विधानसभेत प्रथम बोलताना मुख्यमंत्री झालेले केजरीवाल म्हणाले होते, आम्हाला राजकारणात येण्य़ाचीच गरज नव्हती, जर आधीच्या पक्षांनी उत्तम राजनिती केली असती, तर आम्हाला नवख्यांना इथे येण्याची काय गरज होती? आमची काय औकात आहे? पण आम्ही आलोय, कारण आम्हाला राजकारणाची परिमाणे बदलायची आहेत. ती कोणती? त्याचे उत्तर आता आम आदमी पक्ष देत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे इतक्या वेगाने कुठल्याही मंत्रीमंडळातील इतक्या मंत्र्यांना दोन अडीच वर्षात लाथ मारून हाकलण्याची पाळी आजवर कुठल्याही भारतीय मुख्यमंत्री वा सरकारवर आलेली नव्हती. अवघ्या सहा सदस्यांच्या मंत्रिमंडळातील तीन सदस्यांना पहिल्या वर्षातच फ़ौजदारी गुन्हे व आरोपासाठी हाकलून लावण्याची वेळ आलेली होती. उलट कुठलाही आरोप नसलेल्या कपील मिश्रा नामक मंत्र्याला मात्र केजरीवालनी अकारण हाकलून आपल्याला निष्कलंक सहकारी वा मंत्री चालत नसल्याचा निर्वाळा अलिकडेच दिलेला आहे. दोन महिन्यापुर्वी दिल्लीतल्या महापालिका निवडणूका झाल्या, तेव्हा कपील मिश्रा यांनी पाणी खात्यामध्ये किती अप्रतिम कामे केलेली आहेत, त्याचे हवाले देत केजरीवाल यांनी दिल्लीकरांकडे मते मागितली होती. पण निकाल समोर आल्यावर त्याच मंत्र्याला हाकलून लावत बडतर्फ़ही केले. पण त्याच कपील मिश्रावर अजून कुठलाही आरोप होऊ शकलेला नाही. तरी केजरीवालनी त्यालाच बडतर्फ़ केले. याच्या उलट बाकीच्या तीन मंत्र्यांवर सतत आरोप होत असताना केजरीवाल त्यांना पाठीशी घालत राहिले होते. किंबहूना त्यांच्यावरील आरोप फ़ेटाळण्यात केजरीवाल यांचाच पुढाकार होता. त्याच केजरीवाल यांच्यावर मिश्राने भ्रष्टाचाराचा आरोप केला. तर त्याच्या आरोपाचा खुलासा करण्यापेक्षा केजरीवाल बिळात जाऊन बसले आणि त्यांचे बगलबच्चे उलटे कपील मिश्रावर आरोप करण्यात मशगुल झाले. थोडक्यात आपल्यावर आरोप झाले वा त्याचे पुरावे समोर आणले गेल्यास, उलट आरोप करून पळ काढणे ही या नव्या राजकारण्यांची कार्यशैलीच होऊन गेली. आजवरच्या मुरब्बी भ्रष्टाचार्‍यांनीही थक्क होऊन बघावे, इतका भ्रष्टाचार व राजरोस गुन्हे करण्याची अशी हिंमत, ही आम आदमी पक्षाने भारतीय राजकारणाला दिलेली मोठी भेटच मानावी लागेल. त्यातून त्यांनी जणू आपली औकातच सिद्ध केलेली आहे.

Image may contain: 1 person, text

बेशरमपणाचे उदात्तीकरण ही या नव्या पक्ष व त्याच्या नेत्यांनी भारतीय सामाजिक जीवनाला दिलेली अत्यंत हिडीस देणगी आहे. मागल्या खेपेस कपील मिश्रा नावाच्या यांच्याच माजी मंत्री व आमदाराने विधानसभेत काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयास केला असता, त्याच्यावर पक्षाचे आमदार धावून गेले. दोनतीन अन्य पक्षाचे आमदार हाकलून बाहेर काढण्यात आले. थोडक्यात विधानसभेत निर्विवाद वा क्रुर बहूमत असल्याच्या बळावर जे दोनचार विरोधी आमदार आहेत, त्यांचा आवाजही ऐकू येऊ नये, इतकी मुस्कटदाबी करून दाखवण्याचा नवा विक्रम या पक्षाने व केजरीवाल यांनी करून दाखवला. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला तर त्याचाही आपण किती सहजपणे गळा घोटू शकतो, त्याचा यशस्वी प्रयोग या लोकांनी करून दाखवला आहे. पण त्यांचे समर्थन करणार्‍या तथाकथित बुद्धीवादी शहाण्यांना या गुन्हेगारी प्रवृत्तीची अजून शरम वाटलेली नाही. आपण कधीकाळी या व्यक्ती व त्यांच्या चळवळीचे समर्थन केले वा त्यांना मदत केली, याचीही ज्यांना शरम वाटत नाही, त्यांना कोणी कसे बुद्धीवादी म्हणावे? इतकी इतरांची गळचेपी करणार्‍यांनी इतरांवर मात्र मुस्कटदाबीचे आरोप करीत रहावे, याला सामान्य भाषेत बेशरमपणा म्हणतात. पण आजकाल बेशरमपणालाच अब्रुदार मानले जात असेल, तर केजरीवाल त्याला कसे अपवाद असतील? अर्थात यात नवे काहीच नाही. आपल्या आरंभीच्या वागण्यातून व कृतीतून त्यांनी अशा पराक्रमाची चाहुल दिलेली होती. काही क्षणात कुठेही जमाव उभा करून दगडफ़ेक व दंगल पेटवण्याची क्षमता केजरीवाल वा शिसोदियांनी आधीच दाखवलेली होती. तरीही उत्साहाच्या भरातला आगावूपणा म्हणून दिल्लीकरांनी काणाडोळा केलेला होता. पण एका वर्षातला अनुभव घेतल्यावर त्यांनी पोटनिवडणूक व पालिका निवडणूकीत या नव्या प्रयोगाला साफ़ नकार दिलेला आहे.

असल्या नव्या प्रयोग व स्वच्छ राजकारणापेक्षा भाजपा वा कॉग्रेसचा भ्रष्ट कारभार परवडला, असाच निकाल पालिका मतदानातून लोकांनी दिलेला आहे. मागल्या दहा वर्षात भाजपाने काही उत्तम कारभार दिल्लीमध्ये केलेला नव्हता. तरीही लोकांनी मोठ्या संख्येने भाजपाला पुन्हा महापालिकेची सत्ता दिली. कारण भाजपाचा गैरकारभार वा भ्रष्टाचार आम आदमी पक्षाच्या अराजक लूटमारीपेक्षा खुपच सुसह्य आहे. असेच दिल्लीकरांना वाटू लागलेले आहे. अर्धवट खड्डे व कचर्‍याचे ढिग माजलेले परवडले. पण कुठल्याही कामाशिवाय नुसती कागदी बिले बनवून दिल्लीच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची लूटमार करणारा केजरीवाल यांचा कारभार लोकांना भयभीत करून गेला आहे. त्याविरुद्ध कपील मिश्रा व भाजपाच्या आमदारांचा आवाज दडपला गेला, तर आता पक्षाचेच कार्यकर्ते विधानसभेत निदर्शने करू लागले आहेत. अशाच दोघा आप कार्यकर्त्यांनी बुधवारी विधानसभेत पत्रके फ़ेकून घोषणा दिल्या, तर आमदारांनी तिथेच त्यांना गाठून इतके मारले, की इस्पितळात उपचारासाठी न्यावे लागले. असे विधानसभेत गोंधळ घालणे ही त्या कार्यकर्त्यांची चुकच होती. पण त्यांना गुन्हेगार गुंडासारखी मारहाण करणार्‍या आमदारांचे काय? जशी तीन वर्षापुर्वी दिल्लीत भाजपा मुख्यालयावर आपच्या गुंडांनी दगडफ़ेक केली होती, तशीच आता विधानसभेतही होऊ लागली आहे. मग केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणाला कोणती नवी कार्यशैली दिली, त्याची चुणूक मिळू शकते. म्हणूनच विधानसभेत त्यांनी प्रथमच काढलेले उदगार आठवतात. आमची औकात काय आहे? आपण काय लायकीचे आहोत त्याविषयी आम आदमी पक्षाच्या नेते आमदारांनी सादर केलेला हा पुरावा आहे. आपण अट्टल गुन्हेगार आहोत, याची यापेक्षा अन्य कुठली कबुली असू शकते? गुंड पांढरपेशा असला, तर किती भयंकर असू शकतो, त्याचे हे उदाहरण आहे.

3 comments:

  1. किती माराल मेलेल्याला !

    ReplyDelete
  2. "राजकारण कसे करू नये" याचे दर्शन घडवण्यासाठीच हा 'आप' पक्ष केजरीवाल यांनी काढला. त्याला बाकीच्या त्यांच्यातल्या नेत्यांनीच उदाहरण घालून दिले आहे.

    ReplyDelete
  3. भाई,
    आप वर सारखं लिहून तुमची लेखणी विटाळू नका.

    ReplyDelete