Friday, June 16, 2017

चोरलेल्या पैशाची मस्ती

Related image

विजय मल्ल्या हा इसम भारतीय बॅन्कांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशी फ़रारी झालेला आहे. इंग्लंडमध्ये बसून तो भारतीय कायदा यंत्रणा व सरकारला वाकुल्या दाखवतो आहे. अर्थात असा तोच एकमेव भारतीय गुन्हेगार नाही. ज्यांच्यापाशी भरपूर पैसा आहे, अशी माणसे नित्य जीवनातही कायद्याला असेच वाकवताना वा टांग मारताना आपण बघत असतो. सामान्य शेतकर्‍याच्या घरात कर्जाचा काही हजाराचा बोजा चढला, तरी त्याला तोंड लपवायला जागा उरली नाही, म्हणून तो गळफ़ास लावून वा विष प्राशन करून आत्महत्या करीत असतो. पण समाजात ज्याची जितकी अधिक श्रीमंती वा पैशाची मस्ती असते, तितका कायदा त्याला हात लावू शकत नाही, हा आपला अनुभव आहे. कुठल्याही बॅन्केत किंवा सार्वजनिक संस्थेमध्ये गेलात, तर तिथला सर्वात मोठा कर्जदार वा थकबाकीदार कोणी नामवंत असल्याचे आढळून येईल. समाजात आज अशा लोकांना कायद्याचे भय उरलेले नाही. म्हणून तर तुम्हीआम्ही कायद्याला घाबरून असतो आणि कायदा राजरोस धाब्यावर बसवणारे अधिक शिरजोर दिसतात. कारण कायदा गुन्ह्याला शिक्षा देतो, असे आपल्या अनुभवास कमी येते. उलट कायदा मोडणार्‍यालाच कायदा अधिक संरक्षण देतो, असेच अनुभवास येत असते. मागल्या काही दिवसात विविध वृत्तवाहिन्यांवर एकामागून एक मोठ्या भानगडी व अफ़रातफ़री चव्हाट्यावर आणल्या गेल्या आहेत. पण त्यात गुंतलेले कोणी शरमेने मान खाली घालून जगताना दिसत नाहीत. मग त्यांनी कर्ज घेऊन बॅन्केला फ़सवलेले असो, किंवा कुठे अफ़रातफ़री केलेल्या असोत. त्यांच्या जवळपास कायदा फ़िरकला तरी तोच कायदा त्यांना धक्का लावू शकत नाही, अशी त्यांना पक्की खात्री असते. कारण कायदाच त्यांना पळवाट काढून देतो, असेही सातत्याने दिसून येत असते.

विजय मल्ल्या हा भारतीय संसदेचा सदस्य होता. त्याला विविध बॅन्कांनी बुडवेगिरी करण्यासाठी करोडो रुपयांचे कर्ज पुरवले होते. बुडवण्यासाठी असे म्हणायचे कारण, त्याच्या कंपनीचे व्यवहार किती योग्य वा गफ़लतीचे आहेत, त्याचा तपासही न करता त्याला कर्ज देण्यात आलेले आहे. आज त्याचा गवगवा झाला आहे. पण अशीच कागदपत्रे तेव्हाही संबंधितांकडे होती आणि तरीही त्याला कर्ज मान्य झालेच कसे? कारण त्याच्या पाठीशी सत्तेत बसलेले लोक ठामपणे उभे राहिले होते. एका कारणासाठी कर्ज घेऊन ते भलत्याच कारणासाठी फ़िरवण्याची हिंमत विजय मल्ल्या करू शकला. कारण त्याच्या अशा व्यवहारावर लक्ष असले तरी आडकाठी होणार नाही, याची त्याला पक्की खात्री होती. जो कोणी त्यात आक्षेप घेईल, त्याला त्याच पैशातला हिस्सा दिला म्हणजे गप्प करता येते, हे मल्ल्याचे खरे भांडवल होते. आज त्याच चोरीच्या पैशावर तो परदेशात मौजमजा करीत असून, त्याला भारतीय कोर्टात आणतानाही भारत सरकारची दमछाक होते आहे. पण जेव्हा त्याच्या फ़सवेगिरीला रोखायचे होते, तेव्हा काणाडोळा करून चोरीला हातभार लावणारे मात्र उलटे प्रश्न विचारत आहेत. मनमोहन सिंग किंवा चिदंबरम ह्यांच्या हातात सत्ता असताना मल्ल्या याच्या कर्जाला रोखता आले असते. पण त्यांनीच तशा कर्जाला हातभार लावला होता. एका प्रकरणात अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी पीटर मुखर्जी यांच्या कंपनीला अफ़रातफ़रीसाठी कशी मदत केली, त्याचा तपशील अलिकडेच समोर आला आहे. बदल्यात त्यांच्या पुत्राला कमिशनही मिळालेले होते. अशा गोष्टी इतक्या बेधडक कशा होऊ शकतात, असा सामान्य माणसाला प्रश्न पडतो. त्याचे दोन खुलासे आहेत. पहिली बाब म्हणजे कायद्यातच गुन्हेगाराला निसटण्याच्या पळवाटा ठेवलेल्या असतात., दुसरे कारण अशा चोरांना पकडणार्‍यांनाच खरेदी करता येत असते.

आपण गफ़लती केलेल्या आहेत आणि कधीतरी सरकारी यंत्रणा आपल्या पाठीमागे लागणार आहे, याची मल्ल्याला खात्री होती. म्हणूनच त्याने कुठल्याही क्ष्णी परदेशी पळून जाण्याची जय्यत तयारी ठेवलेली होती. म्हणूनच त्याला नुसता सुगावा लागला आणि त्याने विनाविलंब भारतातून पळ काढला. याचा अर्थ सोपा आहे. कुणीतरी अर्थखात्यातल्या वरीष्ठाने त्याला हालचाली सुरू झाल्याची खबर दिलेली होती. त्याने संसदेतून बाहेर पडताच थेट विमानतळ गाठला आणि तो लंडनला पोहोचल्यावरच पलायनाची बातमी जाहिर झाली होती. तेच ललित मोदीबद्दल म्हणता येईल. आता लंडनच्या कोर्टात त्याला माघारी आणण्यासाठी खटला चालू आहे आणि त्यासंदर्भात विचारले असता, मल्ल्या बेशरमपणे म्हणतो; मला भारतात परत नेण्याचे स्वप्न बघत बसा. याचा अर्थ इंग्लिश कायदे व भारतीय कायदे आपल्याला कित्येक वर्षे गुन्हा केल्याबद्दल कुठलीही शिक्षा देऊ शकत नाहीत, याची मल्ल्याला खात्री आहे. त्यालाच कशाला क्रुरकर्मा दाऊद इब्राहीम यालाही मायदेशी आल्याशिवाय दिर्घकाळ भारतीय पासपोर्ट कसा मिळत राहिला होता? आपण सामान्य माणसे आयुष्यभर भारतात रहातो आणि इथेच जगत असतो. पण साधा पर्यटनासाठी पासपोर्ट हवा असेल, तर तो मिळवताना किती दमछाक होते? मग परदेशी लपून राहिलेल्या गुन्हेगाराला इतक्या सहजपणे पासपोर्ट कसा मिळू शकतो? त्याचे उत्तर कोणाकडे मिळणार नाही. त्याचे कारण सोपे आहे. कायदा-नियम वा कुठल्याही अडचणीवर पैसा मात करतो. पैसा हाच आता कायदा झाला आहे आणि कायदा विरोधात असेल तर त्यालाही पैशाच्या बळावर नामोहरम करता येते. ही वस्तुस्थिती झालेली आहे. एखाद्या गुन्हेगाराला पोलिस हुडकून ठाण्यात घेऊन पोहोचण्यापुर्वीच त्याचा वकील तिथे हजर झालेला असतो. ही सर्व पैशाची किमया झालेली आहे.

लालूंनी किती भानगडी केल्या आणि आता तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यच अफ़रातफ़रीमध्ये असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत. पण लालू वा त्यांच्या आप्तांना कायदा अजून हात लावू शकलेला नाही. त्यांच्यावरील आरोपाची व पुराव्यांची कसून चौकशी व तपास चालू आहे. त्या तपासात इतके दिवस खर्ची पडतात, की कायद्याने कृती करायची वेळ येईपर्यंत गुन्हेगाराला सुरक्षित जागी पळून जाण्याची भरपूर सवड दिली जाते. विजय मल्ल्याच्या अफ़रातफ़रीचा खुप गाजावाजा झालेला होता आणि त्यातून निसटण्याची शक्यता उरलेली नव्हती. मग त्याच्यावर निर्बंध घालण्याचे पाऊल कशाला उचलले गेले नाही? तर तसे काही केल्यास कायद्यानेच प्रशासनाचे पाय ओढले असते. एकदा माणूस पैसेवाला झाला किंवा सत्तेच्या शिखरवर पोहोचला, मग कायदा त्याच्यासमोर शरणागत होतो आणि कायद्याचे अंमलदार वचकून वागू लागतात. त्यामुळे कायदा ही पैशाची बटीक बनलेली आहे. उंदराने मांजराशी खेळावे, असे कायद्याचे खच्चीकरण झालेले आहे. जोपर्यंत त्यातून कायद्याची सुटका केली जात नाही, तोपर्यंत कायदा प्रभावी होऊ शकत नाही, की त्याचा वचक कोणाला बसू शकत नाही. मग तो मल्ल्या असो किंवा दाऊद इब्राहीम असो. कायदा नावाचे पाखंड जोवर पाळले जाणार आहे आणि त्यासाठी वस्तुस्थितीची गळचेपी शब्दांचे बुडबुडे उडवून केली जाणार आहे; तोपर्यंत मल्ल्या असेच शिरजोर होत रहातील. शेतकर्‍यांना किरकोळ कर्जासाठी गळफ़ास लावून घ्यावे लागतील आणि मोठे दरोडेखोर समाजात प्रतिष्ठेनेच जगत रहातील. कारण पैसा हाच कायदा झाला आहे आणि प्रतिष्ठाही पैशाने विकत मिळू लागली आहे. म्हणून तर भ्रष्टाचार भानगडी निपटून काढण्याचे नाटक रंगवून नवे दरोडेखोर केजरीवालच्या रुपाने पुढे येत असतात. गुन्हेगार नसणे हा आता गुन्हा होऊन गेला आहे.

3 comments:

 1. भाऊ मल्या पेक्षा किर्ती चिदंबरम व लालु पुत्रांवर लेख अपेक्षित

  ReplyDelete
 2. किर्ती पन बाह्र गेलाय परत आलाय की नाही कीय माहित? त्याचे वडिल निर्लज्जासारखे पुरोगामी पेपरात लिहितात आणि पेपरवाल्यांना पन लाज नाही
  पुरोगामी ना ते

  ReplyDelete
 3. राजवट बदलली तरी नोकरशाही आणि पोलीस यांचीच वट असते आणि त्यांच्या निष्ठा खोडसाळपणा करू शकतात त्यामुळेच विजय मल्ल्या किंवा ललित मोदी यांचे पलायन शक्य होत असावे काय ?

  ReplyDelete