Tuesday, June 13, 2017

मेहरुन्नीसा दलवाई

गेल्या आठवड्यात मेहरुन्निसा दलवाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील आपल्या रहात्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी बातमी एका जिल्हा वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. आतल्या पानात एक कॉलमच्या छोट्या टायपातील शिर्षक असलेली ही बातमी कोणाच्याही नजरेत भरणारी नाही. बहुधा त्या जिल्हा पत्राच्या संपादक वार्ताहरांनाही या नावाचे महत्व ठाऊक नसावे. सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात मी विश्रांतीसाठी गेलो असताना कोणीतरी वर्तमानपत्र घेऊन आले. त्यामध्ये शनिवारी ही बातमी वाचायला मिळाली. त्यात मेहरुन्निसा यांची त्रोटक ओळख होती आणि मागे कोण कुटुंबिय आहेत, वगैरे तपशील होता. त्यात अर्थातच त्यांच्या दिवंगत पतीचीही थोडीफ़ार माहिती आलेली होती. पण अधिक काही माहिती द्यावी आणि प्रसिद्धीसाठी ती मिळवावी, असेही तिथल्या वार्ताहर उपसंपादकाला वाटले नाही. याचे मला खुप वैषम्य वाटले. निदान आजच्या घडीला तरी मेहरुन्निसा दलवाई हे नाव खुप महत्वाचे आहे. कारण ही गृहिणी व तिच्या पतीने पन्नास वर्षापुर्वी एका सामाजिक क्रांतीचे स्वप्न बघितले होते आणि आज कुठे त्याला मोठ्या प्रमाणात धुमारे फ़ुटू लागले आहेत. हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची चळवळ सुरू केली, तेव्हा त्यांना मुस्लिम समाजात व अगदी आप्तस्वकीयातही सुखनैव जगणे अशक्य झालेले होते. धर्माचा प्रचंड पगडा असलेल्या समाजात असे काही करायची कल्पना धाडसाची असताना, हमीदभाईंनी मुसंडी मारली होती आणि त्यांच्या त्या धाडसाला तितक्याच निष्ठेने व आस्थेने सहकार्य करणारी पत्नी, असे हे क्रांतीकारी व्यक्तीमत्व होते, ज्याला जग मेहरुन्निसा दलवाई म्हणून ओळखत होते. आज देशात तिहेरी तलाकचा विषय ऐरणीवर आलेला असताना हमीदभाईंचे स्मरण कुणाला होत नाही, तिथे मेहरुन्निसा दलवाई यांची महत्ता कोणाला उमजायची?

आज तिहेरी तलाक विरोधात मोठा गदारोळ चाललेला असून, सुप्रिम कोर्टाने त्यात लक्ष घातले आहे आणि अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तीगत कायदा मंडळ त्याच्या विरोधात हरणारी लढाई लढते आहे. हे बघितल्यावर ४५ वर्षे जुन्या हमीदभाईंच्या लढ्याच्या आठवणी जाग्या होतात. १९७२ सालात याच मंडळाची परिषद मुंबई सेंट्रलच्या महाराष्ट्र कॉलेजात भरलेली होती. तिथे तलाकपिडीत महिलांचा मोर्चा नेऊन मुस्लिम धार्मिक कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्याची मागणी रेटण्याचा प्रयास दलवाई यांनी केला होता. हजारो मुस्लिमांच्या विरोधात असा आग्रह धरणे वा त्यांच्याच परिषदेवर मोर्चा घेऊन जाण्याची कल्पनाच धाडसी होती. हमीदभाईंचे मुठभरच मुस्लिम सहकारी होते आणि आमच्यासारखे काही परिवर्तनाची भाषा बोलणारे त्यांच्या समवेत होते. आमचा इवला मोर्चा शेकडो पटीने मोठ्या मुस्लिम लोकसंख्येने वेढलेला होता. तिथे पोलिसांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आम्हा मोर्चेकर्‍यांना ताब्यात घेतलेले होते. अर्थात हमीदभाई स्वप्नाळू नव्हते. आपली शक्ती व व्याप्तीची मर्यादा त्यांना पक्की ठाऊक होती. म्हणूनच मागणी मान्य होण्याची कुठलीही अपेक्षा त्यांनी बाळगली नव्हती. पण त्यातून मुस्लिम समाजाला वेठीस धरणार्‍या धर्ममार्तंडांना अस्वस्थ करण्याचा त्यांचा हेतू सफ़ल झाला होता. इतक्या मोठ्या संख्येने हमीद दलवाई मुर्दाबादच्या घोषणांचा हलकल्लोळच त्यांना अपेक्षित असावा. कारण आपण बीजपेरणी करतोय, त्याचे पीक काढायला आपण नसू, इतकेही त्यांना पक्के ठाऊक असावे. पण बीज पेरले गेले होते आणि आज तिहेरी तलाक विरोधात शेकडो हजारोच्या संख्येने मुस्लिम महिला रस्त्यावर येत आहेत. कोर्टाचे दार ठोठावत आहेत, त्याचे खरे श्रेय हमीदभाईंना आहे तितकेच ते मेहरुन्निसा दलवाई यांनाही आहे. कारण त्या काळात ही पत्नी हमीदभाईंच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे उभी राहिलेली होती.

हमीदभाई फ़ार काळ जगले नाहीत. मुत्रपिंडाच्या विकाराने त्यांचा अल्पवयात अवतार संपला. तर त्यांच्या कार्याचा झेंडा खांद्यावर घेऊन मेहरुन्निसा यांनी तलाकपिडित महिला व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य नेटाने पुढे रेटलेले होते. त्याला भव्यदिव्य चळवळीचे रुप भले आले नसेल. पण सुप्तावस्थेत ते बीज कायम राहिले आणि आज त्याला वृक्षाचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे १९७२ सालात हमीदभाई मुर्दाबाद अशा गर्जना करून सुधारणेचा आवाज दडपून टाकणार्‍या मुस्लिम कायदा मंडळाचा आवाज आज रस्त्यावर उतरलेल्या तलाकपिडित महिलांपेक्षा दुबळा ठरतो आहे. त्या महिलांच्या मुखातून उठणार्‍या गर्जना हमीदभाईं इतक्याच मेहरुन्निसा दलवाई यांच्या डरकाळ्या आहेत. भले त्यांचे नाव कोणी घेत नसेल. पण प्रत्येक तलाकपिडित महिला आज रस्त्यावर उतरून झुंज द्यायला सरसावली आहे, त्या प्रेरणेतून हेच दलवाई दांपत्य विराट स्वरूप धारण करून समाज सुधारणेला अवकाश प्राप्त करून देत आहे. याचा विसर पडता कामा नये. प्रत्येक तलाकपिडित महिला व तिच्या कुटुंबाचे सदस्य लढायला सिद्ध झाले आहेत, ही त्याच दलवाई दांपत्याची पुण्याई आहे. म्हणूनच त्याचा उल्लेख अशा बातम्यातून यायला हवा होता, असे वाटले. पण बातम्या रंगवणार्‍यांना वा विषयाचा चोथा करणार्‍यांना विषयाच्या गाभ्यापर्यंत जाण्याची बुद्धीच नसेल, तर हमीदभाई वा मेहरुन्निसा यांचे योगदान कशाला ठाऊक असणार? कुणाला तो वारसा शोधून काढून त्याची जाणिव लोकांमध्ये निर्माण करण्याची चिंता असणार? मागल्या पिढीतील कोणीतरी नामवंत व्यक्ती निधन पावली, म्हणून बातमी द्यायची. तिची ओळख ना आपल्याला करून घेण्याची इच्छा, ना वाचकाला ओळख करून देण्याची आकांक्षा! चळवळीत असे दिग्गज पायाचे दगड म्हणून स्वत:ला इतिहासात गाडून घेतात, म्हणून समाज परिवर्तनाचे मनोरे उभे रहात असतात.

अर्थात आज पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यांनाच हमीदभाई वा मेहरुन्निसा यांच्या उद्दीष्टापेक्षा प्रासंगिक राजकारणासाठी परिवर्तनाचे महत्व वाटत नसेल, तर उपसंपादक वार्ताहरांना तरी कोणी माहिती द्यायची? आजच्या पुरोगाम्यांना हमीद वा तत्सम पुर्वज श्राद्ध सोहळे साजरे करण्यासाठी हवे असतात. त्यांनी मांडलेले विचार भूमिका यांच्याशी अजिबात कर्तव्य नसते. त्याच्या लेखी संघ वा मोदींनी तलाक विषयाला हात लावला असल्याने, आता हमीदभाईंचे उद्दीष्ट प्रतिगामी झाले आहे. कारण त्यांचा वारसा सांगणारे वा जवळीक बोलणारे आजकाल मुल्लामौलवींच्या प्रमाणपत्रावर पुरोगामी ठरत असतात. हमीदभाईंच्या चळवळ वा भूमिकेची अशी दुर्दशा असल्यास, मेहरुन्निसा दलवाईंचे कौतुक कोणाला असेल? त्यांनी आरंभलेल्या अशक्यप्राय परिवर्तनाच्या संकल्पनेची माहिती आजच्या पिढीला कोणाकडून मिळणार? त्याची बातमी तरी कशी व्हायची? त्याची महत्ता कोणाला कशी उमजावी? महात्मा फ़ुल्यांच्या चळवळीत जितके योगदान सावित्रीचे होते, तितकेच हमीदभाईंच्या चळवळीत मेहरुन्निसा दलवाईंचे मोलाचे योगदान होते. निदान आजच्या तिहेरी तलाक विरोधात उठलेल्या वादळात तरी त्यांच्या योगदानाचे ठळक वर्णन लोकांसमोर यायला हवे. पुरोगामीत्व सदोदित मिरवणार्‍यांपैकी कितीजणांना त्याची गरज वाटली? निदान या निमीत्ताने तरी आजच्या हजारो लाखो मुस्लिम तलाकपिडित लढवय्या मुली महिलांना आपल्या वेदनांचा पहिला उच्चार करणार्‍या या दलवाई दांपत्याची ओळख झाली असती ना? त्यासाठी तरी मेहरुन्निसांच्या निधनाच्या निमीत्ताने त्यांच्या योगदानाचा गाजावाजा व्हायला हरकत नव्हती. एका आतल्या पानातली ती नगण्य स्वरूपातील बातमी बघून खुप वैषम्य वाटले म्हणून हे लिहावे लागले. एक समाधान आहे. हमीदभाई हयात नसतील. पण त्यांच्या पत्नीला तरी तलाकपिडितांच्या आजच्या डरकाळ्या कानी पडण्यापर्यंत आयुष्य लाभले.

1 comment:

  1. अधिक माहिती द्यावी ही विनंती.
    त्यांनी समाजात जागृतिसाठी लेखन केले असेल, शिक्षणाचा प्रसार केला असेल, अव्याहत प्रयत्न केले असतील, ते सर्वांना कळावे.

    ReplyDelete