Monday, September 19, 2016

पितरांचे जेवण



गुरूवारी गणपती बाप्पांना निरोप दिला गेला आणि नवरात्रोत्सवापर्यंत गदारोळ संपला. दरम्यान पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्ष म्हणजे आपले पुर्वज किंवा अगदी जवळचे अलिकडल्या काळात मृत्यू पावलेले जे कोणी सगेसोयरे आहेत, त्यांच्या आठवणी काढून साजरे करण्याचे दिवस. त्यासाठी मग पितरांना जेवू घालण्याची कल्पना आहे. खरे तर साग्रसंगीत स्वयंपाक करून पंगती उठवण्याचा सोहळा चालतो. पण अशा पंगतीसाठी लोक फ़ारशी गर्दी करत नाहीत. कसेबसे लोक जमवावे लागतात. माझ्या बाबतीत गोष्ट बरी, की असले कुठलेही सोहळे मी साजरे करीत नाही. मग ते दिवाळी गणेशोत्सवाचे असोत की पितरांचे असोत. श्राद्ध वगैरेच्या भानगडीपासून मी दुर असतो. समज आल्यापासून मी अशा गोष्टी मानल्या नाहीत वा मला पटल्या नाहीत. अर्थात माझी बाजू प्रत्येकाला पटेल असे नाही, म्हणूनच कुटुंबातील इतराना पटावे असेही नाही. त्यांनी असे काही करण्याला माझा विरोध नाही, किंवा मी त्यात अडथळेही आणलेले नाहीत. मागितले तर त्यातल्या खर्चाचा हिस्सा असलेले पैसेही दिलेले आहेत. मात्र त्यात मला कुठेही गोवू नये, इतकीच माझी अट राहिली आहे. ती मान्य करून इतरांनी तसे काही केल्यास माझा आक्षेप नाही. पण माझ्याच आईवडील वा इतरांचे काय? त्यांच्याही बाबतीत ज्या भावंडांना शक्य असेल त्यांनी करावे, याला माझा विरोध नाही. पण मी यातले काहीही करत नाही. अगदी पक्का प्रतिगामी असल्याने मला ‘पुरोगामी’ मानली जाणारी ‘पुण्यतिथी’ही जमली नाही. मात्र पुर्वजांचे देणे राहिले असे वाटणे मात्र स्वाभाविक आहे. आपल्यासाठी पुर्वजांनी इतके काही केल्याची परतफ़ेड कशी करावी? हा प्रश्न मलाही दिर्घकाळ सतावत राहिला. पण त्याचे उत्तर कधी सापडले नव्हते. ते उत्तर गेल्या मे महिन्यात नाशिकला मिळाले. एका व्याख्यानाला गेलो असताना अनपेक्षित स्थळी मिळाले.

बापू कोतवाल नावाचे गृहस्थ नाशिकमध्ये एका परिसरात आपल्या परीने काही समाजसेवा म्हणून उपक्रम चालवित असतात. तिथे मुलांनी गोळा होऊन आपला मोकळा वेळ सत्कारणी लावावा म्हणून विविध उपक्रम चालवित असताना, त्यांनी पितृपक्षाचा वेगळा विचार केला. अनेकांना केवळ उपचार म्हणून हा खर्च करायचा असतो. त्यात वेळ दवडणेही परवडत नसते. जेवायला जमणारेही जुलमाचा रामराम म्हणून येत असतात. हे ओळखून बापूंनी एक चांगली कल्पना अंमलात आणली. पितरांना जेवण घालण्यावर जो खर्च होतो किंवा जे साहित्य खर्ची घातले जाते; ते खर्‍या गरजू व भुकेल्यांच्या तोंडी पडावे असे त्यांना एके दिवशी वाटले. त्यांनी अशा समविचार करू शकणार्‍यांना पितृपक्षातील खर्चाचेच दान करण्याची कल्पना सुचवली. हे धान्य वा खाद्य घेऊन आदिवासी वा गरीब घरातील मुलांना विद्यार्थ्यांना भोजनाची वार्षिक व्यवस्था करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. व्याख्यानाच्या निमीत्ताने नाशिकला गेलो असताना बापूंनीच मला ही माहिती दिली. मी कमालीचा सुखावलो. कारण दोनचार वर्षे सासूबाई, सासरे किंवा माझी आई यांच्या आठवणीसाठी काही करायची धारणा मनात होती. पण पितृपक्षाचे सोपस्कार मला मान्य नव्हते. म्हणूनच या उपक्रमाला माझ्या पुर्वजांच्या नावाने काही देऊन उतराई होण्याची इच्छा मला झाली. पण बापू कोतवाल हा कोणी एनजीओ नाही. म्हणूनच त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करून उपयोग झाला नाही. या उपक्रमासाठी तात्काळ कुठली देणगी घेण्यास त्यांनी साफ़ नकार दिला. कारण त्यांची भूमिका साफ़ होती. त्यांना गरीब मुलांच्या पोटापाण्यापुरता हा विषय महत्वाचा वाटलेला नव्हता. पितरांना जेवू घालण्याच्या प्रथेच्या जागी वेगळी चांगली प्रथा उभी रहाण्याला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. म्हणूनच मे महिन्यात पैसे वा देणगीला त्यांनी साफ़ नकार दिला. मग मी काय करावे?

बापूंनी माझा मोबाईल नंबर टिपून घेतला आणि पितृपक्षातच देणगी घेतो असे बजावले. खरे तर रोख रकमेपेक्षा वस्तुची देणगी त्यांना भावते. कारण देणार्‍याने पितरांचे उतराई होण्याची त्यामागची भावना संपू नये. पण पितरांना जेवू घालताना खर्‍या भुकेल्या व गरजूंच्या तोंडी घास देण्याची माणुसकी त्यातून जोपासली जावी, याकडे बापूंचा कटाक्ष आहे. म्हणूनच परवा पितृपक्ष सुरू होताच त्यांचा फ़ोन आला. मी त्यांना दिलेले आश्वासन विसरून गेलो होतो. पण त्यांनी मे महिन्यातील संभाषणाचा संदर्भ देऊन पितृपक्ष लागल्याचे स्मरण मला करून दिले. मी त्यांचे आभार मानले आणि त्यांची अपेक्षा विचारली. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नाही. जे काही ज्या स्वरूपात पितरांसाठी देण्याची इच्छा असेल तेवढे, असे त्यांचे उत्तर होते. कसल्याही नोंदणीकृत संस्थेशिवाय हा माणूस आपल्यासारख्या कामसू लोकांना हाताशी धरून हा उपक्रम चालवितो आहे. त्यामुळे मला माझ्या पितरांचे उतराई होण्याची संधी मिळाली. पितरे वा पुर्वज, त्यांचे आत्मे असतात किंवा नाही, त्याचा मला पत्ता नाही. पण ज्यांनी लालनपालन केले, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची इच्छा उपजत असते. त्यासाठी इतका उदात्त मार्ग शोधल्याबद्दल या माणसाचे कौतुक करावे लागेल. मात्र त्याची कुठलीही प्रसिद्धी त्यांनी आजवर केलेली नाही आणि वर्तमानपत्रात याविषयी छापून येणेही त्यांना मान्य नाही. ज्यांना प्रत्यक्ष सहभागी होऊन वा बघून त्यात यावे असे वाटेल, त्यांनीच यावे. कारण ज्यांच्यासाठी हे काम करायचे, त्या गरीब घरच्या मुलांवर काही उपकार करण्याच्या भावनेतून दान घेतले जाऊ नये, हा बापूंचा हट्ट आहे. गरजूला म्हणजेच आपल्या पितरांना, अशी धारणा त्यामागे असावी ही त्यामागची भूमिका आहे. संपुर्ण जीवन शिक्षकी पेशात व्यतित केलेल्या माझ्या सासूसासर्‍यांसाठी इतका नेमका पितृपक्षाचा सोहळा अन्य कुठला असू शकेल?

अर्थात माध्यमात मी हे लिहीत आहे आणि बापू कोतवाल नावाच्या वेगळ्या माणसाची ओळख करून देत आहे. ते कदाचित त्यांनाही आवडणार नाही. पण मलाही असे काही उपक्रम असल्याची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचणे अगत्याचे वाटते. कारण मला ही माहिती आधी मिळाली असती, तर चार वर्षापुर्वीच मी पितरांचे पांग फ़ेडण्याच्या कर्तव्याला मुकलो नसतो. देणगी वा दान देण्याची भूमिका यात नसावी, हा बापूंचा हट्ट मला आवडला. त्यात कर्तव्याची जी भावना असते, ती समाजातील गरजूंविषयी आत्मियता वाढवण्यास कारणीभूत होऊ शकते. तसे उपक्रम अनेक संस्था करतात आणि त्यासाठी जाहिरपणे देणग्याही गोळा केल्या जातात. मागितल्याही जातात. पण हा अजब माणूस त्यापासून दुर आहे. चारपाच वर्षात केवळ तोंडी प्रचारातून त्यांनी असे वंशज गोळा केलेत, की ज्यातून शंभरावर मुलांना वर्षभर भोजनाची व्यवस्था होत असते. ज्यांना त्यातून खरे समाधान मिळते अशांनी इतरांना सांगून, त्या उपक्रमाशी जोडण्यातून ह्या कामाचा विस्तार झालेला आहे. होतही राहिल. पण मला एक नवा मार्ग सुचवल्याबद्दल बापू कोतवालांचे खास आभार मानण्याची गरज वाटली. कदाचित हा लेख प्रसिद्ध झाल्याने बापूंचा रोषही होऊ शकेल. पण त्याची मला पर्वा नाही. सामाजिक बदलाचे प्रामाणिक उपक्रम झाकलेले राहिले, तर व्यापारी उपक्रमांची दुकानदारी जोरात चालते आणि त्यातले भावनिक व मानवी अगत्य नष्ट होत जाते. तसे होऊ नये इतकीच प्रामाणिक इच्छा अशा प्रसिद्धी मागे आहे. म्हणूनच बापूंची परवानगी घेतल्याशिवाय त्यांचा मोबाईल क्रमांकही इथे देत आहे. मात्र त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी या माणसाची त्यातली कळकळ ओळखून आत्मियता असेल, तर पुढाकार घ्यावा. अन्यथा देणगी देण्यासाठी इतर अनेक जागा व संस्था आहेतच. (बापू कोतवाल ९८२२२ १८४०८)

रोजनिशी  दै. जनशक्ति  

6 comments: