Sunday, October 2, 2016

उरणमधले दहशतवादी

uran terror के लिए चित्र परिणाम

गुरूवारी अकस्मात मुंबई नजिकच्या रायगड जिल्ह्यात अतिरेकी जिहादी दिसल्याचा कल्लोळ सुरू झाला. दोन शाळकरी मुलांनी लष्करी वेशातल्या काहीजणांना वेगळ्या भाषेत बोलताना ऐकले आणि बघितले. नेहमी जिहादी हल्ले व त्यांचे दर्शन वाहिन्यांवरून होत असल्याने प्रत्यक्ष तसे काही बघितले, तर मुले घाबरून जाणे स्वाभाविक होते. मात्र या मुलांनी तात्काळ आपल्या शिक्षकांच्या कानी ही गोष्ट घातली आणि त्यांनी पुढे पोलिसांना वर्दी देण्याची जागरूकता दाखवली. काश्मिरातील उरी तळावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याने विनाविलंब पोलिस, सुरक्षा दल आणि विविध यंत्रणा कामाला लागल्या. मुंबई बंदरात व किनारी पट्ट्यामध्ये गस्त व तपास सुरू झाला. संपुर्ण मुंबई व आसपासच्या प्रदेशात संशयितांचा शोध घेतला जाऊ लागला. संशयितांची रेखाचित्रे बनवून धावाधाव सुरू झाली. कारण मुंबई हल्ल्यातले आरोपी असेच किनारी भागात सागरी मार्गानेच आलेले होते. तीन दिवस हा तपास चालू राहिला. मात्र शनिवारी अकस्मात हे संशयित आरोपी हाती लागले आणि खुलासा झाला. संकट निकालात निघाले. पनवेलजवळ एका रस्त्यावर एका कंटेनरचा चालक त्याच्या बाजूने चाललेल्या लष्करी वहानाच्या ड्रायव्हरला शंकास्पद वाटला. त्याने झटकन पुढाकार घेऊन त्या कंटेनरला रोखले आणि झडती सुरू केली. तर कंटेनरमध्ये तीन लष्करी वेशातले लोक सापडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते सामान्य कर्मचारी निघाले. हे तिघे काश्मिरी असून सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. सध्या कंटेनर कंपनीत कामाला आहेत. पण जुने लष्करी कपडे त्यांच्याकडे होते म्हणून संशय बळावला होता. तपासाने संशय निकालात काढला. पण या निमीत्ताने त्या मुलांनी दाखवलेली जागरुकता मोलाची आहे. त्याखेरीजही एक धडा शिकण्याची गरज आहे. हा सगळा गोंधळ कशामुळे उडाला?

अर्थात त्या मुलांच्या गैरसमजामुळे इतकी धावपळ झाली, असेच कोणीही म्हणू शकेल. पण साधा लष्करी गणवेश मुलांना भयभीत कशाला करू शकला? त्या गणवेशाच्या बरोबरीने संबंधितांची भाषा अमराठी होती. किंबहूना ती काश्मिरी होती आणि विविध वाहिन्यांवरचे अरबी वा पाकिस्तानी भाषेतले काही ऐकलेले असल्याने त्या मुलांना ते दहशतवादी असल्याची भिती वाटली. कुठली भाषा वा गणवेश आणि शंकास्पद वर्तन इतक्याने मुले गर्भगळित झाली. त्यांनी केलेल्या वर्णनाने अवघी सुरक्षा यंत्रणा गडबडून गेली. सवाल असा, की इतके घाबरून जाण्याचे कारण काय? यापुर्वी असे अनेक हल्ले झालेत आणि त्यातही असेच हल्लेखोर आलेले होते. ठराविक भाषा, वेश वा चेहरा हे आता संशयित होऊन गेलेले आहेत. त्यांचे नुसते दर्शनही सामान्य भारतीयाला भयभीत करू शकते. हे भय म्हणजेच दहशत असते. त्यांना जास्त काही करावे लागत नाही. कुठूनही केव्हाही कसेही आत्मघाती हल्लेखोर येतात व येऊ शकतात, ही आपल्या मनातली समजूत मागल्या काही वर्षात तयार झाली आहे. ही आपल्या मनातली समजूत वा भय म्हणजेच दहशतवाद असतो. दहशतवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हे दहशतवादी जिहादी तुम्हाला ठार मारायला येत नसतात. तुमचा रक्तपात करण्यातही त्यांना रस नसतो. तुम्हाला भयभीत करून स्वत:च्या सुरक्षेविषयी तुम्हाला साशंक करून टाकणे, हेच कुठल्याही हल्ल्याचे व हिंसेच उद्दीष्ट असते. मागल्या दोनतीन दशकात त्यात अशा लोकांनी किती यश मिळवले आहे? त्याची उरणची घटना ही नुसती चुणूक आहे. आज देशात कुठेही असे काही घडले वा दिसले, तरी लोकांची पळापळ सुरू होते आणि खरेच धोका आहे काय, तेही तपासण्याची हिंमत उरलेली नाही. हे केवळ उरणलाच घडले असे मानायचे कारण नाही. तेच देशात सर्वत्र घडत असते.

सात वर्षापुर्वी असाच एक प्रसंग देशाच्या संसदेत घडलेला होता. लोकसभेच्या सभापतींनी अकस्मात सभागृहाचे कामकाज स्थगित करून सर्व सदस्यांना तात्काळ संसद भवनातून बाहेर निघून जाण्यास सांगितले. सर्व सदस्य सैरावैरा पळत सुटले होते. तात्काळ सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आणि पोलिस सुरक्षा यंत्रणांनी संसदेचा ताबा घेतला होता. एक एक दालन, कार्यालय आणि कानाकोपर्‍याचा कसून तपास सुरू झाला होता. कारण संसद भवनात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती मिळालेली होती. दिर्घकाळ झडती झाल्यानंतर ती अफ़वा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे कारण असे होते, की चेन्नई येथील अमेरिकन वकिलातीला एक फ़ोन आला होता. त्यात त्यांच्या परिसरात व संसद भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी होती. ठराविक काळाने त्यांचे स्फ़ोट होणार अशी धमकी होती. त्यांनी स्थानिक पोलिसांना कळवले आणि माहिती चेन्नईच्या पोलिसांनी दिल्लीला कळवली. मग तिथल्या पोलिसांनी संसदेच्या अधिकार्‍यांना ती माहिती देऊन सुरक्षा उपाय म्हणून संसद मोकळी करून झडती सुरू केली होती. देशाचे सर्वोच्च व्यासपीठ मानल्या जाणार्‍या व कडेकोट बंदोबस्त असलेल्या वास्तुमध्ये असा काही प्रकार होत असेल, तर सामान्यपणे देशात कुठेही अशी घटना घडणे शक्य आहे. खासदार व देशाचा कारभार करणार्‍या लोकप्रतिनिधींनाही आपल्या भोवतीची सुरक्षा व्यवस्था शंकास्पद वाटली. नुसत्या धमकीनंतर त्यांनी पळ काढला असेल, तर उरणच्या त्या विद्यार्थ्यांनी घेतलेली काळजी चुकीची म्हणता येत नाही. पण अशा घटनांमधून एक गोष्ट सिद्ध होते, की दहशतवाद कधीच जिंकला आहे. त्याने आपल्या मनाचा व जनमानसाचा कधीच कब्जा घेतलेला आहे. ज्यांना दहशत माजवायची आहे, त्यांना माणसे मारायची नाहीत, तर केवळ लोकांमध्ये भयगंड निर्माण करायचा आहे. त्यात ते किती यशस्वी झालेत?

दहशतवाद म्हणजे हिंसा अशी आपली एक गैरसमजूत आहे. हिंसा वा हत्या हा त्यातला दुय्यम भाग आहे. कुणाला मारण्याची अशा लोकांना इच्छा नाही. त्यांना फ़क्त मरणाच्या भयाने तुम्हाला हतबल करून सोडायचे आहे. माणुस घाबरला, मग त्याला हरवण्याची गरज नसते. तो कुठलीही किंमत मोजून शरण यायला राजी असतो. दहशतवाद्यांना कुणाला मारायचे नसते, तर भयभीत करून आपल्या इच्छेपुढे शरण यायला लोकांना भाग पाडायचे असते. ती भिती तुमच्या मनात निर्माण करण्यासाठी एखादी हत्या किंवा घातपात करावा लागत असतो. त्यात बळी पडणार्‍याशी हल्लेखोरांना काहीही कर्तव्य नसते की दुष्मनी नसते. कायदा व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा कुणा व्यक्तीला वा जनतेला सुरक्षित राखू शकत नाहीत. त्यांच्या सज्जतेला भेदण्याची आपल्यात कुवत आहे, अशी सामान्य जनतेची खात्री पटवून देण्यासाठी आवश्यक तितकी हिंसा; असाच जिहादी दहशतवादाचा प्रयोग असतो. मुंबई हल्ला, लष्करी तळावरचा हल्ला किंवा संसदेवरील हल्ला, यातून तितकी भिती यशस्वीपणे भारतियांच्या मनात आज निर्माण करण्यात जिहादींनी यश मिळवले आहे. पण दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतील, त्यांनाही नामोहरम करण्यात ते यशस्वी झाले आहेत. इशरत जहान चकमकीसाठी किती पोलिस तुरूंगात गेले? त्यातून काय सिद्ध झाले? पोलिस वा लष्कराने चुकून कोणाचा बळी घेतला, तर आयुष्यातून त्यांना उध्वस्त व्हावे लागते. कोर्टकचेर्‍या करूनही याकुबला वाचवण्याचे उद्योग होऊ शकतात. पण दहशतवादाशी दोन हात करणारा चुकला तर त्याला कुठलीही क्षमा नाही. म्हणजे हल्ल्यासाठी तुम्हीआम्ही भयभीत आणि चुकीची कारवाई झाल्यास आयुष्यातून उठण्याची सुरक्षा यंत्रणांना भिती. सगळेच दहशतीखाली आले ना? मग आपण दहशतवादाशी दोन हात करणार कसे? कोण आपल्याला या संकटातून वाचवणार आहे?

1 comment: