Monday, October 17, 2016

ऐ दिल है मुश्कील

bollywood devided के लिए चित्र परिणाम

Ten people who speak make more noise than ten thousand who are silent.   -Napoleon Bonaparte

दहा हजार शांत माणसांपेक्षा दहा बडबडणारी माणसे अधिक गोंगाट करतात, असे नेपोलियन बोनापार्ट नावाचा जगप्रसिद्ध सेनापती म्हणतो. असे एखादे वाक्य अनेक मोठ्या गहन वाटणार्‍या प्रश्नांचे सोपे उत्तर देत असते. पण ते बोलणार्‍यांच्या कधी लक्षात येत नाही. कारण त्यांना आपण बोलतो, तोच जनतेचा व संपुर्ण लोकसंख्येचा आवाज आहे असे वाटत असते. म्हणून त्यात तथ्य नसते. कारण बोलणारे कृतीशील नसतात आणि शांतपणे काम करणारे बहुतांशी कृतीवीर असतात. म्हणूनच जे गोंगाट करतात, ते कृतीची वेळ आली मग सुरक्षित बिळात जाऊन दडी मारून बसतात आणि शांत कृतीवीरांनाच काम उरकवे लागत असते. आज भारतामध्ये जिहाद आणि त्यातून उत्पन्न होणारी हिंसा, यावरून विचारकलह चालू आहे. त्यात पाकिस्तानच्या कलाकारांना भारतीय चित्रपटात घ्यावे किंवा नको, यावरून वादंग माजले आहे. त्यासाठी तावातावाने बोलणारे कलेला सीमेच्या मर्यादा नसल्याचे दावे करीत असतात. तर काहीजण अशा कलानिर्मितीमध्ये गुंतलेल्या पैशाचे दिवाळे वाजण्याची भिती व्यक्त करीत असतात. सव्वाशे कोटी भारतीयांचे याविषयी काय मत आहे, त्याची दखलही घ्यावी असे यापैकी कोणाला वाटलेले नाही. सीमेवर मरणार्‍या सैनिक जवानांविषयी किंची्त सहानुभूती त्यांच्या वर्तनातून व्यक्त होत नाही. मुखवटा कलेचा आणि चिंता गुंतलेल्या पैशाची, असा दुटप्पी कारभार चालला आहे. पण त्यांच्याच हाती आवाज घुमवण्याची साधने असल्याने गदारोळ चालू आहे. म्हणून सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न सोडवावेत, असेही त्यांच्या मनाला शिवत नाही. कलेला सीमा नसेल तर ती कला फ़क्त भारतीय वा पाकिस्तानी कशी असू शकेल? ज्या पाकिस्तानी कलाकारांसाठी हे सीमापार प्रेम उतू चालले आहे, त्या पक कलाकारांनी त्याची कुठली साक्ष दिली आहे काय?

करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ नावाच्या चित्रपटात फ़वाद खान नावाच्या पाक अभिनेत्याला संधी देण्यात आली आहे आणि त्याचे प्रदर्शन होऊ देणार नाही, असा पवित्रा मनसे या पक्षाने घेतला. मग त्याचा देशव्यापी उहापोह सुरू झाला. त्यातून हे विविध युक्तीवाद पुढे आलेले आहेत. त्यातला महत्वाचा युक्तीवाद कलेला सीमेच्या मर्यादा नसतात असा आहे. तो युक्तीवाद सव्वाशे कोटी भारतीयांच्या गळी मारण्याचा प्रयास जारी आहे. कोट्यवधी भारतीयांना असले काही पटवण्याची गरज नाही. त्यापेक्षा फ़वाद खान नावच्या एका पाकिस्तानी व्यक्तीला हा युक्तीवाद पटवून देणे सोपे नाही काय? ‘कलेला सीमा नसते, म्हणून तर तुला परकीय असून भारतीय चित्रपटात महत्वाची भूमिका दिली. त्यासाठी आम्ही पैसेही मोजले. तुला भरपूर मेहनतानाही दिला. जितके पैसे पाकिस्तानात तुला भिक मागूनही मिळणार नाहीत, इतकी मोठी रक्कम भारतीय निर्मात्यांनी तुला मोजलेली आहे. त्याच्या बदल्यात फ़वाद खान, तू भारतीयांना काय देतो आहेस? हेच भारतीय निर्माते दिग्दर्शक जो युक्तीवाद सांगत आहेत, तो सिद्ध करून दाखव’. इतके कोणी त्या महान कलाकाराला कशाला समजावू शकलेला नाही? त्याने उरी येथील भारतीय सैनिकी तळावर झालेल्या घातपाती जिहादी हल्ल्याचा निषेध करावा, ही महाग मागणी आहे काय? कला व कलाकाराला भौगोलीक सीमा नसतील, तर जगातल्या कुठल्याही अशा दुखण्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यात फ़वादला कुठली अडचण आहे? पण तो दोन निषेधाचे शब्द उच्चारायला तयार नाही. ज्यासाठी त्याला दोन रुपयेही मोजावे लागणार नाहीत. फ़क्त निषेधाचे शब्द बोलावेत आणि आपल्याला कोट्य़वधीचा मेहनताना मोजणार्‍यांची अब्जावधीची गुंतवणूक वाचवावी. इतकेही सौजन्य फ़वाद दाखवायला राजी नाही. कारण तो पाकिस्तानी आहे आणि पाकिस्तानची भौगिलीक सीमा तो पाळतो आहे.

जेव्हा पाकिस्तानी कलाकारांनी काही करायची वेळ येते, तेव्हा त्यांना त्यांच्या देशाच्या भौगिलीक सीमा नियंत्रित करतात. त्यातून त्यांना कलेची महत्ता मुक्त करू शकत नाही. आणि त्याच्या त्याच निष्ठेपायी भारताचे शेकडो निरपराध नागरिक वा सैनिक हकनाक मारले जातात. तेव्हा आमचे शहाणे फ़वादला कलेचीच कवचकुंडले बहाल करायला धावतात. हा निव्वळ बेशरमपणा असतो. हे नवे नाही. भारतात येणार्‍या पाक क्रिकेट संघानेही श्रीनगर येथे भारतीय संघाशी सामना खेळण्यास नकार दिलेला होता. कारण काश्मिर हा वादग्रस्त प्रदेश असल्याने तो भारत नाही, म्हणूनच तिथे खेळण्यास त्यांनी नकार दिलेला होता. म्हणजेच पाक क्रिकेटपटू असो किंवा कलाकार असो, तो इथे प्रतिभावान म्हणून येत नाही. तो पाकिस्तानी म्हणून येतो आणि आपल्या सरकारची भूमिका घेऊनच येत असतो. फ़वाद खान त्याला अपवाद नाही. तो उरीचा दोन शब्दांनी निषेध करत नाही, कारण पाकिस्तान सरकारही निषेध करत नाही. म्हणजेच फ़वाद खान पाकिस्तान सरकारचीच भूमिका घेऊन चालला आहे आणि म्हणूनच त्याला कलाकार म्हणून कुठलीही सवलत देण्यास तो नालायक आहे. पण ज्यांना भारतीयांचीच दिशाभूल करायची असते, तेव्हा ते सोयीस्करपणे कला पुढे आणतात. उलट जेव्हा कला गैरसोयीची असते, तेव्हा राजकीय मुद्दे पुढे आणतात. गुजरात दंगलीचे राजकीय भांडवल करताना यापैकीच अनेकांना कलाकार राजकीय वास्तवापासून अलिप्त राहू शकत नाही, असे म्हणताना आपण ऐकलेले नाही काय? आज भारतीय जवान हकनाक मारले जात असताना मात्र त्यांना कला व राजकारण भिन्न असल्याचे साक्षात्कार झालेले आहेत. म्हणून त्याला बेशरमपणा म्हणणे भाग आहे. त्यालाही हरकत नाही. कलेचा राजकारणाधी संबंध नसेल, तर जे राजकारण करतात, त्यांचे संरक्षणही मागू नका ना?

आता करण जोहरच्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास थिएटर मालकांच्याच संघटनेने नकार दिलेला आहे. कारण उघड आहे. तिथे कोणी हुल्लडबाजी केली, तर मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका आहे. तर त्यांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगायला हेच बेशरम पुढे असतात. कलेला कुठल्याही सीमा नसतील, तर मग कुठल्याही भौगिलीक भूमिकेवर चालणार्‍या शासन व्यवस्थेकडे संरक्षण तरी कशाला मागता? जे पोलिस वा सैनिक फ़वादच्या पाकनिष्ठेसाठी बळी पडत असतात, त्यांनी फ़वादच्याच चित्रपटाला संरक्षण तरी कशाला द्यायचे? ती जबाबदारी सुद्धा कलेच्या रक्षकांनीच आपल्या खांद्यावर घ्यावी. चित्रपट गृहात किंवा बाहेर हुल्लड होईल, त्या गुंडगिरीचा सामना तथाकथित कतारक्षकांनी करावा. त्यासाठी सरकारची मदत मागू नये. इथले वा कुठल्याही देशातले सरकार तिथल्या कायदा मानणार्‍यांचे संरक्षण करायला बांधील असते. ज्यांना त्या देशाच्या भौगोलीक सीमाच मान्य नाहीत, पर्यायाने त्या सरकारची भूमिकाच मान्य नाही, त्यांनी त्या सरकारकडून अपेक्षा करण्याची गरज काय? ज्यांना फ़वादकडून दोन शब्दाचा निषेध वदवून घेता येत नाही, त्यांनी राज्यकर्त्यांनी दंडुका उगारून संरक्षण देण्याची मागणी कशाला करावी? ज्यांना हुल्लडबाजी हिंसक वाटते, त्यांनी पोलिसांना दंडुका उगारायला सांगणे ही कुठली कलाकारी आहे? कला प्रेम निर्माण करीत असेल तर पोलिसांच्या सुरक्षेची गरज कुठे उरते? ज्याअर्थी पोलिसांची मदत मागावी लागते आहे, त्याअर्थी तुम्ही निर्माण केलेली कला प्रेमाची भाषा नसून, हिंसक प्रतिक्रीया उमटवणारी कृती आहे. त्यावरून हिंसेची पाळी येत असेल, तर तिला कलात्मक अविष्कार म्हणता येणार नाही. कोट्यवधी सामान्य लोक शांत आहेत, त्यांची हीच भावना आहे. बोलघेवड्या मुठभरांनी कितीही कल्लोळ केला म्हणून त्यांचा गोंगाट सत्य ठरू शकत नाही.

4 comments:

  1. भाऊ,या पाकड्यांना सलाम बघा त्यांना देश किती महत्वाचा वाटतोय नाहितर आपण?? सीमा नसतात ?? आपलेच देशद्रोही आहेत पाकड्याना शिव्या घालुन उपयोग नहीं

    ReplyDelete
  2. Super...
    Indian armys life is more important than billion rupees of Directors...

    ReplyDelete
  3. Nalayak Karan peksha aamhala aamacha desh aani sainikancha abhiman ati mahatvacha aahe.

    ReplyDelete
  4. संजय दत्तच्या उल्लेखाशिवाय हा विषय पूर्ण होत नाही. संजय दत्तने कलाकाराच्या मर्यादा ओलांडल्या आणि तो देशद्रोही गुन्हेगारी यंत्रणेचा सहकारी झाला.
    त्याचा वापर आपल्याच देशाविरुद्ध झाला आणि त्याची झळ सामान्य माणसाला बसली. हे उदाहरण समोर असुनही जे कलाकारांची तरफदारी करतात त्यांच्या हेतु बद्दलच शंका घ्यावी लागते.

    ReplyDelete