Monday, October 3, 2016

कुठला शरीफ़ ‘राहिल’?

raheel sharif nawaz sharif के लिए चित्र परिणाम

उरी हल्याला आता दोन आठवडे होत आले असून आरंभी अण्वस्त्रांच्या धमक्या देणार्‍या पाकिस्तानची भाषा दिवसेदिवस घसरत चालली आहे. राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारतावर दुगाण्या झाडणारे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़, जगात एकटे पडले आहेतच. पण ते आता आपल्या देशात व प्रशासनातही एकाकी पडत चालल्याची लक्षणे आहेत. कारण भारताकडून कोणी इतक्या ठाम भूमिकेची अपेक्षा केलेली नव्हती. पाकला जाब विचारण्याची भाषा आजवर खुप झाली होती. युद्ध हा अखेरचा पर्याय असल्याने एवढ्यावरून भारत युद्धात उतरणार नाही, याची पाकला नेहमीच खात्री होती. म्हणूनच असे भ्याड हल्ले करून सतावले जात होते. पण मोदी सरकार आणि आधीची सरकारे यात जमिनअस्मानाचा फ़रक आहे. मोदी हा धोका पत्करणारा माणूस असल्याने त्यांच्याकडून इतक्या सौम्य प्रतिक्रीयेची कोणी अपेक्षा करू नये. त्याचवेळी कुठलीही घाई करून फ़सणाराही हा माणूस नाही. म्हणूनच त्यांनी चोख उत्तराची भाषा केली तरी चोख उत्तर म्हणजे कोणती कृती, याविषयी मौन धारण केले. मात्र त्या निमीत्ताने विविध पर्याय प्रथमच पुढे आणले गेले. त्यात पाकला जगात एकाकी पाडण्यापासून सिंधूखोर्‍याचे पाणी रोखणे, खास राष्ट्र म्हणून पाकला दिलेला दर्जा काढून घेणे, इथपासून किरकोळ पण नेमका कमांडो हल्ला इथपर्यंत अनेक पर्यांयांचा विचार झाला आहे. अशा चर्चेमुळे पाकिस्तान पुरता सैरभैर झाला आहे. नेमकी कुठली भूमिका घ्यावी, त्याचाही निर्णय तिथले नागरी सरकार करू शकलेले नाही. पाकसेनेच्या नेतृत्वालाही काय होईल त्याचा अंदाज आलेला नाही. पण त्यामुळेच अधिक गोंधळ उडाला आहे. त्याचे प्रतिबिंब पाकच्या बदलणार्‍या प्रतिक्रीयामध्ये जाणवते. आरंभी अण्वस्त्रांची धमकी देणारे आता भारताला युद्ध परवडणारे नाही, अशी समजूतदार भूमिका मांडू लागले आहेत. की पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ होऊ घातली आहे?

पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यापुर्वी एकदा लष्करी राजवटीच्या अग्निदिव्यातून गेलेले आहेत. वाजपेयी सत्तेत असताना शरीफ़ यांनी भारताशी मैत्रीला साथ दिली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सैनिकी नेतृत्वाने शरीफ़ यांना बडतर्फ़ करून सत्ता हाती घेतली होती. मुशर्रफ़ यांनी लष्करी कायदा लावून सर्व सत्ता आपल्याकडे घेतली आणि शरीफ़ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून तुरूंगात टाकले होते. सौदी अरेबियाच्या मध्यस्थीमुळे शरीफ़ यांना जीवदान मिळाले. अन्यथा शरीफ़ फ़ासावरही लटकले असते. झुल्फ़ीकार अली भुत्तो यांच्या नशीबी तसेच मरण आलेले होते. आपल्या हाती निर्विवाद सत्ता रहावी म्हणून भुत्तो यांनी सर्वात कनिष्ठ असलेल्या झिया उल हक यांची लष्करप्रमुख म्हणून नेमणूक केली. पण नंतर झियांनी भुत्तोंना बडतर्फ़ करून त्यांना भर चौकात फ़ासावर लटकावले होते. तीच चुक शरीफ़ यांनी १९९० च्या दशकात केली. मोहाजीर असलेल्या मुशर्रफ़ यांना लष्करप्रमुख नेमताना ते पंजाबी नसल्याने आपल्या मुठीत रहातील, अशी आशा शरीफ़ यांना होती. पण ती फ़ोल ठरली. शरीफ़ यांच्या भारतमैत्रीला शह देण्यासाठी मुशर्रफ़ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी करून युद्धाची स्थिती निर्माण केली. त्यात पाकचे नाक कापले जाण्याची वेळ आल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिन्टन यांच्या हातापाया पडून शरीफ़ यांनी युद्धापर्यंत स्थिती जाऊ दिली नाही. मग मुशर्रफ़ श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेले असताना शरीफ़ यांनी त्यांच्या जागी नव्या लष्करप्रमुखाची नेमणूक केली. मायदेशी येणर्‍या मुशर्रफ़ यांच्या विमानाला कराची येथे उतरण्यास प्रतिबंध केला होता. पण सेनापतीच्या निष्ठावान अधिकार्‍यांनी शरीफ़ यांनाच अटक करून लष्करी क्रांती केली आणि पाकभूमीत पाऊल टाकताच मुशर्रफ़ यांनी स्वत:ला प्रशासक म्हणून घोषित केले होते. या अनुभवामुळे शरीफ़ सेना्प्रमुखाला वचकून असतात.

आताही लष्करप्रमुख राहिल शरीफ़ यांची कारकिर्द नोव्हेंबरमध्ये संपायची आहे. पण त्यांना सत्ता हाती घेण्याचा मोह झालेला दिसतो. म्हणूनच पंतप्रधानाच्या भारतमैत्रीत खोडा घालण्याच्या कारवाया त्यांनी चालविल्या होत्या. मात्र उरीनंतर प्रकरण अंगलट आलेले आहे. खरेच युद्धाची चाचपणी भारताने सुरू केल्यावर जनरल शरीफ़ यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच त्यांनी युद्धापर्यंत स्थिती जाऊ नये, अशी धावपळ सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणजे नागरी सरकार नाकर्ते ठरवून सेनाप्रमुखाने सत्ता ताब्यात घेणे असा आहे. भारताचा आक्रमक पवित्रा त्यासाठी लाभदायक ठरू शकतो. कारण पाक राजनैतिक बाबतीत एकाकी पडला आहे आणि दुसरीकडे भारताने पाकची सगळीकडून कोंडी करण्याचे डाव यशस्वी करीत आणलेले आहेत. शिवाय युद्ध झाल्यास नागरी सरकार उपयोगाचे नाही. तेव्हा नवाज शरीफ़ यांना नाकर्ते ठरवून लष्करी प्रशासक होण्याची तयारी राहिल शरीफ़ यांनी चालविली असल्याचे जाणवते. बलुचिस्थानात उठाव जोरात सुरू आहे. पाक-चिनी महामार्ग प्रकल्प लष्करी बंदोबस्तामध्ये उभारावा लागत आहे. सिंध कराचीमध्ये दंगली कायम सुरू असतात आणि त्यातच भारताने सिंधूखोर्‍याचे पाणी रोखले, तर पंजाब ह्या सुबत्ता असलेल्या प्रांतातही रक्ताचे पाट वाहू लागतील. त्यावरचा उपाय म्हणजे लष्करी राजवट इतकाच आहे. राहिल शरीफ़ ती स्थिती आणायच्या प्रयत्नात आधीपासूनच होते. आता भारताच्या आक्रमक पवित्र्याने त्यांचे काम सोपे झाले असून, युद्धाशिवायही दोन देशात शांतता राखण्याचे श्रेय ते मिळवू शकतात. नवाज शरीफ़ यांना बडतर्फ़ करून लष्करप्रमुख थेट भारताशी तडजोडीचा पवित्रा घेऊ शकतात. भारताच्या काही अटी व मागण्या मान्य करून, राहिल शरीफ़ सत्ताधारी होऊ शकतात. आपण पाकला युद्धापासून वाचवल्याचेही श्रेय ते घेऊ शकतील.

या आठवड्याच्या मध्यापासू्न पाकिस्तानची भाषा त्यामुळेच नरम झाली आहे. त्याची कारणे पाकिस्तान अंतर्गत उलथापालथ अशीच असू शकतात. खरेच आमनेसामने युद्ध झाले, तर पाकिस्तानचा टिकाव लागू शकत नाही, याची राहिल शरीफ़ यांना खात्री आहे. शिवाय एकूणच सगळे जनरल भ्रष्टाचारात आळसावले असल्याने, त्यापैकी कोणालाही युद्ध नको आहे. कारण युद्धात नुसता पराभव वाट्याला येणार नसून, बहुतांश पाक जनरल्सना आज उपलब्ध असलेली चैन त्यागावी लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच पाक राजकारणी व पत्रकारांना युद्धाची खुमखुमी असली, पाक सेनाधिकार्‍यांना युद्ध अजिबात नको आहे. त्याचे दुष्परिणामही नको आहेत. त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे नागरी सरकारला हटवून लष्कराने सत्ता हाती घेणे. मात्र त्यामुळे भारताला रोखून धरता येणार नाही. उरीनंतर काही कठोर कारवाई केल्याचे भारतीयांना दिसावे लागेल. त्यासाठी सईद हाफ़ीज, मौलाना अझर वा दाऊद, सलाहौद्दीन यांना तुरूंगात डांबण्याचा निर्णय नवे लष्करी प्रशासक घेऊ शकतील. क्वचित जागतिक मागणी म्हणून जैश, तोयबावर बंदी लागू केली जाईल. किंवा अगदी यापैकी एकदोघांना भारताच्या हवाली करण्याचाही सौदा होऊ शकेल. आणखी महिन्याभरात तशा काही हालचाली झाल्या, तर नवल वाटण्याचे कारण नाही. किंबहूना आमसभेतील सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर अमेरिकेने जिहादी छावण्या उडवा, असा स्पष्ट इशारा दिलेला बघता, काही मोठे पाकिस्तानात घडू घातले असल्याचा संकेत मिळतो. असे सौदे पडद्याआड होत असतात आणि त्यात तिसर्‍याच कुणाची तरी मध्यस्थी असू शकते. मात्र गेल्या चारपाच दिवसातील पाकिस्तानचा उतरलेला नूर, असे काही घडत असल्याचा इशारा देत आहेत. पाकच्या पंतप्रधान शरीफ़ यांच्यासह बहुतांश राजकीय नेत्यांचे मौन अतिशय सुचक आहे.

7 comments:

  1. भाऊ, पण जर राहील शरीफ यांनी सत्ता ताब्यात घेतली तर केरी लुगर बिल लागू होईल ना? त्यामुळे सत्ता ताब्यात घेण्यापेक्षा आताच्या नागरी सरकारवर अंकुश ठेवतील. जे सध्या चालू आहेच.

    ReplyDelete
  2. राहील तो राहील काय करील ???

    ReplyDelete
  3. पाकिस्तानी कुणीही 'शरीफ' नाही.
    भारताला सतत सावधच राहावे लागेल.

    ReplyDelete
  4. हिंदीमध्ये एक कहावत आहे,लातों के भूत बातोंसे नही मानते!

    ReplyDelete
  5. - सध्या पाकची आर्थिक स्थिती सध्या जेमतेम आहे. अजुनही गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही आणि निर्यातीवर ताण बर्‍यापैकी आहे.
    - राहिल शरीफ यांनी सत्ता ताब्यात घेतल्यास -
    --- आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर ताण आणखी वाढतील
    --- आधीच एकाकी पडलेल्याला पाकिस्तानला चीनही खुलेआम मदत करतांना दहादा विचार करेल.
    --- देशांतर्गत वाढत जाणारा महागाई/बेरोजगारीचा ताण आणि खालावणारी आर्थिक स्थिती यांतील समतोल साधणे अत्यंत कठीण होत जाईल. मंदीसदृश परिस्थितीसुद्धा उद्भवू शकेल.
    --- बलूच आणि सिंध येथे आणखी धुरळा उठायला अत्यंत पोषक वातावरण निर्माण होईल.
    --- भारताला आयते कोलीत हातात दिल्यासारखे होईल.
    --- युद्धाशिवाय पर्याय उरणार नाहीत अशा परिस्थितीकडे वाटचाल सुरू होईल.. किंबहुना ते अपरिहार्य ठरेल.

    अर्थात् हे सगळे माझे विचार आहेत, असेच होईल असे काही नाही. पण अगदीच मूर्ख वा सत्तापिपासू नसलेत तर राहिल शरीफ सत्ता सध्यातरी बळकावणार नाहीत. आणि तसे केलेच तर तो आत्मघात ठरेल.

    ReplyDelete