Friday, October 28, 2016

वरूण गांधीवरचे आरोप

varun gandhi के लिए चित्र परिणाम

सध्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना विधानसभांचे वेध लागलेले आहेत. त्यातही ज्यांचे जिथे राजकीय क्षेत्र आहे, तिथे त्यांचे भवितव्य गुंतले असल्याने, त्यांना बाकीच्या जगात काय घडते आहे त्याच्याशी कर्तव्य राहिलेले नाही. म्हणूनच सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश राज्यात सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाच्या घरगुती भांडणाला सर्वाधिक महत्व प्राप्त झाले आहे. पण त्याच संदर्भातील भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यावर घोंगावणार्‍या वादळाला कोणी फ़ारसे महत्व देताना दिसत नाही. भाजपाचे खासदार होण्यापुर्वी वरूण गांधी यांच्या काही गोष्टी उघड करणारे एक प्रकरण बाहेर आले आहे. आम आदमी पक्षातून बाहेर हाकलले गेलेल्या प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी हा गौप्यस्फ़ोट केला आहे. कुठल्याशा लष्करी साहित्य खरेदीशी संबंधित हा मामला असून, त्यातील एका वादग्रस्त दलालाच्या सहवासात वरूण गांधी असल्याचे आरोप आहेत. किंबहूना अशा दलालाकडे जी कागदपत्रे मिळाली, ती वरूणनेच दिलेली असावीत असाही आरोप आहे. पण ती खुप जुनी आहेत आणि भाजपात त्यांनी येण्यापुर्वीचा विषय आहे. मजेची गोष्ट म्हणजे त्यावर कॉग्रेसचे प्रवक्तेही फ़ारसा गदारोळ करताना दिसत नाहीत, की भाजपाचे प्रवक्तेही वरूणच्या बचावाला पुढे आलेले दिसत नाहीत. २००९ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी उमेदवार म्हणून बोलताना वरूणने चिथावणीखोर भाषण केल्याचा कल्लोळ माजवण्यात आला होता. तेव्हा मायावतींनी मुख्यमंत्री असल्याच्या अधिकारार वरूणला तुरूंगात डांबण्यापर्यंत मजल मारली होती. तेव्हाही कोणी भाजपावाला वरूणच्या बचावाला आलेला नव्हता. नंतर त्या वादग्रस्त भाषणाचे काय झाले, त्याचा शोध कोणाला घ्यावासा वाटला नव्हता. आजचे प्रकरण गंभीर असुनही त्यात कोणी लक्ष घालायला राजी दिसत नाही. यात काही चमत्कार आहे काय? की त्याचा उत्तरप्रदेश विधानसभेशी संबंध आहे?

तीनचार महिन्यापुर्वी विधानसभेच्या निवडणूकीचे उत्तरप्रदेशात पडघम वाजू लागले. तेव्हा भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, अशी चर्चा चाललेली होती. त्यात वरूण गांधी यांचेही नाव घेतले जात होते. पण कोणीही भाजपावाला त्यावर शब्द बोलत नव्हता. आताही कोणी ही भानगड आल्यावर बोलत नाही. जणू वरूण गांधी भाजपात असून नसल्यासारखे आहेत. अर्थात आपले नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतले जावे, अशी वरूणचीच अपेक्षा होती. मात्र त्याला पक्षातून प्रतिसाद मिळाला नाही. वरूणच्याच काही पाठीराख्यांनी तसे मोठमोठे फ़लक उतरप्रदेशात अनेक भागात झळकवले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही. तिथून मग ते नाव मागे पडले. पण वरूण गप्प राहिल की काही गडबड करील, त्याचा अंदाज कोणालाही नव्हता. आजही आपल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीबद्दल भाजपाने मौन पाळलेले आहे. म्हणूनच वरूणच्या हालचालींना महत्व आहे. त्याचा आणि ताज्या भानगडीचा काही संबंध असावा काय? कारण बाकीच्या पक्षात विसंवाद असताना भाजपाला जिंकण्याची उत्तम संधी चालून आलेली आहे. म्हणून पक्षात गटबाजी वा बेबनाव भाजपाला परवडणारा नाही. अशावेळी वरूणची महत्वाकांक्षा बाधक ठरण्याचा धोका कोणी नाकारू शकत नाही. त्याला वेसण घालण्यासाठी ही भानगड बाहेर आणली गेली असेल काय? कारण अशी कागदपत्रे व पुरावे अकस्मात भूषण व यादव यांच्याकडे कुठून पोहोचली, याविषयी शंका आहेत. काही काळापुर्वी हे पुरावे संबंधिताने पंतप्रधान, संरक्षणमंत्री इत्यादींना पाठवलेले होते. पण त्याविषयी कुठली कारवाई झालेली नाही. प्रकरण मोदींच्या कारकिर्दीतले नाही. युपीएच्या कालखंडातील आहे. मग भाजपा सरकार त्याविषयी हालचाल कशाला करत नाही, असाही सवाल विचारला गेला आहे. प्रकरणाला वाचा फ़ोडली गेली असली तरी अनेकांचे त्याविषयीचे मौन चकित करणारे आहे.

वरूण गांधी आपल्या आईमुळे भाजपात आला हे उघड आहे. पण त्याचा ओढा मुळातच आपल्या घराण्याकडे आहे. ज्या दिवशी त्याने राजकारणात प्रवेश केला त्याच दिवशी काकू सोनिया गांधींनी त्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या. वेळोवेळी वरूण आपल्या काकू व चुलत भावंडांना भेटायला गेल्याच्याही बातम्या आलेल्या आहेत. मात्र त्याच्या आईने कधी तिकडे वाट वाकडी केली नाही. वरूणचे पिता संजय गांधीच इंदिराजींचे वारस होते आणि अपघाती निधनामुळे तो वारसा राजीव गांधींकडे गेला. त्यामुळे विचलीत होऊन वरूणची आई मनेका गांधी यांनी घर सोडले, तेव्हा वरूणचा जन्मही झालेला नव्हता. पण या दोघा जावांमध्ये पटले नाही. संजयची अमेठीची जागा आपल्यालाच राखीव असावी, असा मनेकांचा आग्रह होता. पण तो फ़ेटाळून इंदिराजींनी तिथे राजीवना उभे केले आणि वारसही बनवले. त्यानंतर पुढल्या म्हणजे इंदिराहत्येनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राजीव विरोधात मनेका अमेठीतून लढल्या व पराभूत झाल्या होत्या. असे हे जुनेच भांडण आहे. पण वयात आल्यावर वरूणने चुलत घराशी संपर्क राखलेला होता. सहाजिकच भाजपामध्ये त्याच्याविषयी शंकेचे वातावरण असले तर नवल नाही. मात्र आयता मिळणारा खासदार यापेक्षा वरूणला पक्षात कधी महत्व मिळाले नाही. तरीही नेहरूंचा वारसदार म्हणून त्यालाही राजकीय महत्वाकांक्षा असेल तर नवल नाही. म्हणूनच त्याने सर्व रस्ते खुले ठेवलेले असावेत. पण म्ह्णूनच त्याला भाजपातही शंकेने बघितले जात असणार. शिवाय नेहरूवादाच्या विरोधात जाणार्‍या पक्षाने नेहरूंच्याच वारसाला उत्तरप्रदेशची धुरा देण्याचा विषय येत नाही,. तरीही वरूणने काही चतुराई केलेली होती. त्याच्याच परिणामी सध्याची भानगड उघड करण्यात आलेली असेल काय? कारण जे पुरावे समोर आलेले आहेत, ते विरोधकांपेक्षा सरकारी गोटातून आलेले वाटतात.

संरक्षणमंत्री व पंतप्रधान कार्यालयात असलेले पुरावे वेगळ्या गोटातून समोर आणले गेल्यावर काहूर माजवले जाणार आणि वरूणची बोलती बंद होणार; असा त्यामधला डाव आहे काय? त्याला आगामी विधानसभा निवडणूकीतून बाद करण्यासाठीच हे खेळ चालले असावेत काय? तसे नसते तर भाजपाला बदनाम करण्यासाठीच पुराव्यांचा वापर होऊ शकला असता. पण तसेही करणे अशक्य आहे. कारण नाव भाजपा खासदाराचे असले तरी खरेदीचा विषय युपीएच्या कारकिर्दीतला आहे. म्हणजेच लक्तरे धुतली गेली तर युपीए व पर्यायाने कॉग्रेसचीच धुतली जाणार. बहुधा म्हणूनच भाजपा खासदाराचे प्रकरण असूनही कॉग्रेस प्रवक्ते व नेत्यांनी त्याविषयी बोलायचे टाळले आहे. तर भाजपाने वरूणला आपला बचाव मांडण्यासाठी एकाकी सोडून दिलेले आहे. म्हणजे इतके मस्त पुरावे समोर आणूनही प्रकरण गाजण्याची कुठलीही लक्षणे नाहीत. मग ज्याने कोणी हे पुरावे समोर आणायला मदत केली, त्याचा नेमका हेतू काय असू शकतो? वरूण गांधीचे पंख छाटण्यापलिकडे त्यातून काहीही साध्य झालेले दिसत नाही. बालंट अंगावर आलेला माणूस कुठल्याही मोठ्या पदासाठी दावा करू शकत नाही. कारण जिथे जाईल तिथे त्याला खुलासेच देत बसावे लागणार. तीच पाळी वरूणवर आणण्यासाठी भाजपाच्याच सरकारी गोटातून हे पुरावे भूषण व यादव यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले असतील काय? कारण ही भानगड चव्हायावर आणून अन्य काहीही साध्य झालेले दिसत नाही. त्यातून राजकीय गदारोळ झालेला नाही, की आरोप प्रत्यारोपाची धुमश्चक्री उडालेली नाही. वरूणच्या बाबतीतले असेच एक प्रकरण आठवते? ललित मोदीनेही काकू सोनियांचा संदेश घेऊन वरूण आपल्याला लंडनमध्ये भेटल्याचा गौप्यस्फ़ोट केला होता. तसाच काही प्रकार या पुराव्यामागे तर नसेल ना? ज्यात वरूणला बळी देऊन सोनियांना गोवण्याचा खेळ चालू आहे काय?

(२३/१०/२०१६)

1 comment: