Monday, February 13, 2017

आपण यांना पाहिलंत का?

Image result for kejari mamta

कालपरवा दोन हजाराच्या नव्या पण खोट्या नोटा पकडल्या गेल्याची बातमी वाचली. योगायोग असा, की बाजारातल्या खोट्या नोटा व काळापैसा खतम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या कठोर पावलाला अवघे तीन महिने पुर्ण होत असताना, ह्या नोटा पकडल्या गेल्या आहेत. भारताच्या हद्दीवरच बांगलादेशातून इथे आणल्या जात असताना त्या पकडल्या गेल्या. त्यामध्ये नव्या नोटांच्या १७ गोष्टी जशाच्या तशा नक्कल करण्यात आल्या असल्या, तरी पकडल्या गेल्या. कारण त्यासाठी वापरला गेलेला कागद योग्य दर्जाचा नव्हता. बाकीच्या तपशीलात पडण्याची गरज नाही. खोट्या नोटा संपलेल्या नाहीत वा संपणार नाहीत. यात खोट्या नोटा कुठून आल्या वा किती होत्या त्यालाही महत्व नाही. त्या कुठे पकडल्या गेल्या त्याला महत्व आहे. त्या बांगलादेशातून भारतात आणल्या जात असताना पकडल्या गेल्या. जिथे पकडल्या गेल्या तो प्रदेश बंगालचा आहे. योगायोग असा, की नोटाबंदीच्या विरोधात सर्वाधिक आवाज उठवणार्‍या ममता बानर्जी त्याच बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना मात्र त्या खोट्या नोटांची भिती वाटलेली नाही. त्यांनी त्याविषयी एक शब्द बोलणे आवश्यक मानलेले नाही. खरे तर गेल्या महिनाभरात ममता बानर्जी यांच्याकडून फ़ारसे काही ऐकू आलेले नाही. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा झाल्यापासून आकाशपाताळ एक करणार्‍या ममतांना, आता अकस्मात कशामुळे गप्प बसणे अगत्याचे वाटते आहे? अर्थात त्या एकट्याच नाहीत. गेल्या आठवडाभरात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही अकस्मात थंडावलेले आहेत. त्यांचीही कुठे बातमी नाही. मागल्या दोनतीन महिन्यात वाहिन्या व टिव्हीच्या बातम्यांची अर्धीअधिक जागा व्यापलेल्या या दोघांना काय झाले आहे? अलिकडे त्यांचे कुणालाच कॅमेराच्या माध्यमातून दर्शन होऊ शकलेले नाही.

भारतात वा महाराष्ट्रात दुरदर्शन सुरू झाले, तेव्हा आरंभीच्या काळात एक कार्यक्रम आठवड्यात हमखास दाखवला जायचा. हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या त्या कार्यक्रमाचे नाव होते, ‘आपण यांना पाहिलंत का?’ कारण ज्या व्यक्ती हरवल्या असायच्या आणि पोलिसांना शोध घेऊनही सापडायच्या नाहीत; त्यांच्या शोधात सामान्य जनतेने मदत करावी, म्हणून त्यांचे फ़ोटो दाखवले जायचे. सध्या ममता व केजरीवाल असेच हरवलेत किंवा बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी अशीच जाहिरात द्यावी काय? कारण दोनतीन महिन्यात त्यांनी अवघा देश बुडाला आणि देशभरची जनता खड्ड्यात गेली, म्हणून काहुर माजवले होते. आता ती सर्व समस्या संकटे संपली असे त्यांना वाटते काय? नसेल तर त्यांनी मौन धारण करून बेपत्ता व्हायचे कारण काय? की नोटाबंदीची समस्या संपली असे त्यांना म्हणायचे आहे? ममताची गोष्ट वेगळी आहे. त्यांना बंगाल बाहेर आपले हातपाय पसरायचे होते, म्हणून त्यांनी गदारोळ केला होता. नोटाबंदी मागे घेऊन जुन्याच नोटा चालवण्याचा त्यांचा आग्रह होता. तो अमान्य झाल्यामुळे त्यांचे हातपाय आपटणे चालू होते. पण त्याचा उपयोग झाला नाही, म्हणून भोकांड पसरल्यासारखे रडणे चालू होते. पण नोटाबंदीची मुदत संपली आणि दोन आठवड्यात त्यांचा आवाज बंद झाला होता. त्याचे कारण ताज्या पकडलेल्या खोट्या नोटांमध्ये तर सामावलेले नाही ना? कारण या खोट्या नोटा पाकिस्तानात छापल्या जातात आणि बंगलादेश वा नेपाळ मार्गे भारतात पाठवल्या जात असतात. त्या भारतात दाखल होण्याची एकच जागा आहे. त्यांची आवक सुरू झाली म्हणून तर ममता शांत झालेल्या नाहीत ना?

बंगालमध्ये कालीचक नावाचे एक मोठे गाव आहे. ८० टक्के खोट्या नोटा पाकिस्तान तिथूनच भारतात पाठवते, असा आरोप आहे. अशा गावातील पोलिस ठाण्यात त्याच भानगडी अधिक नोंदलेल्या असणार हे वेगळे सांगायला नको. तर अशा गावात काही महिन्यांपुर्वी मोठी दंगल उसळली आणि त्यात पोलिस ठाणेच पेटवून देण्यात आले होते. त्याविषयी गाजावाजा होऊ दिला गेला नाही. वाहिन्यांचे कॅमेरे तिथे पोहोचण्यापुर्वीच डागडुजी व रंगरंगोटी करून ती जाळपोळ झाकली गेली होती. ममतांना त्या कालीचकविषयी वाटणारी ‘ममता’ आणि नोटाबंदीनंतरची आगपखड यांचा काही संबंध आहे काय? जिथून खोट्या नोटा येतात, त्या गावातले पोलिस ठाणे जाळले गेल्याचे ममतांना दु:ख नाही आणि खोट्या नोटा पकडण्यासाठी सरकारने पाऊल उचलले, तर त्यांना संताप आला. आता पुन्हा खोट्या नोटा छापल्या जात आहेत आणि त्यांची भारतात आवक सुरू झाल्याने ममता समाधान पावल्या आहेत काय? नसेल, तर त्यांनी ओरडा कशाला बंद केला आहे? बंगालच्या चहामळ्यात कामगार उपाशी मरतात, रोजगार संपला असा आक्रोश करणार्‍या ममता थंडावल्या कशाला? रोजगार पुन्हा सुरळीत झाला म्हणून, की खोट्या नोटांचा प्रवाह पुन्हा सुरू झालाय म्हणून? माणसे किती बदमाश असतात ना? आपल्या हेतूला पुण्य़ चिकटवून राजकारणात कशी दिशाभूल केली जात असते, त्याचा हा नमूना आहे. गेला महिनाभर ममतांनी मोदींना शिव्याशाप दिल्याचे कुठे कानी आले नाही. जणू ही महिला बेपत्ता होऊन गेली आहे. तशीच कहाणी दिल्लीचे केजरीवाल यांची आहे. ४ फ़ेब्रुवारीपर्यंत सतत टिव्हीवर झळकणारा हा माणुस, नंतर दोन दिवसांनी कुठल्या कुठे बेपत्ता झाला आहे. योगायोग असा की ४ फ़ेब्रुवारीला पंजाब व गोव्यातील मतदान संपले आहे आणि नेमक्या त्याच दोन राज्यात केजरीवालांचा पक्ष निवडणुका लढवित होता.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी व मतलब साधण्यासाठी राजकीय नेते कसे कुठल्याही विषयात राईचा पर्वत करतात, त्याचा हा दाखला आहे. नोटाबंदीपासून अखंड बोंबा ठोकणारे केजरीवाल आता गप्प आहेत. निवडणूकीचा प्रचार करताना त्यांना देशातल्या प्रत्येक विषयाची चिंता होती. आता निवडणूकीचा हेतू संपला व प्रचारकार्य संपले, तर त्यांनाही कुठलाच विषय महत्वाचा वाटेनासा झाला आहे. रोज आपल्या टिव्हीवर दिसणारी अशी माणसे घरची होऊन जातात. ती दिसली नाही तर चुक्चुकल्यासारखे वाटते. त्यांच्याविषयी काळजी वाटू लागते. नोटाबंदीनंतर पुढे सरसावलेल्या या दोन्ही नेत्यांची म्हणूनच काळजी वाटते. ते खरोखरच सुखरूप आहेत ना? की आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वकाही लोकहिताचे निर्णय घेत आहेत, अशी त्यांची समजूत झाली आहे? ममतासोबत नोटाबंदीवर पत्रकार परिषद घेऊन प्रचवन देणारे राहुल गांधी अजून हातपाय आपटत आहेत. म्हणजेच अजून तरी मोदींनी लोकहितासाठी काहीही केलेले नसावे. तसे असते, तर राहुलही शांत झाले असते. पण तसे झालेले नाही. राहुलनी ममताची साथ सोडली तरी अखिलेशला सोबत घेऊन शंखनाद चालूच ठेवलेला आहे. मग केजरीवाल व ममता थंडावले कशाला? कंटाळले की आळसावले आहेत? कुछ तो गडबड आहे. अर्थात केजरीवाल यांना आता आपण दिल्लीचे मुख्यमंत्री असल्याचे आठवलेले असावे. किंवा दिल्लीचा किल्ला डागडुजीला घेतला असावा. कारण आणखी दोन महिन्यात दिल्लीच्या तीन महापालिकांसाठी मतदान व्हायचे असून, त्यात आपली पत किती शिल्लक आहे, त्याचा पुरावाच केजरीवाल यांना द्यावा लागणार आहे. तिथे अपयश आले तर त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याचा धोका आहे. कारण अवघी दिल्ली त्याच तीन महापालिकात विभागली गेलेली आहे. ती केजरीवाल नाटकाची खरी कसोटी असणार आहे.

2 comments:

  1. sadhya Uddhav Thakerey yanche dekhil tech chalale aahe.

    ReplyDelete
  2. भाऊ,उद्धव ठाकरे नोटबंदीवरून इतके का तापले आहेत? त्यांची महापालिकेसाठी केलेली बेगमी वाया तर गेली नसेल ना? अगदी कॉंग्रेस,हार्दिकसारख्यांत्या समर्थनाची गरज भासणे केविलवाणे वाटते.आता बाळासाहेबांसारखे बुलंद नेतृत्व नसल्याने भा.ज.प. वाले पूर्वीच्या अदबीने वागणार नाहीत हे ओघाने आलेच.

    ReplyDelete