Saturday, June 24, 2017

अरबी सुरस कथा



लोकांना अल जजीरा नावाची वृत्तवाहिनी ठाऊक असेल. ती वाहिनी अरबी समर्थन करणारीही वाटेल. पण व्यवहारात ती वाहिनी पाश्चात्य माध्यमांना शह देण्यासाठी न्युयॉर्कच्या हल्ल्यानंतर सुरू झाली. तेव्हा सगळीकडून अरबी हल्लेखोर व अल कायदाचा गवगवा झालेला होता. कुठल्याही अरबी वा मुस्लिम देशामध्ये तशा प्रचाराचा प्रतिवाद करणारी यंत्रणा नव्हती. अशावेळी कतार या देशाने पुढाकार घेतला आणि अल्पावधीतच अल जजीरा नावाची अरबी वृत्तवाहिनी सुरू केली. अरबी देशात तिचा जम बसल्यावर तिचे इंग्रजी भावंड सुरू झाले. बीबीसी वा सीएनएन अशा पाश्चात्य माध्यम साम्राज्याला धक्का देण्याचा मनसुबा घेऊनच, ही नवी यंत्रणा उभी करण्यात आली होती. आता ती वाहिनी वा तिचे नेटवर्क इतके प्रभावी झाले आहे, की ती वाहिनी बंद करावी अशी मागणी चार अरबी देशांनी कतारकडे केली आहे. त्यात सौदी अरेबियाचाही समावेश आहे. माध्यमाची ताकद किती प्रभावी असते, त्याची प्रचिती यातून येऊ शकते. पश्चीम आशियात सौदी अरेबिया हा सर्वात मोठा तेलसंपन्न देश मानला जातो. म्हणूनच त्याच्या श्रीमंतीपुढे इतरांनी गुडघे टेकावेत अशी तिथल्या सुलतानांची अपेक्षा असते. पण त्यांना इराणच्या शिया सत्ताधीशांनी कधी दाद दिली नाही व कतार हा सुन्नी देश असूनही सौदीपुढे झुकला नाही. अलिकडल्या काळात तर कतारने आपल्या तेलाच्या पैशातून इतकी प्रगती केली, की नुसत्या तेलाच्याच पैशावर ऐषाराम करणार्‍या सौदीला आता जाग आलेली आहे. कारण सुन्नी वहाबी जगाचे नेतृत्व करण्यासाठी कतारने कंबर कसली आहे. त्यातून सौदी व अन्य अरबी सुलतानशाही देशांचे धाबे दणाणले आहे. तितकीच तिथे धर्माचे नाव पुढे करून हुकूमशाही गाजवणार्‍यांची झोप उडाली आहे. कारण कतारचा सुलतान अरबी व पाश्चात्य वर्चस्ववादाला आव्हान द्यायला उभा ठाकला आहे.

कतार म्हटल्यावर चटकन लक्षात येणार नाही. पण भारतातला वादग्रस्त चित्रकार फ़िदा हुसेन नक्कीच आठवेल. हिंदू दैवतांची विकृत चित्रे काढल्याने त्याच्यावर खटले दाखल करण्यात आले, तेव्हा त्याने भारत सोडुन पळ काढला होता. दिर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्याने भारतीय न्यायालयांचा ससेमिरा टाळण्यासाठी अन्य देशात आश्रय घेतला होता. त्याला कतारने आपले नागरिकत्व बहाल केलेले होते. अर्थात फ़िदा हुसेन तसा खुपच निरूपद्रवी म्हटला पाहिजे. कतारच्या सुलतानाने जगातल्या कुठल्याही खतरनाक दहशतवादी व जिहादींना आपल्या देशात आश्रय दिला आहे. तालीबान वा अल कायदा यांचे जगात कुठे अधिकृत कार्यालय नव्हते. पण असे खुले कार्यालय उघडण्याची मुभा त्यांना कतारच्या सुलतानाने दिलेली होती. जगातल्या अनेक बंदी घातलेल्या जिहादी संघटनांचे घातपाती कतारमध्ये उजळमाथ्याने वावरत असतात. त्यात जसे इसिसचे लोक आहेत, तसेच अलकायदा वा इतरही संघटनांचे हिंसाचारी आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली सौदीचे सुलतान शरणागत होत असताना कतारने मात्र जगातल्या कुठल्याही महाशक्तीला दाद दिलेली नाही. म्हणूनच कुठलाही जिहादी असो, त्याला कतार आश्रयस्थान वाटते. सहाजिकच घातपाती राजकारणात कतारने पैसा व अन्य मार्गाने जिहादींना आपल्या मित्र गोटात ठेवलेले आहे. त्यांचा वापर मोठ्या खुबीने अन्य अरब सुलतान व राजेशाहीच्या विरोधात केला आहे. म्हणूनच कतार हा सौदी व अन्य अरबी मुस्लिम देशांना डोकेदुखी बनला आहे. अशा सुन्नी देशांच्या आघाडीने कतारला आपला शत्रू मानले आहे व त्याच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्याला शह देण्यासाठी कतारने तुर्कस्थानला आपला मित्र करून घेतले आहे. थोडक्यात सुन्नी व वहाबी इस्लामी आघाडीत दुफ़ळी माजली आहे. कदाचित ती युद्धाचा भडका उडवू शकेल.

कतार हा सुन्नी वहाबी अरबी देश आहे, आकाराने छोटा असला व त्याचे तेलाचे उत्पन्न कमी असले, तरी आलेला पैसा त्याने विविध उद्योग व पायाभूत विकासामध्ये गुंतवून आपली स्थिती मजबूत केली आहे. उलट सौदी अरेबियाच्या सुलतानांनी आपल्या रयतेला मोठमोठ्या अनुदानातून ऐषाराम शिकवलेला आहे. विकासामध्ये पैसा गुंतवला नाही, तर लोकांनाही तेलाच्या आयत्या पैशावर मौजमजा करण्याची सवय लावली आहे. कतार म्हणूनच सौदीपेक्षा प्रगत अरबी देश मानला जातो. एका बाजूला अशा रितीने पैशाची गुंतवणुक करून कतारने आपल्याला आधुनिक बनवतानाही वहाबी शुद्धता राखलेली आहे. म्हणूनच आळसावलेल्या सौदी सत्तेला तो आव्हान देऊ शकला आहे. आता हे वितुष्ट विकोपास गेले असून, कतारने शियापंथीय इराण व हिजबुल्ला यांनाही हाताशी धरलेले आहे. एका बाजुला शियांना हाताशी धरायले आणि दुसरीकडे सुन्नी कट्टरपंथाचेही नेतृत्व करायचे; अशी दुटप्पी राजनिती खेळत कतारने अमेरिकन, रशियन व युरोपियन राजकारण्यांनाही पेचात टाकलेले आहे. पण ही दोन अरबी देशातील सत्ता स्पर्धा दिवसेदिवस पश्चीम आशियातील वेगळाच संघर्ष बनू लागला आहे. दोन आठवड्यापुर्वी आखाती देशांची आघाडी वा सुन्नी आघाडीतील देशांनी कतारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या देशाशी होणारे सर्व व्यापारी व अन्य व्यवहार थांबवले आहेत. ती कोंडी फ़ोडण्यासाठी तुर्कस्थानने कतारला जीवनावश्यक माल पुरवठा करण्यात पुढाकार घेतला आहे. या वादामध्ये कतार सोबत राहिल तो आपला शत्रू; अशी भूमिका सौदीच्या राजांनी घेतली असल्याने कदाचित अरबस्थानात नवे युद्ध छेडले जाण्याची चाहुल लागली आहे. त्या देशात भारताचे आठ लाखाहून अधिक नागरिक कामधंद्याच्या निमीत्ताने स्थायिक झालेले असल्याने त्यांना माघारी येण्याची सुचना भारत सरकारने दिलेली आहे.

कतारची कोंडी जाहिर केल्यावर आखाती आघाडीने त्याच्याकडे तेरा मागण्यांची यादी दिलेली आहे. त्यातली एक मागणी अल जजीरा नावाची वृत्तवाहिनी बंद करण्याची आहे. तसेच अनेक जिहादी संघटनांचा आश्रय बंद करण्याचीही मागणी आहे. पण त्यापेक्षाही महत्वा़ची मागणी म्हणजे विविध जिहादी मानल्या जाणार्‍या खतरनाक फ़रारी लोकांना, त्यांच्या देशाच्या हवाली करण्याचीही मागणीही समाविष्ट आहे. जगातल्या कुठल्याही जिहादींना कतारने नेहमी आश्रय व अभय दिले आहेच. प्रामुख्याने ज्यांनी सौदी, बहारीन वा अमिराती सुलतानांच्या विरोधात बंडखोरी केली, त्यांनाही कतारने आश्रय दिला आहे. हे बंडखोर आपापल्या देशातील सुलतानशाही उलथून पाडण्याच्या कारवाया करीत असतात. खरे वितुष्ट बहुधा त्याच शेवटच्या मागणीत लपलेले आहे. कतारच्या सुलतानाने आपल्याखेरीज अन्य अरबी सुलतानांच्या बुडाखाली सुरूंग लावलेले आहेत आणि त्यामुळेच हा नवा पेचप्रसंग अरबस्थानाला भेडसावतो आहे. यात इजिप्तचाही समावेश आहे. कारण इजिप्तला भेडसावणार्‍या मुस्लिम ब्रदरहुड या जिहादी संघटनेलाही कतारने अभय दिले आहे. आर्थिक मदतही चालविली आहे. आणखी एका आठवड्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या भाऊबंदकीमध्ये घुसमट झाल्यामुळे पाकिस्तानचे माजी सेनाप्रमुख जनरल राहिल शरीफ़ मायदेशी पळून आले आहेत. पाकसेनेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी आखाती सेनेचे म्होरकेपण पत्करलेले होते. आता त्या आघाडीने युद्धाचा पवित्रा घेतला तर त्यात पाकसेनेलाही उतरण्याची मागणी केली जाईल. त्यात उडी घेतली तर पाकच्या सीमा राखण्यासाठी कोणी मागे उरणार नाही अशी पाकची चिंता आहे. आजवर अरबी पैशावर मौज करणार्‍या पाक सेनेला व सरकारला आता अरबी सुरस कथेचे चटके बसू लागले आहेत.

4 comments:

  1. वा भाऊ, खूपच सुंदर

    ReplyDelete
  2. भाउ छान माहिती.मराठीत अस कोणी समजावुन सांगत नाही.बातम्यातुन नक्की काय चाललय ते कळत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. Kharach Khoop chaan maitree. Maratheet ase clear naahi sangat kuni..

      Delete
  3. खुप छान विश्लेषण ........धन्यवाद .......चित्रामध्ये "अरब" च्या जागी "मुस्लीम" असं असतं तर जास्त वास्तविक झालं असतं ...!!!

    ReplyDelete