Saturday, September 3, 2016

शिकारी खुद यहा शिकार हो गया


kejri cartoon के लिए चित्र परिणाम
आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील एका मंत्र्याला लैंगिक प्रकरणामुळे जावे लागले आहे. पण त्या निमीत्ताने जो धुरळा उठला आहे, त्याने लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळण्यापेक्षा नवनवे प्रश्न मात्र समोर येत चालले आहेत. प्रथम ह्या मंत्र्याने कुणा महिलेची अडवणूक करून शोषण केल्याचा गवगवा होता. मग पंधरा दिवस ही सीडी केजरीवाल यांच्याकडे पडून असल्याची बाब समोर आली. आता त्याची सरकारसह पक्षातून हाकालपट्टी होत असताना, केजरीवाल यांचा निकटवर्ति नेता माजी पत्रकार आशुतोष याने, त्या बडतर्फ़ मंत्र्याची तरफ़दारी करणारा प्रदिर्घ लेखच लिहीला आहे. किंबहूना केजरीवाल यांना मंत्र्याचा गुन्हा काय, असाही उलता सवाल केला आहे. एकूणच आप पक्षाच्या अब्रुचे धिंडवडे निघत आहेत. त्याला अर्थातच त्या पक्षाचे नेते व प्रवक्तेच जबाबदार आहेत. कारण आरंभापासून त्यांनी साधनशुचितेच्या इतक्या गप्पा मारल्या, की हेच काय ते आजच्या जगातील साधूसंत असल्याचा आभास निर्माण केला गेला. एकदा तुम्ही जगातल्या प्रत्येक सामान्य वा प्रतिष्ठीत व्यक्तीच्या चारित्र्यावर सवाल विचारू लागलात, मग तुम्ही व्यक्तीगत जीवनात तितक्या सभ्यतेचा पावित्र्याचा अवलंब करता, असे मानले जात असते. शिवाय तसे मानले जाऊ लागले, मग त्यानुसार जगण्याची तुमच्यावर सक्ती होत असते. त्यातून सुटका नसते. केजरीवाल यांच्या पक्षाने स्वत:साठी हा अजब सापळा तयार करून घेतला आणि आता त्यात घुसमटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. जितके म्हणून ते आपली अब्रु झाकण्याचा प्रयत्न करीत असतात, तितके अधिकच उघडे पडत जात आहेत. कारण कुठलेही ढोंग फ़ार काळ चालत नाही. कधी ना कधी ते उघडे पडणे अपरिहार्य असते. काही लोक आपणच एक एक वस्त्र सोडून जगासमोर नागडे होत असतात. आप नावाचा पक्ष दुसर्‍या गटातला आहे.

राजकारणात प्रवेश करताना केजरीवाल यांचे अण्णा हजारे यांच्याशी मतभेद झाले होते. तेव्हा केजरीवाल एक वाक्य बोलले होते. ‘हमने अन्ना को बताया, किचड साफ़ करना है, तो किचड मे उतरनाही पडेगा.’ खरेच आहे गटार वा घाण साफ़ करणार्‍याला घाणीत उतरावेच लागते. घाण साफ़ करण्यासाठी गटारात उतरणे आणि ती साफ़ करताना काही घाण अंगाला लागणेही स्वाभाविक असते. पण इथे घाणीत उतरून घाण साफ़ करण्यापेक्षा त्यातच गडबडा लोळण्याची स्पर्धाच केजरीवाल यांच्या सहकार्‍यांनी सुरू केली होती. अन्य प्रस्थापित राजकीय पक्षातले जे दोष व त्रुटी केजरीवाल सतत दाखवत राहिले, त्यांचेच अधिक घाणेरडे अनुकरण त्यांच्याच पक्षात राजरोस सुरू झाले. बाकीच्या पक्षांना आपली नितीमुल्ये वा भूमिका यांना तिलांजली द्यायला काही वर्षे उलटावी लागली. पण आम आदमी पक्षाला काही महिनेच भ्रष्ट व बेताल व्हायला पुरले. पहिल्यांदा सत्ता हाती घेताना विविध मतदारसंघात जनसभा भरवून मतदाराच्या इच्छा जाणुन घेण्याचे नाटक केजरीवाल यांनी छान रंगवले होते. उमेदवार निवडताना प्रथम विभागातील लोकांना विचारून व तक्रारी मागवून छाननीही केलेली होती. पण सत्तेची चटक लागल्यावर केजरीवाल यांच्यासह अन्य कुठल्याही आप-नेत्याला अशा गोष्टींची गरज वाटेनाशी झाली. कुणालाही पक्षात घेण्यापासून उमेदवारी व अधिकारपदे देण्यापर्यंत बेछूटपणाचा अवलंब केजरीवाल करत गेले. अन्य राजकारण्यांपुढे आपली औकात किती, असा सवाल लोकांशी सवाद साधताना करणार्‍या केजरीवाल यांनी, बंगला गाडी नको, पैसे नकोत इत्यादी नाटके केलेली होती. पण पक्के बहूमत मिळाल्यावर अधिकाधिक सहकार्‍यांना सत्ता व अधिकारपदे देण्यासाठी केजरीवाल व्यस्त राहिले. आमदारांचे पगार पाचपट करण्यापर्यंत त्यांनी आपल्या शब्दांना व आश्वासनांना हरताळ फ़ासला.

आता केजरीवाल म्हणतात, कोण गुन्हा करील हे त्याच्या कपाळावर लिहीलेले नसते. मग तेच बाकीच्या पक्षातील नेत्यांना व पक्षालाही लागू होत नाही काय? इतरही पक्षातले भ्रष्ट नेते आधीपासून भ्रष्ट नसतात. संधी मिळाल्यावरच कोणी भ्रष्ट होतो, हे सत्य समजायला केजरीवाल इतकी नाटके करीत होते काय? निवडून येण्याची शक्यता असलेला, कुठलेही चारित्र्य नसलेला व कसाही माणुस बघून त्याला दुसर्‍यावेळी उमेदवारी देताना केजरीवाल आपल्याच आश्वासनांना तिलांजली देत होते. तेव्हा विभागातील मतदारांना विश्वासात घेण्याची त्यांना गरज वाटली नाही. तिकीटे पैसे घेऊन वाटली गेल्याचा जाहिर आरोप अनेकांनी केला होता. आताही पंजाबमध्ये तेच चालू असल्याचा आरोप अनेकजण करीत आहेत. कालपर्यंत पंजाबातील पक्षाचा समन्वयक असलेल्या नेत्याला तडकाफ़डकी बडतर्फ़ करण्यात आले आहे. त्यानेही असाच गंभीर आरोप केला आहे. संजय सिंग वा आशुतोष यासारखे दिल्लीकर नेते पंजाबात येऊन इच्छुक उमेदवारांकडून लाखांची रक्कम उकळत असल्याचा त्याचा आरोप आहे. आशुतोष याला तारणतरण जिल्हातील उमेदवारांनी सोळा लाख रुपये रोख दिले आणि त्याची कुठलीही पावती मिळालेली नाही, असा आरोप आहे. ह्या सर्व गोष्टी इतक्या सार्वजनिकपणे निदान अन्य ‘भ्रष्ट’ पक्षांच्या बाबतीत फ़ारशा ऐकायला मिळत नाहीत. कुठल्याही अन्य पक्षापेक्षा केजरीवाल यांच्या या स्वच्छ पक्षाने अतिशय वेगाने भ्रष्ट व कलंकित होण्याचा विक्रम करून दाखवला आहे. पुराणात मायावी राक्षसांच्या गोष्टी ऐकायला मिळतात. आधुनिक जमान्यातील आम आदमी पक्ष त्याच मायावी राक्षसाचा अवतार असावा अशी शंका येते. कुठल्याही क्षणी हे लोक आपला चेहरामोहरा बदलून वाटेल ते करायला सज्ज असतात. वाटेल तसे खोटे बोलतात आणि काहीही बिनबुडाचे आरोपही करत असतात.

खरे तर हे केजरीवाल यांचेच पाप आहे. पहिल्यावेळी शपथ घेताना त्यांनी त्याच मंचावरून आपल्या सहकार्‍यांना एक आवाहन केलेले होते. कोणी लाच मागत असेल तर नकार देऊ नका. लाच द्यायचे मान्य करा आणि आपापल्या मोबाईलवर त्या देण्याघेण्याचा संवाद रेकॉर्ड करून स्टिंग ऑपरेशन करा. त्यानंतर त्यांच्या पक्षात एकाहून एक मान्यवंर स्टिंग मास्टर्स जमा होत गेले. आशिष खेतान वा आशुतोष हे माध्यमातले अशी कुलंगडी रंगवून पेश करणारेच पत्रकारिता सोडून राजकारणात दाखल झाले. त्यातले खेतान तर केवळ चोरट्या कॅमेराने चित्रणे करून भानगडी चव्हाट्यावर आणण्यासाठीच ख्यातनाम आहेत. अशा लोकांचा गोतावळा जमा झाला, मग त्यांच्यावर सुद्धा कोणीतरी नजर रोखून असेलच ना? राजकारणातल्या वा सार्वजनिक जीवनातल्या लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठीच ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावली; त्यांना त्यांच्याच सापळ्यात कधीतरी अडकावे लागणारच ना? मग बाल महिलाकल्याण मंत्री सुदीपकुमार कुठे फ़सला ते लक्षात येऊ शकते. हे स्टिंग बहुधा त्याच्याच कुणा पक्ष सहकार्‍याने केलेले असावे. ते केजरीवाल यांच्याकडे आल्यावर त्यांनी दोन आठवडे जपून ठेवले आणि मंत्र्याशी सौदेबाजी करून बघितली. तो बधला नाही आणि चित्रणाच्या प्रति माध्यमांकडे पोहोचल्यावर केजरीवाल यांनी बडतर्फ़ीची बोंब ठोकलेली असावी. सुदीपशी सौदा यशस्वी झाला असता, तर त्याची हाकालपट्टी झाली नसती, की त्याला पक्षातूनही हाकलले नसते. उलट आज आशुतोष जो बचाव मांडत आहे, तोच बचाव केजरीवाल व त्यांच्या पक्षातर्फ़े समोर आला असता. पण सुदीपने केजरीवालाना दाद दिली नाही, म्हणून त्याचा बळी घेण्यात आला आहे. हळुहळू अशा अनेक भानगडी चव्हाट्यावर येतीलच. पाच वर्षाची मुदत संपण्याआधीच केजरीवाल आणि टोळीची शिकार त्यांच्याच सापळ्यात अडकून झालेली असेल. म्हणतात ना?

शिकारी खुद यहा शिकार हो गया

2 comments:

  1. छान भाऊ केजरीवाल भंपक आहे दिल्लीकरांना आपल्याच गाढवपणाचे भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत

    ReplyDelete
  2. राजकारणात येवढा खालचा स्तर भारतीयानी कधी अनुभव ला नाहि.यवढा शिकला सवरलेला,आय आय टी केलेला माणुस असा वागु शकतो यावर विश्वासच बसू शकत नाहि. विकास आणी स्वच्छ कारभार या आश्वासनावर निवडून आलेले हे सोडून बाकी सर्व करतात

    ReplyDelete