Sunday, June 18, 2017

चतुर बनियाची गोष्ट



आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंत्र्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत सहमतीच्या कामाला जुंपून पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा इतर कामाला लागलेले आहेत. त्यात अमित शहांनी अकस्मात तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आरंभला आहे. त्याच्या प्रारंभीच त्यांनी मुंबईत येऊन शिवाजी पार्क येथील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून अनेकांना थक्क केले आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांनीच घडवून आणलेली शिवसेना भाजपा युती मोडीत काढण्याचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे, त्यानेच असे पाऊल उचलण्यामागे काहीतरी राजकारण नक्की असले पाहिजे. अमित शहा हे कमी बोलणारे, पण अतिशय धुर्तपणे राजकारण खेळणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहिर केले होते. पण मुंबईत येताच त्यांनी सुरूवात बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन केली. ज्या माणसावर आणि त्याच्या पक्षाविषयी शिवसेनेचे नेतृत्व हल्ला करण्याची संधी सातत्याने शोधत असते, त्यानेच शिवसेनेच्या संस्थापकाविषयी असा आदर व्यक्त करण्यातून लोकांच्या शुभेच्छा मिळवण्याचा हेतू लपून रहात नाही. अलिकडेच अमित शहांनी महात्मा गांधींविषयी काढलेले उद्गार अतिशय वादग्रस्त ठरलेले होते. महात्मा गांधी हा अत्यंत चतुर बनिया होता, असे शब्द अमित शहांनी वापरलेले होते. त्यात किती तथ्य आहे, देवजाणे! पण खुद्द अमित शहा अतिशय चतुर बनिया असल्यासारखे राजकीय व्यवहार करीत असतात. महाराष्ट्रातली युती मोडून त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार खुबीने केलेला आहे. सेनेला आपल्याच बालेकिल्ल्यात नामोहरमही केले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या लाखोलीकडे काणाडोळा करतानाच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळापासून राज्याचा दौरा सुरू करण्याचे राजकारण समजून घेणे भाग आहे.

जेव्हा अमित शहांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीत जाऊन भेट घेण्याची घोषणा केली, तेव्हा त्याला राष्ट्रपती निवडणूक हे कारण असल्याचे मानले गेले होते. पण आता असे दिसते, की त्यांनी राज्याचा तीन दिवसांचा दौरा आखलेला आहे. राष्ट्रपती निवडणूकीसाठी राज्यव्यापी दौरा करण्याची गरज नसते. कारण इथे केवळ खासदार व आमदारच मतदार असतात. त्यांची वा त्यांच्या पक्षनेत्यांची भेट घेणे पुरेसे असते. मग तीन दिवस अमित शहा महाराष्ट्रात काय करणार आहेत? ते कोणाकोणाला भेटणार आहेत? कसल्या सभा घेऊन संघटनेचे कोणते काम उरकणार आहेत? नेमका हाच मुहूर्त साधून राज्याचे मुख्यमंत्री द्वेवेंद्र फ़डणवीस यांनी एक पिल्लू सोडून दिलेले आहे. शेतकरी संपाचे निमीत्त करून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सतत भाजपाला व मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींना आपल्या टिकेचे लक्ष्य केलेले होते. त्याची सांगता सेनेने राज्यात भूकंप होण्याची डरकाळी फ़ोडून केली, असेच वाटत होते. पण ती डरकाळी शांत होण्यापुर्वीच फ़डणवीस यांनी सरकार पडल्यास मध्यावधीला सज्ज असल्याचे आव्हान देऊन, सर्वांना चकीत केले आहे. कारण या दोन मित्र पक्षातले भांडण संपवण्यासाठीच अमित शहा मातोश्रीवर जाणार असल्याची सर्वांची समजूत होती. पण फ़डणवीसांनी तिलाच छेद दिला. मग अमित शहा आणि मुख्यमंत्री यांच्या वागण्याची सांगड कशी घालायची? त्यातला एक भाग म्हणजे राष्ट्रपती निवडणूकीत मतांसाठी अमित शहांनी मातोश्रीची पायरी चढण्याने पक्षप्रमुख सुखावतात. असे अनेकदा झालेले आहे. पदरात काहीही पडत नसले तरी कोणीही अन्य पक्षाचा नेता मातोश्रीवर आल्याने उद्धवराव सुखावलेले आहेत. तीच कृती आता अमित शहांनी करायची ठरवली आहे. पण प्रत्यक्षात राज्यामध्ये शिवसेनेची उरलीसुरली शक्ती संपवण्याचा डाव खेळला जाणार आहे.

दोन महिन्यापुर्वी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील संघटनेची नव्याने बांधणी करण्याची मोहिम भाजपाने हातात घेतली होती,. ती तयारी कुठवर आली, त्याचीच छाननी करायला शहा इथे आलेले आहेत. अशी तयारी निवडणूका घेण्याची पुर्वतयारी असते, हे वेगळे सांगण्याचे कारण नाही. म्हणूनच शहा मातोश्रीवर जाण्याला महत्व नसून, ते राज्यात कसली छाननी करतात, ही बाब महत्वाची आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मध्यावधीची पुडी सोडलेली आहे. शहा यांना तयारी पुरेशी वा सुसज्ज वाटली, तर मध्यावधी घेण्याच्या निर्णयाला चालना मिळू शकेल. ती मध्यावधी विधानसभा निवडणूक होण्यासाठी विधानसभा बरखास्त करावी लागेल, तो निर्णय जुलै वा ऑगस्ट महिन्यात झाला, तर पुढल्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मतदान होऊ शकेल. त्याच दरम्यान गुजरात विधानसभेची मुदत संपत असल्याने दोन्ही राज्यातले मतदान एकाच वेळी होऊ शकेल. त्यासाठीच पक्ष संघटनेची सज्जता तपसायला अमित शहा इथे पोहोचले आहेत. मागल्या महापालिका व स्थानिक निवडणूकात भाजपाने शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यांना खिंडार पाडलेले आहे. नेतॄत्वाच्या धरसोड वृत्तीमुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. अशा लोकांना भाजपाच्या पंखाखाली आणण्याचे डावपेच अमित शहा खेळत असतील, तर नवल नाही. एका बाजूला शिवसेनेच्या नेतृत्वाला किंमत द्यायची नाही आणि दुसरीकडे सतत बाळासाहेबांविषयी आदर व्यक्त करून सहानुभूती मिळवायची, असा हा दुहेरी डाव आहे. त्या सापळ्यात शिवसेनेचे नेतृत्व सातत्याने फ़सत गेले आहे. तोंडाने अपशब्द बोलायचा नाही. पण कृतीने प्रतिस्पर्ध्याना घायाळ करायचे, अशी या ‘चतुर बनिया’ची रणनिती राहिली आहे. या दौर्‍यात आगामी मध्यावधी निवडणूकीचा आराखडा तयार करूनच अमित शहा दिल्लीला परतणार, असा याचा अर्थ आहे.

विधानसभेच्या मतदानाच्या वेळी सेनेला मिळालेली मते आणि नंतरच्या वायफ़ळ बडबडीतून गमावलेल्या लोकांच्या सदिच्छा, याचे आकडे विविध मतदानातून समोर आले आहेत. त्याचाच फ़ायदा घेण्यासाठी भाजपा आता सज्ज झालेला आहे. त्यातून अमित शहांनी मुंबई महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. विविध स्थानिक निवडणूकांचे आकडे व त्याचा तौलनिक अभ्यास केल्यावर मध्यावधी भाजपाला बहूमतापर्यंत घेऊन जाण्याचा आत्मविश्वास शहांना वाटला, तर मध्यावधी अपरिहार्य आहे. त्याबाबत विरोधक व मित्रांना गाफ़ील ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेस आज लढण्याच्या मनस्थितीत नाहीत. तर शिवसेना हे एकमेव आव्हान आहे. पण सेनेची सुत्रे हल्ली वाचाळांच्या हाती गेली असून, त्याचेही तितके आव्हान उरलेले नसल्याची खात्री शहांना झालेली दिसते. अन्यथा त्यांनी मध्यावधीची रणनिती आखली नसती. मुख्यमंत्र्यांनी श्रेष्ठींशी बातचित केल्याशिवाय असे काही बोलायची हिंमत केली नसती. राष्ट्रपती निवडणूक संपली, मग शिवसेनेची मित्रपक्ष म्हणून भाजपाला असलेली गरज संपुष्टात येणार आहे. सहाजिकच येत्या लोकसभेपुर्वी विधानसभेत बहूमत मिळवले, तर लोकसभेतही सेनेशी तडजोडी करण्याई गरज भाजपाला उरणार नाही, स्वबळावर आजपेक्षा अधिक भाजपा खासदार लोकसभेत निवडून आणण्याचा मार्ग खुला होऊ शकेल. म्हणूनच अमित शहांचा दौरा आणि मुख्यमंत्र्यांची मध्यावधीची भाषा, गमतीची नाही. ती दुरगामी राजकीय खेळी भासते. त्यातच अन्य पक्षातले ५० च्या आसपास आमदार भाजपात उडी घ्यायला उत्सुक असल्याने मध्यावधीत पक्षाचे बहूमत आणि नंतरच्या लोकसभेत स्वबळावर लढण्याची सज्जता, असे दोन डाव यशस्वी होऊ शकतात. ते ओळखले नाही, तर पुढल्या राजकारणात शिवसेनेचा अखिलेश, मायावती वा राहुल गांधी होण्याला पर्याय उरत नाही.

7 comments:

  1. अतिशय योग्य 👆

    ReplyDelete
  2. मध्यावधी डिसेंबरमध्ये जरी झाल्यातरी शेनेला ६०-७० जागा मिळतील. शेनेला अस्तित्त्वासाठी कोणाचेही सोयरसुतक नाही. वेळ पडली तर मुस्लीम लीग-समाजवादी-राष्ट्रवादीचं मैद्याचं पोतं मायनस दादा - दाऊद गॅंग हे सगळे मदतीला येतील कारण मुंबई-ठाण्यात शेना राहीली तरच ह्या सगळ्या मदतीला उत्सुक असलेल्यांचे अस्तित्त्व राहणार आहे.बीजेपी ९० जागांमध्येच अडकेल. राष्ट्रवादी-कॉंग्रेस वेगळे लढूनही १०० पर्यंत जातील. जात महत्त्वाची ठरेल या निवडणूकीत. सत्ता गेल्याने कासावीस झालेले जातीचे मतदार राकॉ ला १०० जागा देतील. फडणवीसांनी काम दृष्ट लागण्यासारखे केले पण महाराष्ट्र हे शाफुआं चा पुरोगामी जातीयवादी राज्य आहे.

    ReplyDelete
  3. जरा देखो तो बुर्दवरी मेरे लाला की वो दुष्मन को भी थंडी मार देते है
    नही करते गराहीक पर वार कभी डंडे का जो गुस्सा आही जाता है तो डंडी मार देते है

    ReplyDelete
  4. शेवटचे वाक्य. आशा आहे सत्तेत भागिदारी असणाऱ्या पक्षाच्या सल्लागार मंडळींना योग्य संदेश दिसावा. नाहीतर, ही मंडळी पायावर कुऱ्हाड मारायची का कुऱ्हाडीवर पाय मारायचा, हा सल्ला मात्र ही मंडळी देतील

    ReplyDelete
  5. Bjp's calculation is that they will definitely secure 160 to 180 seats , Sena will get 30 to 40 , congress will get 30 to 40 and balance will be for ncp and some independents​.

    ReplyDelete
  6. सेने विषयी काय बोलावे "चला हवा येऊ द्या" पेक्षा विनोदी प्रकरण झ्हाले आहे हे☺

    ReplyDelete
  7. Sena will get 80 & above seats in 2019

    ReplyDelete