मागल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश राज्यात मोठे सत्तांतर झाले. त्याचाच पुर्वी एक भाग असलेल्या उत्तराखंड या छोट्या राज्यातही त्याचीच पुनरावृत्ती झाली. देशाच्या कानाकोपर्यातून कॉग्रेस जणू नामशेष होत असताना, पंजाबमध्ये कॉग्रेसला लक्षणिय यश मिळाले आणि तिथे मित्रपक्ष असलेल्या अकालीसह भाजपाचा धुव्वा उडाला. तर अन्य दोन छोट्या राज्यात कॉग्रेसने कष्ट केलेले नसले तरी चांगले यश मिळाले. पण तत्परता दाखवली नाही म्हणून सत्ता गमवावी लागली. मात्र याविषयी कुठलीही प्रतिक्रीया दिल्याशिवाय राहुल गांधी विश्रांती वा अन्य कारणास्तव परदेशी निघून गेले. याच दरम्यान महाराष्ट्रातही स्थानिक संस्थांच्या निवडणूका झाल्या होत्या आणि त्यातले पदाधिकारी निवडताना मोठी उलथापालथ झालेली आहे. चार प्रमुख पक्षातील कोणीही अन्य कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करीत सत्तापदे बळकावली आहेत. त्यात २५ पैकी १० जिल्ह्यात भाजपाने स्वबळावर वा अन्य कुणाच्या तरी मदतीने अध्यक्षपदे संपादन केलीत. तर शिवसेनेसह कॉग्रेस व राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी पाच अध्यक्षपदे पदरात पाडून घेतली आहेत. यापैकी कुठल्या जिल्ह्यात कोण कोणाच्या सोबत आहे, त्याचे तपशील चकीत करणारे आहेत. पण त्यात जाण्याची गरज नाही. मागल्या आठवड्यात गोव्यात सर्व बिगरकॉग्रेस पक्षांना हाताशी धरून भाजपाने कॉग्रेसला सत्तेबाहेर बसवले. त्याची देशव्यापी चर्चा झाली. त्यातली नैतिकता वा घटनात्मकता असे विषय चघळले गेले. पण त्याचीच जशीच्या तशी पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विविध जिल्हा परिषदांमध्ये झालेली आहे. याचा अर्थ इतकाच, की कुठल्याही पक्षाला आता सत्ता संपादन करताना नैतिकता वा वैचारीक भूमिकेचा विधीनिषेध राहिलेला नाही. ते फ़क्त वाहिन्यांवर चर्चा करण्याचे मुद्दे बनून गेले आहेत. बाकी सोयीनुसार सर्व काही करायची मोकळीक आहे.
अशा स्थितीत देशभर भाजपा कशामुळे जिंकतो आहे, किंवा कुठलाही पक्ष वा नेता भाजपाच्या मदतीला कशाला धावतो आहे, असा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. पण त्याचे तार्किक उत्तर शोधण्यात बहुतांश विश्लेषक अपेशी ठरलेले आहेत. कारण त्यांना राजकीय वास्तविकता बघायची नाही. सध्या देशात मोदींची लाट असल्याचे एक सरसकट थातूरमातूर उत्तर त्यासाठी दिले जाते. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशात कॉग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष कॉग्रेस होता आणि त्याच्याच अवतीभवती बाकीचे पक्ष व एकूण राजकारण घोटाळत होते. मागल्या दोन दशकात कॉग्रेसचा क्रमाक्रमाने र्हास होत गेला असून, मध्यंतरी पुरोगामी मुखवटे चढवून त्या पक्षाला तात्पुरते जीवदान दिले गेले. पण मध्यवर्ति वा प्रमुख राष्ट्रीय पक्ष असण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्याच कॉग्रेस हळुहळू गमावत गेली. त्याचा लाभ उठवणारा कोणी अन्य राजकीय पक्ष वा चतूर आक्रमक नेता उपलब्ध नसल्याने, कॉग्रेस टिकलेली होती. नरेंद्र मोदींच्या उदयाने ती उणिव भरून काढली आणि मागल्या लोकसभेत कॉग्रेस खर्या अर्थाने व्हेंटीलेटरवर गेली. त्यातून तिला शुद्धीवर आणण्याचे कुठलेही प्रयास त्या पक्षाचे नेतृत्वाने केलेले नाहीत. त्यामुळे रिक्त झालेली जागा व्यापत मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजपा झपाट्याने पुढे आला आहे. सहाजिकच खंबीर समर्थ राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या गोतावळ्यात घुटमळणारे विविध पक्ष व दुय्यम नेते, भाजपाच्या मदतीला जात आहेत. किंवा त्याच्या छत्रछायेत आपले अस्तित्व टिकवण्याची पराकाष्टा करीत आहेत. ही प्रक्रीया खरे तर इंदिरा हत्येनंतर सुरू झाली होती. पण राजीव हत्येने त्याला काहीकाळ खिळ बसली. राहुल गांधींच्या हाती पक्षाची सुत्रे जाणे व त्याचवेळी मोदींचा उदय, ह्यामुळे त्या र्हासाला पुन्हा गती प्राप्त झाली आहे. नेमक्या शब्दात सांगायचे तर भाजपा आता एकविसाव्या शतकातील कॉग्रेस होऊ लागली आहे.
इशान्येकडील राज्यात कॉग्रेस पक्ष नव्हता, तर केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाशी जुळवून घेणारे नेतृत्व तिथे कॉग्रेसची झुल पांघरून सत्तेत बसलेले होते. उत्तरप्रदेशपासून अनेक राज्यातही कॉग्रेस म्हणून कार्यरत असलेले बहुतांश नेते व त्यांचा गोतावळा, आपापले स्थानिक वर्चस्व टिकवण्यासाठी राज्य वा केंद्रातील सत्तेसोबत रहात होते. आता तीच सत्ता कॉग्रेसच्या हातातून निसटली, तर त्या स्थानिक नेत्यांनी कॉग्रेससोबत सती जाण्याची अपेक्षा कोणी करू नये. त्यांनी देशाची सत्ता काबीज करणार्या व ठामपणे राबवणार्या मोदींना शरण जाण्याचा पवित्रा घेतलेला आहे. मागल्या तीनचार वर्षात भाजपाचा झालेला विस्तार बारकाईने तपासला, तर त्यात असे सगळे घटक आलेले दिसतील. जे पुर्वी कॉग्रेसमध्ये असेच शरणागत होऊन आलेले होते. म्हणूनच आता चर्चा कशी चालली आहे? मोदी विरोधात सर्वपक्षीय एकजूट! दोनतीन दशके मागे गेलात, तर अशीच भाषा इंदिरा, राजीव वा कॉग्रेस विरोधातील एकजुटीची असायची. हे सत्तांतर वा पक्षांतर नसून स्थित्यंतर आहे. कालपर्यंत देशात तिरंगी कॉग्रेस होती, आता भगवी कॉग्रेस तिची जागा व्यापते आहे. त्यात कॉग्रेसची पुरोगामी भाषा बोलणारे आता हिंदूत्वाचे वेदही पठण करू लागतील. हे अकस्मात घडलेले नाही. दोनतीन दशके हे चालू होते. सर्कशीत एका झुल्यावरून झुकांडी देऊन दुसर्याकडे झेपावणारा कसरतपटू जसा काही काळ अधांतरी असतो, तशी स्थिती मागल्या दोन दशकात राजकारणाची होती. त्यातला मोदींचा भाजपा हा झुला हाती येईपर्यंत सर्व अधांतरी वाटत होते. आता ती कसरत पुर्णत्वास जाताना दिसत आहे. त्यात मागे सोडून दिलेला झुला काही काळ हेलकावे खात रहातो. तशी कॉग्रेस आणखी काही वर्षे व निवडणूकात हेलकावताना दिसेल. पण त्या झुल्याकडे कोणी झेपावण्याची शक्यता संपलेली आहे. भाजपाचा विस्तार झालेला नाही किंवा त्याला मोठे यश मिळालेले नाही. राहुलकृपेने राष्ट्रीय राजकारणात निर्माण झालेली पोकळी, भाजपा व्यापत गेला आहे. आता भगवी कॉग्रेस उदयास आलेली आहे आणि तिरंगी कॉग्रेस अस्तंगत होते आहे.
No comments:
Post a Comment