Saturday, March 11, 2017

एक्झीट पोलचा गोंधळ

UP exit poll के लिए चित्र परिणाम

बुधवारी उत्तरप्रदेशच्या शेवटच्या फ़ेरीचे मतदान संपले आणि सर्व पाच राज्यात विविध संस्थांनी घेतलेल्या एक्झीट पोलचे आकडे गुरूवारी समोर आले. प्रत्यक्ष मतदान महिनाभर चालू होते आणि तेव्हाच मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीशी बोलून केलेली ही चाचणी असते. त्यामुळेच अशी आकडेवारी वा अंदाज अधिक बरोबर येतात असा समज आहे. अगदी कालपरवा मुंबई महापालिकेच्याही अशाच एक्झीट पोलचे आकडे बहुतांशी खरे ठरलेले आहेत. त्यामुळेच आता पाच विधानसभांची चाचणी खोटी म्हणायला काही कारण नाही. पण इथे अनेक संस्थांनी चाचण्या घेतल्या असून, त्यात प्रत्येकाचे आकडे भिन्न आहेत. अर्थात प्रत्येक चाचणीत तोच आकडा समोर यावा असे कोणी म्ह्णणार नाही. पण दोन टोकाचे आकडे समोर आले, मग शंका निर्माण होतात. उदाहरणार्थ इंडियाटुडे या वाहिनीसह एक्सिस या संस्थेने चाचणी केली, त्यात भाजपाला उत्तरप्रदेशात निर्णायक बहूमत मिळताना दाखवले आहे. तर अन्य चाचण्या भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून दाखवत आहेत. किमान ते कमाल शंभरचा फ़रक पडतो, तेव्हा कोणाला खरे मानावे, असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडणे स्वाभाविक आहे. कारण मोठा आकडा मान्य केला तर उत्तरप्रदेशात बाकीच्या सर्वच पक्षांची धुळधाण उडवून भाजपा जिंकणार आहे. किमान आकडा घ्यायचा तर सत्ताधारी असलेल्या समाजवादी पक्षाने लोकसभेचे अपयश धुवून काढत भाजपाशी चांगली टक्कर दिलेली दिसते. किंबहूना भाजपाचा अश्वमेध रोखल्याचेही श्रेय अखिलेश व राहुल गांधी यांना द्यावे लागेल. पण कुठला आकडा तुम्ही ग्राह्य धरता, यावर सर्व काही अवलंबून आहे. अशा बातम्या व अंदाज लोकांना खेळायला प्रोत्साहन देणार्‍या असतात, म्हणूनच चाचण्या केल्या जातात आणि त्या लोकप्रियही झाल्या आहेत. आणखी काही तासातच खरी मतमोजणी होईल, तेव्हा कोणाचा अंदाज खरा ठरला ते उघड होईलच.

दरम्यान अशी अटीतटीची निवडणूक ही अक्षरश: लढाईच असते आणि म्हणूनच नुसत्या अंदाजावर होणार्‍या राजकीय चर्चा अतिशय वांझोट्या असतात. राजकीय पक्ष जिंकायला मैदानात उतरलेला असल्याने तो कधीच पराभव मान्य करायला तयार नसतो. सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष मतमोजणी सुरू असताना मागे पडणार्‍या पक्षाचे नेतेही युक्तीवाद करून अजून चित्र बदलू शकते, असे छातीठोकपणे सांगत असतात. त्याहीनंतर मोजणी संपुन पराभवावर शिक्कामोर्तब झाले, तरीही कुठला पक्ष हार मानायला तयार नसतो. लोकांनी पराभूत केले हे मान्य असले, तरी आपली भूमिका वा धोरणे चुकल्याचे कुठलाही पक्ष मान्य करत नाही. त्यापेक्षा असे नेते व पक्ष विरोधकांनी मतदाराची दिशाभूल केल्यामुळे थोड्याफ़ार मतांनी पराभूत झाल्याचे युक्तीवाद करीत असतात. ही प्रत्यक्ष मोजणीच्या वे्ळची परिस्थिती असेल, तर नुसत्या अंदाजावर कुठला पक्ष आधीच पराभव कशाला मान्य करील? पण वाहिनीवरच्या उतावळ्यांना अंदाज आणि निकाल यातला फ़रकच कळत नसतो. म्हणूनच ते अंदाजे पराभव होणार्‍यांना जाब विचारत असतात आणि अंदाजे जिंकलेल्यांना बधाई देत असतात. त्यातून एक मजेशीर चित्र बघायला मिळत असते. पण अशाही चर्चा अभ्यासकांसाठी उपयुक्त असतात. कारण त्यातून अनेक राजकीय संकेत मिळत असतात. उदाहरणार्थ गुरूवारी अंदाज व्यक्त होण्याच्या कालावधीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्ष पराभवच मान्य करून टाकला. कॉग्रेस सोबत आपली आघाडी असून आम्हीच सरकार बनवू असे सांगत असतानाच, राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी प्रसंगी मायावतींना सोबत घेण्याचा संकेत दिला आहे. ही बाब महत्वाची असते. त्यातून अखिलेशने आत्मविश्वास कसा गमावला आहे, त्याचीच साक्ष मिळालेली आहे. उलट याही स्थितीत मायावतींनी मात्र तशी शक्यताच नाकारली आहे.

मायावती सतत आपणच एकहाती सरकार स्थापन करणार असल्याच्या गोष्टी करीत आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा वास्तवापेक्षाही आपल्या कार्यकर्ते व पाठीराख्यांना धीर देण्यासाठीच असल्याचे विसरता कामा नये. गेल्या लोकसभेतही मायावती अशीच भाषा बोलत होत्या. पण लोकसभेत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. अखिलेशची कहाणी वेगळी नाही. पाच वर्षापुर्वी त्यालाही बहूमताची खात्री नव्हती आणि निकालापुर्वीच त्यांनी जागा कमीच पडल्यास कॉग्रेसशी हातमिळवणी करण्याची भाषा केलेली होती. यावेळी तर समाजवादी पक्षाची स्थिती प्रथमपासूनच दयनीय होती. पावणेतीन वर्षापुर्वी लोकसभेत त्या पक्षाला अवघ्या पाच जागा जिंकता आल्या. त्यापैकी दोन ठिकाणी खुद्द मुलायम जिंकले आणि तीन जागी त्यांच्याच कुटुंबाचे सदस्य निवडून आले. कुटुंबाबाहेरचा कोणीही पक्षातर्फ़े निवडून येऊ शकला नाही. अखिलेश सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष तेव्हाच मिळालेली होती. त्यानंतर पक्षाची संघटना व कारभार सुधारण्य़ाची संधी होती. पण काहीही होऊ शकले नाही आणि अखेरच्या काळात आपल्या पक्षाची गुंडगिरीची असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी अखिलेशने धावपळ केली. त्यासाठी पित्यासह जुन्या नेत्यांनाही झुगारण्याची हिंमत दाखवली. पण तोपर्यंत खुप वेळ झाला होता. पक्षातला वाद आणि संघर्ष जिंकताना अखिलेश थकून गेला आणि त्यातून सावरण्यासाठी त्याला शेवटच्या टप्प्यात कॉग्रेसला शरण जावे लागले. तीच त्याच्या पराभवाची पहिली कबुली होती. आता मायावतींशी जुळवून घेण्याची भाषा त्याचेच पुढले पाऊल आहे. खरेतर अखिलेशच्या नव्या आक्रमक पवित्र्याचा देखावा माध्यमांनी उभा केला. वास्तवात तितका त्यात जोर नव्हता की जोश नव्हता. म्हणूनच त्या तरूण नेत्याचा पराभव हा माध्यमातील उतावळ्यांचा पराभव म्हणावा लागेल.

चार वर्षे आपल्या पक्षाचे सरकार चालवताना अखिलेशने गुंडगिरी वा अराजकाला आवरण्याचा कोणताही प्रयास केला नाही. लखनौ या राजधानीच्या शहराचा परिसर सोडला तर अखिलेशच्या विकासाचे कुठलेही चिन्ह कोणी दाखवू शकत नाही. ज्यांना चार वर्षे धुडगुस घालू दिला, त्यांनाच अखेरच्या चारसहा महिन्यात वेसण घातली वा पक्षातून हाकलून लावल्याच्या नाटकाने मुठभर पत्रकार व विश्लेषकांना भुरळ पडली, हे नाकारता येत नाही. ज्यांना भाजपा पराभूत होणार असल्याची स्वप्ने पडतात, त्यांना अखिलेशच्या पक्षीय शस्त्रक्रियेने भुरळ घातली होती. पण त्यामुळे सामान्य मतदार भुलला नसेल, तर फ़रक कसा पडेल? उलट मागली दोन वर्षे भाजपाने काही गाजावाजा न करता आपली तयारी चालवली होती. बुथ म्हणजे मतदानकेंद्राच्या पातळीपासून राज्यपातळीपर्यंत सुसंघटित निवडणूक यंत्रणा उभी केली व राबवली होती. बाकीच्या पक्षाचे नेते गदारोळ करत होते व नेत्यांनी सभा घेण्यापलिकडे शांतता होती. भाजपाने देखावा म्हणून मोठ्या छोट्या सभा घेतल्या. पण त्यापेक्षा अधिक जोर गल्लीबोळातल्या संघटनात्मक बाबींवर लावला होता. त्याची कुठलीही बातमी माध्यमात झळकली नाही. आता एक्झीट पोलचे आकडे बघताना अनेक पत्रकार त्या भाजपा यंत्रणेचे हवाले देत आहेत. मग त्याचा पुर्वीच उल्लेख वा बातमी कशाला आली नाही? मोदी-शहा काय बोलतात, त्यापेक्षा बुथवार संघटना व यंत्रणा मतदानाला प्रभावित करतात, हे विश्लेषकांना कधी समजू लागले? नेत्यांच्या वक्तव्यावर काहूर माजवण्याला बातमी समजणार्‍यांनी प्रत्यक्ष मतदाराला जाऊन भिडणार्‍या पक्षीय यंत्रणा व कामाची दखलही घेतली नाही. म्हणून मग अंदाज थक्क करणारे दिसतात. आता निकाल कोणाला किती चकीत करून सोडतो ते बघायचे. पण लोकसभेप्रमाणे याहीवेळी उत्तरप्रदेश भल्याभल्या अभ्यासकांना नापास करणार हे निश्चीत!

१०/३/२०१७   

No comments:

Post a Comment