काही अतिशहाणे इतके मुर्ख असतात, की त्यांना मारण्यासाठी मोठे कारस्थानही करण्याची गरज नसते. त्यांना सहजगत्या मारता येते आणि मरून गेले तरी आपण मेलोत, याचा त्यांना थांगपत्ता लागत नाही. खास करून पुरोगामी शहाण्यांची अशी अवस्था असते. तसे नसते तर गेल्या दशकात नरेंद्र मोदी इथे मोठे यश सातत्याने मिळवू शकले नसते, की त्यांना आज आपले डावपेच इतक्या सहजतेने खेळता आले नसते. उत्तरप्रदेशात मोदी मोठे बहूमत मिळवण्यासाठी संघर्ष व आटापीटा करीत असताना, तमाम पुरोगामी शहाण्यांना मोदींची नाव गोमतीमध्ये बुडत असल्याचे साक्षात्कार घडत होते. पण त्यांचा भ्रम दूर करण्यापेक्षा मोदी आपले हेतू साधण्यासाठी शक्ती खर्ची घालत होते. मोदींना उत्तरप्रदेशात बहूमत मिळवून पक्षाचा फ़क्त मुख्यमंत्री आणायचा नव्हता. तर अधिकाधिक आमदार निवडून आणून त्याच बळावर राज्यसभेत अधिक जागा संपादन करायच्या होत्या. अधिक आमदार आल्यास पुढला राष्ट्रपती आपल्या इच्छेनुसार निवडता येऊ शकेल, याकडे मोदींचे लक्ष लागलेले होते. पण एकाही पुरोगामी शहाण्याला त्या दिशेने विचारही करण्याची गरज वाटली नाही. अशा लोकांना आज मोदी काय करत आहेत व त्यातून काय साधत आहेत, त्याचा तरी थांगपत्ता कशाला लागू शकतो? ज्यांचा मोदी चुकतो, यावर शंभर टक्के विश्वास आहे, त्यांनी मोदी कुठे बरोबर ठरतो, हे समजून घेणे कदापि शक्य नाही. सहाजिकच मोदींनी आपल्याला हवे तसे डाव खेळावेत आणि त्यात प्यादी म्हणून आपल्या विरोधकांना निर्धास्तपणे वापरून घ्यावे, हा आता भारतीय राजकारणातला नियम झालेला आहे. त्यामुळेच उत्तरप्रदेशचा नवा मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची निवड कशासाठी झाली असेल, याचा वेगळ्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. पण ते काम पुरोगाम्यांना अजिबात शक्य नाही.
गेल्या दोन दशकात भाजपाने अयोध्येतील मंदिराचा विषय सोडून दिलेला आहे. तोंडाला लावण्यासाठी चमचाभर लोणचे ताटात वाढावे, तसा हा विषय भाजपाच्या जाहिरनाम्यात येत असतो. बाकी भाजपा त्यावर बोलतही नाही. पण अयोध्येतील मंदिराचा विषय दोनच गटांनी कायम जिवंत व ज्वलंत ठेवला आहे. त्यातला पहिला गट आहे पुरोगामी पत्रकार व विचारवंत, राजकारण्यांचा! तेच लोक अगत्याने त्या गोष्टीवर सातत्याने बोलत असतात आणि भाजपालाही बोलायला भाग पाडत असतात. दुसरा गट आहे विश्व हिंदू परिषदेचा! तेही अधूनमधून संधी मिळाली, मग रामजन्मभूमीचा विषय बोलत असतात. अर्थात हिंदू परिषदेचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच ते बोलत असतात. पण पुरोगाम्यांना तो विषय भाजपाला डिवचण्यासाठी हवा असतो. सहाजिकच मंदिराचे काय? असे विचारून मग भाजपावर हिंदूत्व आणण्याचा आरोप सुरू करता येतो. अशा आरोपाने आजकाल मुस्लिमही विचलीत होत नाहीत. कारण कोर्टाचा निकाल आल्याशिवाय तिथे काहीही होणार नाही, हे सामान्य मुस्लिमालाही कळलेले आहे. पण तसा विषय काढला, मग तावातावाने हिंदू परिषदवाले बोलू लागतात आणि पुरोगाम्यांना चघळायला विषय मिळतो. अशाच विहिंपप्रणित भाजपावाल्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचा समावेश होतो. अशा माणसालाच आता मोदींनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसवले असेल, तर त्यामागचा हेतू काय असू शकतो? मोदींनाही मंदिराचा विषय हवा आहे आणि विकासाची नुसती हुल दिलेली होती काय? तसे असेल तर उत्तरप्रदेशात धमाल होईल आणि २०१९ मध्ये लोकसभा जिंकण्यातच अडथळे येतील. हा धोका मोदींना कळलेला नसेल काय? असेल तर त्यांनी मंदिराचे कडवे समर्थक योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावर बसवून काय साधले? धोका तर पत्करलेला नाही ना? की त्यामागे भलताच डाव मोदी खेळले आहेत?
‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा घेऊन मागली तीन वर्षे मोदी राजकारण खेळत आहेत आणि त्यांना हिंदूत्ववादी ठरवण्याचा आटापीटा पुरोगाम्यांनी केला आहे. तर आपल्या कामातून मोदींनी कुठलाही पक्षपात होणार नाही, याची काळजी घेत पुरोगाम्यांना कुठलीही आरोपाची संधी दिलेली नाही. त्यातून मुस्लिमांच्या मनातले भय संपवण्यात मोदी यशस्वी ठरत आहेत. पण त्याचवेळी भाजपातील कडव्या हिंदू गटांना उत्साहित व उत्तेजित राखण्यासाठी मोदी अधूनमधून कबरस्तान-स्मशान असे विषय बोलून घेतात. कधी लव्हजिहाद आदी विषयावर संसदेत साग्रसंगीत चर्चा व्हायला देऊन, त्यात योगी आदित्यनाथ यांना पुढाकार देत विश्व हिंदू परिषदेची हौस भागवू देतात. स्वत:ला त्यांनी कटाक्षाने हिंदूत्वापासून दूर राखले आहे. मात्र दुसरीकडे अशा दोन्ही गटांना खेळवतानाच त्यातून मुस्लिम समुदायाला बाहेर काढण्याचाही डाव त्यांनी खेळला आहे. एकाही मुस्लिमाल उमेदवारी दिली नसताना त्यांनी मुस्लिमांची चांगली मते व प्रचंड बहूमत मिळवलेले आहे. सहाजिकच आता अन्य पक्षांपेक्षा भाजपाच मुस्लिमही निवडून आणू शकतो, असे सिद्ध केले. त्यामुळे चतुर उत्साही मुस्लिमांना भाजपात येण्यास भाग पडावे, अशी स्थिती निर्माण केली आहे. पण तेव्हाच योगी आदित्यनाथ या कडव्या हिंदूलाच सत्तेत बसवून, त्याच्यासह विहिंपच्या गळ्यात कायदा व्यवस्था राखण्याचे लोढणे अडकवले आहे. भडक बोलणे सोपे असते आणि प्रत्यक्ष कारभार ही जबाबदारी असते. सतत मंदिराच्या उभारणीवर बोलणार्या योगींच्या हाती आता सत्ता सोपवलेली आहे. त्यांनी मंदिराचा विषय हाताळायचा आहे. म्हणजे त्यावर सतत आक्रमक बोलणार्या विहींपच्या तोंडात योगी नावा़चा बोळा मोदींनी कोंबला आहे.
कोर्टात निकाल लागल्याशिवाय अयोध्येत मंदिर बांधले जाऊ शकत नाही. सहाजिकच मुख्यमंत्री होऊन तीच भाषा योगींना बोलावी लागणार आहे आणि तेच हिंदूत्वाचा चेहरा असल्याने त्यांनाच त्या विषयात संयमाची भाषा बोलावी लागणार आहे. कसरत योगींना करावी लागणार आहे आणि बदल्यात साधू-महंत व विहींपलाही मोदींना सवाल करायला जागा शिल्लक उरलेली नाही. पण दुसरीकडे पुरोगाम्यांना हिंदूत्वाच्या भयाचे हाडुक चघळायलाही मोदींनी अलगद सोपवले आहे. पुरोगामी वाचळतेने मग मुस्लिमांमध्ये अधिक भय माजवले जाऊ शकेल आणि तितकेच निराश झालेले मुस्लिम अधिकाधिक भाजपाच्या जवळ येत जातील. म्हणून तर योगींची निवड करून होताच मोदी अन्य कामात गर्क झालेले आहेत. तर निदान पुढले दोनतीन आठवडे पुरोगामी वा तत्सम वाचाळ लोक मंदिर, हिंदूत्व किंवा योगी या विषयात घुटमळत रहाणार आहेत. जितका हा विषय चघळला जाईल, तितके हिंदूंचे धृवीकरण होत राहिल आणि तेव्हाच मुस्लिमातील समंजस लोकांचा ओढा मोदींकडे वाढत जाईल. एकाच खेळीत मोदींनी संघ परिवारातील कडव्यांना शह दिला आहे आणि पुरोगाम्यांना खेळायला साधन पुरवले आहे. अर्थात सत्तेत बसलेल्या योगींना संयम दाखवणे भाग आहे आणि ते काम पुरोगामी वेसण बनून पार पाडतील. मात्र त्याच कारणाने पुरोगामी म्हणजे निव्वळ मुस्लिम लांगुलचालन, ही गोष्ट अधिक ठळकपणे समोर यायला त्यामुळेच हातभार लागत जाणार आहे. उत्तरप्रदेशच्या पलिकडे बिहार, बंगाल केरळसारख्या राज्यातल्या हिंदूंना पुरोगाम्यांकडून भाजपाकडे येण्याची स्थिती त्यातून वाढत जाणार आहे. हे पुरोगाम्यांच्या लक्षात यायला २०१९ किंवा २०२४ साल उजाडणार आहे. कदाचित तोवर संयम शिकलेले योगी आदित्यनाथ पुढले पंतप्रधान म्हणून उभारण्यात पुरोगाम्यांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावलेली असेल.
Yes, I was thinking the same. Our PM has chosen his descendent.
ReplyDelete