Wednesday, March 8, 2017

बळी तोच कान पिळी

kandahar plane hijack full story in hindi के लिए चित्र परिणाम

विसाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे १९९९ साल संपत असताना नेपाळहून भारतात परतणार्‍या प्रवासी विमानाचे तिघा अतिरेक्यांनी अपहरण केले. त्यांनी हे विमान आधी अमृतसरला उतरवून इंधनाची मागणी केली. पण भारतीय कमांडो तिथे येण्याचे भय वा्टले, तेव्हा तसेच विमान उडवून दुबईला झेप घेतली. तिथे इंधन भरून मग अफ़गाणिस्तानच्या कंदाहार विमानतळावर मुक्काम ठोकला होता. दरम्यान त्यांनी एका प्रवाश्याची हत्या दुबई येथे केली होती आणि मग प्रवाश्यांच्या सुटकेसाठी मौलाना अझहर मसूद या जिहादी अतिरेक्याच्या मुक्ततेची मागणी केली. ती मान्य झाल्यावर व तो परतल्यानंतरच प्रवाश्यांसह विमान सोडले होते. ज्या तालिबानांनी त्या अपहरणकर्त्यांना संरक्षण व आश्रय दिला, त्यांनी कमांडो कारवाई झाल्यास गंभीर परिणामांचा इशाराही दिलेला होता. तेव्हा अफ़गाणिस्तानात तालिबानांचे सरकार होते आणि नंतर काही दिवसांनी अफ़गाणी प्रवासी विमान सरकार विरोधी अतिरेक्यांनी लंडनला पळवून नेलेले होते. बदल्यात त्यांनी तालिबानांच्या कब्जात होते, अशा कैद्यांची सुटका मागितली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. कैदी सोडले नाहीत, तर एक एक प्रवाश्याला काही तासांच्या अंतराने ठार मारण्याचा इशाराही त्या अतिरेक्यांनी दिलेला होता. पण त्याला तालिबान सरकार बधले नाही. अपहरणकर्त्यांशी बोलणी करणार्‍या ब्रिटीश सरकारला तालिबानांनी साफ़ कळवून टाकले, की प्रवाश्यांना ठार मारले म्हणून आमचे काही बिघडत नाही. आम्ही कोणाही कैद्याला अजिबात सोडणार नाही. अपहरणकर्ते व विमानतळावरच्या ब्रिटीश पोलिसांनी आपसात काय ते निस्तरून घ्यावे. आम्हाला विमानाशीही कर्तव्य नाही. काही तास तमाशा चालला आणि अखेरीस विमानाचे अपहरणकर्ते निमूट ब्रिटीश पोलिसांना शरण आले. आपल्याला पुन्हा तालिबानांच्या हवाली करू नये, या अटीवर त्यांनी शरणागती पत्करली होती.

आता या गोष्टीला सतरा वर्षे उलटून गेली आहेत. त्यानंतर जगात अनेक बदल व उलथापालथी झाल्या आहेत. पण तालिबानांनी अतिरेक्यांशी सामना करण्याची हिंमत दाखवली, तशी अन्य कोणी दाखवलेली नाही. अतिरेकी वा अपहरणकर्ते यांच्यापाशी कुठलीही हिंमत नसते, ते अत्यंत भेकड असतात आणि निरपराधांना ओलिस ठेवून आपली दादागिरी करीत असतात. अशा ओलिस ठेवलेल्यांच्या जीवासाठी कुठलीही मोठी सत्ता शरणागत होते, कायदेशीर सत्तेची लाचारीच जिहादींचे खरे बळ असते. तेच काढून घेतले, तर त्यांचा धीर सुटतो आणि दमदाटी करणारेच शरण येतात; हे तालिबानांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिलेले होते. अतिरेकी कोणाला मारण्यात जर धाडस दाखवत असतील, तर त्यांना त्यापेक्षाही अधिक क्रुरतेने मारण्याची व त्यात कोणाचाही बळी जाण्याविषयीची बेपर्वाई, हाच उपाय असतो. अधिक आक्रमण इतकाच उपाय असतो. बाकी सर्व पळवाटा असतात. ओसामा बिन लादेन याच्यापाशी कुठली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती, की त्याच्या अनुयायांपाशी क्षेपणास्त्रे नव्हती. त्याची शक्ती व भेदकता सभ्य कायदेशीर सरकारांच्या दुबळेपणात सामावलेली होती. तेच मग अबु अल बगदादीच्या कारभाराचे सुत्र दिसून येईल. काश्मिरात धुडगुस घालणार्‍या जिहादी मानसिकतेचे धाडस त्यातच लपलेले आहे. त्यांना तुमच्या सेनेची वा शस्त्रांची भिती वाटत नाही, कारण तुमच्या कायदेशीर सभ्यतेचा दुबळेपणा त्यांनी ओळखला आहे. त्याच्याच बळावर हे लोक सत्तेला खेळवत असतात, हुलकावण्या देत असतात. त्यांनी कुठे सैनिकाला वा नागरिकाला ठार मारल्याचा जाब त्यांना द्यावा लागत नाही. पण सेनेने कोणाला कशाला मारले वा मारल्याशिवाय त्याला अटक करता आली असती काय, असे प्रश्न तुमचीच कायदा यंत्रणा सैनिकांना विचारत असते. हा दुबळेपणा जिहादचे खरे शस्त्र झाले आहे.

काश्मिरात पेलेट गन वापराव्या किंवा नाही? त्यातून दगड फ़ेकणार्‍यांना जखमा होऊ नयेत, असल्या चर्चा करण्यात आपण कायद्याचे राज्य शोधत बसलो आहोत. उलट नित्यनेमाने घातलेल्या धिंगाण्यामुळे लक्षावधी नागरिक परागंदा झाले, त्याचा जाब कोणी कोणाला विचारायचा? काश्मिरातून पाच लाख पंडित बेघर झालेत, त्याचा जाब आझादीवाल्यांना कोणी विचारला आहे काय? अफ़गाणिस्तान उध्वस्त होऊन गेला नि हजारो लोक मारले गेल्याचा जाब, अलकायदाला कोणी विचारलेला नाही. तर इराक सिरीयातून लक्षावधी लोक परागंदा झाले, त्यांची जबाबदारी युरोपातल्या भलत्याच देशांनी उचलायची असते. कारण ते कायदा पाळणारे देश आहेत आणि त्यांनी कुठेही जिहादी हिंसाचार माजवलेला नाही. आपल्या देशात येणारा निर्वासितांचा लोंढा थांबवण्यासाठी त्यांनी इराक सिरीयात तुफ़ान हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडली असती, तर बगदादी कधीच संपला असता. पण त्यात काही हजार नागरिक मारले जातील, म्हणून ह्या क्षेपणास्त्रांच्या मुसक्या बांधून ठेवण्यात आल्या. त्यातून बगदादी वा तत्सम लोकांना कोणता संदेश दिला जात असतो? तुम्ही निरपराधांचे बळी घ्या. त्यांना आपले सुरक्षा कवच म्हणून मरायला पुढे करा. आम्ही निमूट आपली शस्त्रे गुंदाळून तुमचे अत्याचार व हिंसाचार सहन करू. त्यातूनच अशा लोकांची हिंमत वाढत असते. जेव्हा तसे होत नाही, तेव्हाच जिहादला वेसण घातली जात असते. रशियन विमाने बेछूट हवाई हल्ले करीत सुटली आणि कोण मरतो त्याची पर्वा केली नाही, तेव्हाच बगदादीला दाती तृण धरण्याची वेळ आली आहे. मोसूलभोवती वेढा देऊन आत बसलेल्या नागरिकांची पर्वा इराकी सेनेने केली नाही, तेव्हाच बगदादीचा धीर सुटला आहे. त्याचा अर्थ इतकाच, की अशा जिहादींपेक्षाही अधिक भयंकर हिंसा करण्याची क्षमताच त्यांना वठणीवर आणू शकते. त्यांना शरणागत करू शकते.

बिळात दडी मारून बसलेला उंदीर उच्छाद करीत असतो. त्याच बिळात सगळीकडून मिरचीची धुरी सोडली, मग तडफ़डत बाहेर येतो. अन्यथा त्याला शोधण्यासाठी खड्डे करूनही बंदोबस्त होऊ शकत नसतो. पण बिळातली उंदराची निष्पाप पिल्ले मिरचीच्या धुराने घुसमटून हकनाक मरतील अशी भूतदया दाखवली, तर उंदीरच शिरजोर होऊन तुम्हाला खेळवू लागतो. बगदादी वा काश्मिरातील जिहादी त्यापेक्षा किंचीतही वेगळे नाहीत. दगड फ़ेकणार्‍यांशी संवाद करावा किंवा चर्चा करावी. त्यांच्या भावनाही समजून घ्याव्या, असली पोपटपंची करणार्‍या काश्मिरी हुर्रीयतवाल्यांना दिलेले पोलिसी व लष्करी संरक्षण आधी काढून घ्या. कोणीही त्यांच्यावर बॉम्ब फ़ेकू देत, किंवा त्यांच्यावर गोळ्या झाडू देत. सरकारने त्यांना वाचवायला जाऊ नये. मग सुरक्षा कवचातील आझादी हीच घोषणाबाजीच्या आझादीपेक्षा किती महत्वाची आहे, त्याची अक्कल येऊ शकेल. फ़ारूख अब्दुल्ला असोत किंवा कोणी मिरवैझ फ़ारूख असोत. जेव्हा महापूराने थैमान घातले होते, तेव्हा या आझादीवीरांना सैनिकांची मदत कशाला हवीशी वाटली होती? कारण त्यांच्या गमजा निष्ठूर निसर्ग चालू देणार नाही, याची खात्री होती. निसर्ग लोकशाही वा राज्यघटना मानत नाही. निसर्ग पिसाळला तर रौद्ररूप धारण करतो आणि त्याच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी चालत नाही. म्हणून तेव्हा आझादीच्या गप्पा थंडावल्या होत्या. लोकशाहीचे लाड करणारे भारत सरकार सत्तेत आहे, म्हणून आझादीचा मस्तवालपणा चालू आहे. सीमेपार सर्जिकल स्ट्राईक करताना जितकी मोकळीक सेनेला दिली, तितकीच मोकळीक काश्मिरी सीमेच्या आतही देऊन बघा. कोणाच्या नरडीतून आझादीचा शब्दही फ़ुटणार नाही. कारण तितके धाडस वा हिंमत यापैकी एकाही काश्मिरी नेत्यापाशी नाही. ते कायद्याच्या दुबळेपणावर मस्ती करीत असतात. बळी तोच कान पिळी हा त्यावरचा जालीम उपाय आहे.

६/३/२०१७

No comments:

Post a Comment