Thursday, March 16, 2017

कॉग्रेसी फ़िदायीन

Image result for manishankar aiyar

इंदिरा हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी अनेक अभ्यासू व सुशिक्षितांना आग्रहपुर्वक राजकारणात व प्रामुख्याने कॉग्रेस पक्षात आणलेले होते. त्यात चिदंबरम वा सॅम पित्रोडा यांच्याप्रमाणेच प्रशासकीय सेवेतील अभ्यासू अधिकारी मणिशंकर अय्यर यांचाही समावेश होता. त्या काळात म्हणजे १९८० शतकाच्या उत्तरार्धात अय्यर हेच राजीव गांधींची भाषणे लिहून देत असे सांगितले गेले. त्यात तथ्यही होते. काही महिन्यांपुर्वी राहुल गांधी यांच्या भाषणावर किंवा त्यांनी प्रस्तुत केलेल्या विषयांवर टिका झाली, तेव्हा एका मुलाखतीत अय्यर यांनीच आपण राजीवना कसे लिहून देत असू; ते सांगितले होते. विविध वाहिन्यांवर अय्यर बोलताना वा युक्तीवाद करताना आपण बघितलेले असेलच. अतिशय मुद्देसूद बोलणारा हा नेता, काही प्रसंगी मात्र अतिरेकी व आक्रस्ताळी होऊन जातो. सहाजिकच त्याचा तोल जाऊन भलतेसलते बोलून जातो. मागल्या लोकसभेच्या निवडणूकांपुर्वी नरेंद्र मोदींच्या कौतुकाचा डिमडिम वाजू लागला, तेव्हा असेच बेताल विधान अय्यर यांच्याकडून झाले होते आणि त्याची झळ कॉग्रेसला बसलेली होती. दिल्लीतल्या एका भव्य क्रीडागारात कॉग्रेसच्या कार्यकारिणीचे अधिवेशन भरलेले होते आणि तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अय्यर यांनी दिलेल उत्तर वादग्रस्त ठरलेले होते. मोदी तेव्हा लोकसभा प्रचाराचा मोहिमेला लागलेले होते आणि त्यांना मिळणार्‍या प्रतिसादाचे सार्वजनिक कौतुक सुरू झाले होते. अशा पार्श्वभूमीवर कोणीतरी प्रश्न विचारला होता, त्यावर चिडून अय्यर यांनी ‘वो चायवाला’ असा मोदींचा एकेरी व अपमानास्पद उल्लेख केला होता. त्यावरून खुप वादळ उठले आणि राहुलनी सर्व कॉग्रेस नेत्यांना मोदींविषयी कुठलीही प्रतिक्रीया देण्यावर निर्बंध लागू केले होते. उलट मोदींनी मग चायवाला याच शब्दाचे छानपैकी राजकीय भांडवल केलेले होते. आज तेच अय्यर काय म्हणतात?

वो चायवाला कभीभी देशका प्रधानमंत्री नही बन सकता. अगर इच्छा हो तो उसे यहा कॉग्रेस अधिवेशनके बाहर चाय बेचने की अनुमती मिलेगी, असे काहीसे विधान अय्यर यांनी केले होते. आता त्याला चार वर्षे होत आली आहेत. दरम्यान मोदींनी स्वबळावर बहूमत संपादन करून पंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारली आहे व त्याच मोदींशी कसे लढावे, असा यक्षप्रश्न सोडवताना कॉग्रेस श्रेष्ठींच्या तोंडाला फ़ेस आला आहे. कारण तेव्हा फ़क्त लोकसभा जिकंण्याचा विषय होता. आता तर देशात कुठे व कशी कॉग्रेस टिकवावी, असा प्रश्न त्या पक्षाला वा नेतृत्वाला भेडसावतो आहे. कारण एकामागून एक राज्यात कॉग्रेस नामशेष होत असून, भाजपा तिथे प्रगती करीत चालला आहे. त्याचे श्रेय प्रत्येकजण नरेंद्र मोदींनाच देतो आहे. अशा स्थितीत मोदी वा भाजपाला रोखायचे कसे, त्यावर अलिकडे अय्यर यांनी एक रणनिती स्पष्ट केली आहे. मोदी विरोधातील देशव्यापी मोठे गठबंधन म्हणजे आघाडी उभी करायला हवी आणि तसे करताना कॉग्रेसने त्या आघाडीचे नेतृत्व आपल्याच हातात रहाण्याचा हट्ट सोडून दिला पाहिजे, असा अय्यर यांचा सल्ला आहे. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे तर कॉग्रेसने म्हणजे राहुल गांधींनी पंतप्रधान पदाचा हट्ट सोडून इतर पक्षांना सोबत घेतले पाहिजे. त्यांना एकत्र करूनच भाजपाला रोखले पाहिजे, असे अय्यर यांचे म्हणणे आहे. बिहार वा उत्तरप्रदेशात जसे स्थानिक पक्षांच्या पाठीशी उभे राहून वा कमीपणा घेऊन भाजपाशी कॉग्रेसने लढत दिली, तसेच देशव्यापी वागले पाहिजे, असा अय्यर यांचा सल्ला आहे. अर्थात त्यातही काही नवे नाही. कारण वर्षभरापुर्वी बंगाल तामिळनाडूच्या निवडणुका झाल्या, तेव्हाही अय्यर त्यासाठीच आनंदी झालेले होते. त्यापैकी कुठल्याही राज्यात कॉग्रेसला आपला प्रभाव पाडता आलेला नव्हता व केरळची सत्ता गेली होती, तरीही अय्यर सुखावले होते.

बंगाल, केरळ वा तामिळनाडू अशा राज्यात सत्ता मिळाली नाही वा गमावली, तरीही अय्यर कशाला खुश होते? तर त्यांच्या मते कॉग्रेसने जिंकणे वा सत्ता संपादन करणे दुय्यम गोष्ट आहे. सदरहू राज्यामध्ये भाजपाला सत्ता मिळाली नाही वा फ़ारसे यश मिळाले नाही, याचाच कॉग्रेसला आनंद झाला पाहिजे. विषय कॉग्रेस जिंकण्याचा वा कॉग्रेसला सत्ता मिळण्याचा अजिबात नाही. तर भाजपाला सत्ता वा यश मिळू नये, असेच कॉग्रेसचे उद्दीष्ट असायला हवे, ही अय्यर यांची भूमिका आहे. कॉग्रेस पक्ष नव्याने उभारला जावा, त्याची सशक्त संघटना असावी, याच्याशी अय्यर यांना अजिबात कर्तव्य उरलेले नाही. किंबहूना तसा विचारही कॉग्रेसने करावा असे अय्यरना वाटत नाही. कॉग्रेसने सतत भाजपाला अपयशी करण्याचे व सत्तेपासून दूर राखण्याचेच धोरण राखले पाहिजे, असे अय्यर यांचे मत आहे. सहाजिकच तसे काही करताना अन्य पक्ष वा प्रादेशिक पक्षांना पाठींबा दिल्याने कॉग्रेस दुबळी झाली तरी बेहत्तर; असेही त्यांचे मत आहे. थोडक्यात आता कॉग्रेसने आपले राजकीय पुनरूज्जीवन करणे वा संघटनात्मक बाबतीत नव्याने उभारी घेण्य़ाची भूमिका अय्यर यांना मान्य नाही. आपला पक्ष उभा करण्यापेक्षा भाजपाला अपशकून करणे वा त्याच्या अपयशामध्ये कॉग्रेसने आनंद मानण्याला प्राधान्य असले पाहिजे. ही अय्यर यांची वर्षभर जुनीच मागणी आहे. पण राहुल वा सोनियांनी ती फ़ारशी मनावर घेतलेली दिसत नाही. उलट राहुल सतत पक्ष नव्याने सत्तेत आणायचा व संघटना बांधण्याचा विचार करीत असतात. पण दोन्ही गोष्टी साध्य झालेल्या नाहीत. कॉग्रेसची नवी उभारणी होऊ शकलेली नाही, की भाजपाच्या पराभवाचाही आनंद अय्यरना मिळू शकलेला नाही. केरळ, बंगाल वा तामिळनाडूत भाजपाला लक्षणिय यश मिळाले नाही म्हणून खुश असलेल्या अय्यर यांचा, यावेळी मात्र भ्रमनिरास झाला आहे. कारण पाचपैकी चार राज्यात भाजपा सत्तेत आलेली आहे.

अय्यर यांचा हा सल्ला नेमका समजून घेतला पाहिजे. असाच सल्ला तोयबाचा सर्वेसर्वा आपल्या चेल्यांना देत असतो. मुंबईत जे हल्लेखोर धुमाकुळ घालायला आलेले होते. त्यांना त्यातून काय मिळाणार होते? काहीही झाले तरी अशी हिंसा करून त्यांना सुखरूप माघारी पाकिस्तानला जाणे शक्य नव्हते. अशी हिंसा वा विध्वंस करताना त्यांनी तिथल्या तिथे मरावे, इतकीच अपेक्षा त्यांनी केलेली होती. किंबहूना असे आत्मघातकी कृत्य करताना मारले जाणे, म्हणजेच काही महान उदात्त कार्य असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवलेले होते. मुद्दा आपल्याला काय मिळणार वा मानवजातीचे काही भले होणार असा नसून, आपल्या शत्रूंना ठार मारून संपवणे यालाच प्राधान्य असले पाहिजे, अशी विचारसरणी फ़िदायीन घडवत असते. ज्यांना जग आत्मघातकी हल्लेखोर म्हणून ओळखते. आपणच अंगावर लपेटलेली स्फ़ोटके उडवायची आणि मरता मरता अधिकाधिक लोकांना मारायचे, अशीच ही भूमिका अय्यर मांडत नाहीत काय? कॉग्रेस पक्षाने भाजपाला संपवण्यासाठी आत्मघात करून घ्यायचा, अशीच काहीशी भूमिका अय्यर मांडताना दिसत आहेत. कुठल्याही आघाड्या कराव्यात. त्यापासून कसलीही पक्षीय अपेक्षा बाळगू नये. फ़क्त प्रतिस्पर्धी म्हणजे भाजपाचे नुकसान होईल, इतकेच ध्येय बाळगावे, असेच सांगितले जात आहे ना? कॉग्रेसमधील मुठभर विचारवंत वा अभ्यासू नेत्यांची अशी अवस्था झालेली असेल, तर त्या पक्षाचे पुनरुत्थान कसे व कोणी करायचे? जे विध्वंसाचीच प्रार्थना करीत असतात, त्यांच्याकडून कुठल्याही विधायक कामाची अपेक्षा करता येत नाही. कॉग्रेसच्या नेत्यांची असली मनस्थिती त्यांच्या निराशेचीच साक्ष देणारी आहे. पण त्याचवेळी अशी मानसिकता एकूण समाज व राजकारणासाठी किती घातक झालेली आहे, त्याचा पुरावाच मिळतो ना? राहुल अशा सहकार्‍यांना सोबत घेऊन काय साध्य करू शकतील?

No comments:

Post a Comment