इसिस नावाच्या संघटना वा राज्याचा खात्मा झाल्याच्या बातमया आहेत. स्वत:ला इस्लामी जगताचे साम्राज्य म्हणून घोषित करणार्या तथाकथित खलीफ़ा अबु अल बगदादीचे हे साम्राज्य होते. त्याच्या कुठल्या भौगोलिक सीमा नव्हत्या, की त्याला जगातल्या अन्य कुठल्या देशाची मान्यता नव्हती. म्हणूनच जगाशी त्याचा अधिकृत असा कुठला संपर्क नव्हता. सहाजिकच त्याविषयी येणार्या कुठल्याही बातम्या अधिकृतपणे मान्य करण्याची सोय नाही. त्यामुळेच आताही त्याबद्दल जे काही ऐकू येत आहे, त्यावर पुर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. अशा व्याख्येत न बसणार्या साम्राज्य वा संघटनेच्या कारवाया वास्तविक असतात. म्हणूनच त्यापासून जगाची सुटका नसते. त्याचे परिणाम संपुर्ण मानव जातीला भोगावे लागत असतात. सिरीया व इराकच्या भूमीत काही भागावर त्याने आपली हुकूमत प्रस्थापित केली होती आणि तिथे वसलेल्या लक्षावधी जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत. काही शतके व कित्येक पिढ्या तिथेच स्थानिक झालेल्या, काही लाख लोकांना वडिलार्जित घरेदारे सोडून, जीव मुठीत धरून पळ काढावा लागला. तर काही हजार लोकांना मृत्यूमुखी पडावे लागलेले आहे. हजारो महिलांची अब्रु लुटली गेली वा त्यांना लैंगिक अत्याचाराचे बळी व्हावे लागले आहे. पण असे असूनही त्यांच्या वेदना, यातना वा समस्येच्या सोडवणूकीत, त्यांचा विचार कोणी केला नाही की त्यांना विश्वासातही घेतले नाही. काही शहाण्या लोकांनी या समस्येचे आपल्या समजुतीच्या आधारे विश्लेषण वा निदान केलेले असून, त्यावरच उपाय योजलेले आहेत. मात्र त्यामुळे समस्या संपण्याऐवजी अधिकच जटील व गुंतागुंतीची होत गेली आहे. कारण उपाय शोधणारे वास्तवाकडे पाठ फ़िरवून बसलेले आहेत. अशी मानसिकता हाच एक प्राणघातक आजार असून, त्याचे निर्मूलन हाच त्यावरचा एकमेव उपाय असतो. ह्याचे भान सुटल्याचा तो परिणाम आहे.
दोन माणसात मतभेद असू शकतात आणि हाणामारीपर्यंत वेळ येऊ शकते, हे कोणी नाकारू शकत नाही. पण जेव्हा एकाकडून आपलाच अट्टाहास पुर्ण करण्यासाठी दुसर्याचा जीव घेण्यापर्यंत मजल मारली जाते; तेव्हा माणुसकीच्या पलिकडे विषय गेलेला असतो. आपले समोरच्याला मान्य नसेल, तर त्याला जीवानिशी ठार मारण्याचा पवित्रा कोणी घेतला, तर त्याच्यातला माणुस संपलेला असतो. हे ओळखून सर्व मानवजातीने अशा माथेफ़िरूचा एकहाती नि:पात करणे, हाच त्यावरचा उपाय असतो. एखादा रोग-आजार जेव्हा प्राणघातक होतो, तेव्हा त्याच्या निर्मूलनाची मोहिम राबवली जाते. तसेच उपाय शोधले व अंमलात आणले जातात. त्यात आजाराच्या जंतु विषाणूंना त्यांची बाजू मांडण्याची संधी कोणी देत नाही. मागल्या दोनतीन दशकात जिहाद नावाचा असाच एक मानवजातीच्या मूळावर उठलेला रोग निर्माण झालेला आहे. त्याचे निर्मूलन करण्यापेक्षा त्याच्या अभ्यासात सतत वेळ दवडण्यात आलेला आहे. त्यावर संशोधन व निदान करण्यातच वेळ खर्ची पडला आहे. म्हणूनच अशा चर्चेत रंगलेल्या व रमलेल्या लोकांकडून कुठला नेमका उपाय शोधला गेलेला नाही, किंवा उपयुक्तही ठरलेला नाही. बर्डफ़्लू वा स्वाईनफ़्लू अशा आजाराचे निर्मूलन करताना त्याचा प्रादुर्भाव करणारे मच्छर मारून विषय संपत नाही. त्याची बाधा झालेल्या रोग्यांना नुसते वेगळे करून भागत नाही. त्याचे विषाणू नष्ट करण्याच्या मोहिमाच राबवाव्या लागतात. तशा मोहिमेचा अभाव त्या रोगाला पोषक ठरत असतो. जिहाद नावाच्या आजाराने त्याच कारणास्तव जगाला भेडसावलेले आहे. अगोदर अफ़गाण भूमीपुरता असलेला व नंतर काश्मिरला ग्रासणारा हा आजार, आता संपुर्ण पश्चीम आशियाला घेरून बसला आहे आणि त्याचा फ़ैलाव दूर युरोपातही जाणवू लागला आहे. त्याचे एकमेव कारण बेजबाबदार अंमलदार होत.
अमेरिकेने अफ़गाण भूमीवर सेना धाडल्याने तालीबानांची हुकूमत संपली. पण त्याची बाधा संपली नाही. काश्मिरात भारतीय सेना तैनात करून, तो आजार संपला नाही. उलट बळावला आहे. इराकमधून अमेरिकेने सेना मागे घेतल्या व तिथे लोकशाही प्रस्थापित केल्याने त्याची लक्षणे संपली नाहीत. सिरीयातली हुकूमशाही मोडीत काढण्याच्या कारवायांनी जिहादचे नवे भूत इसिसच्या रुपाने समोर आले. त्याचे एकमेव कारण जगभरच्या शहाण्यांमधील मतभेद व बेबनाव हेच आहे. त्याचेच फ़ायदे घेत अबु अल बगदादी सारखा इसम, एक साम्राज्य निर्माण करू शकला आणि जगातल्या महासत्तांनाही आव्हान देण्यापर्यंत त्याने मजल मारली आहे. मोठी सेना वा अत्याधुनिक शस्त्रास्त्रे त्याला रोखू शकत नाहीत. लगाम लावू शकत नाहीत. कारण बंदीस्त करून वा कोंडवाड्यात घालून रोखायला ते श्वापद नाही. तो मनोभूमीमध्ये फ़ैलावत जाणारा आजार आहे. त्याला पोषक अशी मनोभूमी शिल्लक राहिली नाही, तरच त्या विषाणूंची पैदास होणार नाही की जोपासना होऊ शकणार नाही. धर्मांधवृत्ती हे त्या आजाराचे पैदाशीचे पोषक स्थान आहे आणि अशा जागा अस्तित्वात असेपर्यंत त्याचे संपुर्ण निर्मूलन होऊ शकत नाही. इसिस वा अलकायदा यांच्या हिंसाचारात सहभागी व्हायला गेलेल्या निष्पाप तरूणांना अशा आजाराची बाधा जिथे झाली, त्या जागा आजही शाबुत आहेत. तिथे होणारी आजाराची लागण कायम आहे. मग एका ओसामा बिन लादेनला मारून वा बगदादीच्या मुसक्या बांधून, त्या प्राणघातक आजाराचे निर्मूलन कसे होऊ शकेल? उलट त्याची लागण झालेल्यांना मानवतेच्या नावाखाली युरोपात लाखोच्या संख्येने सामावून घेताना, त्याही देशांमध्ये इसिसची बाधा झालेली आहे. त्यातून कोणी नवा बगदादी वा ओसामा आकाराला येऊ शकतो. कारण मलमपट्टी असाध्य आजारावरचे उत्तर नसते.
ज्याप्रकारचा विध्वंस व हिंसाचार, अत्या़चार बगदादी वा लादेन यांच्या प्रेरणेने करण्यात आला, त्यामागे कुठलीही पाशवी प्रेरणा नव्हती. तर तेच एक धार्मिक पवित्र कार्य असल्याची समजूत या बहकलेल्या तरूणांमध्ये करून देण्यात आलेली होती. तिथे शिक्षण, आधुनिक विचार कुचकामी ठरले. याचे साधे कारण तो एक मानसिक आजार आहे, हेच सत्य नाकारले गेले. कुठलाही प्राणघातक आजार हा सुक्षिक्षित वा अशिक्षित असा भेदभाव करीत नाही. म्हणूनच अफ़गाणिस्तान पाकिस्तानसारख्या मागास देशामध्ये जिहादचा प्रादुर्भाव जितक्या सहजतेने झाला, तितकाच त्याचा प्रसार युरोपच्या सुशिक्षित मुस्लिम तरूणांमध्ये झाला. कारण शिक्षणाने माणसाच्या मनातील शेकडो वर्षे रुजलेल्या धर्मभावना वा प्रेरणा सुप्तावस्थेतही कायम असतात. त्यांना खतपाणी मिळाल्यास त्या उफ़ाळून रौद्ररूप धारण करतात. त्याची बाधा झालेल्या प्रत्येकाला प्रयोगशाळेत नेवून त्याची तपासणी करण्याचा पोरखेळ, या आजाराला विश्वव्यापी साथीचे स्वरूप देऊन गेला आहे. म्हणूनच लादेन मारल्याने जिहाद संपला नाही, तर बगदादीच्या रुपाने तो प्रकटला. आता बगदादी संपल्याने त्याचे निर्मूलन होणार नाही या प्रवृत्ती व प्रेरणेचे निर्मूलन हाच उपाय आहे. जितका यातला जिहादी निर्दय आहे, त्यापेक्षाही निष्ठूर प्रतिसादच त्याचा नि:पात करू शकतो. त्याला चुचकारत बसल्याने त्याची जोपासना होत असते. जोपर्यंत त्याच ठामपणे या विषयाला हात घातला जात नाही आणि दयामाया विसरून अंमलबजावणी होत नाही; तोवर कितीही लादेन वा बगदादी मारून जग सुरक्षित होऊ शकत नाही. अशा हिंसेला उपलब्ध असलेली धर्माची कवचकुंडले काढून घेतली जात नाहीत, तोपर्यंत त्या संकटातून मानवजातीला मुक्ती मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. म्हणूनच बगदादीचे साम्राज्य संपले असल्याच्या बातम्या तात्पुरत्या खळबळ माजवू शकतील. पण संकटातून जग मुक्त होणार नाही.
(५/३/२०१७)
No comments:
Post a Comment