Saturday, March 25, 2017

दिलखुलास योगी

योगी आदित्यनाथ loksabha के लिए चित्र परिणाम

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व विविध भाजपा नेत्यांची भेट घेतली. आजही ते लोकसभेचे सदस्य आहेत. म्हणूनच त्यांनी तिथेही हजेरी लावून निरोपाचे भाषण केले. मुख्यमत्री झाल्यानंतरही आपले लोकसभेचे सदस्यत्व वापरणारा एक खासदार यापुर्वीचा लक्षात राहिला, तो ओडीशाचे गिरधर गोमांगो होत. सहसा खासदार वेगळ्या राज्याची जबाबदारी पेलल्यावर संसदेत येत नाहीत. पण गोमांगो यांनी इतिहास घडवलेला होता. सोनियांनी कॉग्रेसची सुत्रे हाती घेतल्यावर ओडीशाचे मुख्यमंत्री जानकीवल्लभ पटनाईक यांना बाजूला केले होते. त्यांच्या जागी गिरधर गोमांगो यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. सहाजिकच त्यांनी लोकसभेच्या कामकाजातून विश्रांती घेतलेली होती. पण १९९९ च्या सुमारास सत्ताधारी आघाडीत बेबनाव निर्माण झाला आणि जयललिता यांनी वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. सहाजिकच राष्ट्रपतींनी वाजपेयी यांना नव्याने विश्वासदर्श प्रस्ताव संमत करून घ्यायला सांगितले. लोकसभेत तेव्हा काठावरचे बहूमत घेऊन, वाजपेयी काम करत होते. त्यांनी तसा प्रस्ताव मांडला आणि मतदान झाल्यावर केवळ एका मताने सरकारचा पराभव झाला होता. ते एक मत गिरधर गोमांगो यांचे होते. नंतर पर्यायी सरकार सोनियाही बनवू शकल्या नाहीत आणि लोकसभा बरखास्त करावी लागली होती. ती लोकसभा खरेतर गिरधर गोमांगो या मुख्यमंत्र्याच्या एका मतामुळे विसर्जित झाली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यापुर्वी वा नंतर सहसा मुख्यमंत्री झालेल्या कुणा खासदाराचा संसदीय कामातला सहभाग ऐकायला मिळाला नव्हता. योगी यांनी मात्र लोकसभेचा निरोप घेण्याचे सौजन्य दाखवून, अप्रतिम भाषणाने उपस्थितांची वहाव्वा मिळवली. त्यांचे माध्यमाने निर्माण केलेले रूप आणि लोकसभेतले अखेरचे भाषण, यात म्ह्णूनच मोठा फ़रक आहे.

उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक म्हणजे एका बाजूला मोदी-शहा तर दुसर्‍या बाजूला अखिलेश-राहुल, असाच संघर्ष होता. त्यातच ‘युपीके लडके’ अशी घोषणा झाल्याने वेगळीच धार चढलेली होती. तिला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गंगेने व उत्तरप्रदेशने दत्तक घेतलेला पुत्र अशी पुस्ती जोडल्याने, आणखीनच रंगत आलेली होती. मग आपल्या त्रोटक भाष्यांनी विरोधकांना चितपट करण्याचा आव आणणार्‍या प्रियंका गांधींनी, उत्तरप्रदेशला दत्तकपुत्राची गरज आहे काय, असाही टोमणा मारलेला होता. लोकांनी आपला कौल दिल्याने आता राहुल-प्रियंकांची तोंडे बंद झाली आहेत. पण योगींनी लोकसभेतील भाषणात तोच धागा पकडून, विरोधकांची खिल्ली उडवली. आपणही तरूण व युपीके लडके असल्याचे मांडताना, त्यांनी अखिलेश व राहुल यांच्या वयाचा संदर्भ अचुक समोर आणला. राहुलपेक्षा एक वर्षाने लहान व अखिलेशपेक्षा एक वर्षांनी मोठा असल्यामुळे, त्या दोघांच्या मध्ये योगी उभा राहिला. म्हणूनच त्यांची जोडगोळी कामच करू शकली नाही. असे उपरोधिक बोलताना योगींनी आपणही त्याच वयाचे आहोत, पण आपल्याला राजकारणात काहीही वडिलार्जित आयते मिळाले नाही, याकडे लक्ष वेधलेले आहे. आज वडिलार्जित वा घराण्याच्या वारश्यावर जगण्याचे दिवस संपलेले आहेत आणि प्रत्येकाला आपल्याच कर्तृत्वावर पुढे येणे भाग आहे, असा त्यातला गर्भित इशारा आहे. अखिलेश व राहुल यांच्यामध्ये आपण उभे होतो, याचा अर्थ कोवळ्या वयात आपण राजकारणात उमेदवारी सुरू केली, तेव्हा हे दोन्ही युपीके लडके घराण्याच्या श्रीमंतीवर मौजमजा करीत होते. तर आपल्याला जनतेची मान्यता मिळवण्यासाठी पहिल्या दिवसापासून व कोवळ्या वयात कष्ट उपसावे लागले. असे त्यांना सुचवायचे आहे आणि त्यातले अवाक्षर खोटे नाही. कारण योगी पाचव्यांदा लोकसभेत सलग पोहोचले होते.

१९९८ सालात पहिले एनडीए सरकार बनवले गेले, तेव्हा योगी प्रथमच २६ वर्षाचा युवक म्हणून लोकसभेत निवडून आलेले होते. रामजन्मभूमीचा गाजावाजा होता आणि वाजपेयींचा करिष्मा मानला जात होता. पण त्याचा लाभ तितक्याच निवडणूकीत मिळू शकला. त्यानंतर उत्तरप्रदेशात भाजपला उतरती कळा लागली, तरीही जे मोजके खासदार आपली जागा टिकवू शकले, त्यात योगींचा समावेश होतो. २००४ व २००९ या कालखंडात भाजपाने दिल्लीतली सत्ता गमावली व उत्तरप्रदेशातही मुलायमसिंग व मायावतींनी भाजपाला नामशेष करण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा जे मोजके खासदार लोकसभेत भाजपाच्या चिन्हावर विजयी होत राहिले, त्यात योगींचा समावेश आहे. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. नुसती भडकावू चिथावणीखोर भाषणे देऊन निवडणूक जिंकता येत नाही. आपल्या मतदारसंघात लोकांच्या गरजा भागवणे आणि समस्या सोडवण्यावरच अशा विजयाचा पाया घातला जात असतो. त्याखेरीज हा तरूण योगी गोरखनाथ संप्रदायाचा मठही चालवतो. त्याचे व्यवस्थापन संभाळणे वाटते तितके सोपे नाही. राजकीय व अध्यात्मिक अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडतानाच, पक्षीय कामासाठी योगींना अनेक भागातही प्रचारक म्हणून जावे लागलेले आहे. अशी कामगिरी बजावतानाच त्यांना गोरखपूर या मतदारसंघाच्या बाहेरही आपली राजकीय प्रतिमा उभी करण्यात यश मिळालेले आहे. कुणा नामवंताचा पुत्र-वारस म्हणून त्यांच्या खिशात हे यश आलेले नाही. अखिलेश व राहुल यांच्यामध्ये उभा असल्याचा अर्थ इतका व्यापक आहे. आपल्याला पक्षाने कोवळ्या वयात अनुभवापेक्षा मोठी जबबादारी दिली आणि ती संभाळत इथपर्यंत येऊन पोहोचलो, असे योगींनी मोजक्या शब्दात सांगितलेले आहे. किंबहूना त्यापेक्षा सहज मिळालेले यश व अधिकार अन्य दोन्ही समवयीन तरूणांना पेलवता आले नाहीत, याकडेही योगींनी निर्देश केलेला आहे.

जितके कौतुक राहुल वा अखिलेश यांच्या वाट्याला कुठल्याही कर्तृत्वाशिवाय आले, त्याचा लवलेशही योगी आदित्यनाथ यांच्या नशिबी आला नाही. बोचर्‍या व नेमक्या भाषेत कठोर सत्य बोलणार्‍या योगींना माध्यमांनी सतत चिथावणीखोर म्हणून रंगवलेले आहे. पण आपल्या मतदारसंघ वा मठाच्या क्षेत्रामध्ये, हाच योगी सर्वधर्मसमभाव किती यशस्वीपणे राबवतो, त्यावर मात्र चलाखीने पांघरूण घातले गेलेले आहे. योगींच्या मठाचा कारभारीच मुस्लिम असून, मठाच्या आवारात शेकडो मुस्लिम दुकानदार गुण्यागोविंदाने व्यवसाय करीत असतात. मठात वा अन्य कुठल्याही व्यवहारात योगींनी धर्माचा पक्षपात कधी होऊ दिला नाही. आताही मठापासून दूर असताना तिथली कुठल्याही बाबतीत माहिती हवी असली, तर योगी ज्याच्यावर विसंबून असतात, त्याचे नाव यासिन अन्सारी आहे. थोडक्यात योगी एका मुस्लिमावर आपल्या सर्व कामासाठी विश्वास ठेवतात आणि त्यांच्या भोवतालचे मुस्लिम त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवत असतात. अशा योगी आदित्यनाथाला उत्तरप्रदेशच्या मुस्लिमांनी घाबरून राहिले पाहिजे, ही कल्पनाच किती चमत्कारीक आहे ना? योगी हा इस्लामविरोधक वा मुस्लिमांचा हाडवैरी असल्याचे चित्र सातत्याने मांडले गेले. त्याचा व्यत्यास गोरखपूरमध्ये बघायला मिळतो. म्हणूनच कधीही युपीला लडका म्हणून त्याला माध्यमांनी पेश केले नव्हते. एकाच वयोगटातील असूनही योगींनी कर्तबगारीवर मारलेली मजल दाखवण्याचा कुठलाही प्रयास झाला नाही. योगीही अशा कौतुकाचे भुकेलेले नाहीत. म्हणूनच पल्ला गाठला गेल्यावर त्यांनी आपल्या तमाम विरोधकांना व हितशत्रूंना आपण इथवर कसे आलो व पक्षाने आपल्या कर्तृत्वाला कशी साथ दिली, त्याचे निवेदन केले. त्यांनी केवळ राहुल अखिलेश यांनाच टोमणा मारलेला नाही, तर पक्षपाती माध्यमांना व तथाकथित विचारवंतांनाही वास्तवाचा साक्षात्कार मोजक्या शब्दातून घडवला आहे.


3 comments: