Monday, March 6, 2017

सोनियांचे मतदाराला पत्र

कॉग्रेस पक्षाच्या प्रदिर्घकालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याच जुन्या नव्या लोकसभा मतदारसंघातील जनतेला उद्देशून एक पत्र पाठवले आहे. दिवंगत पती राजीव गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातून सोनिया १९९९ सालात प्रथमच निवडून आल्या आणि पुढल्या वेळी त्यांनी त्या मतदारसंघाचा वारसा पुत्र राहुल गांधी यांच्याकडे सोपवला होता. सहाजिकच त्यांना अन्यत्र जाणे आवश्यक होते. तेव्हा त्यांनी बाजूचाच रायबरेली मतदारसंघ निवडला. तो त्यांच्या दिवंगत सासूबाई इंदिराजी यांचा होता. साधारण १९६० च्या दशकापासून हा परिसर नेहरू गांधी खानदानाचा बालेकिल्ला राहिला आहे. १९७७ वा अन्य एकदोन अपवाद करता, तिथून त्याच कुटुंबातील कोणी तरी निवडून येत राहिला आहे. तसे शरद पवारही त्याच कालखंडात बारामतीतून निवडून आलेले आहेत. त्यांच्या खेरीज त्यांच्या कुटुंबातला कोणीही बारामतीतून नित्यनेमाने निवडून येत राहिला आहे. पण आपल्याच मतदारांना असे कुठले पत्र लिहीण्याची पाळी पवार यांच्यावर कधी आली नाही. कारण या प्रदिर्घ कालखंडात त्यांनी बारामतीच्या जनतेसाठी काय केले, किंवा मतदाराशी त्यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याची आठवण करून देण्याची पवारांना गरजही भासलेली नाही. पवार उभा करतील त्या उमेदवारांना मतदान करणे, बारामतीकरांना कर्तव्य वाटत राहिलेले आहे. देशातल्या कुठल्याही भागात गेलात, तरी पवारांनी बारामती या मतदारसंघासाठी काय केले, ते सांगण्याची गरज नसते. पण सोनियांना मात्र आपल्याच बालेकिल्ल्यातील मतदारांना कुटुंबाचा जनतेशी असलेला जिव्हाळा उलगडून सांगावा लागतो. हा नुसता प्रचारातला फ़रक नाही. तर पवार आणि सोनिया-राहुल यांच्यातला फ़रक आहे. म्हणूनच विधानसभेचे मतदान तोंडावर आले असताना, सोनियांना आपल्याच मतदारांना कळकळीचे आवाहन करायची नामुष्की आलेली आहे.

आज आमचे कुटुंब ज्या सुस्थिती्त आहे, त्याचे श्रेय सामान्य मतदाराला व अमेठी रायबरेलीच्या जनतेला असल्याची आठवण करून देत सोनियांनी विधानसभेत कॉग्रेसच्याच निशाणीसमोरचे बटण दाबून हाताचा पंजाच विजयी करण्याची विनंती केली आहे. त्याचे कारण स्वच्छ आहे. मागल्या विधानसभेत तिथे सोनिया कन्या प्रियंकाने ठाण मांडले होते. तरी दहापैकी दोनच जागी कॉग्रेसचे आमदार निवडून येऊ शकले होते आणि आठ जागी कॉग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झालेला होता. त्यातल्या बहुतांश जागा अखिलेश यादवच्या समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. आताही त्या सर्व दहा जागी समाजवादी पक्षाने कॉग्रेसच्या उमेदवारांना पाठींबा द्यावा, म्हणून प्रियंका गांधी यांना मनधरणी करावी लागलेली आहे. इतका सोनियांचा बालेकिल्ला मजबूत आहे आणि इतका प्रियंका गांधींचा उत्तरप्रदेशातील प्रभाव आहे. मागले दोनचार दिवस प्रियंकाने त्याच भागात मुक्काम ठोकून उत्तरप्रदेशला दत्तकपुत्र नरेंद्र मोदींची गरज नसल्याची ग्वाही दिलेली होती. त्यात इतके तथ्य असेल तर तिच्याच आईला आपल्या हक्काच्या मतदारसंघात अखिलेश हा यादवपुत्र दत्तक घेण्याची नामुष्की कशाला आलेली आहे? आपलाच बालिकिल्ला आणि आपलीच प्रभावशाली कन्या प्रियंका हिने मुक्काम ठोकूनही अमेठी रायबरेलीतले उमेदवार कॉग्रेस कशाला निवडून आणू शकत नाही? त्याचेही आत्मपरिक्षण करण्याची राहुल वा त्याच्या मातोश्रींना अजून गरज भासलेली नाही. तर कन्येची गोष्टच कशाला? मुद्दा त्यांच्या निवडून येण्याचा नसून, सोनियांनी हे पत्र आपल्याच बालेकिल्ल्यातील मतदारांना पाठवण्याचा आहे. इतक्या वर्षात ज्या मतदाराने कसलीही अपेक्षा न बाळगता गांधी खानदानाला मते दिली, त्याचेच असे पाय धरण्याची वेळ सोनियाजींवर कशाला आलेली आहे? तर त्यांनी त्या परिसरात किंचीत म्हणावे असेही काही केलेले नाही.

कालपरवाच अमेठी सुलतानपूर भागात प्रचार करताना राहुल गांधींनी त्या परिसरातल्या मागासलेपणाला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. अमेठीचे लोक निर्बुद्ध असण्यावर या खानदानाचा किती ठाम विश्वास आहे, त्याचे हे नमूने आहेत. ज्या भागातून तीन दशके तुमचे खानदान निवडून येते, तो परिसर आजवर मागासलेला राहिलाच कसा? तीन दशके तुम्ही तिथे प्रगतीची गंगा आणली असती, तर आज मोदींनी तो विकास बॉम्ब टाकून उध्वस्त केला, असे कोणाला म्हणायचे आहे काय? १९९९ ते २०१४ पर्यंत मायलेकरू तिथले खासदार होते आणि त्यातली नंतरची दहा वर्षे त्यांच्याच हातात देशाची सत्ता केंद्रीत झालेली होती. त्या काळात तर मोदी तिथे काही करू शकत नव्हते? मग या दहा वर्षात राहुल वा सोनियांनी कोणता विकास आपल्या बालेकिल्ल्यात केला होता? तो केला असता, तर मोदींवर आरोप करायची वेळ कशाला आली असती? तुम्ही तीन दशकात काही केले नाही आणि तीन वर्षात आपल्या पक्षाला मतेही न देणार्‍या त्याच भागाचा विकास मोदींनी करायलाच पाहिजे. हा कुठला युक्तीवाद आहे? मोदींनी अमेठी रायबरेलीचा विकास पळवून नेल्यासारख्या भाषेतला राहुलचा आरोप पोरकट नाही काय? अमेठीचे लोक अडाणी जरूर असतील. पण तद्दन मुर्ख नक्कीच नाहीत. दहा वर्षे देशाची निरंकुश सत्ता हाती असतानाही या मायलेकरांनी आपल्यासाठी काहीही केले नाही. पण जावयासाठी मात्र शेकडो एकर जमिनी देऊन कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली, हे त्या लोकांना नेमके कळते. तसे आहे म्हणुन तर दोघांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातून मग बंधूभगिनी मिळून दत्तकपुत्र नरेंद्र मोदीवर दोषारोप करीत आहेत. तर मातेला इतक्या वर्षांनी आपल्या मतदाराला पत्र लिहून गयावया करायची वेळ आलेली आहे. त्यातून आपल्याच नाकर्तेपणाची त्यांनी साक्ष दिलेली आहे.

३३ वर्षापुर्वी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या पाठीशी लोकसभेत ४०० हून अधिक खासदार होते. कोट्यवधी रुपयांच्या योजना वा विकासाची कामे त्यांना सहज अमेठी रायबरेलीत नेता आली असती. इतक्या वर्षात तो परिसर सुजलाम सुफ़लाम होऊन, तिथे तसूभर विकासाला वाव राहिला नसता. तर बारामतीप्रमाणे मतदाराला अन्य कुठल्या पक्षाचा विचारही करावा लागला नसता. त्या विषयात दातखिळी बसणार्‍या याच राजीव वारसांना तीन वर्षात वाराणशीमध्ये मोदींनी काय केले नाही, हे सांगण्याची गरज भासू लागली आहे. दहा बारा वर्षापुर्वी गुजरात विधानसभेच्या प्रचारात मोदींवर ‘मौतका सौदागर’ असा बेछूट आरोप करणार्‍या सोनियांच्या ह्या केविलवाण्या स्थितीची खरेच दया येते. अवघ्या चारपाच वर्षापुर्वी देशभरच्या मतदारांकडे पक्षासाठी मते हक्काने मते मागणार्‍या या स्टार प्रचारक कॉग्रेस अध्यक्षाला, आज आपल्याच मतदारसंघातल्या लोकांना व्यक्तीगत पत्र लिहून मतांचा जोगवा मागावा लागतो आहे. त्यावरही विश्वास नसल्याने समाजवादी पक्षाकडून त्याच जागांची भिक मागावी लागते आहे. तिथे दोन्ही मुलांना तैनात करूनही मातेला विजयाची खात्री वाटेनाशी झाली आहे. ही अगतिकताच नेहरू गांधी खानदानाच्या दिर्घकालीन नाकर्तेपणाची साक्ष आहे. देशाचे कल्याण दूरची गोष्ट झाली. त्यातली बदमाशीही लपून रहात नाही. आज आमचे खानदान जे काही आहे, ते तुमच्यामुळेच आहे, असे सोनियांनी म्हटले आहे. पण या खानदानाचे सोने करण्यासाठी अमेठी रायबरेलीच्या मतदाराने परिस होऊन केलेला त्याग, आजही यांना पुरेसा वाटलेला नाही. यांनीच त्या मतदारासाठी काही केले नाही व म्हणूनच ती जनता आजही दुरावस्थेत आहे. त्याची प्रामाणिक कबुली देण्याचेही औदार्य सोनियांना दाखवता आलेले नाही. रायबरेली अमेठीची जनता आजही गरीबी व मागासलेपणाने ग्रासलेली आहे, ते याच एका खानदानामुळे आहे. ते कोणी सांगायचे?

1 comment:

  1. बरोबर भाऊ.कुठ गायब झालात भाऊ???

    ReplyDelete