Monday, March 6, 2017

आझादीचा भुलभुलैया

gulmehar kaur के लिए चित्र परिणाम


गेल्या वर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काश्मिरच्या आझादीविषयी एक मेळावा झाला आणि त्यात झालेल्या घोषणांनी काहूर माजले होते. त्यातले दोन विद्यार्थी नेते देशद्रोहाच्या आरोपाखाली खटल्यात गुंतलेले आहेत. अजून त्यांच्यावर तसा कुठला आरोप कायद्याच्या निकषावर सिद्ध झालेला नाही. म्हणूनच त्यांना देशद्रोही ठरवणे योग्य होणार नाही. ही झाली कायदेशीर मर्यादेची गोष्ट! पण त्या निमीत्ताने देशप्रेम व देशाद्रोहाची एक नवी लढाई छेडली गेली आहे. त्याचेच पडसाद दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रामजस कॉलेजमध्ये उमटले आणि त्यात जी हाणामारी झाली, त्यातून आता नवा वाद उभा राहिला आहे. त्या हाणामारीत विद्यार्थी संघटनांच्या दोन गटात मारामारी झालेली होती. नेहरू विद्यापीठातला एक आरोपी नेता उमर खालीद, याचे भाषण या कॉलेजात योजले होते आणि त्याला विरोध करीत भाजपाच्या विद्यार्थी संघटनेने हातघाईपर्यंत मजल मारली. त्यामध्ये एका विद्यार्थिनीला घाणेरड्या धमक्याही दिल्या गेल्या. ही विद्यार्थिनी गुलमेहर कौर नावाची आहे. आपला विरोध प्रकट करण्यासाठी तिने सोशल मिडीयात एक क्लिप टाकली. त्यात ती मुलगी अनेक लिखीत फ़लक घेऊन दिसते, पण काहीही बोलत नाही. भाजपाची विद्यार्थी शाखा असलेल्या अभाविप संघटनेला घाबरत नाही. माझ्या पित्याने कारगिल युद्धात छातीवर गोळी झेलली. त्याचा बळी पाकिस्तानने नव्हेतर युद्धाने घेतला. अशा घोषणा या मुलीने त्यात प्रदर्शित केल्या आहेत. एका शहीदाची मुलगी म्हटल्यावर तात्काळ तिच्याविषयी सहानुभूती जागी होणार, हे त्यामागचे गृहीत आहे. पण त्याच त्या सहानुभूतीच्या आडून कोणता संदेश पाठवला जात आहे? त्याकडे कोणीही लक्ष वेधलेले नाही. शहीदाची कन्या म्हणून तिच्या देशप्रेमाविषयी कोणी शंका घ्यायला जागा उरत नाही. पण तिने प्रसारीत केलेल्या घोषणांचा संकेत तिच्याच पित्याच्या हौतात्म्याची कदर करणारा आहे काय?

ज्यांना सहानुभूतीचे भांडवल करायचे असते, ते लोक नेहमी अशा प्रतिमा वा साधने निवडत असतात. उदाहरणार्थ काश्मिरमध्ये जी हिंसा चालते, तेव्हा त्यात हिंसाचार करणारेही आझादीच्या घोषणा देत असतात. पण त्याच घोषणांच्या आडून दगडफ़ेकही चालते. त्यात जखमी होणारा सैनिक वाचला, तर सुखरूप माघारी घरी येतो. नसेल तर हुतात्मा होऊन त्याचा मृतदेह कुटुंबाला परत मिळत असतो. त्याने आपल्या प्राणाचे मोल कुणासाठी व कशासाठी मोजलेले असते? त्याची फ़िकीर जर त्याच्याच कुटुंबाला नसेल, तर त्याच्या हौतात्म्याला काय किंमत राहिली? कारगिलच्या एका शहीदाची कन्या म्हणते, तिच्या पित्याचा बळी पाकिस्तानने नव्हेतर युद्धाने घेतला. ते युद्ध भारताला खुमखुमी होती म्हणून लढले गेले होते काय? ते युद्ध कोणी लादले होते? या मुलीचा पिता तिथे मजा म्हणून छातीवर गोळी झेलायला गेला आणि बळी पडला, असे तिला म्हणायचे आहे काय? युद्ध भारताला नकोच आहे. पण ते सतत पाकिस्तानने लादलेले आहे. त्या युद्धात छातीवर गोळी झेलायला या मुलीचा पिता कशाला पुढे सरसावला होता? आपल्या पित्याकडून तिने यातला एक शब्द जरी ऐकला असता, तर तिने अशी भाषा वापरली नसती. पण तिचे वय बघता, आपला पिता पाकच्या घातपाती युद्धात कसा व कशासाठी मारला गेला; त्याचा मागमूसही या मुलीला नसावा. अन्य कुणाच्या घरातला सैनिक मारला जावा, तितक्या अलिप्ततेने तिने अशा घोषणांचे फ़लक प्रदर्शित केलेले आहेत. कारण कारगिलचे युद्ध झाले वा तिचा पिता शहीद झाला, त्यावेळी पिता मरण पावला म्हणजे काय, तेही समजण्याचे तिचे वय नसावे. म्हणूनच अगदी तटस्थतेने तिने आपल्या पित्याला पाकने मारले नसल्याचे म्हटलेले आहे. कारगिल युद्धाला आता १८ वर्ष झाली आहेत आणि ही मुलगी विशीतली आहे.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की कोणीतरी जाणिवपुर्वक तिला पुढे करून, अशी दिशाभूल करतो आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानने अतिरेकी घुसवले नसते, तर युद्धाचा प्रसंग आलाच नसता. मग शहीदाचा बळी युद्धाने म्हणजेच पाकिस्ताननेच घेतला नाही काय? एवढा साधा तर्क ज्या मुलीला करता येत नसेल, तिने शहीदाची मुलगी म्हणून सहानुभूतीच्या भांडवलावर असल्या घोषणांचा वापर करणे नक्कीच निषेधार्ह आहे. उमर खालीद ज्या आझादीच्या गोष्टी बोलतो, त्याच आझादीच्या आडून चालू असलेल्या हिंसाचाराने शेकडो भारतीय सैनिकांना हकनाक शहीद व्हावे लागलेले आहे. काश्मिरी खोर्‍यात इकडून तिकडे जाणार्‍या सैनिकांच्या गाडीला घातपात होतात. त्यात बळी पडणार्‍यांचे प्राण कुठल्या युद्धाने घेतलेले नाहीत. ते खालीदसारख्या उपटसुंभांनी जे आझादीचे नाटक चालवले आहे, त्याच हिंसाचाराने घेतलेले बळी असतात. एवढी साधी गोष्ट ज्या मुलीला कळू शकत नाही, तिने स्वत:ला शहीदाची मुलगी म्हणवून घेण्याची काय गरज आहे? जिला आपल्या पित्याचे शहीद होणेच भावलेले नाही, तिने अगत्याने आपला पिता कुठे मारला गेला, ते सांगण्याचा हेतूच संशयास्पद आहे. अर्थात इतका बारकाईने तिने या गोष्टींचा विचार केलेला नाही. पण तिला अशा प्रचारात पुढे करणार्‍या कुणा पाताळयंत्री मेंदूने ह्या गोष्टी नेमक्या योजून हा अपप्रचार केलेला आहे. कॉलेजात झालेल्या हाणामारीत कुणा अन्य गटाच्या गुंडाने तिला विनयभंगाची धमकी दिली असल्यास तो रानटीवृत्तीचा गुन्हाच आहे. पण त्या गुन्ह्याला पुढे करून राष्ट्रभावनेला सुरूंग लावण्यासाठी चाललेली दिशाभूल, तितकीच निषेधार्ह आहे. म्हणूनच केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केलेले मत अधिक रास्त आहे. कुठले लोक अशा कोवळ्या मुलांच्या मनात विषपेरणी करून आहेत, हा रिजिजू यांचा सवाल योग्य ठरतो.

एका सैनिकाला युद्धाने मारले व पाकने नाही मारले, असे बोलणारी मुलगी आपल्या पित्याच्या हौतात्म्याचीच विटंबना करीत असते. कारण देशाच्या सुरक्षेसाठीच तो पिता घरसंसार सोडून सीमेवर गेलेला होता. तेव्हा आपलीच मुलगी आपली अशी निर्भत्सना करील, अशी त्याची तरी अपेक्षा असेल काय? नसेल तर शहीदाची मुलगी म्हणून तिने आपल्या पित्याचे भांडवल करण्याची गरज नव्हती. तिच्या वागण्यातला दुटप्पीपणा लपून रहात नाही. कारण तिचा पिता सैनिक म्हणून लढला, तर युद्ध त्यालाही अगत्याचे वाटत होते आणि मुलगी तर युद्धाचीच टवाळी करते आहे. पर्यायाने ती आपल्या पित्याच्याच हौतात्म्याची हेटाळणी करते आहे. मात्र तीच हेटाळणी करण्याकडे लक्ष वेधले जावे, म्हणून त्याच हौतात्म्याचे भांडवलही करते आहे. हा दुटप्पीपणा दुर्लक्षित रहातो. काय दिवस आलेत बघा. शहीदाच्या हौतात्म्याचेच भांडवल करून राष्ट्रासाठी लढणे, हा गुन्हा ठरवण्यापर्यंत युक्तीवाद भरकटत गेला आहे. या मुलीला तितकी अक्कल असण्याची शक्यता कमीच आहे. पण तिला धुर्तपणे आपल्या राजकीय हेतूसाठी पुढे करण्यामागचा कुटील मेंदू कसा काम करतो, हे समजून घेण्याची म्हणूनच गरज आहे. कुठल्याही देशविरोधी बंडाची वा उठावाची सुरूवात नेहमीच सहानुभूती गोळा करून होत असते. पाकव्याप्त काश्मिरची भलामण करणारे कधी, त्या काश्मिरात चाललेल्या अत्याचाराविषयी बोलत नाहीत. इथे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचा लाभ उठवून स्वातंत्र्य देणारी व्यवस्थाच उध्वस्त करण्याचे कारस्थान मात्र धुर्तपणे राबवले जाते. त्याचा हा उत्कृष्ठ नमूना आहे. दोन परस्परविरोधी गोष्टींचा किती सराईतपणे गोलमाल केला आहे ना? शहीदाच्याच मुलीला शहादतीच्या हेटाळणीसाठी पुढे करण्यात आले आहे आणि मोठमोठे बुद्धीमंत शहाणेही त्या युक्तीवादाच्या सापळ्यात अलगद फ़सलेले आहेत.

(४/३/२०१७)


5 comments:

 1. Can you please post english translated ver of this? I feel this is a balanced take on the event & all non Marathi deserve to read it. Thanks a lot!

  ReplyDelete
 2. ही प्रशांत परिचारकांपेक्षाही नीच जमात आहे.
  ह्यांचा अजेंडा पका आहे.ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुळात काश्मीरवर भारताने बळाचा वापर करून ताबा मिळवलेला आहे.जे एन यू मधील प्रोफेसर्स उघड उघड आपल्या भाषणांमधून हे सांगत असतात. आपल्या उपटसुंभ विद्यार्थ्यांना अशाच प्रकारची शिकवण ते देत असतात. मग काश्मीरी जनता म्हणजे भारताहून वेगळी आहे,भारत तिच्यावर अन्याय करत आहे,भारतापासुन तिला आजादी हवी आहे अशी भाषणे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश असते. ९० नंतर योजनाबद्ध पद्धतीने काश्मीरमधून हुसकावून लावलेले पंडीत आणि तिथे राहीलेले घुसखोर हा एक त्याच योजनेचा भाग आहे.मग जनमत चाचणीचा आग्रह जनतेची मागणी या गोंडस नावाखाली काश्मीर गिळंकृत करण्याचा डाव आहे.आपल्या देशातले माध्यमशहाणे अर्थात पुरोगामी त्याला सामिल आहेत.

  ReplyDelete
 3. भाऊ,परिचारक वर एक लेख

  ReplyDelete
 4. देशद्रोही लोक अशा विशीतल्या मुलांना फसवणार त्याला विरोध करणारे abvp वाले बदनाम होणार

  ReplyDelete
 5. म्हातारे राजकारणी आणि धर्मगुरू यांच्या अहंकारापायी बिचारे तरुण सैनिक जगभर मारत असतात.....Nishant.

  ReplyDelete