Monday, March 27, 2017

वाद आणि अपवाद

resident doc on strike के लिए चित्र परिणाम

मुंबईत डॉक्टरांनी सार्वत्रिक सुट्टीच्या रुपाने संप पुकारल्याने रुग्णांचे खुप हाल झाले. तसे ते नेहमीच होत असतात. कुठल्याही पेशातील लोकांनी अकस्मात संपाचे हत्यार उपसावे, ही आता नवी बाब राहिलेली नाही. त्यात डॉक्टर कशाला मागे रहातील? पण हा संप डॉक्टर पेशातील सर्वांचा नव्हता, तर निवासी डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिकावू डॉक्टरांचा होता. महाराष्ट्रात जे कोणी प्राथमिक वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होतात, त्यापैकी काहीजण पुढे एखाद्या खास विषयात प्राविण्य संपादन करण्यासाठी उच्चशिक्षण घेतानाच निवासी डॉक्टर म्हणूनही काम करीत असतात. त्यांना अपुरे विद्यावेतन मिळते, ही जुनी तक्रार आहे. पण अशा अनेक कारणास्तव या शिकावू डॉक्टरांच्या संघटनेने अनेकदा संपाचे हत्यार उपसलेले आहे. त्यामुळेच त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता. हल्ली जो अकस्मात संप झाला, त्याची दाद म्हणूनच हायकोर्टात मागितली गेली. एका सामान्य नागरिकाने न्यायालयाचा अवमान म्हणून याचिका दाखल केली आणि डॉक्टरांच्या संघटनेची कोंडी झाली. कारण यापुर्वीच न्यायालयाला त्यांनी आकस्मिक संप करणार नसल्याचे लिहून दिलेले होते. त्याचा यावेळी भंग झाला. तेच कारण घेऊन हा याचिकाकर्ता हायकोर्टात गेला होता. त्याला योग्य दाद देऊन कोर्टाने डॉक्टर मंडळींचे कान चांगलेच उपटले आहेत. पण त्याकडे केवळ पेशेवर डॉक्टरांचा विषय म्हणून बघणे योग्य ठरणार नाही. बहुतेक पेशांमध्ये आता हीच प्रवृत्ती बोकाळली आहे. आपल्या कुठल्याही मागण्या असोत वा अडचणी असोत, त्याचा निचरा होण्यासाठी सामान्य जनतेला ओलिस ठेवण्याची वृत्ती सतत बळावत गेलेली आहे. आताही धुळे व त्याच्यानंतर मुंबईत रुग्णाच्या आप्तस्वकीयांनी डॉक्टरांना मारहाण करण्याचे निमीत्त झाले आणि विनाविलंब निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय अंमलात आणला.

अर्थात डॉक्टरांना रुग्णांच्या नातलग वा निकटवर्तियांनी मारहाण करणे समर्थनीय असू शकत नाही. डॉक्टरच कशाला कुणा वकील वा सामान्य बस ड्रायव्हर कंडक्टर यांनाही मारहाण होणे समर्थनीय नाही. पण असे प्रसंग सातत्याने व सर्वत्र घडत नसतात. म्हणूनच त्यावर सार्वत्रिक बहिष्कार घातल्यासारखी प्रतिक्रीया आततायीपणाची ठरते. कारण असे निवासी डॉक्टर्स सार्वत्रिक संपावर गेले, म्हणजे सामान्यांसाठी असलेल्या आरोग्यसेवेची चाके थांबतात आणि अनेकांच्या जीवाशी खेळ होऊन जात असतो. आपल्या सुरक्षेची कुठली व्यवस्था नाही आणि असेल तिथे ती पुरेशी नाही, ही डॉक्टरांची समस्या गैरलागू नाही. पण ती इतकी जिव्हारी लागणारी वा जीवावर बेतलेली समस्या नाही. एकाददुसर्‍या घटनेने एकूणच सर्व डॉक्टरांचा जीव धोक्यात आलेला नाही, किंवा त्यांना असुरक्षित वाटण्याचे काहीही कारण नाही. पण संघटना सज्ज असली मग कुठल्याही मागणी वा कारणासाठी बेधडक संपाचे हत्यार उपसणे, ही आता नित्याची बाब झालेली आहे. कधी रिक्षावाले टॅक्सीवाले किंवा बसवालेही अशीच नागरिकांची तारांबळ उडवून देतात. असे काही केले म्हणजे दुर गावातून शहरात आलेल्या हजारो प्रवाश्यांचे हाल होतात. स्थानिक नागरिकांच्या जगण्यातही व्यत्यय निर्माण होत असतो. एकूणच नागरी जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते. हे नागरिक अमूक एक सेवा आहे म्हणून तिच्यावर विसंबून आलेले असतात आणि तीच सेवा ठप्प झालेली असली, मग नागरिकांचे हाल कुत्राही खात नाही. मग तो रुग्ण असेल, प्रवासी असेल किंवा कामधंद्याला बाहेर पडलेला नागरिक असेल. त्याचा असा कुठला गुन्हा असतो, की संपवाले त्याला शिक्षा फ़र्मावत असतात? हे कुठल्याही पेशाला व प्रामुख्याने सेवाक्षेत्रात काम करणार्‍यांना शोभादायक नाही. किंबहूना आपल्या ग्राहकालाच सतावण्याचा तो लाजिरवाणा खेळ असतो. हायकोर्टाने तिकडेच लक्ष वेधले आहे.

हा विषय डॉक्टरांचा असल्याने त्यातून अन्य पेशांचा संप योग्य ठरणार नाही. कुठल्याही कारखान्यात वा उत्पादन व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक एकत्र येऊन न्याय वा अन्य मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसतात. शाळांच्या किंवा बोर्डाच्या परिक्षा आल्या, मगच शिक्षक संघटनेला आपल्या तुंबलेल्या मागण्या आठवतात. त्याचा विचार होण्यासाठी मग परिक्षेवर बहिष्कार किंवा उत्तरपत्रिका उशिरा तपासणे, अशा अनेक खेळी होत असतात. यात शिक्षक म्हणून काम करणारे कर्मचारी आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याशीच खेळ करीत आहोत, हे विसरून गेले आहेत. शिक्षण क्षेत्रात सरकारने गुंतवणूक केली नव्हती, तेव्हा कुठल्याही शाळांना वा संस्थांना अनुदान मिळत नव्हते. तिथे कष्ट उपसून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणार्‍या शिक्षकांना वेळच्या वेळी अपुराही पगार मिळू शकत नव्हता. पण त्यापैकी किती शिक्षकांनी अधिक पगार वा वाढीव वेतनासाठी संपाचे हत्यार उपसलेले होते? आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या काळजीने ग्रासलेले शिक्षक कुठल्याही स्वार्थापेक्षा मुलांच्या भवितव्याला प्राधान्य देत होते. डॉक्टर इतके प्रतिष्ठीत होते, कारण ते उपचाराचे भरपूर पैसे घेण्यापेक्षा रुग्णाला आत्मियतेने उपचार देण्यासाठीच ख्यातनाम होते. असे बहुतेक पेशेवर समाजात मान्यता पावलेले होते. कारण त्यांनी आपण सेवाक्षेत्रात आहोत हे लक्षात ठेवून गरजू व ग्राहकाला प्राधान्य दिलेले होते. आपल्या कुठल्याही कृतीतून पेशाला काळिमा फ़ासला जाऊ नये, यासाठी प्रत्येकजण जागरुक असायचा. आज डॉक्टर वकील वा शिक्षक अशा कुठल्या पेशामध्ये तितका प्रामाणिकपणा शिल्लक उरला आहे? नसेल, तर नुसते प्रतिष्ठेच भांडवल करता येणार नाही. गर्भपातावर प्रतिबंध असतानाही अमानुष कृत्ये करणारे कालपरवाच काही लोक पकडले गेले आहेत आणि त्यांनी गुन्हेगारानेही लाजावे असा पळपुटेपणा दाखवलेला आहे. तेव्हा कुठल्या संघटनेला जाग आली नव्हती.

चार वर्षापुर्वी बीड जिल्ह्यात सुदाम मुंडे नावाच्या डॉक्टरला बेकायदा गर्भपात करण्याच्या आरोपाखाली अटक झाली. कालपरवा सांगली जिल्ह्यात तसाच प्रकार आढळून आला. वर्षभरापुर्वी मुंबईतील प्रख्यात अशा इस्पितळात मानवी अवयव चोरून त्याचे प्रत्यारोपण करण्याची मोठी गुन्हेगारी साखळी उघडकीस आली. अशावेळी कुठल्या डॉक्टरी संघटनेने त्या अमानुष कृत्यासाठी पुढाकार घेऊन निषेधाचा सूर तरी लावला होता काय? आपल्यातला कोणी नरपशूला शोभणारे कृत्य करतो, तेव्हा त्याच्यामुळे आपल्या पेशाला अपमानित व्हावे लागते, इतकीही पेशेवरांना प्रतिष्ठा उरलेली नाही काय? आपापल्या पेशाच्या पावित्र्याला कलंक फ़ासणार्‍यांना उघडकीस आणुन, त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात कुठल्या वैद्यकीय संघटनेने पुढाकार घेतल्याचे आढळलेले नाही. एखादा शिक्षक विद्यार्थिनींशी अश्लिल चाळे करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, किती शिक्षक संघटनांनी त्याविरोधातला आवाज बुलंद करण्यासाठी प्रयास केले आहेत? अशा शिक्षकांना पेशातून हाकलून लावण्यासाठी विद्यार्थिनींना थेट तक्रार देण्यासाठी एखादा विभाग शिक्षक संघटनेने उघडला असता, तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. विद्यार्थिनींना शिक्षकाविषयी असलेला आदर व पालकांना शिक्षकाबद्दल असलेला आत्मविश्वास अधिक वाढला असता. आपल्या पेशाची प्रतिष्ठा व पावित्र्य कायम राखण्यासाठी अशा संघटना नेमके कोणते काम करतात, किंवा कुठले प्रयास त्यांनी केले आहेत? अवैध गर्भपात व शस्त्रक्रीया रोखण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेने पुढाकार घेतल्याचे कधीच ऐकू येत नाही. खरेतर त्यांनी तसे काही केल्यास अशा गोष्टी थेट पोलिसांकडे जातील आणि गाजावाजा होण्याऐवजी गुन्हेच कमी होऊ शकतील. पण तसे कुठलेही विधायक पाऊल अशा पेशातील संघटनांनी उचलल्याचे आजवर कधी दिसलेले नाही. मग या संघटना हव्यात कशाला?

सामान्य कष्टकरी कामगार आपल्या मेहनतीचा पुरता मोबदला मिळत नाही, म्हणून संघटना बनवून मालकाला शरणागत व्हायला भाग पाडत असतो. कामगार संघर्ष झाले आणि त्यातूनच व्यावसायिक संघटनांना कायद्याने मान्यता दिली. ती मान्यता वा अधिकार हे न्यायासाठी आहेत. पण त्याचाच आधार घेऊन उदयास आलेल्या बहुतांश संघटना, आपल्या मतलबासाठी समस्त समाजाला ओलिस ठेवण्याकडे वळत गेल्या. त्यातून त्यांचे स्वार्थ साधलेही गेले असतील. पण क्रमाक्रमाने व्यावसायिक गुन्हेगारीसाठी त्याच शक्तीचा अनाठायी वापर होऊ लागला. पर्यायाने अशा कुठल्याही व्यवसायाची प्रतिष्ठा रसातळाला गेलेली आहे. हायकोर्टाने निवासी डॉक्टरांच्या संपावर नुसते ताशेरे झाडलेले नाहीत, तर या संपातून डॉक्टरांनी आपल्या पेशाला काळिमा फ़ासला, असे खडेबोल कोर्टाने ऐकवलेले आहेत. त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. डॉक्टरांचे कर्तव्य रुग्णाच्या आरोग्याशी जोडलेले असते आणि त्याचाच विसर त्या संघटनेतील मंडळींना पडला असल्याचे कोर्टाने निदर्शनास आणून दिलेले आहे. कोर्टाने हल्ल्याचे समर्थन केलेले नाही. पण प्रतिकुल परिस्थितीतही डॉक्टरांना आपले कर्तव्य विसरत कामा नये, याची आठवण करून दिलेली आहे. कामावर असताना आपले जीवन सुरक्षित नाही असे सर्वच निवासी डॉक्टरांना वाटत असेल, तर त्यांनी तिथे राहू नये. राजिनामे देऊन चालते व्हावे. त्यांच्या जागी सरकार नव्या शिकावू डॉक्टर विद्यार्थ्याना नेमू शकते, असेच त्यातून स्पष्ट केले आहे. कारण निवासी डॉक्टर हा समाजावर उपकार करत नसून, त्याला रुग्णांच्या आजारावर उपचार करताना नवे काही शिकता येत असते. त्यातूनच प्राविण्य मिळवता येत असते. म्हणूनच उपकारकर्ता असल्याच्या थाटात या डॉक्टरांनी समाजाला ओलिस ठेवण्याचा उद्योग थांबवावा, अशी तंबीच देण्यात आलेली आहे. हे कोर्टाला सांगावे लागले ते डॉक्टरी पेशाला नक्कीच भूषणावह नाही.

पण सवाल एकट्या डॉक्टरी पेशाचा नसून, कुठल्याही सेवाभावी पेशाची तीच कहाणी आहे. त्यात पैसा कमावण्याला इतके प्राधान्य मिळालेले आहे, की पेशाचे पावित्र्यच रसातळाला गेलेले आहे. मध्यंतरी कुठल्या इस्पितळात रुग्णाचा आप्तेष्ट पैसे देत नाही म्हणून शुश्रूषा सेवकाने चाकाची खुर्ची नाकारली. अर्भकाला जमिनीवर फ़ेकून दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महागड्या इस्पितळात पैशाशिवाय पान हलत नाही. साध्या गोष्टींसाठी वारेमाप पैसे उकळले जातात किंवा अकारण वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या जातात. त्यातून डॉक्टरांना हिस्सा मिळतो, म्हणून रुग्णांचे असे शोषण चालते. आपल्या पेशात शिरलेल्या व सोकावलेल्या अशा मनोवृत्तीला हद्दपार करण्यासाठी कुठली संघटना पुढाकार घेत नाही. अशाच अनेक अपप्रवृत्तीच्या विरोधात तुंबलेला राग जेव्हा उफ़ाळून येतो, तेव्हा त्यांना आपली सुरक्षा धोक्यात असल्याचा साक्षात्कार होतो. हा राग कुणामुळे उफ़ाळून येतो, याचा अभ्यास संघटनांनी केला पाहिजे. आरोग्य व्यवस्था किंवा वैद्यकीय सेवा सामान्यांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. त्यामुळेच तिथे होणारा खर्च वाया गेला, तर जुगार हरल्यासारख्या संतप्त प्रतिक्रीया उमटत असतात. हजारो लाखो रुपयांची किंमत मोजूनही उपचार योग्य झाला नाही, तर असा साचलेला राग उफ़ाळून येत असतो. जेव्हा असे खर्चिक उपचार व इस्पितळे नव्हती, तेव्हा कुठल्या डॉक्टर वा इस्पितळावर हल्ले झाल्याची बातमी येत नसे. कारण पैसे दुय्यम होते आणि डॉक्टरांनी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयास केला, याविषयी कुणाच्याही मनात शंका नसाय़ची. त्या विश्वासाची जागा आज शंका व अविश्वासाने व्यापलेली आहे. त्यामुळेच अशा घटना वाढत गेल्या आहेत. त्यावर संपाचे हत्यार उपसणे हा उपाय नसून, गमावलेला लोकांचा विश्वास नव्याने संपादन करणे. तोही नम्रतेने सेवाभावी वर्तनातून मिळवता येईल. मग डॉक्टरकडून चुक वा लूट हा अपवाद होईल आणि कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रात वादाला जागा शिल्लक उरणार नाही. आज तरी आरोग्य क्षेत्रात फ़सवणूक वा शोषण हा नियम झाला आहे. तो बदलण्याची गरज आहे.

3 comments:

  1. काही डॉक्टरांना खूप धोक्याचा सामना करावा लागतो...विशेषतः सर्जन्स. त्यांच्याकडे रोज तलवार मारली आहे , कारने उडवले आहे, मशीनमध्ये हात गेला आहे , विष प्यायला आहे अशा प्रकारचे पेशंट येतात. अशा पेशंटच्या शरीराला खूप डॅमेज झालेला असतो...त्याच्या जगण्याची शक्यता आधीच खूप कमी झाली असते. निदान अशा केसेस हाताळणाऱ्या डॉक्तरांना तरी सारखे नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यांनी १०० पैकी ९५ पेशंट जरी वाचवले तरी उरलेल्या ५ पेशंटच्या नातेवाईकांकडून त्यांच्या जीवाला धोका असतो. अशा डॉक्टरांना पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे. - Nishant

    ReplyDelete
  2. .
    .
    बरं आहे देवा तू (असलास तर) माणसांपासून खूप दूर आहेस...

    नाहीतर माणसाच्या तुझ्याकडून तर डॉक्टरांपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहेत...

    डॉक्टरांसारखा तू जर माणसाच्या इतका जवळ असतास तर कदाचित रोज तुला पण मारहाण झाली असती..

    आणि कोर्टाने पण सांगितलं असतं जमत नसेल तर देवपण सोडून दे...
    .

    ReplyDelete
  3. अतिशय वस्तुनिष्ठ विवेचन!

    ReplyDelete