Monday, March 6, 2017

बिन चिपळ्यांचा नारद

pawar laughing के लिए चित्र परिणाम

ताज्या जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यावर जे राजकारण रंगले आहे, त्याच्या किळसवाण्या बातम्या ऐकून अनेकांना संताप येत असेल तर नवल नाही. कारण लोकशाही आता गुणवत्ता विसरून नुसत्या आकड्यांचा खेळ होऊन बसला आहे. त्यात अधिक आकडे जोडू शकेल, तो लोकशाहीचा विजेता असतो आणि ज्याला आकडे जमवण्याची कला अवगत नाही, तो लोकशाहीतला पराभूत असतो. तुम्ही कोणते विचार मांडता वा कुठला जनहिताचा कार्यक्रम घेऊन समोर येता, त्याला काडिमात्र किंमत राहिलेली नाही. आजच्या लोकशाहीत आकड्यांना महत्व आलेले आहे. बहूमताचा आकडा हे प्रत्येकाचे ध्येय होऊन बसले आहे आणि त्यात विचार वा गुणवत्तेला स्थान उरलेले नाही. सत्तापदे हे साध्य झाले असून, कुठल्याही मार्गाने सत्ता संपादन करण्याला साधना समजले जाते आहे. अशा लोकशाहीत केशवराव धोंडगे कोणाला आठवणार? अलिकडल्या दोन दशकात त्यांचे नावही कुठे कानावर पडत नव्हते. बहूधा १९९५ च्या विधानसभेनंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली असावी. त्यापुर्वी १९९० पर्यंत त्यांचे नाव ऐकायला मिळत होते. तेव्हा प्रथमच शिवसेनेने विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष होण्याइतके आमदार निवडून आणले आणि त्यावर्षीच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सेनेचा नवखा आमदार विठ्ठल चव्हाण याचे भाषण ऐकून केशवरावांनी समाधानाचे उद्गार काढल्याचे आठवतात. विठ्ठल चव्हाण याच्या अभ्यासपुर्ण भाषणाचे कौतुक करताना केशवराव म्हणाले होते, आता आमच्या पिढीने वैधानिक संसदीय राजकारणातून निवृत्त व्हायला हरकत नाही. त्याचे कारण साफ़ होते. सत्तास्पर्धेच्या पलिकडे जाऊन अभ्यासपुर्ण राजकारण करणारा नव्या पिढीचा कोणी त्यांना विधानसभेत दिसला होता. त्यानंतर केशवरावांनी बहुधा खरोखर राजकारण संन्यास घेतला. कारण दोन दशकानंतर त्यांची एक राजकीय प्रतिक्रीया परवा कानावर आली.

केशवराव तसे शरद पवारांचे समकालीन वा थोडे ज्येष्ठ राजकारणी! त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटिल वा शंकरराव चव्हाण अशा दिग्गजांशी संघर्ष केलेला होता. त्यांचा किंवा तात्कालीन मधू दंडवते, बापू काळदाते, रामभाऊ म्हाळगी, उद्धवराव पाटिल यांचा राजकीय संघर्ष, सत्ता बळकावण्यासाठी कधीच नव्हता. त्यांची लढाई जनहितासाठी सत्ता राबवली जाते किंवा नाही, यावर अंकुश राखण्यासाठी होती. त्यानुसारच त्यांचे डावपेच चालत होते. संसदीय कामात सरकारी पक्षाला पेचात पकडून जनहितासाठी राबायला भाग पाडण्यात त्यांनी आपली बुद्धी व शक्ती पणाला लावली होती. शरद पवार त्यानंतरच्या पिढीतले नेते म्हणूनच समोर आले. अशा केशवरावांना आज आपले मौन सोडण्याची वेळ आली, तेव्हा नवल वाटले. आजचे राजकारण त्यांना पचणारे वा सहन होणारे अजिबात नाही. म्हणूनच बहूधा त्यांनी त्या विषयात बोलण्याचेही कायम टाळलेले असावे. पण सध्याचे निमीत्त वेगळे असावे. नांदेडच्या रामतीर्थ विद्यापीठाने शरद पवार यांना सन्मानार्थ डी. लीट. पदवी प्रदान केल्याचे निमीत्त झाले. तिथेही केशवराव हजर होते आणि त्यांनी म्हणे पवारांचे यथोचित कौतुकही केले. पण नंतर त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रीया देताना शरद पवार यांची अक्षरश: खरडपट्टीच काढली. त्यांनी शरद पवार यांची ‘बिन चिपळ्यांचा नारद’ अशी संभावना केली. त्यामागे पवारांना हिणवण्याचा हेतू असेल असे अजिबात वाटत नाही. केशवराव उपहासाने बोलण्यासाठीच प्रसिद्ध होते. आपल्या राजकीय भाषणात कोपरखळ्या वा काव्यमय टवाळी करण्यासाठी ते ख्यातनाम होते. त्यांच्या अशा उपहासात्मक बोलण्याचे अनेक राजकीय नेत्यांनीही कौतुकच केलेले आहे. अनेक मंत्री स्वत:वर धोंडग्यांनी केलेल्या टवाळीलाही दाद देत असत. असे हे केशवराव, पवारांवर अकस्मात कशाला घसरले असतील?

नव्या पिढीचे राजकारण चालू आहे, त्यातल्या अनेक गोष्टी केशवरावांना पचणार्‍या नाहीत वा नावडत्याच आहेत. पण जिथे प्रतिष्ठेने राजकारण खेळले, तिथे माजलेल्या चिखलात वा डबक्यात शिरायचेही त्यांना आज पसंत नसावे. अशा राजकारणात आजही पवार लुडबुडतात आणि पोरसवदा राजकारण्यांशी डावपेच खेळताना पराभूत होतात, त्याने बहूधा केशवरावांना अस्वस्थ केलेले असावे. म्हणूनच त्यांनी दिलेली नारदाची उपमा लक्षणिय आहे. नारद हा तिन्ही लोकी वावरणारा कळलाव्या देव म्हणून प्रसिद्ध आहे. इथले तिथे करून काहीतरी कलागती लावणे, हेच त्याचे पौराणिक काम होते. आजकाल शरद पवार राजकारणातून संदर्भहीन होत गेले असतानाही त्यांची लक्ष वेधून घेण्याची धडपड अतिशय केविलवाणी होत चालली आहे. त्यामुळेच आपल्या समकालीन नेत्याची अशी लुडबुड केशवरावांना क्षुब्ध करणारी ठरली असावी. एकप्रकारे त्यांनी अशा बोचर्‍या टिकेतून पवारांना आता पुरे झाले, असेच सुचवलेले असावे. वेगळा पक्ष काढून आणि नको तितक्या कोलांट्या उड्या मारूनही काहीही साध्य झाले नाही, याचे भान पवारांना उरलेले नाही. बदलत्या कालखंडात आशीर्वाद देऊन नव्या पिढीला चार उपयुक्त सल्ले देण्याचे काम त्यांनी करावे, अशीच अपेक्षा असू शकते. खरेतर मागल्या लोकसभेपुर्वीच पवारांनी आता पंच्याहत्तरीत आलो, यापुढे निवडणूक लढवणार नाही, असे जाहिर करून टाकलेले होते. पण विनाविलंब राज्यसभेत दाखल होऊन त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपली मुदत पाच वर्षांनी आणखी वाढवून घेतली. त्यानंतरही आघाड्या बनवणे, तोडणे वा पाठींबे जाहिर करून, नंतर त्यातून माघार घेणे; असले लपंडाव चालूच ठेवले आहेत. जनमानसातील आपली प्रतिमा अधिकाधिक खालावत चालली आहे, त्याचेही भान सोडून पवार राजकारणाचा अट्टाहास सोडायला राजी दिसत नाहीत. त्याविषयीचा संताप केशवरावांना मौन सोडायला भाग पाडून गेला असेल काय?

नाही म्हटले तरी दोघेही समकालीन आहेत आणि एकाने निवृत्त झाल्यावर राजकारणावर मल्लीनाथी वा टिकाटिप्पणी करायचे अनेक मोह टाळलेले आहेत. खरे म्हणजे खोचक व बोचरे बोलणार्‍या केशवरावांसारख्या व्यक्तीला, आजच्या राजकारणातली अनेक व्यंगे नित्यनेमाने दिसत व बोचत असतील. त्यावर त्यांनी सातत्याने भाष्य करायचे म्हटल्यास कुठल्याही दैनिकाचा एक रसभरीत स्तंभ लिहीला जाऊ शकेल आणि तो अतिशय लोकप्रियही होऊ शकेल. पण त्यांनी त्यापासून अलिप्तता राखून तसा मोह कटाक्षाने टाळलेला आहे. हा त्यांचा मोठेपणाच म्हणायला हवा. आपली उमेद वा उमेदीचा कालखंड संपला, तर ते सत्य स्विकारायला अतिशय मोठी हिंमत लागते. दोनतीन दशके विधानसभा दणाणून सोडणार्‍या नेत्याला असा मोह सोडणे सोपे नसते. तुलनेने शरद पवार यांनी अनेक मोठी सत्तापदे उपभोगली व अधिकारही गाजवला आहे. त्यांनी मिळवण्यासारखे काही मोठे राहिलेले नाही. सहाजिकच अतृप्तीचा विषय येत नाही. पण हाती काही उरले नसतानाही राजकीय पटावर जुगाराची हाव सुटत नाही, अशी पवारांची गोष्ट आहे. त्यामुळेच मग आपले काही साधण्यापेक्षा इतरांचे काही बिघडवण्याच्या खेळी करण्यात ते दंग असतात. आधी भाजपाला पाठींबा जाहिर करणे, मग तो नाकारणे वा मध्यावधीला सज्ज असण्याचे बोलणे. सत्तेतून बाहेर पडायला हिंमत लागते, ती नव्या शिवसेना पक्षप्रमुखापाशी नाही, इत्यादी गोष्टी पवार कशाला बोलतात? त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस कधी केले होते? ज्याला उमदा उदयोन्मुख तरूण नेता म्हणून घडताना बघितले, त्याचीच आजची शोकांतिका बघणे अनावर झाल्यानेच केशवरावांनी बहुधा आपले मौन सोडले असावे. अर्थात म्हणून पवार हाती चिपळ्या नसतानाही कळलावेगिरी सोडतील, अशी अपेक्षा कोणी करू नये. पण त्यानिमीत्ताने केशवरावांना बोलायला भाग पाडल्याबद्दल पवारांचे अभिनंदन मात्र आम्ही करतो. केशवराव खुप वर्षांनी तुमचे बोल ऐकून कान तृप्त झाले, मन प्रसन्न झाले. धन्यवाद!

(२/३/२०१७)

2 comments:

  1. केशवराव धोंडगे यांचे समग्र भाषण यू -ट्यूबवर उपलब्ध आहे ते ऐकले तर त्यांनी पवारसाहेबाना शालजोडीतले वगैरे काही दिलेले वाटत नाहीत. संपूर्ण भाषण पवारांचे 'जाणंता राजा ' स्वरूपाचे कौतुक करणारेच आहे .सर्वांनी ते अवश्य ऐकावे . केशवरावांच्या चाहत्यांच्या कोंडाळ्यात उभे राहून केलेल्या भाषणातले जेवढे काही ऐकू येते ते सारे स्तुतीपरच आहे . अर्थात त्यात काही गैर नाही . मुख्यमंत्री फडणवीस रायगडावर गेले आणि शिवरायांचे दर्शन घेऊन आले त्यावरची शेरेबाजी मात्र एवढ्या वयोवृद्ध नेत्याला अजिबात शोभादायक नाही . बऱ्याच दिवसांनी भाषण करायची संधी मिळाल्याने काय बोलू आणि काय नको असे होत असावे आणि त्यातून विस्कळित ,सुचेल तसे बोलण्याचा मार्ग वक्ता नकळत स्वीकारतो ,विशेषतः गाजलेल्या ,प्रथितयश वक्त्याला हा मोह आवरता येत नाही . वृत्तपत्रात आलेले वृत्तांत बिनचिपळ्यांच्या नारदाच्या प्रेमात पडले असावेत .

    ReplyDelete