नुकत्याच महापालिका निवडणुका संपल्या आणि त्यात भाजपाने मोठी बाजी मारली होती. बहुतांश महापालिकात आपले महापौर बसवणार्या भाजपाने मुंबईत शिवसेनेशी तुल्यबळ जागा मिळवूनही ऐनवेळी महापौरपदाचा हट्ट सोडला. सेनेला मुंबई आंदण देऊन टाकली असे मानले गेले. त्यामागची कारणेही समोर येऊ शकली नाहीत. पण सेनेला मुंबईत आपले बळ सिद्ध करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. नगण्य असलेला भाजपा मुंबई पालिकेत सेनेला आव्हान देण्याइतके यश मिळवण्यापर्यंत कसा पोहोचला, त्याचाही अभ्यास सेनेने अजून केलेला नाही. किंवा आपल्या कुठे चुका झाल्या, त्याचेही आत्मपरिक्षण करण्याची गरज सेनेला वाटलेली नाही. सेनेसाठी यापेक्षा मोठा धोका असू शकत नाही. कारण विधानसभेपासून पालिका निकालापर्यंत कुठे गडबड झाली, त्याचा आढावाही सेनेने घेतलेला नाही. निदान सेनेतून वेळोवेळी घेतले जाणारे पवित्रे, भूमिका वा व्यक्त होणार्या प्रतिक्रीया भरकटलेल्या वाटतात. तसे नसते तर पंतप्रधानांनी योजलेल्या स्नेहभोजनावर आलेली सेनेची प्रतिक्रीय़ा वेगळीच दिसली असती. आजवरच्या अपमानाचे उट्टे शिवसेना काढणार, यापासून ‘राष्ट्रपती निवडणूकीत मते हवी असतील, तर ‘मातोश्रीवर या’ अशी भाषा सेनेच्या प्रवक्त्याने वापरलेली आहे. ही भाषा अनेक शिवसैनिकांना आवडणारीही असेल, पण त्या भाषेने वा अशा पवित्र्याने होणारे राजकीय नुकसान मात्र मोठे आहे. याचे पहिले कारण मातोश्रीवर येण्याने कोणी छोटा होत नाही किंवा मातोश्रीत बसणारा मोठा होत नाही. तिथे बाळासाहेब ठाकरे नावाच्या स्वयंभू व्यक्तीमत्वाचे वास्तव्य असल्याने जागेला स्थानमहात्म्य प्राप्त झालेले होते. व्यक्तीमहात्म्याने स्थानमहात्म्य निर्माण झालेले होते. तेव्हा त्यांनीही कोणासाठी, ‘हवे तर मातोश्रीवर या’ असली भाषा वापरलेली नव्हती. मग आज अशी भाषा वारंवार कशाला वापरली जाते आहे?
मातोश्रीवर कोणी आल्याने कधी शिवसेनाप्रमुखांचे महात्म्य वाढलेले नव्हते. त्यांचेच महात्म्य इतके मोठे होते, की इतरांना तिथे जाण्यातून स्वत:चे महात्म्य वाढल्याची अनुभुती व्हायची. जगातले अनेक महानुभाव मातोश्रीवर यायचे, ते ती ऐतिहासिक वास्तु बघायला नव्हे. तर तिथे वास्तव्य करणार्या व्यक्तीच्या मोठेपणाला अभिवादन करण्यासाठी तिथे हजेरी लावली जात होती. म्हणूनच तेव्हा कधीही कोणाला ‘मातोश्रीवर या’ असे सांगावे लागत नव्हते. आज तसा हट्ट धरण्यातून त्या वास्तूचे मूल्य कमी केले जाते, याचे तरी भान सेनेच्या तथाकथित प्रवक्त्यांना उरले आहे काय? अशा अरेरावीतून मातोश्रीची प्रतिष्ठा कमी केली जाते. तिथे कोण मान्यवर येत-जात असतात, त्यावर आज त्या वास्तुचे महात्म्य उरले आहे, असेच प्रवक्ते आपल्या शब्दातून सांगत असतात. पंतप्रधान वा अन्य कुठल्या पक्षाचा मोठा नेता, तिथे आला म्हणजे काय मोठे होऊ शकते? अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्षप्रमुखांच्या आग्रहास्तव मातोश्रीवर भोजनाला उपस्थित झालेही. म्हणून युती तुटायचे संकट टळले नव्हते. किंवा दोन पक्षात येऊ घातलेले वितुष्ट संपले नव्हते. मग तेव्हा तरी अमित शहांनी मातोश्रीवर येण्यासाठी इतका अट्टाहास कशाला करण्यात आला होता? आताही कोणी मातोश्रीवर कशाला यायला हवे? महापालिका निवडणूका चालू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरीष्ठ नेता बाळा नांदगावकर तिथे पोहोचले होते. म्हणून काय फ़रक पडला? त्यांना पक्षप्रमुखांनी सौजन्याचीही भेट दिली नाही. पर्यायाने सेना-मनसे यांच्यात कुठलीही तडजोड झाली नाही आणि अखेर पालिका मतदानात सेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही. दोघांच्या भांडणात ३८ जागा गेल्या आणि भाजपाच्या मोठ्या यशाला हातभार लागला. मातोश्रीवर जाऊन नांदगावकर रिकाम्या हाताने परतले आणि सेनेलाही लाभ होऊ शकला नव्हता. मग मातोश्रीवर यायचे कशाला?
शब्दांचे नुसते बुडबुडे उडवून काहीही साध्य होत नसते. शिवसेनाप्रमुख आपल्यावर होणार्या टिकेला उत्तर देण्याविषयी एक उक्ती नित्यनेमाने वापरायचे, ‘सौ सोनारकी एल लोहारकी’! आजची शिवसेना व पक्षनेतॄत्व तीच उक्ती विसरून गेलेले आहे. आपल्यावर कुरबुरणार्या शेकडो प्रतिक्रीया आल्या, तरी बाळासाहेब तिकडे काणाडोळा करीत असायचे. पण एकेदिवशी पलटून असा घणाघाती प्रतिहल्ला करायचे, की सोनाराच्या शंभर हातोड्यांना एकाच घणाने भूईसपाट केले जायचे. अलिकडे शिवसेनेतून सतत कुरबुरीचे सूर लावले जात असतात. पण लोहाराचा घाव घालण्यासाठी घण उचलण्याची कुवतही विसरून गेले आहेत. राजिनामे खिशात असतात. अर्थसंकल्पावर बहिष्कार असतो, अशा कित्येक घोषणा गर्जनांनी सेना स्वत:ला सातत्याने हास्यास्पद करून घेत असते. ‘मातोश्रीवर या’ हा असलाच पोरकटपणा झालेला आहे. राष्ट्रपती निवडणूकीत सर्वाधिक मते भाजपाकडे असली, तरी तेवढ्याच बळावर आपला उमेदवार निवडून आणण्यास ती पुरेशी नाहीत, हे भाजपाला नेमके ठाऊक आहे. म्हणूनच त्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी पंतप्रधानांनी मित्रपक्षांच्या नेत्यांशी स्नेहभोजनाचा कार्यक्रम योजला आहे. त्यात एक मित्रपक्ष शिवसेना असून, त्याच्याही खिशात काही हजार मते आहेत. त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचे राष्ट्रपती निवडणूकीत पारडे झुकू शकते. पण आपल्याखेरीज अन्य कुणाचाच हातभार भाजपाच्या विजयाला लागू शकत नाही, असल्या भ्रमात शिवसेना असेल, तर त्यापेक्षा मोठ बालीशपणा असू शकत नाही. बिजू जनता दल, अण्णाद्रमुक असे पक्षही ती उणिव भरून काढू शकतात. फ़ार कशाला अजून वेळ जवळ आली नसताना, ममतांनी सहमतीचा उमेदवार दिल्यास पाठींबा देण्याची भाषा केलेली आहे. सहाजिकच परिस्थितीलाही महत्व असते आणि म्हणूनच पोरकटपणाला अशा गंभीर राजकारणात स्थान नाही, हे सेनेने ओळखलेले बरे.
उत्तरप्रदेशात तळ ठोकून मोदींनी अफ़ाट यश मिळवले, कारण त्यांना राष्ट्रपती निवडणूकीत अधिक आमदार हवे होते. अशा दुरगामी डावपेचात गुंतलेल्या व्यक्तीला अडवणूक करून वाकवण्याचा खेळ, वाटतो तितका सोपा नाही. बोलघेवडेपणा करून पालिकेत यश मिळाले नाही, तर राष्ट्रपती निवडणूकीत काय साध्य होणार? शिवसेनेशिवाय उद्या राष्ट्रपती निवडून आणण्यात मोदींनी यश मिळवले, तर पुढल्या राष्ट्रीय राजकारणात व युतीच्या डावपेचात सेनेच्या हाती काय शिल्लक उरणार आहे? आपल्याच हातात हुकमाचे पत्ते असल्याच्या भ्रमात अरेरावी करताना, समोरच्याही हातात काहीतरी पत्ते आहेत, याचाही विसर पडून चालत नाही. म्हणूनच सेनेने विरोधात जाऊनही राष्ट्रपती मोदींना हवा तोच निवडून आला, तर भविष्यात कुठल्याही राजकीय गणितामध्ये शिवसेनेची भाजपाला गरज उरणार नाही. किंबहूना मागल्या तीन वर्षात सेनेने प्रत्येक पाऊल असे उचललेले आहे, की भाजपाच्या समिकरणात शिवसेनेमुळे काहीही अडता कामा नये. भाजपाला अडचणीत आणायचा डाव सेनेने खेळावा आणि तो सेनेवरच उलटावा, असे अफ़लातून डाव मातोश्रीतले कोण चाणक्य शोधून काढतात, याचेच हल्ली कौतुक वाटायला लागलेले आहे. ‘मातोश्रीवर या’ ही शब्दावली लौकरच विनोद ठरण्यासारखी आहे. निदान ज्या व्यक्तीच्या महात्म्याने मातोश्री हे नाव ख्यातकिर्त झाले, त्याच्या प्रतिष्ठेला बाधा येऊ नये; याचे भान सेनेचे नेते प्रवक्ते राखतील, इतकीही अपेक्षा यापुढे करायची नाही काय? आपण ऐतिहासिक नाटकाच्या रंगमंचावर डायलॉग मारीत नसून, एकविसाव्या शतकातील वास्तविक राजकारणात वावरत आहोत, याची जाणिव सेनेच्या नेतृत्वाला वा प्रवक्त्यांना कधी येणार आहे? की अगदी असली-नसली विश्वासार्हता व प्रतिष्ठा लयाला गेल्यावर जाग येणार आहे? तसे झाल्यास मातोश्रींचे महात्म्यही शिल्लक उरलेले नसेल.
भाऊ,सेना हस्यास्पद होत चालली आहे माफ करा पण, मातोश्री ला हे निळु फुले महागात पडणार आहेत अस दिसतय जरा काय झाल की वाड्यावर या ???
ReplyDeleteBhau aaj kal nitish Kumar pan modi fan hot chalale ahet. Aaj times now ne sangital ki Nitish ko Modi achhe lagane lage he. Jar Nitish Kumar apala ahankar visrun Modi chya javal yenyacha prayant karat asatil tar, Sena etaka adhmuthel pana ka karate ahe? Bar tari Nitish kumarani modinya bihar made parabhut kel hot, tari pan tyana badalat chalanare rajkaran kalate ahe. Senechi hich khari mothi shokankita banat chalali ahe. Je nete kadhi panchayat samiti audha junku shakat nahit, bhidhan sabha tar tyancha sathi ashakyatali gosht ahe tech lok aaj Sena chalavat ahet.
ReplyDeleteSange vadilanchi kirti to ek murkh...yapeksha adhik bolne uchit tharnar nahi.
ReplyDelete