विधानसभांचे निकाल लागून आठवडा लोटला आणि सत्याची झळ अनेकांना बसू लागली आहे. त्यात उत्तरप्रदेशात भूईसपाट झालेल्या समाजवादी व कॉग्रेस पक्षातली चलबिचल चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पण भाजपाने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री नेमल्याचा गवगवा इतका झालेला आहे, की अन्य पक्षातली उलथापालथ फ़ारशी प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. यात पित्याविरुद्ध बंड पुकारणार्या अखिलेश यादव याच्या डोक्यावर खापर फ़ुटणारच आहे. पण सध्या तरी विस्कटलेल्या कॉग्रेस पक्षात नेतृत्वाला आव्हान देणारे आवाज उठू लागले आहेत. राहुल गांधींच्या खुज्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावले जात आहेच. पण त्यांनी ज्यांची मदत घेतली, त्यांनाही सवाल विचारले जात आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ शहरातील कॉग्रेसच्या मुख्यालयाच्या आवारात, एका पोस्टरने पत्रकारांचे लक्ष वेधून घेतल्यामुळे त्याची ठळक बातमी झालेली आहे. त्या पोस्टरवर प्रशांत किशोर ही व्यक्ती कोणाला आढळल्यास आणून हजर करा आणि पाच लाखाचे इनाम घेऊन जा, असे लिहीलेले आहे. अर्थात सामान्य वाचकाला प्रशांत किशोर ठाऊक असण्याचे कारण नाही. अगदी सामान्य राजकीय कार्यकर्त्यालाही ह्या व्यक्तीची माहिती नसावी. पण राजकारण खेळणार्या व निवडणूका लढवणार्या लोकांना प्रशांत किशोर नेमका ठाऊक आहे. गेल्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांना विजयापर्यंत घेऊन जाणारा आधुनिक चाणक्य अशी त्याची ओळख झालेली होती आणि नंतरच्या काळात त्याने दिल्ली व बिहारमध्ये इतरांना मदत करून मोदीलाटही परतून लावता येत असल्याचे सिद्ध केलेले होते. म्हणूनच त्याला उत्तरप्रदेश पादाक्रांत करण्यासाठी राहुल गांधींनी कामाला जुंपलेले होते. मात्र होते तेही कॉग्रेसने गमावले. म्हणूनच कुणा प्रादेशिक कॉग्रेस नेत्याने चिडून असे पोस्टर पक्षाच्या मुख्यालयात लावलेले असावे.
गेले सातआठ महिने प्रशांत किशोरने कॉग्रेसचा व उत्तरप्रदेशी राजकारणाचा अभ्यास करून, तिथली पक्षासाठीची रणनिती बनवलेली होती. त्यानुसार कॉग्रेसला आणि कॉग्रेस नेतृत्वाला सल्लाही दिलेला होता. त्यापैकी किती सल्ला मानला गेला, हा विषय अलाहिदा आहे. नरेंद्र मोदी असोत की नितीशकुमार असोत, त्यांनी प्रशांतचे सल्ले मानले होते. उलट कॉग्रेसची स्थिती आहे. प्रशांतने अभ्यास केल्यावर जे काही निष्कर्ष काढलेले होते, त्याच्याआधारे त्याने कॉग्रेस कशामुळे हरत होती व कशा मार्गाने जिंकू शकेल, त्याचे आडाखे तयार केलेले होते. त्यात पहिला मुद्दा होता, नेतृत्वाचा! राज्याचे नेतृत्व कोण करणार, ह्या प्रश्नाचे उत्तर देणे भाग होते. त्यात कॉग्रेसने जर राहुल वा प्रियंका यापैकी एकाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पेश केले, तर मतदार प्रभावित होईल अशी त्याला खात्री होती. पण त्याचा हाच पहिला सल्ला व मुद्दा फ़ेटाळून लावण्यात आला. गांधी घराण्यात फ़क्त पंतप्रधान जन्माला येत असल्यानेच प्रशांतची ही सुचना नाकारण्यात आली. परिणामी त्याला पर्यायी उत्तर शोधावे लागले होते. तेव्हा त्याने ब्राह्मण चेहरा पुढे करण्याची सुचना केली. त्याला राहुल सोनियांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे दिल्लीत तिनदा मुख्यमंत्री झालेल्या शीला दिक्षीत असे होते. तेही चुकीचे ठरले, कारण शीला वयोवृद्ध असल्याने तितकी धावपळ करू शकत नव्हत्या. तरीही कॉग्रेसची बुडती नौका वाचवण्याचा आटापीटा प्रशांतने चालूच ठेवला होता. म्हणूनच त्याने आठ महिने आधीच कॉग्रेसी प्रचाराची मोहिम राहुलना घेऊन सुरू केली. किसान यात्रा व त्यात खाटा मांडून गप्पांच्या स्वरूपात राहुलना पेश करण्याचा प्रयास केला. पण संवाद ही राहुलच्या आवाक्यातली गोष्ट नसल्याने, प्रत्येक ठिकाणी एकतर्फ़ी भाषण व नंतर लोकांनी खाटा पळवण्याचा खेळ रंगलेला होता. म्हणूनच ती किसान यात्रा तशीच अर्धवट सोडून देण्यात आली.
त्यानंतर पक्षाची एकण स्थिती व पक्षाची नगण्य संघटना विचारात घेऊन प्रशांत किशोरने समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी त्यानेच पुढाकार घेऊन समाजवादी पक्षाशी प्रारंभिक बोलणीही उरकली होती. तर पक्षाच्या वतीने परस्पर निर्णय घेणारा वा बोलणी करणारा प्रशांत कोण, असा प्रश्न विचारला गेला व त्याचा बेत साफ़ फ़ेटाळून लावण्यात आला. मोदी नितीशना यशाची रणनिती आखून देणार्या कुशल व्यक्तीला कॉग्रेसच्या कालबाह्य झालेल्या ऐतखाऊ नेत्यांनी धारेवर धरले आणि त्याचा बेत उधळून लावला. थोडक्यात दोन महिने आधी जी समाजवादी कॉग्रेस युती आघाडी होऊ शकली असती, तिचा बोर्या वाजला. उत्तरप्रदेशात नाममात्रही संघटना नसलेल्या संघटनेची सुत्रे हाती असलेले दिग्गज कॉग्रेस नेते, प्रशांत किशोरला आपल्या बळावर निवडणूका जिकण्याच्या गप्पा ऐकवत होते. त्यामुळे प्रशांतचे कुठलेही नुकसान व्हायचे नव्हते. पण वेळ हातून निसटत चालली होती आणि निवडणूकांचा मुहूर्त जवळ येत चालला होता. सहाजिकच प्रत्यक्ष उमेदवारांचे अर्ज भरण्याची वेळ येऊन ठेपली, तरी कॉग्रेसकडे उमेदवार ठरलेले नव्हते, की कुठल्या जागा लढवायच्या त्याचाही आराखडा नव्हता. संपुर्ण राज्यभर उभे करायला उमेदवारही कॉग्रेसपाशी नव्हते. पण नेता म्हणून मिरवणार्या प्रत्येक लहानसहान व्यक्तीची मस्ती मात्र सत्तेत बसलेल्यांनाही लाजवणारी होती. सहाजिकच प्रशांत किशोर कॉग्रेसला जितका वाचवू बघत होता, तितकेच ऐतखाऊ कॉग्रेसनेते अधिक मस्तवालपणा करीत होते. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात समाजवादी पक्षाशी हातपाय जोडून जागावाटप उरकण्यात आले आणि त्याचाही पुरता विचका करून टाकण्यात आला. अगदी नेमके सांगायचे, तर प्रशांत किशोरने रणनिती बनवावी आणि कॉग्रेस नेतृत्वाने ती उधळून लावावी, असाच खेळ काही महिने चालला. मग त्याचेच परिणाम निकालातून समोर आले.
प्रशांत किशोर हा विलक्षण बुद्धी लाभलेला होतकरू माणूस आहे. समाजमनाचे बारकावे ओळखून जनमानसाला प्रभावित करणारे मुद्दे पुढे आणण्यात त्याला हातखंडा आहे. त्याचे कौशल्य वापरणार्याला लाभ होऊ शकतो. पण त्यालाच शहाणपण शिकवणार्यांना प्रशांत मदत करू शकत नाही. अहंकार वा अहंमन्यता निवडणूकीत उपयोगाची नसते. तिथे लोकांची मते मिळवायची असतात आणि म्हणूनच लवचिकता निर्णायक असते. तिथेच कॉग्रेस पक्ष व नेतृत्व तोकडे आहे. लोकसभेत पराभूत कशाला झालो व विजय कसा मिळवतात, याचा गंधही नसलेली बांडगुळे त्या पक्षात आज श्रेष्ठी होऊन बसलेली आहेत. त्यामुळेच त्यांना अजून तीन वर्षापुर्वीच झालेल्या पराभवाचा अर्थ उलगडलेला नाही. तर प्रशांत किशोरसारख्या रणनितीकाराचे महत्व त्यांना कसे उमजावे? त्याच्याकडून शहाणपणा शिकून विजयाकडे वाटचाल करण्यापेक्षा त्यांनी एका रणनितीकारालाही कसे मातीमोल करता येते, त्याचे प्रात्यक्षिक घडवले आहे. आता सगळे खापर सामान्य कार्यकर्ता व पाठीराखा प्रशांतवर फ़ोडतो आहे. कारण त्याला प्रशांत पुढे दिसला. पण या चाणक्याने योजलेला प्रत्येक डाव पक्षातूनच उलथवला गेला, हे बिचार्या सामान्य कार्यकर्त्याला ठाऊक नाही. आता त्यावर उठलेल्या प्रतिक्रीयांच्या काळात कॉग्रेस नेते प्रशांतच्या बचावाला पुढे आले आहेत. कारण त्याचे निमूट ऐकलेल्या अमरिंदर सिंग यांना यश मिळाले आहे आणि पुढे हिमाचल व गुजरातमध्ये प्रशांतची मदत कॉग्रेसला हवी आहे. अर्थात अमरिंदर प्रमाणे त्या दोन्ही राज्यात या रणनितीकाराच्या सल्ल्याचे पालन झाले, तरच उपयोग असेल. कारण आता उत्तरप्रदेशात भाजपाने त्याच्या रणनितीवर मात करून नवा पल्ला गाठला आहे. किंबहूना भाजपाने आपली स्वतंत्र रणनिती योजून प्रशांत किशोरला शह दिलेला आहे. बिचार्या प्रशांतची प्रतिष्ठा मात्र यात मातीमोल होऊन गेली आहे.
No comments:
Post a Comment