Thursday, March 30, 2017

भागवत पुराण

mohan bhagwat के लिए चित्र परिणाम

‘सामना’ हे मुखपत्र हल्ली अधिकाधिक हास्यास्पद होण्याच्या दिशेने अतिशय वेगाने वाटचाल करीत आहे. खरे तर मुखपत्र कसे नसावे, याचा आदर्श म्हणूनच त्याकडे बघता येईल. कुठल्याही संघटना वा चळवळीच्या अनुयायांना सातत्याने विविध घडामोडींविषयी पक्षाच्या विचारांचे मार्गदर्शन व्हावे, असा मुखपत्रामागचा हेतू असतो. पण शिवसेनेचे मुखपत्र दिवसेदिवस आपल्या पक्षाला व त्याच्या भूमिकांना हास्यास्पद होण्यासाठीच चालविले जात किंवा कसे, अशी शंका येऊ लागली आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही ते मुखपत्र वादग्रस्त होते. पण या मुखपत्रात नित्यनेमाने काय लिहीले जाते वा कोणती भूमिका मांडली जाते, त्याची महिन्यातून एखाद्या वेळीच बातमी होत असे. आजकाल अन्य वृत्तपत्रांना खाद्य पुरवण्यासाठीचे हे वृत्तपत्र निघत असते. त्यात काय म्हटले आहे, ते लोकांना व शिवसैनिकांना इतर मुख्यप्रवाहातील बातमीतूनच कळते. अर्थात केंद्र व राज्यात शिवसेना सत्तेत असल्यामुळे युतीत बिघाड असेल तर ती बातमी होणारच आणि अन्य वृत्तपत्रे त्याचे रसभरीत वर्णन करणारच. अशा सर्व वृत्तपत्रांना नित्यनेमाने मजकूर पुरवण्याचे काम अलिकडे ‘सामना’ने मनावर घेतलेले आहे. मुखपत्रातून शिवसेनेचे राजकीय हित व हेतू साध्य केले जावेत, अशी किमान अपेक्षा असते. नेमका त्यालाच ‘सामना’तून सुरूंग लावला जातो. त्याच मुखपत्राच्या संपादकांनी आपल्या परीने नवनवे विनोद करण्याचाही सपाटा लावलेला आहे. अलिकडे त्यांनी ‘भागवत’ पुराणाला हात घातला आहे आणि सहाजिकच त्याची राष्ट्रीय माध्यमातही टवाळी झाली. कारण ज्यांना मुंबईतला आपला बालेकिल्लाही जपता आला नाही आणि मुंबईचा महापौर निवडून आणताना एक एक नगरसेवक शोधण्याची नामुष्की दोन दशकानंतर आली, तेच आता राष्ट्रपती ठरवण्याच्या गमजा करू लागले आहेत.

१९९५ पासून आजपर्यंत मुंबईचा महापौर कोण होणार, हे मातोश्रीत ठरायचे आणि त्या नावावर मते पडण्याविषयी कधी जुळवाजुळव करावी लागलेली नव्हती. यावेळीच बहूमताची मारामारी झाली आणि सेनेशी टक्कर घेऊन बरोबरी करून दाखवणार्‍या भाजपाने ऐनवेळी शर्यतीतून माघार घेतल्याने सेनेचा महापौर निवडून येऊ शकला. अन्यथा खुप मारामारी करावी लागणार होती. पण अशा अनुभवातून गेल्यावरही शेखी मिरवण्याची खुमखुमी कमी झालेली नाही. राहुल गांधी जसे सर्वत्र पराभूत झाल्यावरही मस्तीत बोलतात, तशाच भाषेत ‘सामना’वीरांनी राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत यांचे नाव पुढे केले आहे. राष्ट्रपती आणि महापौर यातला फ़रक तरी यांना कळतो किंवा नाही, याची शंका येते. मोहन भागवत हे कोणी शाखाप्रमुख वा विभागप्रमुख नाहीत. ते एका देशव्यापी संघटनेचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या त्याच संघटनेचे काही नियम व प्रघात आहेत. त्यांच्याच मुशीतून भाजपा नावाचा राजकीय पक्ष उदयास आला असला, तरी त्या पक्षात जाणार्‍याला संघामध्ये कुठल्याही पदावर रहाता येत नाही. ज्यांला सत्ता व राजकारणात जायचे आहे, त्याला संघातून मुक्त व्हावे लागते. सहाजिकच मोहन भागवत हे संघाचे सरसंचालक असल्याने अन्य कुठल्या घटनात्मक वा सत्तापदावर जाऊ शकत नाहीत. किंबहूना आजवर कुठल्या सरसंघचालकाने तशी इच्छा व्यक्त केली नाही वा तसे पदही भुषवलेले नाही. आपल्या जुन्या नव्या स्वयंसेवकांना ते अधूनमधून मार्गदर्शन करीत असतात आणि राजकीय कामात लुडबुड करीत नाहीत. सहाजिकच राष्ट्रपतीपदाचा उमेदवार भागवत यांनी होण्याचा विषयच उदभवत नाही. मग त्यांचे नाव अकस्मात पुढे करण्यामागे काय हेतू असू शकतो? की नुसती गंमत म्हणून नुसताच तोंडाळपणा करायचा असतो? असली बकवास करून शिवसेनेला काय मिळते, तेही हल्ली समजेनासे झाले आहे.

भाजपाने आज संसदेत व विधानसभांमध्ये जे बळ संपादन केलेले आहे, त्याच्या बळावर त्याला राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणणे टप्प्यात आलेले आहे. त्यात एनडीए पक्षांची मते गृहीत धरलेली असून, शिवसेनाही त्या हिशोबात आहे. एका अंदाजानुसार शिवसेनेकडे त्यातील २५ हजार मते असू शकतात आणि राष्ट्रपती निवडून येण्यासाठी ५ लाख ४९ हजार मतांची गरज असल्याचे म्हटले जाते. त्यापैकी शिवसेनेने विरोधात जायचे म्हटले, तर एनडीएची मते पाच लाखच उरतात. म्हणजेच मोदींना आणखी ५० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे. थोडक्यात शिवसेनेला गृहीत धरल्यासही २५ हजार मते कमीच होती आणि सेनेला वगळले तर पन्नास हजार मते कमी पडतील. अशा स्थितीत मोदींना थेट पन्नास हजार मते जमवा, असाच इशारा सेनेच्या ‘सामना’वीरांनी देऊन टाकला आहे. सेनेसाठी राष्ट्रपती ही गंमत असू शकते. मोदींसारख्या गंभीर राजकारण्यासाठी तो जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे भागवतांचे नाव सुचवण्याची गंमत करून सेनेच्या जाणत्यांनी मोदींना सावध केले आहे. परिणामी मोदी आता सेनेच्या मतांवर विसंबून रहाणार नाहीत. ते तसे बोलून दाखवणार नाहीत आणि सेनेला चुचकारल्याचे नाटकही रंगवतील. पण शिवसेनेच्या मतांना पर्याय म्हणून मोदी अन्य कुठल्या तरी प्रादेशिक मतांची बेगमी आतापासून करू लागलेले असणार यात शंका नाही. त्यात ओडिशाचे नविन पटनाईक किंवा तामिळनाडूच्या अण्णाद्रमुकची मदत भाजपाला मिळू शकते. बंगालच्या ममतांनीही सहमतीचा उमेदवार असला तर पाठींब्याची तयारी आधीच दाखवलेली आहे. परिणामी त्यात मोदी यशस्वी झाल्यास शिवसेनेच्या राजकीय पाठींब्याची मोदींना नंतर काडीमात्र गरज उरणार नाही. विधानसभेपुर्वी युती मोडून शहा-मोदी जोडीने पहिले पाऊल टाकलेलेच होते. आता संसदेतही सेनेशिवायचे राजकारण शक्य झाले, तर सेनेचे भवितव्य काय असेल?

मोहन भागवत हा विषय बाजूला राहिल आणि राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेला कोणते स्थान असेल? पन्नास वर्षातली शिवसेनेची ख्याती व भूमिका लक्षात घेतल्यास महाराष्ट्राबाहेरचा कुठलाही पक्ष दिल्लीच्या राजकारणात सेनेला सोबत घेणार नाही. कारण मराठी-अमराठी वादामुळे असे पक्ष कायम सेनेच्या विरोधातच राहिलेले आहेत. भाजपा त्याला अपवाद होता. पण त्यालाही सेनेची गरज राहिली नाही, तर राष्ट्रीय राजकारणात सेना एकाकी पडणार आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक दारात उभी असल्याने आता महाराष्ट्रात भाजपाला मध्यावधीचे धाडस करता येणार नाही. पण जुलैमध्ये ते मतदान संपले, मग विधानसभा बरखास्त करण्याचा जुगार भाजपा खेळू शकतो. तेव्हा अन्य पक्षातून ५० पेक्षा अधिक आमदार भाजपात उमेदवारी मिळवण्यासाठी जातील आणि त्यात सेनेचेही काही असतील. कारण त्यांनाही निवडून आणणारा नेता व पक्ष हवा असतो. विधानसभेनंतरच्या दोन वर्षात सेनानेतृत्वाने त्याची चुणूक एकाही मतदानात दाखवलेली नाही. उलट देवेंद्र व नरेंद्र यांनी त्याची ग्वाही निकालातूनच दिलेली आहे. अशा स्थितीत मध्यावधी घेण्याचा जुगार भाजपा खेळला, तर सेनेला असलेले आमदार टिकवणेही अशक्य असल्याचे ताज्या निकालांत दिसून आलेले आहे. मोदीलाट कायम आहे आणि मोदींशिवायही फ़डणवीस महाराष्ट्रात मते सेनेपेक्षा अधिक मिळवतात, हे सिद्ध झालेले आहे. सहाजिकच भागवतांना राष्ट्रपती करण्यापेक्षा आपले असलेले राजकीय अस्तित्व टिकवण्याला सेनेमध्ये प्राधान्य असायला हवे. त्याचे कुठलेही भान दिसत नाही. नाक्यावरच्या पोरांनी टपोरीगिरी करावी, तशी उथळ निरर्थक मुक्ताफ़ळे नित्यनेमाने उधळल्याने अन्य वृत्तपत्रे प्रसिद्धी देतात, पण मते मात्र कमी होत चालली आहेत. म्हणूनच भागवत पुराणाची कथा पुरे करून राजकारणात थोडा गंभीरपणा दाखवावा. अन्यथा मायावती मुलायम व्हायला वेळ लागणार नाही.

7 comments:

 1. भाऊ,फालतु राजकारण करुन व मुर्खासारख वागुन सेना पायावर धोंडा मारुन घेत आहे विधानसभा निवडनुकीत जर भाजपाला १४४ जागा सोडल्या असत्या तर काय फरक पडला असता ??? असो महापालिका निवडनूकीत भाजपाला सांभाळुन घेतले असते तरी मुठ झाकलेली राहिली असती आता थेट राष्ट्रपती निवडनुकीला हात ??? या पेक्षा दर राष्ट्रपती निवडनुकीला उभारणारे G T Kambale ना तर पाठिंबा द्या म्हणाव

  ReplyDelete
 2. उधोजींचे मन्सबदार रडतकुमार राऊत यांना उधोजींना महाराष्ट्राचा अखिलेश बनवण्याची फारच घाई झाली आहे.

  ReplyDelete
 3. "राष्ट्रपती आणि महापौर यातला फ़रक तरी यांना कळतो किंवा नाही, याची शंका येते" खरे आहे.

  ReplyDelete
 4. "सामना", मलपत्र म्हणा की.

  ReplyDelete
 5. विपरीत बुध्दी याशीवाय दुसरे काय ?

  ReplyDelete
 6. सामनावरचा मार्मिक लेख

  ReplyDelete
 7. संजू दादा दिल्लीतल्या पवार नाक्यावर नित्य नेमाने भेट देत असतात. नाक्या वरच्या लोकांचे संघा बद्दलचे प्रेम जग जाहीर आहे...

  ReplyDelete