Saturday, March 18, 2017

मोदींना कसे हरवावे?

modi with modi के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेश व अन्य विधानसभांची मतमोजणी संपून निकाल आले, तेव्हा प्रत्येक वाहिनीवर सविस्तर चर्चा रंगल्या होत्या. त्यात यापुढे कॉग्रेस वा अन्य विरोधी पक्ष मोदींना कसे रोखू शकतील, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. त्यात मोदीसमर्थक असलेले व्यावसायिक सुनील अलघ यांनी व्यक्त केलेले मत मोठे मजेशीर होते. हा माणुस व्यावसायिक आहे आणि व्यापारी सल्ले देणारा आहे. यामुळेच त्या़चा सल्ला लाभदायक असू शकतो. तोट्यात टाकणारा सल्ला त्याला देताच येणार नाही. कारण लाभाचे सल्ले देणे हाच त्याचा व्यवसाय आहे. अर्थात हा माणूस आज मोदीसमर्थक झालेला नाही. लोकसभेच्या निवडणूका होण्यापुर्वी व राष्ट्रीय राजकारणात मोदींनी झेप घेतली, तेव्हापासून सुनील अलघ मोदीसमर्थक आहे. तेव्हाही अनेक राजकीय विश्लेषकांनी त्याच्या विविध मतप्रदर्शनाची यथेच्छ टवाळी केली होती. म्हणून तो खोटा ठरला नाही. उलट त्याने दिलेले सल्ले तेव्हाच अन्य पक्षांनी मानले असते, तर मोदींना इतके यश मिळाले नसते. किंवा आज मोदी नावाचे आव्हान इतके अक्राळविक्राळ झाल्याचे भय राजकीय पक्षांना भेडसावू शकले नसते. तर अशा सुनील अलघने उत्तरप्रदेश निकालानंतर केलेले चमत्कारीक विधान म्हणजे मोदींना आता फ़क्त मोदीच हरवू शकतात. विरोधकांमध्ये मोदींना पराभूत करण्याची चतुराई नाही की शक्ती नाही. म्हणूनच आपल्या यशाला रोखण्य़ाची शक्ती मोदींमध्ये आहे, असे त्याला सांगायचे होते. पण मोदीच स्वत:ला कशाला पराभूत करतील? मोदी स्वत:ला पराभूत करण्याची शक्यता नाही. पण अहंकाराने त्यांनी चुका केल्या तर ते पराभव ओढवून आणतील, असे त्याला सुचवायचे आहे. जे राहुल गांधींनी कॉग्रेससाठी करून दाखवले आहे. उलट मोदी प्रत्येक पावलावर अत्यंत सावधपणे वाटचाल करीत असतात.

शेवटी मोदी हा काही दैवी चमत्कार नाही. त्याने आपल्या मेहनतीतून व सावधपणातून इतकी मजल मारली आहे. पण लागोपाठ इतके यश मिळवल्यानंतरही मोदींची भाषा व कृती बघितली, तर अहंकारापासून हा माणूस मैलोगणती दूर असल्याचीच साक्ष मिळते. यश तात्पुरते असते आणि थोडीशी चुकही गर्तेत घेऊन जाते; याचे पुर्ण भान असलेला हा नेता आहे. म्हणूनच ताज्या निकालानंतर त्याने यशाने मुजोर होऊ नये तर झुकावे, असा सल्ला आपल्या पाठीराख्यांना दुसर्‍याच दिवशी दिला होता. मेहनतीला फ़ळ आले मग फ़ळांनी बहरलेले झाड झुकत असते, असे मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले. आपलीच पाठ थोपटून घेण्यापेक्षा त्यांनी त्याच भाषणात २०२२ साली देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आहे, त्यासाठी कटिबद्ध होण्याचा संदेश पाठीराख्यांना दिला. यश मिळाले, म्हणून फ़ुशारून जाण्यापेक्षा अजून काहीतरी करायचे राहुन गेल्याची आकांक्षाच पुढल्या संघर्षाला चालना देत असते. मोदींमध्ये त्याचा पुरेपुर साक्षात्कार होतो. पक्षाच्या संसद सदस्यांनी त्यांचा सत्कार केला, तर तिथे त्यांनी काय संदेश दिला? ‘न बैठुंगा ना बैठने दुंगा.’ अशा वाक्यांची टवाळी करण्यात धन्यता मानणारे कुठलीही बाजी मारू शकत नाहीत. अशा वक्तव्यावर काम करणारेच काही करू शकत असतात. अखंड व अहोरात्र राबण्याची क्षमता, ही मोदींची शक्ती आहे. अशा माणसाला पराभूत करण्यासाठी त्याच्यापेक्षा अधिक राबण्याची व अधिक कष्ट उपसण्याची तयारी आवश्यक असते. तिथेच बाकी सर्व नेते व पक्ष लंगडे पडत आहेत. मिळालेल्या यशापेक्षा आधीच्या प्रयत्नात राहिलेल्या त्रुटी व उणिवांचा विचार मोदी करतात. हे त्यांचे यशाचे खरे रहस्य आहे. दिल्ली बिहारच्या यशाला दोन वर्षे होत आली, तरी केजरीवाल वा लालू-राहुल त्या नशेतून अजून बाहेर पडलेले नाहीत. मोदी उत्तरप्रदेशच्या यशाची नशाही चढू देत नाहीत. हाच निर्णायक फ़रक आहे.

अशा स्थितीत आता मोदी विरोधातील पक्षांनी एकत्र येण्याची भाषा सुरू झाली आहे. पुरोगामी विचारांचा बोजवारा उडालेला असताना, पुन्हा त्याच कालबाह्य भूमिकेतून एकत्र येण्याची कल्पनाच हास्यास्पद आहे. पण तसा काहीसा विचार सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. मोदीविरोध म्हणजे पुरोगमीत्व असू शकत नाही. विचारसरणीच्या आधारे व मूलभूत तत्वांच्या अनुषंगाने राजकारण झाले, तरच काही मजल मारता येईल. भ्रष्टाचारामुळे निवडणूक लढवण्यावर बंदी असलेले लालू पुरोगामी असतात व मुस्लिमांच्या जिहादी मानसिकतेला चुचकारणारे सेक्युलर असतात. ह्या थोतांडाला मतदार नाकारत असताना, तेच नाटक घेऊन सर्व पक्ष एकत्र आले, म्हणून कितीसा फ़रक पडणार आहे? उलट त्यामुळे मोदींची बाजू अधिक बळकट होईल. कारण विविध पक्षात विभागला जाणारा मतदार फ़क्त मोदीविरोधी नसतो, तर एकमेकांच्याही विरोधातला असतो. अशा विविध पक्षांतला मतदारही एकत्रिकरणाने मोदींच्या बाजूला जाऊ शकतो. किंबहूना मागल्या तीन वर्षात संधीसाधू सेक्युलर नाटकाला कंटाळून मतदार मोदींच्या गोटात चालला आहे. तो हिंदूत्ववाद वा राष्ट्रवाद असल्या गोष्टींसाठी मोदींकडे झुकलेला नाही. मोदी विरोधातील संधीसाधू सत्तालंपटतेच्या विरोधातूनच त्याला मोदींकडे जाण्याची वेळ आलेली आहे. तत्वशून्य राजकारणाने त्याला मोदींचे हात बळकट करण्याची वेळ आणली. त्याचा जितका व्यापक प्रयत्न होईल, तितकेच मोदींचे बळ वाढणार आहे. मोदींना पराभूत करण्याचा एकमेव सुटसुटीत मार्ग सुनील अलघ यांनी सुचवलेला आहे. तो म्हणजे मोदींना चुका करण्याची संधी देणे आणि त्यातूनच मोदींच्या राजकीय विजयाचा कपाळमोक्ष होऊ शकतो. पण तेही काम इतके सोपे नाही. मोदी तर पदोपदी सावधपणे पावले उचकत असतात आणि चुकाच होऊ नयेत याची काळजी घेतात. झालीच एखादी चुक तर तातडीने त्यात सुधारणा करण्याची लवचिकता दाखवतात.


No comments:

Post a Comment