Monday, March 13, 2017

पापण्यांवर अंजन

jetly on TV के लिए चित्र परिणाम

गेल्या दोनतीन दिवसात वृत्तवाहिन्यांवर उत्तरप्रदेशच्या निकालांचे विश्लेषण चालू आहे. त्यात अन्य चार राज्यांच्या निकालाकडेही बघा, म्हणून कॉग्रेससह काही पुरोगामी नेते प्रवक्ते गयावया करताना दिसत आहेत. आपण किती बुडालो वा कसे बुडालो, त्याची त्यापैकी कोणालाही फ़िकीर दिसत नाही. यापेक्षा त्यांच्या विनाशाची कुठली अन्य लक्षणे असू शकतात? १४ लोकसभा मतदारसंघातले निकाल त्यांना महत्वाचे वाटतात आणि ८५ लोकसभा मरदारसंघात त्यांचा धुव्वा उडाला, त्याची गंभीर दखलही घ्यावी असे त्यांना वाटत नसेल, तर मोदीच कशाला; कोणीही अशा पुरोगाम्यांना पराभूत करण्यासाठी विशेष कष्ट घेण्याची गरज उरलेली नाही. या विश्लेषणात उत्तरप्रदेशचे कौतुक होणे स्वाभाविक आहे. कारण तिथेच ८० लोकसभा जागा निवडल्या जातात आणि त्यापैकी ७३ जागा जिंकून भाजपाने एकहाती बहूमत पावणेतीन वर्षापुर्वी मिळवले होते. सहाजिकच आज तिथे तितकीच मते व अधिक जागा भाजपाने जिंकलेल्या असतील, तर त्यात २०१९ च्या पाया घातला जातो. हे वास्तव भविष्याचा इशारा देणारे असते. तो इशारा कॉग्रेससह अन्य पुरोगामी पक्षांना धोक्याचा संकेत देतो आहे. पण त्याविषयी बोलूही नये, असे या लोकांना वाटते आहे. स्पष्ट सांगायचे जर घाटात जे इशारे असतात, त्याला कुणा ड्रायव्हरने शिव्याशाप द्यावेत, अशाच या प्रतिक्रीया आहेत. घाटात धोक्याचे वळण, अपघाती क्षेत्र वा वेडीवाकडी वळणे, असे इशारे अपघात टाळण्यासाठी दिलेले असतात. त्याचाच इन्कार करणार्‍याला कोण वाचवू शकतो? आपण पराभूत झालोत, यापेक्षाही मोदी व भाजपा जिंकलेला नाही, असे लोकांना पटवण्यात या लोकांना अधिक रस असेल, तर ते स्वत:चीच फ़सवणूक करीत असतात. त्याची फ़ळे त्यांनाच भोगावी लागणार ना? अशा काळातही अर्थमंत्री अरूण जेटलींनी केलेले विश्लेषण विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. पण त्यांनी त्यासाठी डोळे उघडले तर ना?

डोळ्यात अंजन हा शब्द आपल्याकडे प्रचलीत आहे. त्यामुळे डोळ्यातील कचरा साफ़ होतो आणि समोरचे स्पष्ट दिसते. मात्र ते अंजन डोळ्यात वा बुब्बुळापर्यंत पोहोचले पाहिजे. डोळा नाजूक असतो आणि कुठल्याही बाह्य अतिक्रमणाला जोरदार प्रतिकार करतो. सहाजिकच ज्याच्या डोळ्यात अंजन घातले जाते, त्याने त्यासाठी सहकार्य करावे लागते. किंवा लहान मुल असेल तर जबरदस्तीने अंजन घालावे लागते. अशावेळी कोणी घट्ट डोळे बंद करून बसणार असेल, तर अंजन पापण्यांना लागते आणि डोळ्यांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. नेमकी अशीच काहीशी स्थिती पुरोगाम्यांची व कॉग्रेसची झाली आहे. काही प्रमाणात इथल्या शिवसेनेचीही तशीच अवस्था आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये. अरूण जेटलींनी कोणते अंजन डोळ्यात घालण्याचा प्रयास केला आहे? बाकी तमाम भाजपा नेते नरेंद्र मोदींना व त्यांच्या लोकप्रियतेला उत्तरप्रदेशी यशाचे श्रेय देत असताना, जेटली मात्र त्याचे श्रेय राहुल गांधी वा कॉग्रेसच्या धोरणाला देत होते. मागल्या काही वर्षात कॉग्रेसने वा त्याच्या तथाकथीत युवा नेतृत्वाने आपली जागा भाजपासाठी मोकळी केली. धुर्तपणे मोदी तीच जागा व्यापत चालले आहेत, त्याचे उत्कृष्ठ विवेचन करताना जेटली यांनी कॉग्रेसचा मूळ मतदार कोण, त्याचाही खुलासा केलेला होता. गरीब, दलित, पिछडा वा ग्रासलेला भारतीय वर्ग, हा कायम कॉग्रेसचा पाठीराखा राहिलेला आहे. आपल्याला कॉग्रेसच गर्तेतून बाहेर काढू शकेल, ही आशा धरून देशाच्या कानाकोपर्‍यातील गरीबाने सतत कॉग्रेसकडून अपेक्षा बाळगलेल्या होत्या. अगदी पुरोगामी समाजवादी, कम्युनिस्ट पक्ष सुद्धा त्याला धक्का लावू शकत नव्हते. पुढल्या काळात त्याच पक्षांनी हळुहळू कॉग्रेसकडून हा मतदारवर्ग हिसकावून घेत आपली जागा निर्माण केली. तेव्हा भाजपा वा पुर्वीचा जनसंघ त्या स्पर्धेतही नव्हता. कारण त्या पक्षाची टवाळी शेठजी भटजींचा पक्ष अशी होत राहिली.

मध्यंतरी देशात व जगात मोठे बदल झाले आणि गरीबांचा कैवारही घेणार्‍यात कॉग्रेससह अन्य पक्ष भागिदार झाले आणि सत्तेकडे सरकण्यासाठी भाजपालाही गरीबांच्या बाजूने उभे रहाण्याची वेळ आली. त्यांनी त्याप्रमाणे आपल्या धोरण कार्यक्रमात फ़ेरफ़ार करून गरीबी हटावचा अजेंडा पत्करला. त्यासाठी त्या विविध समाज, जाती व घटकांमध्ये आपले बस्तान बसवण्याचा चंग बांधला. अशा वर्गातले नवे नेतृत्व उभे केले आणि नरेंद्र मोदी त्याच वर्गातून आलेला धाडसी नेता आहे. याच कालावधीत कॉग्रेस व पुरोगामी पक्षात मात्र गरीब पिडित व दलित वर्गाचे नेतृत्व मागे पडून सुखवस्तु मध्यमवर्गातील सुशिक्षित व पुस्तकी नेतृत्व पुढे येत गेले. तळागाळातल्या वर्गाविषयी पोटतिडकीने बोलणारे, पण त्याच वर्गाच्या खर्‍या समस्या व वेदनेविषयी पुर्णपणे अजाण असलेले हेच नेतृत्व, मागल्या दोन दशकात पुरोगामी विचारसरणीचे सुत्रधार होऊन गेले. त्यांना वास्तवातील यातना वेदना वा दु:ख जाणून घेण्याची गरज वाटली नाही. पुस्तकी वा अभ्यासपुर्ण अहवालातून जनता समजून घेण्यातच त्यांना रस असतो. म्हणूनच पुरोगामी चळवळ वा राजकारण वास्तव जीवनापासून दुरावत गेले आणि पर्यायाने खर्‍या समाजापासूनही तुटत गेले. म्हणूनच नोटाबंदीने त्रास होत असला तरी गरीबाचा त्या निर्णयाला मिळत असलेला अपुर्व पाठींबा, त्यांना बघता आला नाही. पर्यायाने सगळे पुरोगामी खर्‍याखुर्‍या गरीब पिडीतापासून खुप दूर निघून गेले. तीच जागा मोदी व्यापत गेले. आपला हाच एकमेव कैवारी असल्याची धारणा लोकसभेच्या प्रचारातून निर्माण झाली होती. नंतर मोदी सरकारच्या निर्णय व योजनातून मोदी अधिकधिक त्या गरीबाच्या नजिक येत गेले. तर त्याच निर्णयाला टोकाचा विरोध करून पुरोगाम्यांनी मतदाराला जणू मोदी कळपात ढकलून दिले. आपला पायाच या लोकांनी मोदींना बहाल केला. ही उत्तरप्रदेशची एक वास्तविकता आहे.

राष्ट्रवादाविषयी बुद्धीमंतांची संकल्पना व सामान्य जनतेची कल्पना, यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. नेहरू विद्यापीठात ज्या घोषणा झाल्या व वादळ निर्माण झाले, त्याचे समर्थन पंडित नेहरू वा इंदिराजींनी कधीच केले नसते. पण डाव्या नेत्यांपासून राहुलपर्यंत तमाम पुरोगामी कन्हैया वा उमर खालिदच्या पाठराखणीला पोहोचले. त्यातून त्यांनी जनमानसातल्या राष्ट्रवादाची मक्तेदारीच भाजपाकडे सोपवली. ह्या दोन अशा महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांनी २०१४ नंतर मोदींना आपली प्रतिमा उंचावण्यास मोठा हातभार लावला. कोट्यवधी मतदाराला अशारितीने कॉग्रेस व पुरोगाम्यांनी निराश करून हाकलून लावले असेल, तर त्याने जायचे कुठे? आजवर त्याच्या या भावना कॉग्रेसनेच जोपासल्या होत्या आणि त्याच्या दुखण्यावर पुरोगामीच फ़ुंकर घालत होते. काळापैसा व अतिश्रीमंतांची मुजोरी यावर प्रवचने देणारेच नोटाबंदीच्या विरोधात कंबर कसून उभे राहिले; ते लोकांना भांडवलदारांचे बगलबच्चे वाटले, तर नवल नव्हते. अशा दोन अलिकडल्या महत्वपुर्ण गोष्टींनी मोदींना तळगाळातील मतदाराच्या घरात नेऊन पोहोचवले. तोच मतदार घराबाहेर काढून मतदानकेंद्रात मोठ्या संख्येने येईल, याची सज्जता अमित शहांनी केली. बाकी निकाल आपल्या समोर आहेत. पण ह्या वास्तवाकडे बघायचे कोणी? हे अतिशहाणे कबरस्तान स्मशानात ठिय्या देऊन बसले होते. मतदानकेंद्राकडे बघायलाही त्यांना वेळ नव्हता. मतदाराला जिंकणेच ज्यांना महत्वाचे वाटत नाही, ते निवडणूका कसे जिंकणार? त्यांना अन्य कोणी हरवण्याची तरी काय गरज आहे? आपलीच जागा मोदींना मोकळे करून देतात, त्यांना भाजपाने हुसकावून लावण्याचे तरी कुठे कारण उरते? हे अन्य कोणी विश्लेषक सांगत नव्हता. मोदींचा निकटचा सहकारीच समजावतो आहे. पण त्याने घातलेले अंजन डोळ्यात पडायला तर हवे? आम्ही डोळेच उघडणार नसल्याचे निर्धार करून बसलोत ना?

4 comments:

  1. काहि प्रमाणात ' शिवसेना ' ?? शिवसेनानेत्रुत्व ह्या गोष्टि समजण्यापलिकडेच गेले आहे. बाळासाहेबान्कडून नुसता वारसा आलाय पण ' समज 'असण्याबाबतीत काय ?

    ReplyDelete
  2. Right analysis . JNU issue badly affects on the performance of congress. Ideas of nationalism of common man & intellectuals are different . How can we agree With students who are shouting " bharat tere tukde honde insha alla 2" . I have discussed this with friends but nobody agree on rahuls stand.

    ReplyDelete
  3. भाऊ,अस ऐकायला मिळतय की सामनात छापलयकी स्मशानात ३२५ कमळ उमललीत यावर आपले मत काय ??? मटा लोकसत्ता च्या संपादकीय च्या आपण चिंद्या केल्यात सामनाच्या वैचारिक दिवाळखोरीवर आपले मत अपेक्षित

    ReplyDelete