अलिकडल्या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठे यश संपादन केल्यामुळे संपुर्ण देशात अन्य पक्षांचे धाबे दणाणलेले आहे. त्यातूनच पुढल्या लोकसभेपुर्वी देशव्यापी सर्वच पक्षांची मोदी विरोधातील एकजुट वा महागठबंधन होण्याची चर्चा लगेच सुरू झालेली होती. पण असे सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपाविरोधी मतविभागणी कसे टाळू शकतील, हा यक्षप्रश्न राजकीय पंडितांना सुटलेला नाही. कारण अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष असून, त्यांना आपल्या राज्यात वा बालेकिल्ल्यात अन्य कोणी स्पर्धक नको आहेत. म्हणूनच तर दोन वर्षापुर्वी जनता परिवार गोळा करण्याचा झालेला प्रयत्न मुलायमसिंग यांनीच हाणुन पाडला होता. लोकसभेतील भाजपाच्या दणदणित यशानंतर पुर्वाश्रमीच्या जनता पक्षीय समाजवादी लोकांनी जनता परिवार म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्याला मुलायमसिंग हजर होते. त्यांचेच राज्य मोठे व ज्येष्ठताही त्यांच्यापाशी असल्याने, नितीशपासून देवेगौडापर्यंत सर्वांनी नव्या जनता पक्षाच्या घोषणेची जबाबदारी मुलायमवर सोपवलेली होती. पण हा एकाधिकार त्यांनी वापरला नाही आणि तशी एकजुट होऊ दिली नाही. परिणामी लालू व नितीश यांना दोघांच्याच एकजुटीवर बिहार लढवावा लागला. तिथेही मुलायमनी समाजवादी पक्षाचे उमेदवार उभे करून अपशकून केला होता. म्हणूनच तो राग मनात ठेवून तीन महिन्यापुर्वी मुलायमनी केलेल्या एका अशाच सोहळ्यावर नितीशनी बहिष्कार टाकला होता. या बेबनावाचे एकमेव कारण म्हणजे या प्रभावी नेत्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात अन्य कुणाचा शिरकाव मित्र म्हणूनही नको आहे. मग देशातले दोनतीन डझन पक्ष मोदी विरोधात एकत्र कसे यायचे? ही बाब अशक्य असल्याने सध्या तरी मोदी व त्यांचे विश्वासू अमित शहांना अशा बड्या आघाडीची अजिबात चिंता नाही. त्याकडे पाठ फ़िरवून त्यांनी अन्य राज्यात आपला पाया विस्तारण्याची मोहिम हाती घेतलेली आहे.
यापैकी ओडिशा व बंगाल राज्यात भाजपाने आधीपासूनच आपले पाय रोवले आहेत आणि सध्या प्रभावक्षेत्र विस्तारण्याचे काम जोरात सुरू आहे. पण याच मोहिमेत भाजपाने तामिळनाडू या दक्षिण टोकाकडेही खास लक्ष पुरवलेले आहे. तिथे दिर्घकाळ हुकूमत गाजवणारे करुणानिधी वृद्धापकाळामुळे निष्क्रीय झालेले आहेत, तर त्यांच्या कडव्या प्रतिस्पर्धी जयललितांचे निधन झालेले आहे. त्याच्या परिणामी दक्षिणेतील हे मोठे राज्य सध्या नेतृत्वहीन झालेले आहे. गेल्या दोनचार महिन्यात त्याची सातत्याने प्रचिती येत राहिली आहे. त्याचाच लाभ उठवून तिथे पुन्हा राष्ट्रीय पक्षाचे स्थान निर्माण करण्याची भाजपाची महत्वाकांक्षा आहे. त्यापैकी पहिले पाऊल म्हणून नव्या पिढीला प्रभावित करायची योजना आहे. अर्धशतकाहून अधिक काळ तिथे कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला आपले बस्तान बसवणे शक्य झालेले नाही. १९६७ सालात द्रमुककडून कॉग्रेस पराभूत झाली. त्यानंतर कॉग्रेसला कोणीही प्रभावशाली नेता मिळाला नाही आणि द्रमुकतून फ़ुटलेल्या अण्णाद्रमुकला हाताशी धरून केलेल्या मतलबी राजकारणात, कॉग्रेसचा उरलासुरला पाया उखडला गेला. सगळे राजकारण प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेले. डाव्या पक्षांना एकेकाळी थोडेफ़ार स्थान होते. त्यांनी तशाच तडजोडी करीत आपला अस्त घडवून आणला. अशा स्थितीत गेल्या लोकसभेत भाजपाने प्रथमच एक जागा जिंकून, आपला पाया घातला आहे. आता करुणानिधी व अम्माच्या अस्तानंतर तोच पाया विस्तारण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. त्याची एक मोहिम उच्चशिक्षण घेणार्या कॉलेज विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात ओढून द्रविडी अस्मितेतून बाहेर काढणे अशी आहे. तर दुसरी मोहिम राजकीय आघाडीवर स्वत:च्या बळावरच पाया विस्तारत जाण्याची आहे. त्यातले महत्वाचे पाऊल १२ एप्रिल रोजी टाकले जाणार आहे. कारण तेव्हा तामिळनाडूतली महत्वाची पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे.
जयललिता यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या या जागेसाठी १२ एप्रिल रोजी मतदान व्हायचे असून, ती लढत चौरंगी व्हायची होती. पण भाजपाने त्यात उडी घेतल्याने आता पंचरंगी लढत होईल. जयललितांचा वारसा सांगणार्या तीन गटांनी त्यात शक्ती पणाला लावलेली आहे. माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम यांच्याप्रमाणेच शशिकला गटानेही उमेदवार टाकला आहे. त्यातच आत्याचा राजकीय वारसा घराण्यात असावा अशी भूमिका घेऊन अम्माची भाची दीपा जयकुमार मैदानात उतरली आहे. म्हणजे सत्ताधारी अण्णाद्रमुकचे तीन उमेदवार मैदानात आहेत. खेरीज विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही आपला उमेदवार टाकला आहे. अम्माच्या निधनानंतर अण्णाद्रमुककडे बहूमत असले तरी लोकांचा पाठींबा शिल्लक नाही, हे दाखवण्याची द्रमुकला ही अपुर्व संधी वाटते आहे. अम्माच्या निधनामुळे व करूणानिधींच्या निवृत्तीमुळे आता कोणीही प्रभावी प्रादेशिक नेताच तामिळनाडूत शिल्लक उरला नाही, असा सिद्धांत मांडण्यासाठी भाजपा पैदानात उतरला आहे. हीच भाजपाची दक्षिणेची सर्वात महत्वाची राजकीय मोहिम असणार आहे. नुसता उमेदवार भाजपाने उतरवलेला नाही. खरेतर तोच सर्वात प्रभावी उमेदवार ठरण्याचीहीन शक्यता आहे. कारण भाजपाच्या याच उमेदवाराला तामिळनाडूतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्याने पाठींबा दिलेला आहे. रजनीकांत हा आजचा सर्वात लोकप्रिय तामिळ सुपरस्टार असून, त्याने भाजपा उमेदवार गंगाई अमरन यांना खास घरी बोलावून निवडणूकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे तसे फ़ोटोही सोशल मीडियात गाजू लागले आहेत. अमरन हे संगीतकार असून लोकसभा मतदानापुर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता तेच उमेदवार असून, रजनीकांतच्या शुभेच्छा म्हणजे आपण आर के नगरचे मतदार असतो, तर अमरन या भाजपा उमेदवारालाच मत दिले असते, असे सांगणे आहे. याचा अर्थ काय घ्यायचा?
गेली दोन दशके कमला हासन व रजनीकांत हे दोघेही तामिळी सुपरस्टार आहेत. त्यात हासन अधुनमधून राजकीय वा सार्वजनिक विषयावर मतप्रदर्शन करतो. पण रजनीकांत मात्र पुर्णपणे राजकारणापासून अलिप्त आहे. १९९६ सालात जयललिता मोकाट असताना संतापलेल्या रजनीकांतने द्रमुक व टिएमसी या पक्षांच्या आघाडीला खुलेआम पाठींबा देऊन, राजकीय मतप्रदर्शन केलेले होते. अन्यथा त्याने कटाक्षाने राजकारणापासून अंतर राखलेले आहे. असा माणूस अकस्मात भाजपाच्या उमेदवाराला पोटनिवडणूकीत शुभेच्छा देण्यास पुढे येऊ शकत नाही. त्यामागे काही योजना असू शकते. म्हणजे असे, की रजनीच्या शुभेच्छांवर पोटनिवडणूकीत भाजपाचा उमेदवार द्रविडी राजकीय उमेदवारांना पराभूत करून निवडून आला, तर तो भाजपापेक्षाही त्या सुपरस्टारचा निर्णायक विजय असेल. मतदारांनी रजनीला राजकारणात उतरण्यास दिलेला तो स्पष्ट कौल असेल. तसाच निकाल लागला तर रजनीने भाजपाचे तामिळनाडूतले नेतृत्व करण्यालाही दिलेला तो स्पष्ट कौल मानला जाऊ शकेल. लोकसभा प्रचारासाठी चेन्नईला आलेल्या मोदींना तेव्हा रजनीकांतने अगत्याने भेट दिली होती व त्यांचे आपल्या घरी मनपुर्वक स्वागत केलेले होते. आता तर त्याच्याही पुढे जाऊन त्याने भाजपा उमेदवाराला शुभेच्छा देत भाजपाचे खुले समर्थन केले आहे. त्याला योग्य प्रतिसाद मिळाल्यास, अनेक पक्षी एकाच दगडात मारले जाणार आहेत. द्रविडी पक्षांचा राजकीय प्रभाव संपल्याचा तो संकेत असेल. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही द्रविडी पक्षांपेक्षा मतदार रजनीला प्रतिसाद देत असल्याची खातरजमाच होऊन जाईल. पण त्याचवेळी द्रविडी नसलेल्या राष्ट्रीय पक्षाचा नेता म्हणून लोक रजनीला स्विकारण्यास राजी असल्याचेही स्पष्ट होऊन जाईल. रजनीकांतच्या शुभेच्छा म्हणूनच अंधारातून आलेल्या रातराणीच्या सुगंधासारख्या ठरण्याची आशा भाजपाने बाळगलेली असावी
No comments:
Post a Comment